संघर्ष भाग 6

– सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
आता मला जग सुंदर वाटत होते, माझ्या मनात खूप आनंदी विचार येत होते. मी खूष होते. बाकी माझा अभ्यास वगैरे सर्व व्यवस्थित सुरू होते. एकदा अचानक मला एक फोन आला की मी रेणूची मैत्रीण बोलतेय, मी फोन घेतला माझी कोण ब्वा मैत्रीण? फोन करणारी. तर तो फोन त्याच्या बहिणीने केला होता. मी फोनवर येताच त्याने फोन हातात घेतला,
‘‘मी काय सांगतोय ते ऐक.’’
‘‘हो.’’
‘‘मी उद्या रत्नागिरीला येतोय. आपण भेटायचंय.’’
मला काहीच कळेना. त्याचे निर्णय असेच नेहमी. मनात आलं की, ते करून टाकायचं टोकाचे एकदम. मला जाम टेंशन आलं होतं. मी दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेले. एक लेक्चर झाल्यावर मी ‘घरी जाते’ असं मैत्रिणीला सांगून कॉलेजमधून बाहेर पडले तो आलेलाच होता.
मग आम्ही दोघं भाट्याच्या बीचवर गेलो. मी तोंडाला रुमाल बांधला कारण कोणी ओळखीचं दिसलं तर प्रॉब्लेम नको. तशी दुपारची गर्दी कमी असते. खूप खूप गप्पा मारल्या दोघांनी बरेच दिवसांचे राहिलेले बोलणे राहिले होते.
समोर अथांग असा सुंदर समुद्र. एकावर एक येऊन आदळणार्या लाटा आणि सर्वत्र असणारी शांतता. एकूणच वातावरण मनोहर होतं. मी त्याला म्हटलं,
‘‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण घरच्यांचं काय मत आहे कळत नाही.’’
‘‘आपण घरच्यांशी बोलू तुझं शेवटचं वर्षं झालं की.’’ तो म्हणाला.
खूप खूप स्वप्नं रंगवली भावी आयुष्याची. शेवटी त्याचा पाय निघत नव्हता, पण जाणं भाग होतं, मी त्याला निक्षून सांगितलं की,
‘‘आता मात्र माझी परीक्षा होईपर्यंत तू मला भेटू नकोस. मीही पत्र-बित्र काही पाठवणार नाही. आता अभ्यास एके अभ्यास.’’ तोही तयार झाला. त्यालाही अभ्यासाचं महत्त्व माहीत होतंच ना.
मी जोर धरून अभ्यास केला आणि शेवटी एकदाची लास्ट इअरची परीक्षा झाली. मी खूश होते, सावंतवाडीला घरी आई-बाबांजवळ जायला मिळणार आणि आता शिक्षण झालं म्हटल्यावर ते मला लांब ठेवू शकणार नाहीत. माझ्याबरोबर माझी रत्नागिरीतली एक मैत्रीणही आली होती. तिला माझं गाव, घर सारं काही बघायचं होतं मग काय आम्ही फार मज्जा केली. खूप खूप धम्माल केली. ती मैत्रीण होती तोवर आई-बाबा निवांत होते, कारण त्यांना माहीत होतं ती असेपर्यंत मी काही कोणाला भेटू शकत नव्हते. एकदा माझ्या कॉलेजच्या आधीच्या मैत्रिणी आणि ही मैत्रीण असे आम्ही भेटलोच. पण त्याची नी माझी काही भेट झाली नाही.
ती माझी मैत्रीण निघून गेली आणि आता आम्ही घरातलेच फक्त राहिलो. आई, बाबा, मी आणि माझे भाऊ. एक-दोन दिवस असेच गेले. मीही काही बाहेर जायचा विचार केला नाही. अचानक आई म्हणाली,
‘‘अगं रेणू, तुला मावशीकडे मुंबईला जायचंय.’’
‘‘आता का गं?’’ मी जरा रडवेली होऊन म्हटले मला खरंतर आईजवळ राहायचं होतं, पण काय माहीत आई-बाबांना भीती वाटत असावी की, मी त्याला भेटेन. एकदा माणसावरचा विश्वास उडाला की, तो परत बसताना कठीण. मला खरंतर आईशी खूप बोलायचं होतं, पण वेळच मिळत नव्हता. आधी मैत्रीण आली म्हणून आणि आता हे मुंबईचं नाटक.
‘‘अगं मावशीला खूप गरज आहे. तिला बरं नाहीये.’’ आईने असं कारण सांगितल्यावर मी नाही म्हणूच शकले नाही. कारण मावशीवर पण माझं प्रेम होतं. मी मुंबईत गेले. पंधरा दिवस झाले होते आणि एक दिवस मला कळलं माझा रीझल्ट लागलाय. मी रीझल्ट पाहिला तर मला 70 टक्के मार्कस् पडले होते. मी खूपच खूश झाले.
रीझल्ट लागला म्हणून मी घरी सावंतवाडीत आले. आई-बाबा वगैरे सर्व खूप आनंदात होते. कारण मला डिस्टींक्शन मिळालं होतं. तसंही त्याकाळी बीएस्सीला डिस्टींक्शन मिळवणं सोपी गोष्ट नव्हती आणि त्यात माझं तर शेवटच्या वर्षाला कॉलेजही बदललं होतं पण तरीही मी ते करून दाखवलं होतं. म्हणजे मलाही तसंच करायचं होतं.
आता पुढे काय हा मोठा प्रश्न आई-वडिलांना पडला होता. त्यांनी ठरवलं की, मी एमएसस्सी करायची, ती पण मुंबईत. त्यांच्या हा निर्णय मला अजिबात आवडला नव्हता. मला शिकायचा प्रॉब्लेम नव्हता, पण मला मुंबईत राहायचं नव्हतं. मला माझ्या घरीच राहायचं होतं. मावशी माझे खूप लाड करायची, तिची दोन्ही मुलं म्हणजे माझे मावसभाऊ पण माझ्याशी खूप चांगले वागायचे, माझे काकाही छान होते, तरीही मला तिकडे राहायला जायचं नव्हतं, पण मी काही बोलू शकत नव्हते.
त्याच दरम्यान आईने माझ्यासाठी एक स्थळ पाहिलं असावं कारण ती फोटो काढ म्हणून माझ्या मागे लागली होती, शेवटी मी कसाबसा फोटो काढून आले, पण असा फोटो काढला की, ज्यामुळे मला समोरचा पसंतच करणार नाही.
माझं आता मुंबईला जाणं पक्कं झालं होतं. मुबंईला जायच्या आदल्याच दिवशी आम्ही कॉलेजच्या मैत्रिणींनी एका मैत्रिणीच्या घरी जायचं ठरवलं होतं, तिचे आजोबा वारले होते, म्हणून तिला भेटायला आम्ही जायचं असं ठरवलं. मी आईची परवानगी काढली. जुलै महिना होता तो धुवाधार पाऊस होता नुसता. मी छत्री घेऊन बाहेर पडले.
सगळ्या मैत्रिणी ज्या मैत्रिणीचे आजोबा गेले तिच्या घरी गेलो. तिच्याशी बोललो, गप्पा मारल्या आणि चालत चालत परत आपल्या घरी निघालो. बोलता बोलता एका मैत्रिणीने विचारलं,
‘‘रेणू, अगं तुझं प्रेम होतं ना एका मुलावर? मग काय झालं त्याचं?’’
मी सांगितलं, ‘‘हो ग पण आमच्या घरी पसंत नाही, मीही अशी मी काही पळून जाऊन वगैरे लग्न करू शकणार नाही, काय होईल ते परमेश्वरालाच माहीत.’’ बोलत बोलत आम्ही आमच्या घराजवळ आलो होतो. पाच जणी गेलो होतो त्यातल्या आता आम्ही जवळ राहणार्या दोघीच राहिलो होतो. तिच्याशी मी बोलतच चालले होते नी अचानक माझ्या मनात काय आलं काय माहीत?
मी तिला म्हटलं, ‘‘तू पुढे हो मी येते मागून. इथे माझं जरा काम आहे.’’
तीही बरं म्हणाली. माझ्या डोक्यात एकदम आलं होतं आता इथे आलेच आहे तर त्या सणकूला भेटूनच जाऊ. आता उद्या आपण मुंबईला जाऊ, मग कधी भेट होईल काय माहीत? फक्त तो घरी असला पाहिजे.कारण संपर्काला काहीच साधन नव्हतं त्यामुळे घरात असला तर मटका नाहीतर फुसका. अशी अवस्था होती. पण माझ्या सुदैवाने की दुर्दैवाने ते माहीत नाही तो घरी होता.
मी आलेले पाहताच त्याला खूप आनंद झाला. काय करू नी काय नको असं झालं त्याला जवळपास तीन-चार महिने झाले आम्ही भेटलो नव्हतो, काहीच बातमी नाही, अगदी ‘क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहके’ सारखी दोघांची अवस्था झाली होती. डोळ्यांतून अश्रूच्या धारा लागल्या होत्या.
‘‘काय म्हणतेस? कशी आहेस?’’ त्याने विचारलं.
‘‘मी बरी आहे, पण आता मी उद्या मुंबईला जाणार आहे. आणि मग आपण भेटू शकणार नाही.’’ मला रडूच आलं.
‘‘तुला जायचं नाहीये का मुंबईला?’’ त्याने विचारलं.
‘‘अजिबात नाही मला इथंच राहायचंय.’’
‘‘तुझं माझ्यावर प्रेम आहे का ग?’’ विचारताना त्याचे डोळे लकाकत होते.
‘‘हे काय विचारतोस?’’ मी म्हटलं.
‘‘आपण दोघं पळून जाऊन लग्नं करुया?’’
‘‘चल… जाऊ…’’ मी पण लगेच म्हटलं.
मी असं म्हणताच त्याने ड्रेस अडकवला.
‘‘चल.’’ तो म्हणाला.
‘‘अरे कुठे?’’
‘‘तू म्हणालीस ना पळून जाऊया म्हणून.’’ तो म्हणाला.
‘‘अरे पण मी…’’
‘‘आता मागे नको फिरू.’’
बाहेर मुसळधार पाऊस. तो आता माझ्याबरोबर वाद घालू लागला की, ‘‘तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये.’’ मला काहीच कळत नव्हतं. मी खूप वैतागले होते, इकडे आड तिकडे विहीर. त्याने असं म्हणताच मीही जिद्दीला पेटले नी म्हटलं,
‘‘चल.’’ आम्ही दोघं बाहेर पडलो. माझं मलाच कळत नव्हतं मी कुठच्या तंद्रीत होते. आम्ही रिक्षात बसलो नी एसटीस्टँडवर आलो. आणि कणकवलीला जाणारी एक एसटी लागली होती त्यात बसलो. एसटीत बसलो नी मात्र मला रडायला यायला लागलं.
मी काय करून बसले होते? घरी आई-बाबा माझी वाट पाहात असतील. आत्ताच तर मी मैत्रिणींना सांगितलं होतं की मी काही पळून वगैरे जाणार नाही, आणि आता मी पळून जातेय? नक्की काय होतंय मला काहीच कळत नव्हतं. पाऊस तर मी म्हणत होता. तो म्हणाला,
‘‘रडू नको, लोकांना वाटेल मी तुला जबरदस्तीने पळवून नेतोय. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना? माझ्यावर तुझा विश्वास आहे ना?’’
‘‘हो रे विश्वास आहे, मला लग्नही करायचंय तुझ्याशी पण आता आपण काय करायचं?’’
‘‘बघू आता जे होईल ते होईल.’’ तेव्हा संध्याकाळचे सहा-साडेसहा वाजले असतील.
‘‘आता आपण कुठे जायचं?’’ मी विचारलं.
‘‘कणकवलीत माझा एक मित्र आहे, गरीब आहे, परंतु तो आपल्याला नक्की मदत करेल.’’
मी घाबरून गप्प बसले होते, डोळ्यांतून पाणी येत होतं, मनातून नाही नाही ते विचार येत होते, वाटत होते कशाला आलो आपण इकडे गपचूप घरी गेलो असतो तर बरं झालं असतं, पण आता वाटतंय नशिबात जे लिहिलेलं असतं ते चुकत नाही हेच खरं.
कणकवली स्टँडवर उतरलो मुसळधार पाऊस सुरूच होता. आता या भर पावसात त्या मित्राला कुठे शोधणार, पण आमचं नशीब बलवत्तर होतं की तो मित्र काही कामासाठी स्टँडवर आला होता, कारण त्या काळी फोन नसल्याने कुणाला फोन करून कळवणं शक्यच नव्हतं.
त्याने मित्राला हाक मारली. मित्रंही त्याला पाहून खूष झाला,
‘‘अरे तू? असा अचानक कसा?’’ मग त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्याच्या एकंदर सर्व प्रकार लक्षात आला. त्यानेही हळूहळू मित्राला सर्व परिस्थिती सांगितली. फक्त माझ्याकडे छत्री होती. बाकी सगळेच भिजत होते. आम्ही तिघं एका रीक्षात बसलो. त्या मित्राने आम्हाला एका खानावळीत नेलं. तिथं त्याने जेवणाची ऑर्डर दिली. मी एकही कण जेवले नाही. अन्नाचा अपमान नको म्हणून मी भाताचा एक घास खाल्ला. तिथे जवळच एक लॉज होता, तिथं राहण्याची सोय होते का अशी त्या दोघांची चर्चा चालली होती, मी म्हटलं, ‘‘मी असल्या लॉजमध्ये राहणार नाही.’’
मग त्याचा मित्र म्हणाला,
‘‘तुम्ही आमच्या घरी चला.’’ तो मित्र खरंतर चांगला होता, पण अगदी साध्या गरीब घराण्यातला होता, पण मदतीला खूप चांगला. त्याचं घर पण साधं तरी स्वच्छ, पण खूप साधी माणसं. पण घरी त्या मित्राची आई, वहिनी होती. त्याचंही लग्न झालेलं नव्हतं. घरात त्या बायका बघून मला जरा बरं वाटलं.
माझ्याजवळ एक मोठी पर्स, त्यात तीन-चारशे रुपये. त्याच्याजवळ एक पाकीट त्यात दोनशे रुपये असे इतकेच पैसे आमच्याबरोबर आणि आम्ही लग्न करायला निघालो होतो, पण आता अशी अवस्था होती, की धड घरीही परत जाऊ शकत नव्हतो. माझे आई-वडील, भाऊ सगळ्यांचीच मला आठवण येत होती, रडू येत होतं, मी असं का केलं असं परत परत वाटत होतं.
मी त्या रात्री भींतीला टेकून नुसती बसून राहिले, पण जास्त दु:खही दाखवता येत नव्हतं परत त्याला काय वाटेल, की आपण हिला आणलं आणि आता ही दु:खी आहे किंवा मित्राच्या आईला आणि वहिनीला वाटेल की याने हिला जबरदस्तीने आणलं की काय? मनात नाना शंका. त्यात पोटात काही नाही. रडून रडून डोळे सुजलेले.
त्याने आणि त्याच्या मित्राने दुसर्यादिवशी गाडी ठरवली. त्या मित्राच्या वहिनीने मला तिच्याकडची अगदी साधी अशी साडी दिली. तिचाच ब्लाऊज दिला. मी जेमतेम आंघोळ केली आणि आम्ही लग्न करण्यासाठी निघालो. कारण आता वेळेत लग्नं होणं गरजेचं होतं. वाटेत बाजार लागला त्यात मी आवश्यक ते थोडे कपडे आणि बांगड्या, खोटं मंगळसूत्र अशी खरेदी केली आणि आम्ही देवगडला रवाना झालो.
देवगडला एक अतिशय सज्जन असे ब्राह्मण सद्गृहस्थ होते. ते अशी लग्नं लावून देत असत. बाकी सगळी मुलं आणि त्यांच्याबरोबर मी असं पाहून त्यांना जरा विचित्र वाटलं त्यांना नक्की कळेना ही मुलगी कोणाशी लग्नं करतेय? तेव्हा जात पात फार होतं. नक्की ब्राह्मण मुलाशीच ही लग्नं करतेय ना? अशी शंका त्यांना आली. त्यांनी मला एकटीला आत बोलावले. तिथेच त्यांची पत्नीही होती. त्यांनी मला विचारले,
‘‘तुझं नाव काय?’’
‘‘रेणू जोशी’’
‘‘तू कोणाशी लग्नं करतेयस?’’ मी म्हटलं, ‘‘आकाश साठे’’
साठे आडनाव ऐकल्यावर त्यांच्या जिवात जीव आला, कारण त्यांनी आकाशला पाहिले नव्हते. त्यामुळे ही मुलगी कुणाशी लग्नं करतेय हेच त्यांना कळले नव्हते. तू काय शिकलीस, मुलगा काय शिकला असे प्रश्न त्यांनी विचारले,
मी बीएसस्सी झालेय आणि मुलगा सिव्हील इंजिनिअर आहे हे ऐकूनही त्यांना बरे वाटले. ते खूपच चांगले होते, ते म्हणाले,
‘‘म्हणजे तुम्ही दोघंही सज्ञान आहात तर.’’
‘‘हो.’’ नशिबाने माझ्या पर्समध्ये माझं कॉलेजचं आयकार्ड होतं. मी ते दाखवलं. त्यांना जरा बरं वाटलं.
‘‘आता समाधानाने मी स्वत: तुझे कन्यादान करून देतो.’’ मग त्यांची पत्नी आणि ते स्वत: यांनी माझं कन्यादान विधीपूर्वक केलं. मला फार भरून येत होतं आणि आमचं लग्न लागलं असतानाच एक फोन आला, तो माझ्या काकांचा होता. माझे काका देवगडला होते. आई-वडिलांची शोधाशोध सुरू होती, सगळीकडे फोनाफोनी सुरू होती. कुणीतरी त्यांना सांगितलं होतं की, देवगडला अशा प्रकारचं लग्नं लागतं म्हणून त्यांनी काकांना चौकशी करायला सांगितली होती. आणि काकांनी चौकशीसाठी फोन केला होता.
आता त्या भटजींना मोठा प्रश्न पडला, पण त्यांनी सांगितलं की, हो ती इथे आली आहे आणि आत्ताच त्यांचं लग्नं लावलं आहे. ती आली आहे म्हणताच काकांचा जीव भांड्यात पडला. ते म्हणाले,
‘‘तिला सांग कुठेही जाऊ नकोस. मी येतोय.’’
मग भटजींनी पटापट विधी उरकून घेतले. आकाशचे मित्र लग्नं रजिस्टर करण्याच्या खटपटीत लागले. जेणेकरून नंतर काही प्रॉब्लेम येऊ नये. मीही जरा खूश झाले की, माझ्या माहेरचं कुणीतरी येतंय आणि मुख्य म्हणजे आता निदान आईबाबांना तरी कळेल की, मी सुखरूप आहे. थोड्याच वेळात काका तिथे आले आणि त्यांना मिठी मारून मी खूप रडले.
त्यांनी काहीच उपदेश केला नाही. ते आकाशला आणि मला म्हणाले, ‘‘तुम्ही घरी चला.’’ त्यांनी आम्हाला घरी नेले काकूने गोडाचा शिरा केला. काल दुपारी मी जेवले होते त्यावर आज मी तो थोडासा शिरा खाल्ला आणि मलाही जरा बरं वाटलं.
क्रमश:
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
=====================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.