Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रात्रीचे १२ वाजले होते. काव्या नुकतीच आपलं काम उरकून रूम मध्ये झोपायला आली. रूम मध्ये येताच नवऱ्याचे बेडवर ठेवलेले कपडे तिला दिसले. रवीने इस्त्री करायला म्हणून ठेवले होते. काव्या आधीच खूप दमली होती पण रवी रोज सकाळी लवकर घरातून निघतो म्हणून धावपळ नको म्हणून तिने रात्रीच त्याचे कपडे इस्त्री करायला घेतले.

काव्या इस्त्री करता करता मुसुमुसु रडू लागली. रवी आपला मोबाईल चाळत बसला होता. काव्याचा आवाज ऐकताच रवी तिला विचारतो..

रवी – “काय झालं गं?”

काव्या आपली एक नाही का दोन नाही…आपली एकटीच रडतच होती.

रवी पुन्हा खोचून विचारतो…. “अगं काय झालं जरा सांगशील का मला पण….आई काही बोलली का तुला.”

काव्या – “आई कुठलाही मौका सोडतात का घालून पालून बोलायला, सतत त्यांचं टोमणेबाजी चालूच असते.”

“चार वर्ष झाली आपल्या लग्नाला पण अजून घरात पाळणा हलला नाही. मलाही आई व्हावंसं वाटतं..मलाही बाळ हवंय, त्याचे लाड कोड पुरवायचेत. एकतर तुमच्या आईंची दिवसभरात काडीची सुद्धा मदत नसते.”

“दिवसभर जराही कामातून सुटका होत नाही माझी, सकाळचे ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत नुसती कामं चालू असतात.”

“आणि मग अजून मुलबाळ नाही तर डॉक्टरांना नको का दाखवायला.”

“कितीवेळा मी त्यांना आणि तुम्हालाही सांगितलं आहे कि माझी मासिक पाळी अनियमित आहे…लग्नाआधी तर मला ह्याचा भयंकर त्रास व्हायचा, पण कुणाला ह्या गोष्टी दिसत नाही बस उठून सुटून मला दोष देत राहायचं आणि त्यांचंच “बरं आपलं चालू असतं कि आम्हालाही खूप त्रास होता मासिक पाळीचा.”

“माझी मावस बहीण निमालाही असाच त्रास होता आणि तिला सहा वर्षानंतर मूल राहिलं, पण तिच्या सासरच्यांनी कधी तिचा असा जाच केला नाही.”

रवी – “काव्या माझ्या आईबद्दल अभद्र बोललेलं मला खपणार नाही, तुला खरंच त्रास होतोय तर आपण एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवू या.”

काव्या – “खरंच त्रास होतोय म्हणजे…. असं कसं विचारता तुम्ही?”

रवी – “बरं बाई , शांत हो आता..आपण उद्याच जाऊ या डॉक्टरांकडे. पण ह्या बद्दल तू आईला काही बोलू नको..उद्या आपण फिरायला जातोय म्हणून सांगून जाऊ .”

काव्या आता कुठे शांत झाली होती.

दुसऱ्यादिवशी काव्या रोजच्यासारखीच सकाळी लवकर उठली आणि सगळी कामं तिने भराभर आटोपली आणि तयार व्हायला गेली

रवीदेखील तयार होऊन आला आणि आईला म्हणाला

रवी – “आई काव्या आणि मी बाहेर जातोय जरा ….यायला उशीर होईल तू जेवायला वाट पाहू नकोस.”

आई – “हो ते कळलं मला…तेच म्हटलं सकाळी सकाळी स्वारी एवढी नटून थटून कुठे निघाली….कुठं रे एवढं काम पडलं आता तुमच्या दोघांचंही कि सकाळी सकाळी जातंय बाहेर.”

रवी – “अगं आई बरेच दिवस झाले काव्याला कुठे बाहेर घेऊन नाही गेलो म्हटलं आज पिक्चरला घेऊन जातो तिला.”

आई – “हम्म्म्म, आईचा नाही केला रे कधी एवढा विचार कि आई पण दिवसभर एकटीच असते तिलाही बोअर होत असेल.”

रवी – “आई जाऊ दे ना आता …तू कुठे हे सगळं घेऊन बसलीस आता…चल येतो आम्ही…बाय ..बाय “

रवीने काव्यासोबत घरातून लगेच काढता पाय घेतला आणि ते दोघेही निघून गेले.

स्त्रीरोगतज्ञांकडे जाताच काव्याने व्यवस्थित त्यांना तिला होत असलेले त्रास सांगितले आणि डॉक्टरांनीही तिची बाजू ऐकून घेतली व तिला व्यवस्थित ट्रीटमेंट चालू केली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पूर्वीदेखील बायकांना असे त्रास असायचे पण त्यावेळी विशेषज्ञ् नसायचे आणि सोयी सुविधा देखील नसायच्या. एखादीला नशिबानेच काहीही ट्रीटमेंट न घेता दिवस जायचे तर एखादीला दिवस राहायचे नाही म्हणून आयुष्यभर वांझोटी म्हणून हेलावणा होयची.

डॉक्टरांशी भेटल्यानंतर काव्या आणि रवी दोघांनाही दिलासा मिळाला होता. काव्याने डॉक्टरांच्या सल्यानुसार नियमित व्यायाम आणि औषधे घेतली आणि २ महिन्यांतच काव्याची गोड बातमी कळाली. बातमी ऐकताच काव्याच्या सासूबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला.

दुसऱ्याच दिवशी सासूबाई काव्याला , “बघितलं मी म्हणत होते ना तुला कि आम्हालाही पाळीचा त्रास होता….असा त्रास बीस काही नसतो गं..सगळं मनाचा खेळ असतो बघ.”

सासूबाईचं बोलणं ऐकून काव्या आणि रवी एकमेकांकडे बघून खोचकपणे हसू लागतात. 

© RitBhatमराठी

=============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories