Skip to content Skip to sidebar Skip to footer

संक्रांत (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२

©️®️ मिथून संकपाळ

आज सकाळी ती उठली आणि रोजच्या प्रमाणे लगबगीने आवरायला लागली, ऑफिस ला उशिरा पोचणे तिला स्वतःलाच आवडत नव्हते. त्यामुळे नेहमीच ती रोजची कामे आवरून वेळेत ऑफिस ला पोचायची.
आजही ती पटापट हात चालवत होती, नवऱ्याला डबा बनवून दिला आणि स्वतःसाठी घेतला. घरातून बाहेर पडायला निघणार इतक्यात मोबाईल वाजला.. अनोळखी नंबर
“काय कटकट असते यांची, कधीही फोन करतील आणि चालू होतील.. ही स्कीम आहे, हा प्लॅन आहे, लोन पाहिजे का?” ती अशी पुटपुटत होती आणि तोवर फोन वाजून बंद झाला.
“मरु दे”.. असं म्हणत ती बॅग भरू लागली, घराची चावी आणि मोबाईल घेवून बाहेर आली. दरवाजा लॉक करतच होती, इतक्यात पुन्हा मोबाईल वाजला.. तोच नंबर..!!
“छे बाई, नसती डोकेदुखी आहे..” असं म्हणत तिने फोन उचलला आणि खेकसण्याच्या स्वरात ती म्हणाली,
“हॅलो ssss, कोण बोलतंय???”
“शितल…?”
“मी शितलच बोलते, आपण कोण..?”
“सुहास बोलतोय”
“काय काम आहे बोला ना पटापट, एक तर घाई आहे आणि तुमचा फोन आताच यायचं होता, आणि हो.. लोन बिन साठी फोन केला असाल तर मला काही नकोय sss”
“शितल, मी सुहास भोसले बोलतोय” शांतपणे उत्तर आलं.
नाव ऐकून ती थबकली, मोबाईल कडे पाहिलं.. नंबर दिसत होता, नाव नाही. पुन्हा मोबाईल कानाला लावला,
“सुहास भोसले, म्हणजे..”
“हो, मीच. आठवलं की नाही आता तरी? आवाजही विसरली का?”
तिच्या चेहऱ्यावरचे सारेच भाव जणू हरवले होते, पुतळ्यासारखी ती स्तब्ध झाली होती, भानावर येत ती म्हणाली
“आज अचानक.. इतक्या दिवसांनी..”
“हो.., कॉल जरी अचानक केला असला तरी तुझी आठवण अचानक नाही आलीय ह..”
“मग..??”
“आठवण रोज येते, कधी मी मनाला समजावतो, तर कधी मन मला समजावते.. आज मात्र दोघंही ऐकायला तयार नव्हतो, म्हणून मग फोनच केला”
“अजूनही तुझी सवय गेली नाही..”
“कसली सवय?”
“कारणं देताना पण असं काही सांगतोस, की खोटं असलं तरी आक्षेप घ्यावा वाटत नाही”
“अच्छा, म्हणजे तू माहीत असूनही सर्व काही निमूट ऐकून घ्यायची तर..?”
“हो, तसच होतं”
“माझ्या कधी लक्षात नाही आलं”
“कारण तू कधी मला समजूनच घेतलं नाहीस, नेहमीच गृहीत धरत आलास”
“असं नव्हतं काही, सर्वच गोष्टी मनासारख्या होत नसतात”
“तुझ्या तर मनासारखं झालं ना?”
“आजही तू असच बोलणार आहेस का..?”
“मला आता घाई आहे, ऑफिसला जायचंय”
“मग संध्याकाळी फोन करू का? कधी वेळ मिळेल तुला निवांत..?”
“सध्या वेळ नसतोच मुळी, जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मीच फोन करेन, अर्थात हा नंबर तोवर बदलला नाहीस तर..”
“ठीक आहे, वाट पाहीन तुझ्या फोन ची, bye”
“bye”
झपझप पावलं टाकत ती ऑफिससाठी निघून गेली.

लगबग करत ती स्टेशन ला पोचली खरी, पण वाटेत अनेक विचारांनी तिच्या डोक्यात काहूर माजले होते.. आज अचानक इतक्या वर्षांनी का बरं फोन आला असेल, आता काय बोलायचं असेल त्याला, आणि माझा नंबर त्याने कुठून मिळवला, मी आताही त्याच्याशी बोलायला हवं का, स्वतःहून फोन करते असं सांगितलं पण खरंच करायला हवं का.. असे एक ना अनेक प्रश्न तिच्या डोक्यात घोंगावत होते.
स्टेशन वरून लोकल पकडली आणि पुन्हा डोक्यात तेच विचार. प्रश्न तिला पडत असले तरी त्यांची उत्तरही तिलाच शोधायची होती. एरव्ही मैत्रिणींसोबत गप्पागोष्टी करत प्रवास करणारी ती, आज मात्र कुठेतरी शून्यात हरवून गप्प बसली होती, आजूबाजूला काय सुरू आहे याचे तिला अजिबात भान नव्हते.
ऑफिसमधे दिवसभर काम करताना सुद्धा तिची अवस्था तशीच होती, त्या दोन मिनिटांच्या फोन कॉल मुळे ती सकाळपासून अस्वस्थ होती. काय करावं, आताच्या प्रसंगाशी कसं सामोरं जावं, हे तिला काहीच सुचत नव्हतं. इतका सारा विचार करताना अनेक वेळा मन भूतकाळात जाऊन आलं, तिला आजही तो दिवस अगदी ठळकपणे लक्षात होता.. बारावीचे वर्ष होते..

१४ जानेवारी, २०००
मकर संक्रांत
कॉलेज सुटलं आणि सर्वजण घरी जायला निघणार, इतक्यात सुहास तिच्यासमोर आला आणि हात पुढे करत म्हणाला,
“तिळगुळ घे आणि गोड बोल”
नजर खाली ठेवूनच तिने हात पुढे केला, हातावर तिळगुळ आणि त्याच्या बोटांचा स्पर्श झाला, पटकन हात बाजूला करत ती तिथून निघाली आणि जाताना फक्त “Thank you” एवढंच म्हणाली.
खरं तर स्वतःही तिळगुळ द्यायला हवे होते, पण तिच्याकडे परत द्यायला तिळगुळ नव्हते, शिवाय असं सर्वांसमोर एखाद्या मुलाला तिळगुळ देणे तिला स्वतःला आवडलं नसतं.
तिला सुहास आवडायचा पण प्रत्यक्षात कधीच बोलणं झालं नव्हतं, आणि आज अचानक त्याने स्वतःहून तिळगुळ द्यावे, यावर तिचा विश्वास बसत नव्हता. हाताच्या मुठीत तिळगुळ घट्ट पकडून ती घरच्या दिशेने चालत राहिली, थोडं अंतर पुढे गेल्यावर मूठ उघडून त्यातले काही तिळगुळ तोंडात टाकले.. एक गोड हसू तिच्या ओठांवर आपसूक उमटलं. अपेक्षाही नसताना आवडत्या व्यक्तीने तिळगुळ द्यावे, आपल्याशी गोड बोलावं, यापेक्षा गोड दिवस काय असू शकतो..? आज ती खऱ्या अर्थाने तो गोडवा अनुभवत होती.
दुसऱ्या दिवसापासून मग दोघांमध्ये थोडं थोडं बोलणं चालू झालं, अर्थात एक मैत्रीपूर्ण नातं बहरत होतं. त्यातूनच कधी चॉकलेट, नोटबुक, फ्रेंडशिप वाले भेटकार्ड यांची देवाण घेवाण चालू राहिली.
मांजर दूध पिताना डोळे मिटून पीत असतं, आणि त्याची समजूत असते की मला कोणीच पाहत नाही.. तसच काहीसं इथं चित्र दिसत होतं. एव्हाना सर्वांच्या नजरेत ही मैत्री आली होती, आणि या दोघांमध्ये मैत्रिपलिकडे जाऊन काहीतरी नक्की असावं अशी जणू सर्वांची खात्री झाली होती. मात्र या दोघांमध्ये अजुन कोणीही पुढचं पाऊल टाकलं नव्हतं, मैत्री आणि फक्त मैत्रीच.
बरोबर एक महिन्यांनी तो दिवस उगवला, ज्याची शितल आतुरतेने वाट पाहत होती –

१४ फेब्रुवारी, २००० – Valentine’s Day
आज काहीतरी सुहास कडून ऐकायला मिळेल असं तिला मनोमन वाटत होतं, अगदीच त्याने काही नाही विचारलं किंवा काही बोलला नाही, तर आपण मात्र मनातलं सारं सांगून टाकावं असं तिने ठरवलंच होतं. महिना भराच्या मैत्रीचे रुपांतर आज Valentine’s Day च्या निमित्ताने प्रेमात करावे अशी इच्छा आज उफाळून आली होती. धाडस करून तिने एक गुलाबी भेटकार्ड खरेदी केलं होतं. कधी एकदा सुहास ला पाहते आणि कधी हे नातं पुढं घेवून जाते असं तिला झालं होतं. पूर्ण तयारीनिशी ती कॉलेज मध्ये पोचली.
तिची नजर आता सुहास चा शोध घेत होती, वाटेत आणि कॉलेज च्या आवारात तो कुठे दिसला नाही म्हणून सरळ ती वर्गात जाऊन बसली. सुहास वर्गातही दिसत नव्हता, त्यामुळे तिला किंचित काळजी वाटू लागली होती. वारंवार ती नोटबुक मध्ये लपवलेल्या त्या गुलाबी भेटकार्ड कडे पाहत होती, वर्गात तर लक्ष अजिबात नव्हतं. कसेबसे सर्व लेक्चर्स संपवले आणि ती वर्गाच्या बाहेर पडली, काहीशी कुजबुज तिच्या कानी ऐकू आली, बाकीच्या मुली आपसात बोलत होत्या,
“अगं, त्या बाजूच्या वर्गातल्या सोनाली ने सुहास ला प्रपोज केलं म्हणे”
“काय सांगतेस, सोनाली ने?? कॉलेज क्वीन.. वॉव”
“किती लकी ना सुहास”
“मी पण त्याला विचारलं होतं मागे एकदा, पण नाही म्हणाला”
“मला तर वाटलं होतं, शितलचा नंबर लागतो की काय..”
“पण तिच्या पेक्षा सुंदर सोनाली मिळाली ना त्याला”
सर्वजण हसत हसत निघून गेल्या..
हे सर्व ऐकून शितल च्या स्वप्नाचा चक्काचूर झाला होता.. डोळे पाण्याने डबडबले होते, आपण काहीच ऐकलं नाही असं नाटक करत ती तडक तिथून निघाली आणि घराच्या दिशेने चालू लागली. पुढे काही दिवस ती कॉलेज ला गेलीच नाही. आयुष्याची परीक्षा नापास झाल्याची भावना तिच्या मनात होती त्यामुळे कॉलेज च्या परीक्षेची आणि अभ्यासाची काळजी तिला गौण वाटत होती. बारावीच्या बोर्डाची परीक्षा तोंडावरच होती, त्यावर थोडेफार लक्ष केंद्रित करून ती घरीच अभ्यास करत राहिली आणि क्वचितच कॉलेजचे दर्शन घेतलं. काही वर्षांनी लग्न झाले आणि भूतकाळ विसरत तिने आपल्या संसाराला सुरुवात केली होती..
आणि आज अचानक इतक्या वर्षांनी सुहासचा आलेला फोन..!!

सतत त्याच त्याच गोष्टींचा विचार करण्यापेक्षा एकदा काय ते बोलून घ्यावं असं तिने ठरवलं आणि वेळात वेळ काढून सुहास चा नंबर डायल केला,
“हॅलो सुहास?”
“हॅलो शितल, सुहासच बोलतोय, बोल”
“कसा आहेस?
“मी ठीक आहे, तू कशी आहेस? बरं झालं तू फोन केला”
“मी पण ठीक आहे, मी म्हणाले होते ना फोन करते”
“छान वाटलं तुझा आवाज ऐकून”
“बरं, काही बोलायचं होतं का तुला? म्हणजे इतक्या वर्षांनी कॉन्टॅक्ट केलास म्हणून म्हटलं”
“खरं तर भेटायचं होतं, पण वाटलं की आधी फोनवरच बोलावं”
“अच्छा, आणि काय काम काढलं माझ्याकडे भेटण्यासारखं?”
“आपण फ्रेंड्स होतो, म्हणजे अजूनही आहोत. मग भेटायला असं काही खास कारण हवं का?”
“आता काही बंधनं असू शकतात ना, मुलगी लग्नाआधी आई वडिलांच्या घरी राजकुमारी असते, लग्न झालं की मग तिला खांद्यावर जबाबदारीच ओझं घेवूनच सासरी पाठवलं जातं”
“इतकी फिलॉसॉफी…??”
“मुलांसाठी तेच असतं रे.. भोग मुलींच्या नशिबीच असतात. घर बदला, नाव बदला, आडनाव बदला.. एवढंच नाही.. सवयी बदला, वागणं बदला.. बरं जाऊ दे, तुला सारी फिलॉसॉफी वाटणार”
“काही अंशी खरं आहे तुझं, पण प्रत्येकाच्या वाट्याला असच येईल असं नसतं ना”
“हो, म्हणूनच परवा म्हणाले होते, तुझ्या मनासारखं तर झालंच ना”
“माझ्या मनासारखं काय झालं?”
“सोनाली कशी आहे?”
“कोण सोनाली?”
“बघ, तू पण नाव बदललं वाटतं तिचं लग्नानंतर?”
“ओह, अच्छा. आता आले लक्षात.. सोनाली”
“कशी आहे?”
“मला कसं माहीत असणार? असेल तिच्या घरी”
“अच्छा म्हणजे ते ही अर्धवटच झालं तर”
“तू काय बोलतेस, जरा नीट कळेल असं बोलशील का?”
“सोनालीने तुला प्रपोज केलं होतं, बरोबर..?”
“हो, बरोबर आहे”
“मग तेच म्हणतेय, तिच्याशी प्रेम करून आता लग्न दुसरी सोबतच केलं का?”
“तुझी ना सवय अजूनही गेली नाही बहुतेक, शहानिशा करण्या आधीच सर्व तर्क लावून रिकामी होतेस”
“म्हणजे काय म्हणायचं आहे तुला?”
“तिने मला प्रपोज केलं ही गोष्ट करेक्ट आहे, पण मी तिला होकार दिला असं कोणी सांगितलं तुला?”
“अरे पण…”
“अरे पण काय.. सांगितलं का असं कोणी तुला?”
“ती इतकी सुंदर, कॉलेज क्वीन, तू होकार दिलाच असणार ना”
“कळलं ना आता, उगाच नाही म्हणत.. नसते तर्क लावत बसतेस ते”
“म्हणजे तू तिच्याशी लग्न नाही केलंस?”
“माझं तिच्यावर प्रेमच नव्हतं, ना मी तिला होकार दिला, मग लग्न कसं करेन तिच्याशी?”
“मग..?”
“प्रेम व्यक्त करायला Valentine’s Day चा मुहुर्त लागत नसतो, प्रेम ही एक भावना आहे, एखाद्या विषयी वाटणारं प्रेम वेळीच व्यक्त करता आलं की मग मनात कोणती खंत राहत नाही.”
“तू असं केलं का कधी?”
“प्रयत्न केला होता, पण तू संधीच दिली नाही”
“मी..?”
“हो तू.. तुला आठवतंय मी तुला संक्रांतीला तिळगुळ द्यायला आलो होतो”
“कसं विसरू शकते मी”
“तिळगुळ घेवून तू पटकन तिथून निघून गेलीस, मागे वळूनही पाहिलं नाही, तेव्हाच मी तुझ्यासाठी भेटकार्ड आणलं होतं. माहीत होतं पुढे Valentine’s Day आहे, दुसरं कोणी तुझ्या जवळ येण्याआधी मला माझ्या मनातलं तुला सांगायचं होतं, पण ती संधीच मिळाली नाही, आजही ते भेटकार्ड तसच जपून आहे माझ्याकडे”
शितलच्या डोळ्यातले पाणी कधीच गालावरून खाली ओघळत होतं, तिला झालेल्या चुकांबद्दल, आपल्या वागण्याबद्दल स्वतःचाच राग येत होता.. आणि सुहास अजूनही बोलतच होता,
“… मनात आलं होतं की वर्गात सर्वांसमोर तुला ते कार्ड द्यावं, पण तुला कदाचित वाईट वाटेल म्हणून योग्य वेळेची प्रतीक्षा करत होतो. महिन्याभरात तुला चांगलं समजून घेत होतो. पण अचानक तू Valentine’s Day पासून गायब झालीस. त्यावेळी काही आत्तासारखे मोबाईल नव्हते आपल्याकडे, कॉलेजला येणंही तू बंद केलं होतं, माझं काय झालं असेल याची कल्पनाही नाहीय तुला”
सुहास सुद्धा आता इमोशनल झाला होता, सारं काही सांगताना
त्याचा कंठ दाटून आला होता.
“अरे, काय बोलतोस तू हे?”
“जे सांगतोय ते सारं खरं आहे, माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि आजही मी ते विसरू शकलो नाहीये”
“मीच दुर्दैवी, खरंच तू म्हणतोस तसं मी खात्री करून घ्यायला हवी होती, कानांनी ऐकलं पण मनाचं एकदा ऐकून बघायला हवं होतं. कदाचित आज गोष्टी वेगळ्या असत्या. आता फक्त पश्चाताप करण्याशिवाय काहीच नाही उरलं माझ्याकडे”
“खरंच आज गोष्टी वेगळ्या असत्या”
दोन्हीकडे शांतता पसरली होती, हुंदके आणि अश्रू पुसण्याचा आवाज.. इतकंच काय ते दोघांना ऐकू येत होतं.
“सॉरी सुहास..”
“अग वेडे, सॉरी म्हणून आता मला पुन्हा कोड्यात नको टाकू. मला असं वाटेल की तुझंही माझ्यावर प्रेम होतं की काय”
“त्या दिवशी कॉलेज मध्ये तू दिसायला हवा होतास, निदान मी आणलेले भेटकार्ड तरी तुला देता आलं असतं, आणि कदाचित हे सारं घडलं नसतं”
“म्हणजे.. तू ही..”
“हो, मी ही तुझ्यात गुंतले होते आणि तुला सर्व काही सांगायचं होतं, पण सारं काही वेगळंच घडलं”
पुन्हा एकदा दोन्हीकडे शांतता पसरली..
“शितल, काय घडलं हे असं आपल्या बाबतीत..”
“तू आता कुठे आहेस? एकदा भेटूया का आपण?”
“त्याने काय होणार आहे? टाइम मशीन नाहीय आपल्याकडे, ज्यामुळे
आपण भूतकाळात जाऊ”
“हो, माहीत आहे आता काही होणार नाही. पण मला एकदा तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी असणारं प्रेम बघायचं आहे, माझं प्रेम सार्थकी लागेल रे”
“माफ कर, पण आता ते शक्य नाही”
“का रे, इतकही सुख देणार नाहीस का मला? मान्य आहे मी चुकले पण त्याची इतकी मोठी शिक्षा नको रे देवू”
“मी काय तुला शिक्षा देणार, शिक्षा तर मला मिळाली आयुष्यात”
“असं का बोलतोय? तुझा संसार नीट आहे ना?”
“संसार करण्यासाठी लग्न तर व्हायला हवं. तू कॉलेज मधून गेलीस, आयुष्यातून गेलीस पण मनातून कधीच गेली नाहीस. ती जागाही कोणीच घेवू शकलं नाही”
“काय बोलतोयस अरे..” हुंदके देत ती विचारत होती.
“आज पर्यंत तुझ्या आठवणीत जगतोय, तुझा पत्ता फोन नंबर सारं काही शोधलं पण कधी तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची हिम्मत नाही केली. पण आता जायची वेळ आली म्हणून वाटलं तुला सगळं सांगावं एकदा. ते ओझं घेवून नाही मरायचं मला, आणि तू ही फक्त एक स्वप्न समजून विसरून जा. माझ्यासाठी तुझं आयुष्य दुःखी करून नको घेवू.. एवढं एक वचन दे”
“हे काय वेड्यासारखं बोलतोयस.. मरण्याची काय भाषा करतोय?”
“कॅन्सर, लास्ट स्टेज आहे”
“तू कुठे आहेस सांग मला, मी येते तुला भेटायला”
“नको, तुला समोर पाहून माझी जगण्याची इच्छा होईल आणि ते आता शक्य नाहीये”
“हॅलो… हॅलो.. हॅलो सुहास.. हॅलो.. अरे सांग ना कुठे आहेस”
समोरून काहीच उत्तर आलं नाही, फोन कधीच कट झाला होता.
कित्येक दिवस शितल त्या नंबरवर वेड्यासारखी फोन करत राहिली, पण तो नंबर आता “अस्तित्वात नव्हता”

काही दिवसांनी तिच्या घरी एक निनावी पत्र मिळालं, फक्त चार ओळींच…

“तू कुठेही रहे, सुखी रहा
सुख माझे त्यात आहे..
तू स्वतःला जपत रहा
प्राण माझा तुझ्यात आहे”

समाप्त

– मिथून संकपाळ.

==========================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.