Skip to content Skip to sidebar Skip to footer

संक्रमण ! (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२

©️®️राधिका कुलकर्णी

आजही नेहमी प्रमाणेच आर्य आपल्या खोलीत बसलेला.
बाहेर संक्रांतीच्या सणाची/ हळदी कुंकवाची जय्यत तयारी चालू होती.
सकाळपासून राधाची लगबग चाललेली. सासूबाईंना सणवार, उत्सव सगळे सांग्रसंगीत झालेले लागायचे. त्यात कुठलीही पळवाट किंवा आडमार्ग शोधलेला त्यांना मुळीच खपत नसे.

‘प्रत्येक सणाचे काही वैशिष्ट्य असते,महत्त्व असते. त्यामागे काहीतरी एक उदात्त हेतू असतो.उगीचच काळ बदलतोय म्हणत असलेल्या प्रथा मोडून नवीन काहीतरी फॅड काढून सणांचे पावित्र्य नष्ट करणे म्हणजे आपल्या पुर्वजांचा रोष ओढवून घेण्यासारखे आहे ‘
असे सासूबाईंचे ठाम मत.

त्यामूळे राधा जशी सून म्हणून हळदीकरांच्या घरात आली तसे सासूबाईंनी तिला सगळ्या रितीभातीनूसार सण, कुलाचार ,कुलधर्म सगळे शिकवले. राधानेही सगळे न चिडता त्यांच्या हाताखाली काम करत करत शिकून घेतले.
राधा चांगली त्यावेळची ग्रॅज्युएट झालेली. ठरवले तर सहज कॉलेजात प्रोफेसर म्हणून लागली असती पण हळदीकरांच्या घरात सुना नोकरी करत नाहीत ह्या नियमानुसार राधाही गृहिणीच बनून राहिली.

राधाला पसंत केले तेव्हाच तिच्या आईबापाला सासूबाईंनी कल्पना दिली होती की ‘आम्हाला शिकलेली मुलगी हवीय पण तिने नोकरी करणे आम्हाला चालणार नाही.’

हळदीकरांच्या घराण्याच्या गेल्या तीन/चार पिढ्या वकीली व्यवसायाकरताच प्रसिद्ध होत्या. त्यात राधाचा नवरा तर चांगला विलायतेत शिकून बॅरिस्टर बनून आलेला. घरात लक्ष्मी दहा हातांनी पाणी भरत होती. पुन्हा त्यांची लग्नासंबंधी इतर कोणतीही मागणी नव्हती. लग्नाचा दोन्हीकडचा खर्च करायची त्यांनी स्वतःहून तयारी दाखवली म्हणल्यावर राधाच्या आई वडिलांना आकाश ठेंगणे झाले.
आणि वर वधू एकमेकांना अगदी अनुरूप. नाही म्हणायला कुठे जागाच नव्हती. मग काय रूपया नारळ देऊन बोलणी पक्की झाली आणि लगेच मार्गशीर्ष महिन्यात दोघांचे धूमधडाक्यात लग्न लागले.
राधाच्या माहेरची परीस्थिती खाऊन पिऊन सुखी अशी बरी होती पण हळदीकरांच्या तामझामाला पूरे पडायची त्यांची कुठे ताकद. नाही म्हणलं तरीही पहिल्या सणांना साजरे करायचे तेही त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असा मानपान,आहेर करून ह्याचे राधाच्या आईबापाला दडपणच आले होते.
त्यात पहिलाच संक्रांतसण जवळ आला तशी त्यांची काळजी वाढायला लागली.. रीतीनूसार काय काय करायचे असते तो विधी गुरूजींकडून जाणून घेऊन त्यांनी त्याप्रमाणे लेक जावयाच्या सणाची तयारी सुरू केली. तरीही मनात धाकधूक होतीच. कुठे काही कमी पडू नये , नाहीतर राधाला उगीचच सासुकडून चार शब्द ऐकायला लागतील. एव्हाना राधाच्या सासूबाई रीतीभाती किती कडक पाळतात,त्यात कुठलीही कुचराई झालेली त्यांना कशी चालत नाही हे त्यांना ऐकून माहीत झाले होते. म्हणूनच ते अगदी काटेकोरपणे सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते.
आदल्या दिवशी भोगी,मग संक्रांत आणि मग किंक्रांत असा तीन दिवसांचा सण अगदी पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित पार पडावा ह्याची राधाचे आई-वडील काळजी घेत होते. त्याप्रमाणे अगोदर जाऊन त्यांना रितसर आमंत्रण पण देऊन आले होते राधाचे वडील.
म्हणता म्हणता भोगी आली. भोगविडे,वाण, सूपवाण सगळे यथोचित पार पडले. संध्याकाळी सवाष्ण बायकांना भोगविड्याचे वायन दान सगळे नीट पार पडले. राधाच्या आईने राधासाठी काळी चंद्रकळा आणि दोघांसाठी हलव्याचे दागिनेही केले होते.

संध्याकाळी राधाच्या सासरहून एक माणूस आला आणि राधाच्या आईला एक भली मोठी पिशवी देऊन सांगितले हे मोठ्या बाईसाहेबांनी पाठवलेय.
राधाच्या आईने आत जाऊन पिशवी उघडली आणि त्या थक्क झाल्या.
त्यात राधाच्या सासूबाईंनी पत्र धाडले होते.

चि. सौ. विहिण बाई ,
सप्रेम नमस्कार.

संक्रांतीच्या सर्वांना गोड शुभेच्छा !

मला कल्पना आहे की पहिला सण म्हणून तुम्ही यथोचित सर्व तयारी केली असेल. पण आमच्या रितीभातींचे ओझें तुम्हाला व्हावे किंवा त्या दडपणाखाली तुम्ही कर्ज काढून सण साजरा करावा असे मला मुळीच वाटत नाही. माझा आग्रह फक्त रीत पाळली जावी ह्याकडे असतो. मग बाकी गोष्टी गौण आहेत.
आमच्याकडे रीतीनूसार मुलगी आणि जावयाला दागिना घडवतात माहेरचे. म्हणून ह्यात रीतीप्रमाणे आवश्यक सर्व गोष्टी करून पाठवल्या आहेत. उद्या तुम्ही फक्त हे आमच्या सुन आणि मुलाला द्या.

आणखी एक.., ही गोष्ट फक्त आपल्यात राहील ही हमी जशी मी घेतेय तशी तुम्ही पण घ्या. वयाने मोठी म्हणून अधिकारवाणीने सगळे करत आहे. तुमचा अपमान करण्याचा किंवा तुमची न्यूनता दाखवायचा मुळीच हेतू नाही. तुम्ही तुमचे शंभर नंबरी सोनं आधीच तुमच्या लेकीच्या रूपाने आम्हाला दान केलं आहे. तीच लाख मोलाची संपत्ती दिलीय तुम्ही आम्हाला. ह्याउपर आम्हाला अजून कशाचीही अपेक्षा नाही.
तेव्हा कृपा करून कुठलेही गैरसमज न करून घेता ह्या सगळ्याचा स्विकार करावा ही विनंती.
काही चुकीचे वागले/बोलले असेन तर क्षमस्व.

तुमचीच विहीणबाई,
इंदूमती हळदीकर.

पत्र वाचून राधाच्या आईच्या डोळ्यांना धारा लागल्या. इतके समंजस लोक आणि सासर परमेश्वराकडे मागूनही मिळाले नसते. आत्तापर्यंत त्यांच्या कडक स्वभावाचीच महती कर्णोपकर्णी ऐकून होते राधाचे आई-वडील पण काटेरी फणसाच्या आतले गोड गरे ते आज प्रत्यक्षात चाखत होते. त्यानंतर मात्र त्यांना आपल्या मुलीची कधीही चिंता वाटली नाही की कसं होईल राधाचे खाष्ट सासुच्या हाताखाली.
दिवस वर्ष सरली. म्हणता म्हणता राधाच्या संसार वेलीवर फूलाची चाहूल उमटली. नऊ महिने नऊ मांस पुर्ण होताच राधाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सुंदर सुकुमार त्या मुलाला बघून सासुबाईंना तर त्याला कुठे ठेवू अन् कुठे नको असे व्हायला लागले.

इकडे राधाही हळूहळू नव्या नात्यातला नवेपणा विसरून सासूबाईंच्या हाताखाली तयार होत होती. सणवार,रीतीभाती, सगळे तिने एव्हाना शिकून घेऊन अगदी तरबेज झाली होती. सासूबाई पण आता थकल्या होत्या. आपल्या खोलीतूनच त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असत. राधाही अगदी त्यांना हवे तसेच सगळे करत असल्याने त्या आता पुर्णपणे निश्चिंत झाल्या होत्या.
लग्नाला बारा वर्षे झाली आणि सासूबाई अचानक बाथरूममध्ये पडल्याचे निमित्त होऊन माकडहाड तुटल्याने पुर्णपणे अंथरूणाला खिळून पडल्या. इकडे मुलगाही मोठा होत होता पण राधाला आपल्या मुलाच्या बाबतीत सतत एक चिंता भेडसावायची. आत्ता अजून अकरा वर्षांचा होता पण त्याचे वागणे, हालचाली तिला चमत्कारिक वाटायच्या. कळत नव्हते की हा फक्त तिच्या मनाचा खेळ आहे की खरंच काही गंभीर आहे जे मन तर सांगतेय पण आपलीच हिंमत होत नाहीये.
आर्य सतत मुलींचे कपडे, दागिने घालायची जिद्द करायचा. मुलींशीच खेळायचा. मुलींबरोबरच त्याला जास्त करमायचे. मुलांचे खेळ खेळायला त्याला अजिबात आवडायचे नाही. सतत आईच्या मागेमागे स्वैपाकघरात त्याची लुडबुड चाललेली असायची.

कधी जर ह्या विषयावर ती बोलायला गेलीच तर सासुबाई आणि नवरा ‘ अगं घरात जास्तीत जास्त वेळ तो बायकांत वावरत असतो म्हणून तसा वागतो. काळजी करायचे काय कारण ह्यात! ‘ अशी संपादनी करून तीची भीती खोडून काढायचे. मग तिचाही नाईलाज व्हायचा. पण आर्य चौदा/पंधरा वर्षांचा झाला तरीही त्याच्या सवयीत कोणताच बदल होइना तसे आता राधाच्या नवऱ्यालाही काळजी आणि एक अनामिक भीती भेडसावू लागली. त्याची नको त्या अवयवांची वाढ मुलींप्रमाणे होत होती. त्याचे मुलींसारखे स्तन वाढत होते. हे खूपच विचित्र होते. राधाने आर्यला बऱ्याचदा एकट्यात आपल्याच स्तनांशी खेळताना, किंवा त्यांचे निरीक्षण करताना लपून पाहीले होते. तिला त्याची खूप काळजी वाटत होती. बरं ही गोष्ट कुणाजवळ बोलण्याजोगीही नव्हती. एकट्यातच ती मुलाच्या काळजीने अनेकदा रडत रहायची. तिला असे रडताना पाहून आर्य प्रेमाने तिची चौकशी करायचा , “आईऽ काय झाले गं? का रडतेस अशी एकट्यात?
आज्जी काही बोलली का तुला?”
त्याच्या त्या प्रेमळ चौकशीने ती जास्तच भावनिक होऊन रडत असे.. इतके सोन्यासारखे माझे लेकरू पण देवाने त्यालाच का असे अर्धवट जन्माला घातले? हे माझे काही मागच्या जन्मीचे वाईट कर्म आहेत का म्हणून माझ्या उदरातून अशी अर्धवट उत्पत्ती झाली?
अरेऽ पण देवाऽ , जर मी चुकले असेन तर त्याची शिक्षा मला द्यायचीस ना , ह्या अजाण,निरपराध बाळाला का दिलीस?
तिला वाटणारी भीती फक्त भीतीच रहावी म्हणून ती अनेक व्रत वैकल्ये,उपास तापास पण करायला लागली होती हल्ली…
बऱ्याचदा तिच्या मनात यायचे की एकदा आर्यशी मोकळेपणाने बोलावे.त्याला त्याच्यातील ह्या शारीरिक बदलांबाबतीत काय वाटते? तो आतून दु:खी किंवा चिंतीत आहे का? त्याला स्वतःला काय वाटते? हे सगळे सगळे आई नाहीतर त्याची जवळची मैत्रीण म्हणून बोलावे पण तिची हिम्मत होत नसे कारण जर त्यातून तिला नको असलेले सत्य उघडकीस आले तर ते पचवणे अगोदर तिलाच अशक्य होते. त्यात जर मैत्रीच्या नात्यातून त्याने अजून काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे द्यायची तिची पात्रता होती का? हा ही तिला पडलेला दुसरा प्रश्न.
परंतु कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा राहतो थोडीच..! एक दिवस ती घटना घडली ज्यामुळे ह्या मनातल्या प्रश्नांनी वाचा फोडलीच. सकाळची वेळ. सगळे आवरून कपड्यांच्या घड्या ठेवायला राधा अचानक आर्यच्या खोलीत शिरली आणि समोरचे दृश्य बघून तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.

” आर्यऽऽऽ , हे काय करतोएस गधड्या?? हे असले नतद्रष्ट चाळे शोभतात का मुलाच्या जातीला??
आण ते इकडे.!”

म्हणतच एक जोरदार धपाटा पाठीत घालत राधाने आपली ब्रेसियर त्याच्या हातातून खेचून घेतली.
आईच्या अचानक येण्याने आणि असे रीॲक्ट होण्याने तोही गोंधळला,घाबरला आणि कपाटामागे जाऊन लपला. त्यांचा आवाज ऐकून वडीलही तिथे पोहोचले. आर्य घाबरून कपाटामागे लपला होता.. काय प्रकार घडलाय? राधा एवढी का चिडलीय? ह्याचा राधाच्या नवऱ्याला काहीच उलगडा होत नव्हता. त्याने धावत जाऊन आधी आर्यला आपल्या जवळ ओढले आणि राधाला जरा चढ्या स्वरातच विचारले,

” एवढं ओरडायला काय झाले गं? आर्य बघ किती घाबरलाय तुझ्या ओरडण्याने? “

” अहो ओरडू नको तर काय करू? कार्ट्याचे चाळेच तसे होते. नशिब तुम्ही बघितले नाही… मी तर फक्त एकच धपाटा घातला, तुम्ही तर बदडूनच काढले असते.”

“अगं पण नेमके झाले तरी काय?”

” शीऽऽऽ! मला तर आपल्याच तोंडाने सांगायची देखील लाज वाटतेय.. तुम्ही त्यालाच विचारा. मी जातेय.”

रात्रीची जेवणं, झाकपाक सगळं आवरून राधा आपल्या खोलीत आली तसे नवऱ्याने तिला विचारलेच..
” सकाळी काय झाले होते? का चिडली होतीस आर्यवर एवढी? “
त्यावर पुन्हा डोळ्यातील पाणी अडवता अडवता तिने सर्व प्रसंग नवऱ्याला कथन केला.
ह्याआधीही असेच त्याला आरशात स्वतःला निरखून पाहताना पाहिल्याचेही तिने सांगितले. प्रसंग खरच गंभीर आणि चिंताजनक होता.
अहोऽऽ मी काय म्हणते, एकदा एकट्यात तुम्ही त्याच्याशी बोलता का?”
हे सगळे तो मुद्दाम करतोय की अजून काही कारण आहे ते जाणून घ्यायला नको का? हा विषय तुम्हीच योग्य पणे बोलू शकताल..”
राधाने नवऱ्याला सांगितले. तसे त्यानेही होकार भरला. राधाला तर मुलाच्या भविष्याच्या चिंतेने रात्रभर डोळ्याला डोळाच लागला नाही.

नेहमीप्रमाणे घाईघाईत राधाचा नवरा आपल्या ऑफिसला गेला. काही क्लायंट आधीच त्याची वाट पाहत बसले होते. असिस्टंटने त्याच्या कामाच्या फाईल्स टेबलवर काढून ठेवल्या होत्या. राधाचा नवरा म्हणजेच गोपाळ आपल्यासमोर बसलेल्या क्लायंटची फाईल तपासतच होता इतक्यात टेबलवरचा फोन खणखणला.
त्याने फोन उचलला आणि क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले.
” हो.. लगेच पोहोचतो.” असे म्हणतच आजच्या सगळ्या केसेस असिस्टंटकडे सुपूर्द करून तो घाईतच निघाला.
अवघ्या दहा पंधरा मिनिटांत तो आर्यच्या शाळेत पोहोचला.
आर्यच्या शाळेतून फोन होता. प्रिन्सिपॉल मॅडमनी ‘ताबडतोब शाळेत या’ असे सांगितल्याने गोपाळ घाईतच पोहोचला.
प्रिंसिपल केबीनमध्ये भयाण शांतता होती. त्यांनी मुद्दाम आर्यला वर्गात जाऊन बसायला सांगितले होते. त्यामुळे आता केबीनमध्ये फक्त गोपाळ आणि मॅडम दोघेच होते.
” मॅडम इतक्या तातडीने का बोलावून घेतले तुम्ही? “
मॅडमनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
“अहो कारणच तसे गंभीर आहे म्हणून तक्रार नाही पण आर्यची काळजी वाटली म्हणून बोलावून घेतले तुम्हाला. तसा आर्य अभ्यासात हुशार आहे पण आजकाल त्याच्या बाबतीत सतत मुलींच्या कम्प्लेंट्स येताहेत की तो मधल्या सुट्टीत मुलींच्या वॉशरूम्समधे जातो. कोणी हटकले की तात्पुरता जातो आणि पुन्हा लेडीज टॉयलेटचाच वापर करतो. एक दोन वेळा मी रागावून सोडून दिले पण हे वारंवार घडतेय म्हणल्यावर ही गोष्ट पालक म्हणून तुमच्या कानावर घालणे मी माझे कर्तव्य समजले म्हणून इतक्या तातडीने बोलावून घेतले. तसा बाकी तो सगळा ठीक आहे पण मलाही त्याच्या काही हालचाली आणि वर्तनाबद्दल जरा शंका येते. तो इतर मुलांप्रमाणे मैदानी खेळ खेळत नाही. सतत मुलींचे निरीक्षण,मुलींशी लगट असल्या कृती करतो. हे जरा विचित्र आहे. तुम्ही त्याला जरा एखाद्या चांगल्या काऊन्सिलरला दाखवले तर बरे होईल. “

काल राधाने सांगितलेला प्रसंग आणि आज शाळेच्या हेडमास्तरीण बाईंची तक्रार ह्यातून गोपाळच्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकायला लागली. संध्याकाळी तो लवकरच घरी आला. आर्य आपल्या खोलीत अभ्यास करत होता. गोपाळ आर्यजवळ जाऊन म्हणाला , ” चल,आज आपण दोघेच फिरायला जाऊ.. येतोस ?”
बाबांबरोबर बाहेर जायचे म्हणले की आर्यची कळी खुलली.
बाबा मी आत्ता कपडे बदलून येतो. अरे बदल ना पटकन. फक्त शर्ट तर बदलायचा ना. आवर पटकन.”
गोपाळ तिकडेच थांबला. पण गोपाळसमोर कपडे बदलायला आर्य आढेवेढे घेऊ लागला. तो किंचित वरमल्यागत तिथेच पुतळा होऊन उभा राहिला. गोपाळला समजेना हा आपल्या समोर शर्ट बदलायला इतका का लाजतोय? “
” बाबा तुम्ही बाहेर जा नाऽ. मला लाज वाटते तुमच्यासमोर कपडे बदलायची. “
अडखळत चाचरत शेवटी आर्यने आपली अडचण बोलून दाखवली त्याबरोबर गोपाळ शॉक झाला हे ऐकून. हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे ह्याची एव्हाना त्यालाही खात्री पटली पण मुलगा म्हणून त्याला नेमके काय वाटते हे जाणून घेण्यासाठी त्याच्याशी संवाद आवश्यक होता, तेही संयमीत राहून, म्हणून तो निमूटपणे खोलीबाहेर गेला आणि आर्यची वाट पहात थांबला. थोड्याच वेळात आर्य कपडे बदलून बाहेर आला. गोपाळ त्याला घेऊन लांब एका मंदिरात गेला. दर्शन झाले तसे दोघेही एका दगडी चौथऱ्यावर टेकले. बाजूलाच एक भेळवाला भेळ विकत होता. आर्यला बोलते करण्याचा हा उत्तम पर्याय होता. गोपाळने लगेच दोन भेळपूड्या विकत घेतल्या आणि भेळ खाता खाता त्याला विचारले…
” आर्य, तुला माहितीय आज मी तुझ्या शाळेत आलो होतो.”
बाबांचे वाक्य ऐकताच आर्यचा घास घशातच अडकला.. आता बाबा पूढे काय बोलणार ह्याची बहुतेक त्याला कल्पना असावी.
” का बाबाऽऽ, का आला होतात तुम्ही शाळेत? “
“नाही , असेच कामानिमित्त आलो होतो. पण हेड बाई खूप कौतुक करत होत्या तुझे.. तू अभ्यासात खूप हुशार आहेस म्हणत होत्या.”
वडिलांचे वाक्य ऐकताच आर्य चपापला. हे कसे शक्य आहे. आज प्रत्यक्ष बाईंनीच मला रंगेहाथ पकडले होते तरीही… !
त्याच्या विचारांच्या तंद्रीतून गोपाळनेच त्याला बाहेर काढले..
” मग यंदा दहावी.. , नंतर काय करायचे ठरवलेस तू? तुझे कोण मित्र आहेत? त्यांचे काय ठरलेय पूढे? “

” बाबा मला ना कोणीच मित्र नाहीत. सगळे मला ‘बायल्या बायल्या’ म्हणून चिडवतात बाबा. मुलं फार वाईट्ट असतात. मला नाही आवडत मुलं. त्यापेक्षा मला मुलीच जास्त आवडतात. “
” अरे पण तुला ते असं का चिडवतात? “
” कारण मी त्यांच्यासारखा दिसत नाही नाऽऽ, मुलींसारखा नाजूक दिसतो, ह्यात माझा काय दोष ना.? पण त्यामुळे सगळी मुलं मला मधल्या सुट्टीत मारतात, चिडवतात, खूप त्रास देतात. मला खूप वाईट वाटते. मलाच नाही समजत की मला काय होते. बाबा मला माहीतीय आज तुम्हाला प्रिंसिपल मॅमनीच बोलवून घेतले होते ना,माझी तक्रार करायला??”
आर्यने रडवेल्या सूरात विचारले.
” अरे पण तुला इतके समजते तर मग तू जाणूनबुजून लेडीज टॉयलेटमध्ये का जातोस? तुला माहितीय ना मुलांनी मुलींच्या टॉयलेटमध्ये जाणे गून्हा आहे.”
” बाबा मला नाही समजत पण आपसूक माझे पाय तिकडे जातात. ” मलाच नाही समजत मी असे का वागतो. “
गोपाळला आर्यच्या अवस्थेची दया येत होती. मन काळजीने पोखरले असले तरी वरकरणी संयम दाखवत तो म्हणाला …
” हे बघ आपण उद्याच एका चांगल्या डॉक्टरकडे जाऊ. मग तर झाले.. काही प्रॉब्लेम असेल तर ते तो लगेच सोडवतील औषध देऊन. तू काळजी करू नकोस हां. मी आहे ना. सगळे ठीक होईल. चल भेळ संपव ती. मग आपल्याला तुझं फेव्हरीट आईस्क्रीम पण खायचेय अजून.. आवर पटकन. “
गोपाळने आर्यला सहज करण्याकरता हे सगळे बोलला पण खरेतर तोच मनातून खचला होता. आत्ता खरेतर त्यालाच आधाराची गरज होती.
पण आता अधिक वेळ न दवडता त्याने आपल्या फॅमिली डॉक्टरला भेटून ह्याबद्दल बोलायचे ठरवले.
भेळ आईस्क्रीम पार्टी संपवून दोघेही घरी आले. आर्यची कळी खुलली होती आज. त्या आनंदातच तो जेवायचे नाही सांगून आपल्या खोलीत गेला.
सगळी कामे उरकून जेव्हा राधा आपल्या खोलीत आली तेव्हा नवऱ्याला चिंतेत बघून तिने सहजच विचारले
” काय झाले? “
त्याबरोबर गोपाळ पुरूषासारखा पुरुष असुनही रडायला लागला.
रडतच त्याने शाळेतला किस्सा त्यानंतरचा आर्य बरोबरचा सगळा संवाद कथन केला. त्याच्या मनातली शंका खरी होते की काय हीच भीती त्याला सतावत होती.
राधाच्याही डोळ्यातून धारा वाहत होत्या. दोघेही एकमेकांना आधार देत होते. रात्र सरली आणि नव्या सुर्योदयासोबत एका नव्या नाटकाने हळदीकरांच्या घरात प्रवेश केला.
सर्व प्रथम एकटा गोपाळ, मग राधा आणि गोपाळ असे त्यांच्या फॅमिली डॉक्टरला भेटले. मग आर्यला घेऊन तिघेही भेटायला गेले. डॉक्टरांनी आर्यलाही बरेच खासगी प्रश्न विचारले. त्याची सगळी शारीरिक तपासणी केली. डॉक्टरांसमोरही तो सदरा काढायला लाजत होता..
एकंदर प्रकरण साधे सरळ नव्हते हे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. राधा आणि गोपाळला एका भयानक सत्याचा सामना करायचा होता. ते कसे रीॲक्ट होतील?
ही गोष्ट त्यांच्या पचनी पडेल का?
अशा परिस्थितीत त्या मुलांना त्यांची फॅमिली पण सपोर्ट करत नाही, मग काय होईल आर्यच्या बाबतीत?
तो हे सत्य कसे स्विकारेल???

डॉक्टरांच्या मनात अनेक प्रश्न रूंजी घालत होते.
तरीही शेवटची खात्री करायला त्यांनी काही चाचण्या करून घेण्याचा सल्ला दिला.
काही दिवसांतच त्याची अल्ट्रासाऊंड टेस्ट,क्रोमोझोम स्टडीसाठी रक्त तपासणी, काही स्कॅनिंग आणि इंटरनल एक्झामिनेशन अशा विविध चाचण्या करण्यात आल्या.
ह्या सर्व टेस्ट्सचे रीपोर्ट्स आल्यावर अखेर त्या कटू सत्यावर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केला जे पचवणे पालक म्हणून आर्यच्या आई-वडिलांना अगदी अशक्यप्राय गोष्ट होती ते म्हणजे ‘आर्य हा पूर्ण पुरुष नाहीये. त्याच्यात स्त्री हार्मोन्स (इस्ट्रोजीन/प्रोजेस्टेरॉन) जास्त प्रमाणात सेक्रिएट होत असल्याने तो जन्माने पुरूष असुनही स्त्री आहे.
हळदीकरांच्या घराण्याच्या इज्जतीवरच हा खूप मोठा घाला होता.
बाहेर कितीही लपवले तरी सत्य एक ना एक दिवस उघडकीस येणारच होते.

बरं ह्या सगळ्यात आर्य हे सत्य कसे स्विकारेल हा त्याहून मोठा प्रश्न होता. ह्या नाजूक काळात जर त्याला कोणी गैरवागणूक दिली तर त्याचे मन खच्ची होण्याचे चान्सेस नाकारता येत नव्हते. सगळ्यात अगोदर घरात त्याची आज्जी हे कसे स्विकारते हा मोठ्ठा प्रश्न होता.
अखेरीस मन घट्ट करून राधा आणि गोपाळने आर्यच्या अवस्थेचे सत्य त्याच्या आज्जीला सांगायचे ठरवले.

मुळातच असे काही असते हेच मान्य नसणाऱ्या राधाच्या सासूबाईंनी त्या दिवसानंतर आर्यला आपल्या सावलीपासूनही दूर ठेवले. घरी कोणत्याही सणवार, उत्सव प्रसंगी हमखास आर्यला खोलीत डांबून घातले जायचे.. का? तर आज्जीचे तसे फर्मान होते. पूजापाठ, देवाधर्माच्या वेळी त्याला तिथे यायला मज्जाव केला जाऊ लागला.
कोवळ्या वयात एक आघात कसाबसा पचवत असताना घरात ही अशी अपमानास्पद वागणूक त्याच्या दु:खावर डागण्याच देत होती. अभ्यासातही त्याचे मन लागत नव्हते.
तो आजकाल स्वतःच स्वतःला खोलीत कोंडून घेत असे. राधा आणि गोपाळ जरी त्याला प्रेमाने बघत असले तरी अशा प्रसंगी नाईलाजाने का होईना त्यांना आज्जीचे म्हणणे ऐकून तसे वागावे लागायचे ह्याचे त्यांनाही प्रचंड दू:ख होई.. राधाचे एरवी सगळे ऐकणाऱ्या सासूबाई ह्या एका बाबतीत मात्र जाम आपले विचार बदलायला तयार नव्हत्या. दिवसेंदिवस हा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होत चालला होता. घरातल्या हीन वागणूकीमूळे आर्य आपल्याच कोशात वावरू लागला होता. आई वडीलांशी देखील त्याचा संवाद हल्ली खूप कमी झाला होता…
आजही तो असाच आपल्या खोलीत बंद होता.
कारण घरात आज संक्रांतीच्या हळदी-कुंकवाची तयारी सुरू होती. आसपासच्या सगळ्या घरातील बायका हळदी कुंकवाला येणार. त्यांच्यासमोर ह्या अपशकूनी पोराचे तोंड दिसायला नको म्हणून कोणी काही म्हणण्याअगोदरच आर्यने स्वतःला बंद करून घेतले होते.
सगळी तयारी करून रीतीप्रमाणे राधा छान शालू नेसून , गळ्यात दागिने, नाकात नथ अंबाड्यात मोगऱ्याचा चौपदरी गजरा आणि कपाळावर चंद्रकोर लावून बाहेर आली. सासूबाईंच्या आग्रहाखातर मन नसतानाही ती नटूनथटून चेहऱ्यावर उसने हसू आणून सासूबाईंच्या पाया पडायला त्यांच्या खोलीत गेली.
त्यांच्या पायावर डोके ठेवताना नकळत एक कढत आश्रू त्यांच्या पायावर ओघळला. सासुबाईंना ती ओल जाणवली. राधा निमूटपणे अलगद डोळ्यांच्या कडा टिपत खोलीबाहेर पडतच होती की सासूबाई अचानक म्हणाल्या
” राधेऽऽ आज संक्रांतीचे पहिले हळदी कुंकू आपल्या घरच्या लेकीला दे .मग बाकीच्यांना.”
ते वाक्य ऐकताच राधा दारातच थबकली.
तिचा क्षणभर विश्वासच बसेना की तिने जे ऐकले ते खरे होते का..!
परत वळून ती सासूबाईंकडे एकटक पाहू लागली. तसे त्या पुन्हा म्हणाल्या..
अगं जिथे निसर्ग आलेल्या संक्रमणाचा स्विकार करून सूर्य आपली दिशा बदलतो तिथे आपण तर साधी माणसं आहोत. मग आपणही आपल्या विचारांमध्ये संक्रमण नको का करायला?
एरवी मी हे वैचारिक संक्रमण कधीच स्विकारले नसते पण काल तुझ्या लेकाने नाही ‘लेकीने’ मला धडा शिकवला..
राधा अजूनही बुचकळ्यात. तिला सासूबाई काय बोलताहेत काहीच उलगडा होत नव्हता.
त्यावर मग सासुबाईंनी एक सुस्कारा सोडत काल घडलेला एक किस्सा सुनावला..

काल रात्री अंधारात कोणाला न सांगता माझ्या अपमानकारक वागणूकीला कंटाळून आपला आर्य घर सोडून चालला होता. पण त्याच वेळी मी पाणी प्यायला तांब्या घ्यायला उठले आणि तोल जाऊन पडले आणि तांब्या हातातून पडला. त्या आवाजाने घराबाहेर जाणारा आर्य धावत माझ्या खोलीत आला. ज्याला मी स्वतःला स्पर्शून घ्यायला भीत होते त्याने मला बेडवर बसवले. पाणी पाजले. मायेच्या ममतेने माझी चौकशी केली. त्यावेळी जर माझ्यावरचा राग मनात धरून तो मदतीला आला नसता तर आज मी कदाचित जीवंतही दिसले नसते. आईच्या मायेने त्याने रात्रभर माझ्या उशाशी बसून माझी सेवा केली. त्याच्यातील स्त्रीत्वाने, त्याच्यातील मातृत्वाने हा बदल माझ्यात घडवून आणलाय.
आता माझ्या मनात कोणताही संदेह नाही. जा आपल्या लेकीला छान नटवून तयार कर आणि पहिले हळदी कुंकू तिला दे. आजपासून ती ” आर्या ” माझी नात आहे. “
———————————————————–. (असेही एक – विचार संक्रमण)
(समाप्त)
©️®️राधिका कुलकर्णी.

===================

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.