संघर्ष भाग – ४

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
आता फक्त नजरानजर होत होती, बोलणं कधीतरीच जुजबी. कारण गाव छोटं असल्याने कोणीतरी बघेल ही भीती सतत माझ्या मनात असायची. थोड्याच दिवसांत त्याची परीक्षा झाली आणि तो गावाला निघून गेला असावा. असावा म्हणजे मला काही कळलंच नव्हतं, पण तो दिसायचा बंद झाला होता. आधी परीक्षेमुळे तो सतत अभ्यास करत होता त्यामुळे त्याची भेट होऊ शकली नव्हती कारण त्याचं महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्षं होतं.
महिना-दोन महिने तो दिसला नाही, माझा दहावीचा रिझल्ट लागला होता, मी चांगल्या मार्काने म्हणजे डिस्टींक्शनमध्ये दहावीला पास झाले होते. तेव्हा 70 च्या पुढे म्हणजे चांगले मार्कस् ग्राह्य धरले जात आता सारखे 90-95 टक्के तेव्हा मिळत नव्हते. आता त्याचा रीझल्ट लागेल मग तो तरी घ्यायला तो येईल असं वाटलं होतं, जाताना सांगून तरी जायला काय झालं होतं असा विचार मनात येऊन अस्सा राग यायचा ना त्याचा. आता वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, आतासारखे मोबाईल किंवा संपर्कासाठी व्हाटस्अॅप किंवा फेसबुक तेव्हा नव्हतं.
मध्येच कधीतरी आमच्या घरमालकांच्या बायकोने म्हणजे त्याच्या आत्याने आईला ओरडून सांगितलं,
‘‘अहो वहिनी, आमचा भाचा नाही का इथे शिकायला असतो तो, तो चांगल्या मार्काने पास झाला बरं का! सिव्हील इंजिनिअर झाला हो भाचा माझा.’’
‘‘हो का वा छान अभिनंदन सांगा त्याला. पेढे हवेत हो.’’ आईने कौतुक केलं.
झालं एवढंच काय ते त्याच्याबद्दल कळलं. परत पंधरा दिवस काही नाही. घरात पण कधी त्याचा विषय होत नसे. हा घासू म्हणजे ना! अजूनही मी त्याला घासू म्हणत होते, आता असं चालणार नाही, त्याला नावाने हाक मारायची वेळ आली तर आपण काय म्हणू? अशी कल्पना करून मलाच हसू आलं.
आता आमच्या बिल्डींगचे कामही जोरात चालू होते. लवकरच बिल्डींग पूर्ण होऊन आम्ही नवीन घरात राहायला जाऊ असे स्वप्न मी बघत असे. मीही कॉलेजला अॅडमिशन घेण्याच्या गडबडीत होते, शाळेतल्या कोण कोण मैत्रिणी आपण घेतलेल्या सायन्स विभागाला येत आहेत याची माहिती गोळा करणे, सगळ्या जमून कॉलेजला जाणे यात फार मजा होती. शाळेतल्या दहा-बारा मैत्रिणींचा ग्रूप तयार झाला. त्यातल्या काही माझ्या घरापसासून अगदी जवळच राहणार्या होत्या. त्यामुळे आमचं बरोबर जाणं येणं सुरू झालं. कॉलेजातले सगळ्यांना हवे हवेसे वाटणारं असं फुलपाखरासारखं रम्य आयुष्य सुरू झालं.
काही दिवसांनी मला तो समोर आमच्या घरमालकांकडे आलेला दिसला, पण जसा तो क्षणात आला तसाच क्षणात निघून गेला. मला प्रचंड राग आला. अरे हा मुलगा काहीच सांगत नाहीये कदाचित तिकडे गेला तिकडे काही आणखी नवी ओळख होऊन मला विसरला की काय असं माझ्या मनात आलं. काहीच समजेना नुसती हुरहूर!
एकदोन वेळा आईचा ओरडा पण खाल्ला, ‘‘अगं कुठे लक्षं असतं तुझं हल्ली?’’ असा. एकदा त्याचा चुलतभाऊ जो माझ्या वर्गात होता तो रस्त्यात भेटला. याला विचारावं का असं वाटलं तेवढ्यात तोच आपणहून म्हणाला,
‘‘अगं माझा चुलतभाऊ जो तुमच्यासमोर राहायचा तो आता तिथे राहात नाही, त्याने वेगळी खोली घेतली आहे.’’ पण ती कुठे, काय काहीच कळेना. झालं माझी घालमेल आणखीनच वाढली. एक दिवस मी कॉलेजमधून येताना अचानकच तो समोर आला. बरोबर माझ्या मैत्रिणी होत्या म्हणून मी लक्ष दिलं नाही, पण तरीही त्याने हाक मारली. त्याबरोबर मी थांबले तो म्हणाला,
‘‘मला तुला भेटताच नाही आलं.’’
‘‘हो.’’
त्याला कळलं की हिचं काही लक्ष नाही. त्याने मला तो कुठे राहतो त्याचा पत्ता सांगितला, मी ‘‘बरं.. बरं..’’ म्हटलं नी तिथून सटकले. तो हळूहळू माझ्या पाठी येत राहिला जशा सगळ्या मैत्रिणी जिकडे तिकडे गेल्या मी एकटीच घराच्या वाटेवर राहिले तशी तो पटकन पुढे आला.
‘‘एकतर इतके दिवसांनी आपण भेटतो आहोत आणि तू मला का टाळते आहेस?’’ त्याने रागात विचारले .
‘‘मैत्रिणींना संशय यायला नको म्हणून.’’ मी लगेच उत्तर दिले. त्याला ते पटले तरी त्याला ते आवडले नव्हते. तो माझ्याशी बोलत होता, पण माझं लक्ष मात्रं आजूबाजूचं कोणी बघत नाही ना याकडेच होतं, कारण गाव छोटं होतं आणि ओळखी भरपूर होत्या. तो चिडून निघून गेला.
नंतर जेव्हा जेव्हा तो भेटे तेव्हा तेव्हा आमचं जुजबी बोलणं व्हायचं, माझं लक्ष त्याच्याशी बोलण्याकडे नसेच. याचा त्याला प्रचंड राग येऊ लागला कारण त्याला माझ्याशी बोलायचं असे. एकदा तर मी मैत्रिणींच्या घोळक्यात होते आणि तो तिथे येऊन उभा राहिला मी प्रचंड घाबरले. मी थरथर कापत होते, मैत्रिणींना वाटत होतं, तो मला त्रास देतोय त्या सगळ्या म्हणत होत्या, ‘‘चल आमच्याबरोबर घाबरू नको.’’ मला धड त्यांना काही सांगता येत नव्हतं. त्याच्याशी धड बोलता येत नव्हतं.
शेवटी मी माझ्या जवळपास राहणार्या दोन मैत्रिणींना ही कहाणी सांगितली कारण त्याही माझ्यासारख्याच प्रेमात पडलेल्या होत्या. त्यामुळे त्या बरोबर असताना मला बोलता आलं असतं. एकदा अशीच आमची भेट झाली तेव्हा तो म्हणाला, ‘‘तू सरळ माझ्या रूमवर ये. तिथे आपण निवांतपणे बोलू शकतो.’’
खरंतर रूमवर जाणे मला पसंत नव्हते, पण दुसरा इलाज नव्हता, कारण बाहेर भेटण्यापेक्षा ते मला सुरक्षित वाटत होतं आणि त्याची खोली माझ्या एका मैत्रिणीच्या घराजवळच होती. अशा रीतीने आमच्या प्रेमाला बहार आला, अकरावीचं वर्षं असं बरं गेलं, मी फार वेळा नाही, पण मधूनमधून त्याच्या रूमवर जात असे.
मधल्या काळात आमच्या बिल्डींगवर सुपरवायझर म्हणून तो नोकरीसाठी लागला होता. आणि त्याचवेळी माझे बाबा नी आमचे घरमालक यांच्यात जोरदार भांडण सुरू होतं कारण वडिलांनी सर्व पैसे देऊनही घरमालक त्यांना घराचा ताबा देणार नाही असं सांगत होते, त्याकाळी विश्वासावर सगळं असल्याने वडिलांच्या हातात कागपत्रं काहीच नव्हती. आणि तो लिमयांचा नातेवाईक असल्याने आणि तिथेच जॉबला असल्याने वडिलांशी कधी-मधी त्याचेही भांडण होत असे. त्यामुळे समस्त घरमालक आणि त्यांच्या नातेवाईकांवर आमच्या घरातल्यांचा साहजिकच राग होता.
मोठं संकटच आलं होतं माझ्यावर, अगदी पिक्चर सारखी स्टोरी झाली होती, नेमका दुश्मनच्या घरातल्यावरच प्रेम! बारावीच्या वर्षी कशी काय कोण जाणे घरच्यांना आमच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. आईने 1750 वेळा विचारलं होतं, ‘‘तुझं कुठे काही प्रेम आहे का?’’ किंवा ‘‘त्या सुपरवायझर बरोबर तुझं काही आहे का?’’ मी दरवेळी ‘‘नाही.’’ म्हणत होते. मग आईनेही विषय वाढवला नाही कारण बारावीचं वर्षं होतं. दादाच्या वेळचा अनुभव गाठीशी होता. पण मला बाहेर मोकळं फिरायला बंदी होती. फक्त क्लास आणि कॉलेज. मी अगदी एक-दोन वेळाच त्याला भेटायला खोलीवर गेले होते, तसा तो रोज समोर दिसत होता म्हणून काही वाटत नव्हतं.
बारावीची परीक्षा झाल्यावर एकदा मला तो निवांत पणे भेटला त्याचं म्हणणं होतं की, ‘‘तू आईला खरं काय ते सांगून टाक.’’ मी त्याला परोपरीने समजावत होते, ‘‘की तू आमच्या घरमालकांचा नातेवाईक आहेस त्यामुळे आपल्या लग्नाला संमती मिळणार नाही. अजून थोडे दिवस जाऊदेत. मग बघू.’’ पण त्याला हे असं फसवणं मान्य नव्हतं. कारण मी आईच्या खूप जवळ होते हे त्याला माहीत होते, आणि आई खूप समजूतदार आहे, ती आपल्याला समजून घेईल असं कुठेतरी त्याला वाटत होतं.
पण मला माहीत होतं की, आईला कळलं तर ती बाबांच्या कानावर नक्की घालणार कारण ती प्रत्येक गोष्ट वडिलांना सांगत होती. आणि वडिलांना जर हे कळलं तर माझं काही खरं नाही, कारण आता वडिलांचं आणि घरमालकांचं रोजच भांडण होत असे. त्यामुळे त्यांच्यावर त्यांचा प्रचंड राग होता त्यामुळे आपल्या या प्रेमाला संमती मिळणार नाही हे मला चांगलं माहीत होतं म्हणून मी आईला सांगायचं टाळत होते.
मध्येच एकदा मी आणि तो रस्त्यावर बोलत असताना बंड्या तिकडे आला. बंड्याला मला त्याच्याशी बोलताना बघून आश्चर्यच वाटलं. तो सरळ आम्ही दोघं बोलत आहोत तिथे आला.
‘‘रेणू काय चाललंय?’’ त्याने विचारलं
‘‘आम्ही दोघं बोलतोय.’’ मी न घाबरता उत्तर दिलं.
तो जरा नर्व्हस होऊन बाजूला झाला, मला वाटलं तो निघून गेला असेल. मला त्याने लगेच विचारलं की,
‘‘याने तुला असा कसा प्रश्न विचारला?’’ माझ्या बाबातीत तो फारच हळवा होता ते सुरुवातीला मला छान वाटायचं, पण नंतर याच गोष्टीचा त्रासही होऊ लागला.
‘‘त्याला मी आवडत होते, खरंतर माझं तुझ्यावर प्रेम बसायचं कारण हा बंड्याच आहे.’’
‘‘ते कसं काय?’’ मग मी त्याला सांगितलं की कसा बंड्याचा विचार टाळण्यासाठी मी तुझा विचार करू लागले. त्याला बंड्याचा राग आल्यासारखा वाटला मला. मग मी मजा करण्यासाठी म्हटलं,
‘‘तसा बरा होता ना बंड्या?’’
माझं हे वाक्य ऐकताच तो एकदम चिडला. त्याचा रुद्रावतार बघूनच मी घाबरले.
‘‘अरे, मी गंमत करतेय.’’
‘‘परत असली गंमत करू नकोस आणि त्याला खडसावून सांगून टाक की, माझ्या नादाला लागू नकोस.’’ असं म्हणनू तो निघून गेला. आता मी त्याचं घासू नाव बदलून चिडकाबिब्बा नाव ठेवावं असं ठरवलं होतं. सारखा चिडत राहायचा, पण त्या चिडण्यात प्रेम होतं.
मी पुढे आल्यावर बंड्या एकदम माझ्या समोर आला. मी म्हटलं,
‘‘अरे तू गेला नाहीस का?’’ तोही जरा नाराज झालेला दिसत होता तो म्हणाला,
‘‘मला तुझ्याशी बोलायचं होतं.’’ बंड्या.
‘‘बोल ना.’’ मी
‘‘तू आत्ता का बोलत होतीस त्या घासूबरोबर?’’
‘‘माझं त्याचं प्रेम आहे.’’ त्याला एकदम धक्का बसला. तो म्हणाला,
‘‘मी तुला विचारलं होतं…’’
‘‘पण माझं आणि त्याचं प्रेम आहे.’’ मी न घाबरता उत्तर दिलं.
‘‘घरी माहीत आहे का?’’
‘‘नाही.’’
‘‘मी घरी सांगतोच.’’ बंड्या म्हणाला.
मला जाम भीती वाटली. मी घरी गेले आणि मनात विचार केला की, खरंच याने घरी येऊन सांगितलं तर?
मग मी एक युक्ती केली आईलाच सांगितलं की,
‘‘बंड्या मला विचारत होता..’’ विचारत होता म्हणजे प्रेम आहे हे आईला कळलं. तिला आश्चर्यच वाटलं. ती म्हणाली,
‘‘वाटलं नव्हतं तो असं काही करेल.’’ आई असं म्हणताच मी लगेच तिला सांगितलं,
‘‘मी त्याला नाही म्हटलंय म्हणून तो रागावला आहे. मला वाटतं तो तुला येऊन माझ्याबद्दल काहीतरी सांगेल.’’ आईला ते पटलं. पण बंड्या तसा चांगला होता, त्याचं माझ्यावर खरंच प्रेम होतं असं वाटतं. त्याने आईला काही सांगितलं तर नाहीच उलट तो माझ्यापासून दूर पुण्यात निघून गेला.
आता पण कधीतरी तो मला भेटतोच की, रेणूच्या मनात आलं.
असेच मध्ये काही दिवस चांगले गेले. पण…
एकदिवस आई ऑफिसमधून आली ती वेगळ्याच मूडमध्ये होती, माझ्याशी ती बोलत नव्हती. मला टाळत होती, मला काहीच कळत नव्हतं, मी तिला विचारायचा खूप प्रयत्न केला, पण ती काही बोलली नाही, दोन दिवसांनी आम्हाला दोघींना एकत्र असा तिला हवा तसा वेळ मिळाला. म्हणजे त्या दिवशी आम्ही दोघीच घरात होतो. मला जाम टेंशन आलं होतं. आता ही काहीतरी बोलणार असं मला सारखं वाटत होतं. तेवढ्यात आईची हाक आली,
‘‘काय गं शेवटी तू मनासारखंच केलंस ना? तू मला फसवलंस.’’
‘‘आई, काय बोलतेयस तू? मी तुला का फसवीन.’’
‘‘रेणू, अजून किती खोटं बोलणारेस माझ्याशी. मी कधी हा विचार केला नव्हता की, तू माझ्याशी असं खोटं बोलशील.’’
‘‘आई, काय झालंय?’’
‘‘परवा तो माझ्या ऑफिसमध्ये आला होता.’’
‘‘कोण तो?’’ मी उगाचंच मला समजलं नाही असं केलं.
‘‘तोच तो आपल्या घरमालकांचा भाचा, बिल्डींगचा सुपरवायझर.’’
‘‘घासू होय? आम्ही त्याला घासू म्हणतो तो सारखा अभ्यास करतो म्हणून…’’ मी उगाचंच आईला फसवायचा प्रयत्न करत होते, पण आईला नक्की काहीतरी कळलं होतं.
‘‘तुला त्याच्याबद्दल बाकी काहीच माहीती नाही का?’’ तिने रागातच विचारलं, ‘‘तरी प्रेम करतेस त्याच्यावर?’’
आता मात्र मी गप्प बसले, कारण आई साक्षीपुराव्याशिवाय बोलणार नाही हे मला माहीत होतं. हा तिच्या ऑफिसमध्ये कशाला गेला हेही आता मला खरंतर जाणून घ्यायचं होतं.
‘‘तो माझ्या ऑफिसमध्ये कशाला आला होता सांगू?’’
‘‘हो सांग.’’
‘‘तो म्हणाला, रेणूचे आणि माझे प्रेम आहे. आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो. पण तू मला हे सांगू शकत नाहीस आणि त्याला ते लपवून ठेवणे पटत नाही म्हणून त्याने मला येऊन हे सांगितले.’’
मी काही न बोलता आईकडे वेड्यासारखी बघतच राहिले.
‘‘हे त्याच्याकडून कळले म्हणून मला जास्त वाईट वाटले. तो म्हणाला, ‘मी खूप श्रीमंत नाही, पण मी कष्ट करीन, तुमच्या मुलीला सांभाळीन. त्याचे डोळे भरून आले होते… मला खरं तर वाईट वाटलं, पण तरीही तुला मी सांगते, त्याच्यापासून तू लांबच राहिलेली बरी, तुझ्या बाबांना हे अजिबात पटणार नाही, कारण घरमालकांचा तो नातेवाईक आहे.’’
‘‘अगं पण,’’ रेणू
‘‘मी माझं मत तुला सांगितलंय आता चर्चा नको, विषय बंद.’’
आणि इथून पुढे आकाश आणि माझ्या प्रेमातील संघर्षाला सुरुवात झाली.
क्रमश:
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
===================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.