संघर्ष भाग 9

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
एक दिवस मी शाळेत शिकवत असताना मला अचानक चक्कर आली. समोरचं काही दिसेना. मी घाबरले हे काय आता नवीन? कसबसा तो शाळेचा दिवस पूर्ण करून मी घरी आले. सगळं कॅलेंडर वगैरे तपासून पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की आपली पाळी चुकली आहे. माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. प्रचंड भीती वाटू लागली, पण मी ठरवलं की आता घाबरायचं नाही, कसंही करून या वेळी आपण हे बाळ या जगात आणायचंच. पण आधी नक्की हे खरं आहे का त्याची टेस्ट करायला हवी होती. मी आकाशला सर्व सांगितलं आम्ही घरीच टेस्ट केली. आणि इतका आनंद झाला की, ती टेस्ट पॉझिटीव्ह आली. आता मात्र वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. आम्ही लगेचंच डॉक्टरांकडे गेलो. महिला डॉक्टर होत्या. त्यांनी परत टेस्ट केली. मी प्रेग्नंट आहे असं आता निश्चित झालं.
डॉक्ट मॅडमनी सांगितलं की, पहिले दोन अॅबॉर्शनची हिस्ट्री असल्यामुळे ‘‘तू आता पूर्ण बेडरेस्ट घे. म्हणजे आपण काळजी घेतलेली बरी.’’ त्याचवेळी आईची नेमकी दुसर्या गावी बदली झाली होती, तसंच वहिनीही नोकरी करणारी होती. त्यामुळे मी माहेरी राहायला जाऊ शकत नव्हते. आता काय करायचं? हा प्रश्न. पण मला जितक्या अडचणी येत होत्या त्यावर काहीतरी मार्गही निघत होते. माझ्या शेजारी राहणार्या एका वहिनींनी मला मदत केली. त्यांच्याकडून आम्ही जेवणाचा डबा घेत असू. खूप सुंदर जेवण दिलं त्यांनी आम्हाला.
आकाशला मात्र घरात खूप काम करायला लागत होतं, पण बाळाच्या ओढीने आणि माझ्या काळजीने तो खूप काम करत होता, घरातलं प्लस त्याचं बाहेरचं. शाळेतही मी कळवून टाकलं की, मला आता शाळेत यायला जमणार नाही. खरंतर त्यांना वाईट वाटलं, पण कारण ऐकून आनंद झाला कारण लग्नाला चार वर्षं होत आली होती. रोज काहीतरी अडचणी येत होत्या, पण मी मनाशी निश्चय केला होता की, काही झालं तरी या बाळाला या जगात आणायचंच.
तीन महिने झाले आणि डॉक्टरांनी पिशवीला टाका घातला, जेणेकरून अॅबॉर्शन होऊ नये. माझी शाळा, पोस्ट, क्लास घेणे सगळंच बंद झालं होतं. मला डोहाळेही कडक होते. काही होत नसताना झोपून राहायचं बंधन होतं. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला माझं वजन प्रचंड वाढलं. प्रचंड म्हणजे इतकं की 25 किलो वजन वाढलं. नाजुकाची मी अगदी गरगरीत झाले, पण काही करू शकत नव्हते.
पाचव्या महिन्यापासून आणखीन एक बदल माझ्यात दिसू लागला तो म्हणजे माझ्या अंगाला प्रचंड सूज येऊ लागली. आता आणखी नवं संकट कोणतं येतंय याची प्रचंड धास्ती मला वाटू लागली. आईवडिलांची शुगरची हिस्ट्री आहे म्हणून चेक करुया असं मॅडम म्हणाल्या आणि चेक केलं तर मला शुगर निघाली. आणखी एक टेंशन. दिवस राहिले म्हणून आनंद साजरा करताच आला नाही टेंशनची मालिका सुरूच होती.
पण आता आई-बाबांनी ठरवलं की, हिला आपल्या घरी आणायचं. आईने रजा काढायची ठरवली. आणि मला ती बाळंतपणासाठी माहेरी घेऊन आली. आता माझं पथ्याचं जेवण सुरू झालं होतं. नाचणीची भाकरी, आंबील कारण शुगर आणि बीपीही सुरू झालं होतं. त्याचा त्रास बाळाला होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी आई घेत होती.
माझ्या आते नणदेचं डोहाळजवेण थाटात केलं. त्यात त्यांनी माझंही कौतुक केलं, पण माझ्या प्रकृतीमुळे आईला माझं डोहाळजेवण करता आलं नाही. दुसर्याच्या समारंभात माझा समारंभ उरकला गेला, एक लग्नं असं झालं आणि नंतर कोणताही समारंभ माझ्या नशिबातच नव्हता. असं मला वाटायचं. आई म्हणाली, ‘‘नाराज होऊ नको आपण नवव्या महिन्यात तुझं डोहाळजेवण धामधुमीत करू.’’
पण नवव्या महिन्यातसुद्धा मला तो आनंद मिळाला नाही, कारण माझी प्रकृती नाजूचक होती. शेवटी नववा महिना लागताच एक दिवस आईने घरातल्या घरात माझं डोहाळजेवण करून घेतलं. कारण या दोन महिन्यात मला दोन-तीन वेळा अॅडमिट करावं लागलं होतं. एकदा बाळंतपण सुखरूपणे होणं हेच आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. म्हणून कुणालाही बोलावलंय नाही. तिने सगळे पदार्थ केले, पण सगळं घरातल्या घरात.
मला कडक डोहाळे लागले होते. पेठा खूप खावासा वाटत होता, आता मोठा भाऊ पण सगळं विसरला होता त्याने माझ्यासाठी दिल्लीहून पेठा मागवला होता. त्यामुळे मी खूश होते.
दोनच दिवसांनी मला असं जाणवायला लागलं की, माझं पोट कमी कमी होतंय. मी आईला तसं म्हटल्याबरोबर ती म्हणाली, ‘‘आपण आपलं दवाखान्यात जाऊ.’’ आम्ही दवाखान्यात गेलो. तर डॉक्टर मॅडम म्हणाल्या, खरंच हिच्या पोटातलं पाणी कमी झालंय.
शेवटी डॉक्टरांनी ठरवलं, दोन दिवसांत हिचं सिझरीन करू. सगळ्यांना खूप टेंशन होतं, मला मात्र यावेळी खात्री होती, की हे बाळ माझ्या हाती येणार. सात-आठ डॉक्टरांची फौज माझ्या सिझरीनला हजर होती. जेव्हा बाळाचा जन्म झाला मला कळलं तेव्हा मी तिथल्या सर्व डॉक्टरांना खूप धन्यवाद दिले. त्यांनाही आश्चर्य वाटलं की हा पहिलाच पेशंट आहे की, सिझरीन चालू आहे आणि बोलतोय. पण माझ्याकडे सकारात्मकता खूप होती म्हणूनच इतक्या संकटांना मी धीर देऊ शकले.
बाळ झालं, पण ते लहान होतं, तरी डॉक्टरांना आधी वाटलं होतं त्याप्रमाणे त्या बाळाला पेटीत ठेवावं लागलं नाही, कारण त्या मानाने बाळ खुटखुटीत होतं. हे बाळ म्हणजेच माझी रक्षा. ‘पहिली बेटी धनाची पेटी’ ही म्हण माझ्या बाळाच्या बाबतीत अगदी खरी ठरली. बाळ तरी सुखरूप झालं मी हुश्श केलं.
मला खूप नाजूक, सुंदर गोरीपान अशी मुलगी झाली होती, तिचं वजन थोडं कमी होतं पण बाकी ती खूपच छान होती. बाळ हातीपायी सगळं व्यवस्थित होतं हेही खूप महत्त्वाचं होतं कारण मला खूप इंजेक्शनं, औषधं पहिल्यापासून होती. पण पाच दिवस होताच बाळाच्या अंगावर सगळीकडे फोड उठले. परत मी घाबरले. नंतर कळलं की, मी घेतलेल्या सर्व औषधांमुळे बाळाच्या शरीरात उष्णता झाली होती. पण लगेचंच बाळाला डॉक्टरांनी बरं केलं.
दवाखान्यातून मी आईकडे राहायला आले. बाळ अशक्त असल्याने ते माझं अंगावरचं दूध पिऊ शकत नव्हतं कारण त्याच्या अंगात तेवढी ताकदच नव्हती हे आणखी एक दुर्दैव माझं. त्यामुळे बाळाला बाटली लावली होती. पण ते बाटलीचं दूधही बाळाला पचत नव्हत आणि सारखं संडासला होत असे. आईने तीन महिने माझं बाळंतपण केलं. बाळाची तब्येत थोडीफार सुधारायची की, लगेच परत ती आजारी पडायची.
बाळ आता तीन महिन्याचं झालं होतं. आईनं मग मात्रं मोठं दणक्यात बारसं केलं. यावेळी सगळे नातेवाईक हजर होते. खूप खूप मोठा समारंभ झाला तो अगदी कार्यालय घेऊन. सासर-माहेरचे सर्व होते. खूप गिफ्टस्ही मिळाल्या. बारशात आकाशने तर बाळाला 20 ग्रॅमचा हार केला होता. मला फारच आश्चर्य वाटलं.
आता माझी घरी जायची वेळ आली होती, पण बाळाला घेऊन त्या छोट्याशा भाड्याच्या खोलीत जाणं शक्य नव्हतं. एक चांगली गोष्ट झाली की, दुसरं संकट हे तर माझं नशीबच होतं. कारण ज्या फ्लॅटमध्ये आम्ही पैसे गुंतवले होते तो मालक डुबला होता आणि त्याने बिल्डींगचं काम थांबवलं होतं. आता काय करायचं? माझं बहुतेक नशीबच असं होतं की, कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नव्हती. आताही सगळे पैसे भरले होते, पण फ्लॅट तयार नव्हता. शेवटी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की, आपला फ्लॅट आपणच बांधायचा. पण त्याला वर्ष जाणार होतं.
मग आम्ही दुसरा एक फ्लॅट भाड्याने घेतला तो जरा मोठा होता. बाळ झाल्यापासून आकाश इतका खूश होता की, तो बाळाचं सर्व काही कोडकौतुक करत होता. आता तर मी माहेरून फ्लॅटमध्ये आल्यामुळे आकाशच बाळाला सांभाळत असे. तिलाही वडिलांचा खूपच लळा होता. आता मोठा प्रश्न होता हा की, मला शाळेत हजर होणे गरजेचं होतं, आईलाही जॉबला जाणं गरजेचं होतं, बाळाला कोण सांभाळणार? आकाशचा व्यवसाय असल्याने तो अधेमध्ये लक्ष ठेवू शकत होता, पण पूर्णपणे सांभाळायची जबाबदारी घेऊ शकत नव्हता. कारण त्याचंही काम वाढलं होतं. आणि आता काम करणंही आवश्यकच होतं. परत एकदा शेजारी माझ्या मदतीला आले आणि आम्ही नवीन भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो तिथे शेजारी एक काकू होत्या त्यांनी बाळाची जबाबदारी घेतली. तीही त्यांच्याकडे रुळली त्यामुळे मी निश्चिंत शाळेत जाऊ लागले.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
============
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.