Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

आता लग्नं तर झालं होतं मी रेणू जोशीची रेणुका साठे झाले होते. मंगळसूत्रं खोटं असलं तरी खरी जबाबदारी माझ्यावर आली होती. लग्नं म्हणजे काय, संसार म्हणजे काय? असा कधी विचारच मी केला नव्हता. एक क्षणात माझं आयुष्य पूर्णत: बदलून गेलं होतं. आईवडिलांच्या इच्छेने आपण लग्नं केलं असतं तर किती आनंदात असतो आपण? त्यांनीही हौसमौज केली असती. मी खूप लाडकी मुलगी होते त्यांची, पण त्यांनी कधी हा विषय माझ्याजवळ काढलाच नाही, मला त्यांच्याशी बोलायचे होते तर वेळच मिळाला नाही. खूपवेळा असं वाटतं की, मी त्या दिवशी आकाशला भेटायलाच गेले नसते तर किती बरं झालं असतं, पण कधीकधी असंही वाटतं माझं लग्नं जर दुसर्‍या कुणाशी झालं असतं तर काय झालं असतं? मी कधीच सुखी राहिले नसते आणि आकाश त्याचं काय? तोही माझ्याशिवाय राहू शकला नसता.
आता मागचा विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता, आता घेतलेल्या निर्णयावर समर्थ राहण्याची, त्यातून मार्ग काढण्याची खरी गरज होती आणि आपण त्यातून मार्ग काढला.
समाधानाने रेणू हसली. त्या वेळच्या कष्टातून आपण सहीसलामत बाहेर पडलो आणि खरंच आता खूप सुखी, समाधानी आयुष्य जगतोय. ती जरा उठली पाहिलं तर चारच वाजले होते. तिने आकाशला एक फोन लावला. अजून यायला खूप वेळ लागेल आकाशने सांगितले. तिलाही बरंच वाटलं. आज तिला काही काही सुचत नव्हतं. भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर वर्तमानकाळ म्हणून नाचत होता. तिने हलकेच तोंडावर पाणी मारलं.
आता थर्मासमधली कॉफीही संपली होती. पोटात भूक जाणवत होती. काय करावं बरं तिने परत कॉफी केली आणि समोर बिस्कीटाचा मोठ्ठा डबा घेऊन ती बसली. लिक्वीड डाएटची ऐशी की तैशी म्हणत ती परत झोपाळ्यावर बसली.
लग्न झालं होतं, काकांनी घरी राहायचा आग्रह केला, पण आकाश आणि मी दोघांनीही ठरवलं की नको इथे राहायला, कारण त्याचे मित्रं पण बरोबर होते. मग आम्ही जी गाडी करून आलो होतो त्या गाडीने परत कणकवलीला गेलो आणि त्याच्या मित्रांना घरी सोडलं. आम्ही आता विचार केला होता की, आकाशची एक मावशी कोल्हापुरात राहात होती तिच्याकडे आपण दोन दिवस जाऊ आणि मग सावंतवाडीत परत जाऊ. त्याप्रमाणे आम्ही कोल्हापूरला गेलो.
त्या मावशीनेही आमचं स्वागत केलं. असं पळून जाऊन लग्न वगैरे केलं म्हणून काहीच बोलल्या नाहीत त्या. या सगळ्याचं एक कारण असावं की मी आणि आकाश तसे एकमेकांना अनुरूप होतो, पण माझं मन मात्र सतत मला दुषणं देत होतं. सारखी आई-बाबांची आठवण येत होती त्यांनी काय केलं असेल, माझा कसा शोध घेतला असेल त्यांच्या मनावर किती दडपण आलं असेल असं सारखं वाटत होतं. कोल्हापूरला आल्यानंतर दुसर्‍या दिवशी मात्र मी आकाशला सांगितलं की, ‘आज आपण आईला फोन लावूच.’ आमच्या घरी तेव्हा फोन होता.
एसटीडी बूथवरून मी घरी फोन लावला. पहिला फोन भावाने उचलला माझा आवाज ऐकताच त्याने रागाने फोन खाली ठेवला तो तरुणच होता, माझ्यापेक्षा मोठा. त्याला प्रचंड राग आला होता. साहजिकच होतं ते. मला रडूच फुटलं. तरी परत एकदा प्रयत्न करावा म्हणून मी दुसर्‍यांदा घरी फोन केला. तो आईने उचलला. ती बोलली काही नाही माझा आवाज ऐकून ती रडत होती, मी तिला एवढंच सांगू शकले, ‘‘की मी लग्नं केलं, माझं चुकलं, पण आता मी सुखरूप आहे.’’ तिने फोन खाली ठेवला नाही जोपर्यंत मी बोलत होते, पण ती माझ्याशी एकही शब्द बोलली नाही. मला ते फारच लागले.
खरंतर आईचं बरोबरच होतं, माझी चूक मोठ्ठी होती. एकतर पळून जाऊन लग्नं केलं त्यामुळे आई-वडिलांची समाजात होणारी नाचक्की. तसेच मी कुठे, कशी गेले हे कळेपर्यंत त्यांच्या मनात होणारा गोंधळ, की हिने काही बरं-वाईट तर करून घेतलं नाही ना? किती मन:स्ताप झाला असेल त्यांना असं मला सारखं वाटत होतं. मी सात पर्यंत घरात आले नाही म्हटल्यावर माझ्याबरोबर जी मैत्रीण शेवटपर्यंत होती तिच्या घरी जाऊन त्यांनी हजार प्रश्‍न विचारले. त्या मैत्रिणीला बिचारीला काहीच माहिती नव्हती. तिला माझ्यामुळे त्रास झाला याचं मला आजंही वाईट वाटतं. तिनेही आई-बाबांना सांगितलं की, ती आत्ताच तर म्हणाली, ‘‘मी पळून जाऊन लग्नं करणार नाही.’’ पण आता माझ्यावर कोण विश्‍वास ठेवणार होतं की, मी असं म्हटलं होतं.
नंतर मला कळलं हे सगळं कळलं होतं. की माझा शोध कसा घेतला, मैत्रिणीकडून चौकशी गेल्यावर भाऊ आकाशच्या खोलीवर गेला, तिथे एक-दोघांनी मला त्याच्या खोलीत जाताना पाहिलं होतं आणि नंतर आम्ही बाहेर पडलेलं होतं. त्यामुळे मी त्याच्याबरोबरच गेलेय हे साधारण 8 च्या दरम्यान त्यांना समजलं. तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. निदान मी सुखरूप आहे हे तरी कळलं त्यांना. त्यातून त्यांनी मी काही बॅग वगैरे बरोबर नेली का याची पाहणी केली तर तसं काहीच नव्हतं म्हणजे त्यांना हे कळलं की, मी पळून जाण्याच्या उद्देशाने घरातून गेले नव्हते. या विचाराने त्यांना थोडं बरं वाटलं.
आईशी फोन वर बोलल्यावर मला जरा बरं वाटलं. निदान केलेल्या चुकीची माफी तरी मागितली होती. इतक्या सहज ते माफ करणार नाहीत कारण माझी चूकच तेवढी मोठी होती. पण जरा तरी बरं वाटलं. आईला पण आपली लेक निदान सुखात आहे हे कळल्यामुळं समाधान वाटलं असावं.
मग चार-पाच दिवस कोल्हापुरात राहून आम्ही परत सावंतवाडीत आलो. आता खरं आव्हान होतं. कारण त्याच्या एका खोलीत आम्हाला संसार करायचा होता आणि आई-वडील त्याच गावात असून मला आल्या आल्या त्या घरी जाता येणार नव्हतं. आता माझं माहेरचं घर ज्यात मी आतापर्यंत माझं घर म्हणून राजकन्येसारखी वावरले तेच घर मला परकं झाल होतं. काही दिवसांतच माझं सगळं आयुष्य पूर्ण बदलून गेलं होतं, तो एक क्षण ज्यावेळी मी म्हटलं, ‘चल आपण पळून जाऊ.’ तो एक क्षण जर नसता तर सगळं सुरळीत झालं असतं अस्सं हजारदा नाही लक्षवेळा वाटतं, पण…
आम्ही खोलीवर आलो. मोजकेच कपडे होते माझ्याकडे आणि गळ्यात खोटं मंगळसूत्रं आम्हाला असं जोडीने आलेलं त्याच्या शेजारी राहणार्‍या काकूंनी पाहिलं त्या खूप चांगल्या होत्या. दुपारी बाराची वेळ होती. आम्ही आता जेवायला बाहेर जायचं असं ठरवत होतो कारण खोलीवर काहीच सामान नव्हतं आणि मला जुजबीच जेवण येत होतं, पण शेजारच्या काकूंनी आग्रहाने आम्हाला दोघांना जेवायला बसवलं. तेव्हा आतासारखं अगदी थोडक्यात जेवण वगैरे करत नसत लोकं. सहज दोनचार माणसं खपतील असा स्वयंपाक असायचा. ‘अतिथी देवो भव’ हा विचार असायचा त्यामागे. आही जेवलो.
संध्याकाळी आपण आत्तेकडे जाऊ असं आकाशने मला सांगितलं. माझ्या पोटात मोठा गोळा आला कारण आत्ते तर माझ्या आईच्या घरासमोरच राहायला होती. काय करायचं काय करायचं असा सतत विचार होता, मग मी एक निश्‍चय केला, मी आकाशला म्हटलं,
‘‘आत्तेकडे जायच्या आधी मी माझ्या आईबाबांना भेटणार.’’
त्यानेही काही आक्षेप घेतला नाही. मी संध्याकाळी घरी गेले.
आई, बाबा, दोन्ही भाऊ घरातच होते. माझं लग्नं झालं मी कोल्हापूर वगैरे फिरून आले पण आई-बाबांना मात्र घरातून बाहेर पडण्याची इच्छाच होत नव्हती. बाहेर पडलं तर लोकं बोट दाखवतील, ‘यांची मुलगी पळून गेली’ याचं त्यांना जास्त वाईट वाटत होतं. कारण दोघंही मोठ्या आणि चांगल्या पोस्टवर होती. आपल्यामुळे यांना हे दु:ख भोगायला लागतंय याचं मला आजही खूप वाईट वाटतंय. मी केलेल्या त्या चुकीचं मी आजही समर्थन करत नाही मी निश्‍चितच चूक केली होती की मी अशा तर्‍हेने लग्न केलं, पण आता ते सर्व होऊन गेलं होतं.
मी आकाशला सांगितलं होतं, ‘तुला कुणी वेडंवाकडं बोललं तर तू ऐकून घे. काही बोलू नकोस.’ त्यालाही समजत होतं आई-बाबांची काय अवस्था असेल ते. तोही ‘हो’ म्हणाला.
मी घरात गेले, मोठ्या भावाने माझ्याकडे पाहिलंही नाही, कारण त्याला माझा प्रचंड राग आला होता, माझ्या पुढच्या अ‍ॅडमिशनसाठी तो माझ्याबरोबर खूप फिरला होता, मला चांगलं श्रीमंत स्थळ मिळावं अशी त्याची इच्छा होती. मी आईच्या जवळ गेले, परवा फोनवरून तिची माफी मागितली होती तशीच परत तिची माफी मागितली. ती काही बोलली नाही, पण माझं सारं ऐकून घेतलं तिने. बाबांजवळ गेले तेही रडत होते. धाकट्या भावाजवळ गेले. कोणी काही बोललं नाही, पण माझा अपमान पण केला नाही. घरातून मी निघाले. देवाला नमस्कार करायला गेले तर माझी आई माझी ओटी भरायचं सामान घेऊन तिथे आली. मी गळ्यातली चेन आणि आंगठी काढून ठेवली होती, आईने काही न बोलता ओटीत ती परत तशीच ठेवली.
मी आत्तेकडे जेवायला निघून गेल्यावर बाबांनी आईला सांगितले, तिच्या कपड्यांची बॅग भर आणि तिला दे. कारण आता तिच्याजवळ कपडे नसतील. आईने माझी बॅग भरली आणि मला तिथे आणून दिली. खरंच किती निर्व्याज प्रेम करतात ना आई-वडील? मी इतकी मोठी चूक करूनही त्यांनी मात्रं माझ्या भल्याचा विचार केला.
माझ्या आईवडिलांचा तर प्रश्‍न सुटला. आता मोठा प्रश्‍न होता तो आकाशच्या आईवडिलांचा त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं. त्यांच्या मुलाने लग्नं केलं हेही त्यांना माहीत नसावं. ती दोघं रत्नागिरी जवळच्या एका गावात राहात होती. आकाश म्हणाला, ‘‘परवा आपण दोघं त्यांना भेटायला जाऊया.’’ आता मला खरी भीती वाटत होती. त्याची आई मला ओळखत होती कारण ती समोर तिच्या नणदेकडे यायची. पण मी आता एकदम सून म्हणून गेले तर घरात माझं कसं स्वागत होईल याचीच मला चिंता लागून राहिली होती.
सासरी जायचं मग असं खोटं मंगळसूत्रं कसं घालून जायचं म्हणून मी खरं मंगळसूत्रं घ्यायचा विचार केल. आकाशच्या आत्तेच्या मैत्रिणीने मला पैसे उधार दिले. मी जाऊन मंगळसूत्रं घेऊन आले. त्या आत्तेनी मला खूप मदत केली. मुलीसारखी माया केली. स्वयंपाक शिकवला. भांडी दिली, खूप काही जेवढं म्हणून करता येण्यासारखं होतं तेवढं त्यांनी आमच्यासाठी केलं. आकाशला आत्या खूप होत्या आणि त्या सर्व खूप चांगल्या. एका आत्तेला मूलबाळ नव्हतं ती आकाशवरच मुलासारखं प्रेम करत होती. तिच्याकडे इतक्या साड्या होत्या आणि सगळ्या नव्या-कोर्‍या. त्यांनी मला त्या साड्या दिल्या आणि ब्लाऊज शिवण्यासाठी पैसेही दिले आणि वर सांगितलं की, मला या साड्या नेसून दाखवायच्या. आमच्या हातात काहीच नव्हतं, पण असं झालं होतं की ‘देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’
मी आणि आकाश बसमधूनच माझ्या सासरी गेलो. मी साडी नेसले होते. नवं मंगळसूत्रं घातलं होतं. आम्ही अचानकच सासरी गेलो होतो. लग्नं होऊन 5-6 दिवस झाले असतील आता ते आपल्याला काय बोलतील हे ऐकून घ्यायचं असं मी ठरवलं होतं. आकाशची आई पण नोकरी करणारी होती, तसे ते दोघंही थंड वृत्तीचे होते म्हणजे कोणत्याची गोष्टीचा आनंदही नाही नी दु:खही नाही असा काहीसा त्यांचा स्वभाव होता.
आम्ही दोघं असे गेलेले बघताच त्यांना आश्‍चर्यच वाटलं, पण तरी त्यांनी ‘अरे तुम्ही लग्नं केलंत?’
त्यांनी आम्हाला दारातच उभं केलं. तादंळाचं मापटं भरून आणलं. माप ओलांडायला लावलं, दृष्ट काढली. खूपच छान स्वागत केलं. लक्ष्मीसारखी सून घरात आणलीस म्हणून लेकाचं कौतुक केलं. मला वाटलेली भीती पार नाहीशी झाली. खरं तर त्यांनी रागवायला हवं होतं, चिडायला हवं होत, पण तसं काहीच त्यांनी केलं नाही मला याचं खरंतर आश्‍चर्यच वाटतं. माझ्या आई-बाबांना पण वाईट वाटलं, पण त्यांना राग नाही आला. खरंच जर आम्ही आई-वडिलांशी बोललो असतो किंवा त्यांनी जरा आम्हाला समजून घेतलं असतं तर सहीसलामात लग्नं पार पडलं असतं असं आता वाटतं. दोन दिवस तिथं राहून आम्ही परत निघालो. थोडीफार भांडी सासूबाईंनी दिली आणि आम्ही परत सावंतवाडीला आलो.
आता जरा आम्ही निवांत झालो होतो, दोघांच्याही घरी कळलं होतं, दोघांच्याही घरचे म्हणजे मुख्यत: आई-वडीलांनी फारसा विरोध केला नव्हता. म्हणजे माझ्या घरी अजून माझे आईवडील माझ्याशी नीट बोलत नव्हते. ते खूप दु:खी झाले होते विशेषत: आई. खरंच आहे त्या काळी मुलींनी असं पाऊल उचलणं म्हणजे मान, मरतब सगळ्याचाच फज्जा. मी अशा प्रकारे पळून जाऊन लग्न केल्याचं समजताच माझ्या आईवडिलांना भेटायला रोज कुणी ना कुणी यायचं, जसं एखादं माणूस गेल्यावर लोकं येतात तसंच वातावरण होतं त्यामुळे ते दु:खातून बाहेर न येता आणखीनच दु:खात जात होते, पण येणारी लोकंसुद्धा प्रेमापोटी येत होती. ती त्यांना समजवत होती, ‘‘असुदे, जातीतलाच आहे ना, मुलगा चांगला आहे, माफ करून टाका.’’
दुसर्‍यांना असे सल्ले द्यायला सोपे असतात, हे मला मुलगी झाल्यावर मला कळले. मी पळून जाऊन लग्न केले, आई-वडिलांना दु:ख दिले हे त्यांनी नंतर मला माफ केले तरीही माझ्या मनातून जात नाही, अगदी आजही मला या गोष्टीचं वाईट वाटतंय आणि सर्व मुलींना मी सल्ला देईन की तुम्ही असं काही करू नका.
लग्नं करणं फार सोपं असतं, पण ते निभावणं तेवढंच कठीण. माझं लग्न जुलैमध्ये झालं होतं. खोली छोटीशीच होती, पण मी आता हळूहळू त्याचेच तीन भागात रूपांतर केलं. किचन बेडरूम आणि हॉल. घरावर माझा हात म्हणजे एका गृहिणीचा हात फिरू लागला. तेच घर खूप सुंदर दिसू लागलं. एकदा आकाश म्हणाला सुद्धा,
‘‘या ब्रह्मचार्याच्या आश्रमाचा तू महाल करून टाकलास.’’ त्याच्या या अशा कौतुकाने मला खूप आनंद व्हायचा. मला आमचे शेजारी, त्याच्या आत्या याही भरपूर मदत करायच्या, नवीन नवीन सगळं शिकवायच्या. पण जगायला कौतुक आणि प्रेम पुरेसं नसून पैसा लागतो हे मात्र आता नंतर कळू लागलं.
माझं लग्नं जुलैमध्ये झालं होतं नंतर येणारा पहिला सण मंगळागौर. आकाशच्या आत्यांनी माझा मंगळागौरीचा सण खूप आनंदात साजरा केला, मी नवी नवरी छान साडी, दागिने घालून एकदम सुंदर दिसत होते, पण मन मात्र नाराज होतं कारण माहेरचं कुणीच नव्हतं. आई आली होती, पण ऑफिसातून आल्यावर परक्याच्या कार्यक्रमाला जातात तसं. तिच्या चेहर्‍यावर कोणताही आनंद नव्हता. उलट ती मला रडवेलीच वाटत होती. तिच्या मनात वाटत असेल की, ‘का या पोरीनं असं केलं? किती धुमधामीत आपण तिचे सणवार केले असते?’ पण आता समाजामुळे म्हणा किंवा आपल्याच मनामुळे म्हणा किंवा घरातल्या सगळ्यांच्या मतामुळे तिला माझं काही कौतुक करता येत नव्हतं. ती आली पाच मिनिटं बसली आणि गेली. ज्यांच्या घरात आम्ही भाड्याने राहात होतो त्याच आत्तेकडे मंगळागौर होती त्यामुळे आईने सांगितलं जाताना येऊन जा. मी अतिशय सुंदर दिसत होते. मी जाताना गेले तर आईने माझी दृष्ट काढली तेव्हा मी तिला मिठी मारून खूप रडले. जणू तेव्हाच माझी मंगळागौर साजरी झाली असं मला वाटलं.
झालं आता लग्नं झालं, कोड-कौतुक झालं, भरपूर भेटवस्तू झाल्या, आता खरी संसाराला सुरुवात झाली. माझ्या आईचं, दादाचं म्हणणं होतं की मी शिक्षण पुरं करावं. एमएस्सीला अ‍ॅडमिशन घेतली होती, तर मावशीकडे जाऊन राहावं आणि शिकावं, पण मला मुळातच तिकडे जायचं नव्हतं आणि आता तर ते शक्यच नव्हतं म्हणून मी त्याला नकार दिला. त्यामुळेही ते थोडेफार परत माझ्यावर नाराज झाले.
हळूहळू आम्हाला दोघांना कळू लागलं की नुसत्या प्रेमावर संसार करणे शक्य नाही. त्याचा बिझनेस चांगला चालत होता, पण एकट्यापुरतं ते पुरत होतं आता दोघांची जबाबदारी त्याच्यावर होती, तसंच त्याच्या बहिणीला त्याने बी.एड. ला अ‍ॅडमिशन घ्यायला लावली होती. तिच्या शिक्षणाचीही जबाबदारी आता आमच्यावर होती. मी शिकले-सवरलेले होते मला अजून काहीतरी करायचं होतं, पण अत्ता ते शक्य नव्हतं आता आधी संसाराला हातभार लावणे महत्त्वाचं होतं.
क्रमश:

======================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *