सौदा (भाग दुसरा..अंतिम भाग)

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
(वाचकांच्या आग्रहाखातर कथा पुढे वाढवत आहे.)
बेल वाजली तशी अरुंधती भानावर आली. तिने तोंड पुसलं, दिवे लावले. बोटांनीच केस सारखे केले नि दार उघडलं. दारात दर्शन उभा होता..पराभुतासारखा..”आई ती गेली मला टाकून. तिला हे लग्न वगैरे नकोच होतं. तिने सौदा केला आणि त्यात माझा, तुझा सोंगट्यांसारखा वापर केला.” दर्शन अरुंधतीच्या मांडीत डोकं खुपसून मोकळं होत होता.
अरुंधती त्याला रडू देत होती, मोकळं होऊ देत होती. तिला आता पुन्हा उभं रहायचं होतं, जुनी कात टाकून उध्वस्त झालेल्या आपल्या लेकाचं जीवन पुन्हा मार्गावर आणण्यासाठी खंबीर बनायचं होतं तिला. नियतीने स्वतःवर मारलेला आसूड झेलला होताच तिने आता लेकावर मारलेला आसूड झेलण्यासाठी लेकाला बळं द्यायचं होतं तिला.
—————————————————-
आता पुढे..
आठवडा झाला तरी दर्शन त्याला बसलेल्या मानसिक धक्क्यातून बाहेर येत नव्हता. सुखी संसाराची किती स्वप्न रंगवलेली त्याने. त्याला त्याच्या आईला खूष ठेवायचं होतं. छानसा संसार करायचा होता..अगदी मध्यम वर्गीय माणसासारख्या अपेक्षा होत्या त्याच्या सोनमकडून. तिच्यासोबत सुखाने आयुष्य जगायचं होतं.
जी बापाची सावली त्याला लाभली नव्हती ती त्याला त्याच्या मुलांना पुरेपूर द्यायची होती. सोनमचे व होणाऱ्या मुलांचे खूप लाड करायचे होते. त्यांना भरपूर शिकवायचं होतं मग पुढे त्यांची लग्नं, नातवंड पण या साऱ्या सुखस्वप्नांच्या गाडीला एकदम ब्रेक लागला होता.
पोलीसात जाऊनही विशेष फायदा होणार नव्हता कारण सोनम मनाने त्याची नव्हतीच मुळी. पाचगणीला मधुचंद्रासाठी गेले असतानाच दिवसभर त्याच्यासोबत हिंडणाफिरणारी सोनम रात्री मात्र बाजुला निजायची तेंव्हा दर्शननेच तिला खोलात जाऊन विचारलं असता सोनमने त्याच्यावर हा बॉम्ब टाकला होता.”केवळ पप्पांच्या हट्टामुळे मी तुझ्याशी लग्न केलय दर्शन. मला पप्पांकडून माझी मागणी मिळाली की मी सुटणार पुन्हा मुक्त विहारायला. भरपूर शिकायचय मला. खूप खूप पैसे कमवायचेत.
अगदी ऐशोरामात जीवन जगायचंय मला. चार बायांसारखं रांधा, वाढा, उष्टी काढा करण्यासाठी जन्म नाही झाला माझा.” सोनम बोलत सुटली होती एक्सप्रेससारखी नि दर्शन चेहरा तळव्यात झाकून स्वत:लाच कोसत होता. असा कसा फसलास तू दर्शन! आता पुढे काय अंधार, गुडुप अंधार.
अरुंधतीने पुन्हा दिनकरला फोन लावला पण तो काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. तिने भावाला फोन लावला.
“भाई भाई का फसवलस आम्हांला?”
“काय सांगू अरु तुला?.मला वाटलं होतं लग्न झालं की तिचं टाळकं येईल थाऱ्यावर पण नाही. कोणत्या कुमुहर्तावर जन्माला आली कारटी देव जाणे.”
“अरे पण माझ्या दर्शनचं काय? त्याच्या भावनांशी खेळली ना ती. काय अवस्था करुन घेतलेय त्याने! कसं समजावू मी त्याला..कसं समजावू!”
“मी येतो दोनेक दिवसांत. मग बोलू आपण.”असं म्हणून अरुंधतीच्या भावाने फोन ठेवून दिला.
अरुंधतीकडे आता त्याची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
दोन दिवसांनी सांगितल्याप्रमाणे अरुंधतीचा भाऊ आला तो मान खाली घालूनच.
“काय करु अरु पोरगी ऐकत नाही माझं. तिच्या आयशीने भरीस पाडलं मला असं वागायला. मलाही वाटलं कार्टी लग्नानंतर सुधारेल. वेडा भ्रम होता माझा. सासरी जा म्हणून फोर्स कराल तर आत्महत्या करीन म्हणून धमकी दिलेय तिने. आता थोड्याच महिन्यांत जाईल अमेरिकेला. मी लाख समजावलं, तुझ्या जाण्यावर त्यांचा आक्षेप नसणार पण नाही लग्नसंस्थेवरच विश्वास नाही म्हणतेय.”
“ते सगळं ठीक रे भाई पण माझ्या लेकाचं काय?”
“अरु, तो माझा भाचा आहे. मी बरा असंं वाऱ्यावर सोडून देईल त्याला! तू त्याला घेऊन काही दिवस आपल्या गावच्या घरी जाऊन रहा. तब्येत सुधारेल त्याची. आपण त्याच्यासाठी योग्य जोडीदार पाहू.”
आणि अरुंधती दर्शनला घेऊन तिच्या माहेरच्या गावी गेली. हिरव्यागार झाडीत वसलेलं गाव, झुळुझुळु वहाणारी नदी, माडापोफळींची बनं..अरुंधतीने कितीक दिवसांनी माहेरच्या हवेत मोकळा श्वास घेतला.
दर्शनच्या मामाने गड्याकरवी घर स्वच्छ करुन घेतलं होतं. किराणा भरून ठेवला होता. त्याच्या हातून घडलेल्या चुकीचं तो होता होईल तो परिमार्जन करण्यास बघत होता.
परसदारी सुरुंगी, आवळ्याची झाडं होती. शेवंती, अबोली,जाईजुईचा मांडव. अरुंधतीने गड्याला विचारलं,”रामू, कोण करतं रे एवढी निरगत?”
“अरुताई माझी लेक चंपा बघते हे सगळं. तिला झाडापेडाची भारी हौस. त्यांच्याशी बोलेल काय? गाणी म्हणील काय? फुलराणीच समजते स्वत:ला.”
“अरे पण आहे कुठे तुझी ही फुलराणी?”
तेवढ्यात डाव्या बाजुला माडाकडनं आवाज आला म्हणून अरुंधती त्याबाजूस गेली. “अरे ए माकडा, हो बाजूला चुडत पडायचं तुझ्या टकुऱ्यावर.”
दर्शनने वरती आवाजाच्या दिशेने बघितलं नि दोन पावलं मागे सरकला.
“शेळं खाणार का शेळं,” तिने खाली बघत विचारलं. दर्शन एक नाही दोन नाही.
चंपा दोन शहाळी घेऊन खाली उतरलीदेखील. त्यांना हवं की नको न विचारता कोयतीने शहाळी तासू लागली. दोघांच्या पुढे तिने शहाळी धरली. टपोरे पिंगट डोळे, वाऱ्यावर भुरभुरणाऱ्या कुरळ्या केसांच्या डबल वेण्या नि मोठ्यामोठ्या फुलांच्या नक्षीचा परकरपोलका. शहराच्या मुलींपेक्षा हे ध्यान कितीतरी वेगळं नि बोलायला अगदी चटरपटर.
दर्शनला शहाळ्यातलं पाणी स्ट्रॉशिवाय पिता येणार नाही म्हणून अरुंधती त्याच्यासाठी ग्लास आणते म्हणाली तेवढ्यात तिचं म्हणणं खाली पाडत चंपा म्हणाली,”कुक्कुलं बाळ हाय का हे. लावा सरळ तोंडाला. कसं येत नाय ते बघतो मी.” आणि दर्शनला तिने ते शहाळं तोंडाला लावायला भाग पाडलं. सवय नसल्याने थोडं पाणी गळ्यावरनं ओघळलंच तशी चंपा म्हणाली,”खरंच की गं मावशे, हे कुक्कुलं बाळ दिसतय तुझं.”
तेवढ्यात तिथे रामू आला,”अगं पोरी आपल्या मालकांचे भाचे हायत ते. असं बोलतात होय.”
“मी काय वाईट बोललो! इचारा या मावशीला.”
अरुंधतीला चंपाच्या निरागसपणाचं कुतुहल वाटलं.
“बरी तरबेज केलैस रामू लेकीला.” अरुंधती म्हणाली.
“तरबेज कसली. लग्नाच्या वयाची झाली पण हुडपणा काय जात नाय बाईचा. आईविना पोर मीबी धाक दाखवत नाय तर तेचा गैरफायदा घिती.”
“आसं रे काय म्हणतोस बाबा. आता पावसाला झापं बनवायला लागतील म्हणूनच चढलेलो वरती. मी काय माकड हाय होय!”
“बघा. ताई हिची उत्तरं ऐका. एक शब्द खाली पडू द्यायची नाय बया. भायरली कामं सगळी करती पण घरातल्या कामात भोपळा. दोनदा नववी फेल झाली नि घरात बसलीय.”
“बाबा, तू ना पावण्यांसमोर माझी इज्जतच नको ठेवूस. अशानं कोण करायचंबी नाय मला.”
“अगं चंपा, तुझ्या काळजीनेच बोलतो तो. आता मी आलेय ना. रोज माझ्यासोबत स्वैंपाक करायचा. महिन्याभरात सुगरण करते तुला.”
“फी किती मावशे तुझी. आधीच सांग.”
“फी..अगं माझ्या दर्शनला माणसात आण. शेतात, रानात फिरव.बास भरून पावेन मी.”
आणि झालंही तसंच अरुंधतीने चंपाला तिच्या हाताखाली घेतलं. पहाटे नऊदहाला उठणारी चंपा अरुंधतीच्या ओव्या कानी पडताच उठू लागली. तिच्या मार्गदर्शनाखाली शेणसडा करू लागली. दारात ठिपक्यांची रांगोळी रेखाटू लागली. दर्शनबद्दलही अरुंधतीने तिला सांगितलं.
दर्शन जरी बोलत नसला तरी चंपा त्याच्यासमोर जाऊन बसू लागली. त्याला शेतात फिरायला न्हेऊ लागली. जांभळाच्या झाडावर चढून त्याच्यासाठी जांभळांचे रसरसीत घोस काढू लागली. जांभळं खाऊन कोणाची जीभ जास्त रंगलीय यावर त्यांची हमरीतुमरी होऊ लागली.
चंपा तिच्या गाईचं दूध काढू लागली की दर्शनही तिच्यासोबत बसू लागला. गाय चरावयास घेऊन गेली की तिच्यासोबत जाऊ लागला. कधी जाम, कधी हेळू, करवंद असा रानमेवा खाऊ लागला. चंपाजवळ जणू जादुची कांडी होती. दर्शनचं नैराश्य दूर होऊ लागलं. चार दिवस चंपा घराकडे फिरकली नाही तेंव्हा दर्शनलाच हुरहूर लागली. त्याने अरुंधतीला विचारलं तर ती नुसतीच हसली व म्हणाली, “उद्या अंघोळ करून येईल.”
आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळीच चंपा हजर. केसांवरून न्हायल्याने ओलेत्या केसांची बटवेणी घालून तिने केस पाठीवर सोडले होते. त्याचं पाणी थेंब थेंब पडून तिचा परकर मागे भिजला होता. ती अगदी प्राजक्ताच्या नुकत्याच ओघळलेल्या फुलासारखी टवटवीत दिसत होती.
“कुठे होतीस इतके दिवस?” दर्शनने विचारलं त्यावर ती म्हणाली,”इतके कुठे चारच तर दिवस आज पाचव्या दिसाला टकलीरसून न्हाऊन आलो.”
“म्हणजे रोज न्हात नायस तू?”
“यडं रं खुळं. ते न्हाणं येगळं. हे म्हंजे तुमच्या शेरात एमसी म्हनतात ते तसलं. इथं पाळावं लागतय. देवधर्म आसतो.मला नै आवडत पण बाबा आयकतोय थोडंच. लैच खवीस बाप्या. निसता आगडोंब. ते जाऊंदे. आज दुपारी नदीकडे जाऊया पेवायला.”
“मला कुठं येतंय.”
“मी कसली पेवते बघ तरी. तूबी शिकशील हळूहळू.”
नि उन्हं उतरल्यावर अरुंधतीला सांगून दोघं नदीकडे गेली. सर्याचा तप्तपणा मवाळ झाला होता. नदीचं पाणी अगदी स्वच्छ नि थंडगार होतं. वाऱ्यासोबत तरंगत होतं.
अरुंधतीने दर्शनला खडकावर बसायला सांगितलं नं आपण डुबकी मारली. अगदी मासोळीसारखी चपळाईने पोहू लागली जणू जलपरीच. थोड्याच वेळात ती पाण्यावर येत म्हणाली,”मस्त पेवतो ना मी.”
दर्शनला तिचा तो ओलेता चेहरा, निरागसपणा, करतो,बघतो अशी गमतीशीर भाषा खूपच आवडली. मधेच त्याला ती दिसेना. त्याने इकडेतिकडे पाहिलं. सगळं चिडीचुप्प. आता मात्र तो घाबरला. धपकन कुणीतरी मागून त्याला पाण्यात ढकललं. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं.
“हे शाबास, हातपाय हलव नैतर बुडशील बघ.” अरुंधती त्याच्या बाजुलाच होती. कसातरी हातपाय हलवत तो खडकावर आला. आठेक दिवसांत दर्शन चंपाच्या मार्गदर्शनाखाली पोहू लागला. तीही दर्शनकडून शुद्ध भाषा म्हणजे मी करते, मी जाते असं शिकू लागली.
दर्शन आता माणसात येऊ लागला. अरुंधतीशी, रामूशी नीट बोलू लागला.
रामूने अरुंधतीला विनंती केली,”चंपाला आई नाही. तुम्ही तिला आईची माया दिलात. आता तुमच्या उपस्थितीत तिला बघण्याचा कार्यक्रम होऊन जाऊदे.” अरुंधतीने होकार दिला पण प्रश्न होता दर्शनचा. त्याच्या मनावर या चंपा नावाच्या रानफुलाने जादू केली होती. झालं दुसऱ्या दिवशी मंडळी आली. चंपासाठी बघितलेला नवरामुलगा हा अगदी बावळट दिसत होता. फावड्यासारखे पुढे आलेले चार दात पुढे काढत चंपाला आपादमस्तक न्याहाळत फिदीफिदी हसत होता. मला लग्नात अर्ध्या तोळ्याची अंगठी, तीन तोळ्याचा गोफ पायजेल.” तो तोंडात बोटं घालत हीही हसत म्हणाला.
“बघ कसा हसतोय माकडावानी. सौदा कराया आलायस का पोरगी बघायला.”हातात चहाचा ट्रे घेऊन आलेल्या चंपाने त्या बावळट ध्यानाला चांगलाच दम भरला तसा तो आई आई ही बघना कश्शी करते. तुच सांगितलं होतंस ना गोफ मागायला असं म्हणत आईकडे तिची तक्रार करू लागला. चंपा हसत म्हणाली,”आईच्या पाठी लपतय ध्यान.” पाहुणे मंडळींना हा त्यांचा अपमान वाटला. पाहुणेमंडळी आगपाखड करत निघून गेली. बघतोच कोण करतं हिच्याशी लग्न..नवऱ्यामुलाचा मामा हातवारे करत भांडतच गेला.
“चंपा पोरी काय केलंस हे.” रामू नाराज होत म्हणाला.
“मी तयार आहे चंपाशी लग्न करायला. चंपाचा होकार पाहिजे.” दर्शन पुढे येत म्हणाला.
“तुम्ही, का गरीबाची चेष्टा करताय.” टॉवेलाच्या टोकाने डोळे पुसत रामू म्हणाला.
“तुमी आनी किती तोळे सोनं मागणार हायसा? लोकाच्या पोरी म्हंजे काय वस्तू वाटल्या तुमास्नी सौदा कराया!”
अरुंधती पुढे होत म्हणाली,”चंपा ज्याच्या आयुष्याचा एखाद्याने सौदा केला असेल तो दुसऱ्यांच्या आयुष्याचा नाही गं सौदा करणार. तो खरंच तुला मागणी घालतोय. तुझ्या होकारावरच सगळं ठरेल.”
चंपाने अरुंधतीला मिठी मारली नि हळूच दर्शनला डोळा मारला. हा सौदा मात्र प्रेमाचा होता. लेकीचं कल्याण होतंय हे पाहून रामूचे डोळे पुन्हा भरून आले पण हे अश्रु आनंदाचे होते.
दोन वर्षांनी अरुंधती पुन्हा माहेरच्या गावी गेली होती..आपल्या लेकाला, सुनेला नि टुकुटुकु बघणाऱ्या नुकत्याच मान धरु लागलेल्या नातीला घेऊन. देवीची साडीचोळीने ओटी भरली. देवीसमोर बाळाला पालथं घातलं. देवी जणू अरुंधतीला सांगत होती, “अरुंधती, फार भोगलंस. आता भोग संपले तुझे. लेकासुनेसोबत आनंदाने रहा.”
समाप्त
=============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============
1 Comment
Hello World! https://apel.top/go/gu4winrshe5dgoju?hs=1a7838bea68c254047097e98cccbec7e&
q70uky