

कमळा च्या पाकोळी प्रमाणे असलेले नाजूक डोळे, हरीण सारखी तीक्ष्ण नजर, नाजूक तरतरीत नाक, गुलाब सारखे लाल चुटुक ओठ, पांढरे शुभ्र दात आणि हसताना गालांवर उमटणाऱ्या खळ्या, दाट काळेभोर केस, तुकतुकीत त्वचा, एखाद्या स्वर्गातील अप्सरा ला लाजवेल असा सुंदर असा शरीराचा बांधा असलेली सोनल ही आता जाधव परिवरा चा हिस्सा झाली आहे. नुकतेच सोनल चे लग्न जाधव परिवारात एकुलता एक असलेला शेखर सोबत झाले.
पुण्यात सेटेल झालेले हे जाधव परिवार तसे मनाचे साधे व प्रेमळ माणसे. नवीन लग्न झालेल्या मुलींना त्यांच्या सासरच्या मंडळीं विषयी मनात जसा प्रश्नांचा गोंधळ असतो तसाच सोनल च्या मनातही ” सासरची माणसे कशी असतील?? सासू बाई कश्या असतील ?? मला ते सांभाळून घेतील का?? नवीन चालीरीती …नवीन घर …नवीन माणसे ….नवीन आयुष्याची सुरुवात….सर्व होईल का व्यवस्थित सावकाश.” असा प्रश्नांचा पाऊस सुरूच होता.
लग्न होऊन आल्यावर प्रत्येक मुलीला वाटणारी काळजी ही स्वाभाविकच, त्यात मग सोनल अपवाद कशी ठरेल.
सोनल चे लग्न अगदी निर्विघ्न पार पडले. लक्ष्मी रुपी माप ओलांडून ती जाधव कुटुंबात एकरूप झाली.
लग्न होऊन निदान एक आठवडा झाला असेल, घरात नवीन जोडप्या साठी भेट देणारी मंडळी सुरूच होती.
गहू वर्णीय, लांब व मध्यम असलेली अंगकाठी, साधारण पंनाशितल्या असलेल्या सुनंदा ताई म्हणजे सोनलच्या सासूबाई. हलक्या रंगाच्या पण डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या कॉटन च्या साड्या परिधान करत. चेहऱ्यावर असलेलं ते प्रेमळ हास्य व बोलण्यातून जाणवणारा आपलेपणा सुनंदा ताई नेहमी नाती टिकवून ठेवण्यात व त्यात आनंद शोधण्यात मग्न असे. सुनंदा ताई ह्या रिटायर झालेल्या शिक्षिका म्हणून त्यांच्या वागण्या बोलण्यात जणू एक शिक्षक लपून आहे असे भासे.
लग्न होऊन बरेच दिवस गेली तरी सोनल ची साडी नेसणे काही थांबले नाही. खरेतर साडी नेसून घरकाम करणे तिला जरा अवघड जाई पण घरची मंडळी काय बोलतील ह्या भीती पोटी सोनल रोज साडी नेडून घरात वावरे. सोनल ला काम करता करता साडी मुळे फरशीवर अपटायची वेळ बऱ्याच वेळा येऊन गेली. पटपट चालताना मधेच निऱ्यात फसणारा पाय सोनल ला तोंडावर पडायची वेळ आणत, हे एकदा सुनंदा ताईं ने पाहिले. क्षणभर त्यांनी सोनल कडे पाहिले आणि तिला हाक मारत जवळ बोलवले. ” सोनल, बाळा इकडे ये. ”
सासू बाईंनी हाक दिली म्हणून सोनल आपल्या हातातल काम सोडून पटकन सासू बाईंच्या दिशेने पावल टाकू लागली. ” काय झालं आई …काही पाहिजे का??” अस म्हणत सोनल तिच्या पदराला आपले ओले हाथ पुसू लागली.
” नाही ग मला नको आहे काही …असच म्हंटल थोड गप्पागोष्टी करू …इतर दिवशी पाहुण्यांची वर्दळ असते तशी आज नाहीये तर जरा निवांत बसू …” सुनंदा ताईंच्या तोंडून पडलेले शब्द ऐकून सोनल ला जरा बरं वाटलं. ती आणि सुनंदा ताई आता सोफ्यावर बसून होत्या, हाती चहाचा कप आणि टेबलवर काही नाश्त्याचे पदार्थ.
हळू हळू सासू सूनाच्या गप्पा सुरू झाल्या आणि हळूच सुनंदा ताईंनी नवीन विषय छेडला. ” सोनल घरी काय कपडे घालत होतीस ??”
” आई मी घरी असेच साधे कपडे ..कुर्ता पायजमा, जीन्स टॉप असच …” सोनल निरागस पने उत्तर देत होती.
बोलताना सोनल ला सुनंदा ताईंचा स्वभाव आवडला होता, त्यांचे मोकळे बोलणे …प्रेमळ भावना, त्यांचे सुंदर विचार ह्या गोष्टींनी सोनल चे मन मोहून गेले.
” मग बाळा तु इकडे पण तेच कपडे घातले तरी काही हरकत नाही… हे पण तुझ घरचं आहे की ..” सुनंदा ताईंनी त्यांचे विचार मोजक्या शब्दांत व्यक्त केले.
ते ऐकून सोनल जरा निशब्द झाली. सासू बाई अश्या प्रकारे तिला मोकळे पण देत आहेत याचे तिला नवल वाटले.
” पण आई नवीन लग्न झाले की साडीच नेसावी लागते ना…आणि आपल्या घरी सतत पाहुणे असतात…”
सोनल च्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेत ” पाहुणे काय नेहमीच येत जात राहणार …आणि नवीन जमान्यात नवीन तऱ्हे चे कपडे तर येणारच …काळानुसार बदलत चालव …आपले विचारात भर टाकत जावी. आपले विचार मांडण्याची कला अवगत करावी. ” सुनंदा ताई सोनल ला समजून सांगत होत्या.
” आई मला वाटलं की इकडे चालणार नाही…म्हणजे लग्ना नंतर तर मुलींना साडी नेसावी लागते ना म्हणून…” सोनल अडखळत म्हणाली.
” सोनल आता तू पण ह्या टेक्नॉलॉजी च्या युगातली…जुनी माणसे सगळीच काही जुन्या विचारांनी भरलेली नाहीये, आता काही दिवसांनी तीही जॉब करशील मग तरीही तू साडी नेसून जाशील का?? मला तू माझ्या मुली सारखी आहे आणि हे घर तुझ ही आहे तेव्हा तुला आवडेल ते कपडे घालत जा, आणि मोकळं राहत जा …”
सुनंदा ताईंचे शब्द ऐकून सोनल चे मन भरून आलं.
” आई खरच तुम्ही खूप छान आहात, थँक्यु ” सोनल आपल्या गालांवर खळी उमटवत म्हणाली.
टीव्ही सिरियल मध्ये जश्या काही सासू कपटी, स्वार्थी आणि सुनेला सासुरवास देणाऱ्या दाखवल्या जातात तेच खरे वास्तव आहे असे नाही. माणसे काळानुसार बदलत जातात, त्यांच्या विचारांत भर पडतात, नवनवीन गोष्टी शिकतात त्यापैकी सुनंदा ताई होत्या. त्यांचे विचार मुळातच सुंदर होते. त्यांनी कधी जुन्या चालीरीती आणि नवीन काळ यांच्यात समन्वय साधून त्या चालत होत्या.
आपल्या सासू बाई मनाने खरच खूप चांगल्या आहेत, आणि सोनल स्वतः ला खूप नशीबवान समजत की तिला अशी सासू मिळाली.


सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.