Skip to content Skip to sidebar Skip to footer

संघर्ष भाग – ३

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

आता गावातही काही बदल होऊ लागले होते. सुधारणा होत होत्या. जुने वाडे जाऊन अपार्टमेंट बांधण्याची तेव्हा कुठे सुरुवात झाली होती. आमच्या घरमालकांनी म्हणजे आपट्यांनी पण असं ठरवलं की, आपण आता इथे ब्लॉक सिस्टीम उभी करू त्यासाठी त्यांनी एक मिटींग बोलावली. आई-वडिलांनी पण या दोन-तीन वर्षांत घर घेण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, कारण आम्हाला ते सहज शक्य होते, पण काही ना काही कारणाने ते घर बांधणं राहून जायचं. आता इथेच ब्लॉक सिस्टीम होतेय तर काही कन्सेशन मिळतंय का बघू असं आई-बाबांचं ठरलं. तीन खोल्यांपेक्षा मोठा सहा खोल्यांचा ब्लॉक असे दोन ब्लॉक एकत्र करून घ्यायचं असं खूप मोठ्या रंगतदार चर्चेतून ठरलं. घरमालकांनी पण सांगितलं की तुम्हाला आहे त्या किमतीतच ते घ्यावे लागेल. शेवटी ही जागा चांगली आहे, तर इथेच आपण ब्लॉक घेऊ असं आई-बाबांनी ठरवलं.
आता गंमत अशी झाली की, ब्लॉक सिस्टीम बांधायची तर भाडेकरूंना जागा सोडायला हवी, पण आमचं घर अशा ठिकाणी होतं की तिथे नंतर मोकळी जागा असणार होती, त्यामुळे आम्हाला घर सोडावं लागणार नव्हतं. मला तर हुश्श वाटलं. कारण बालपणापासूनचं सगळं आयुष्य त्याच घरात गेलं होतं त्यामुळे ते घर माझं खूपच आवडतं होतं आणि नवीन जागेत गेलं की परत तिथे अ‍ॅडजेस्ट होईपर्यंत कठीण गेलं असतं असं मला वाटलं होतं. बंड्या आणि कंपनीला मात्र ते घर सोडावं लागलं. माझ्या ते पथ्यावरच पडलं. आपसूकच बंड्या माझ्यापासून लांब गेला आणि मी सुटकेचा निश्‍वास टाकला.
आता मला त्या घासूचाही विचार करावा लागणार नाही असं मी ठरवलं पण… पण मला आता ती सवयच लागून गेली होती. त्यात आमची आई सतत त्याचं कौतुक करत असे. ‘‘तो मुलगा बघा, कधी कुणाशी बोलत नाही, स्वत:ची कामं स्वत: करतो, आपापले कपडे धुतो, तसंच अभ्यासातही चांगले मार्क मिळवतो. आई-वडिलांपासून लांब राहतो.’’ असं आईचं आपलं सुरू असायचं. त्यामुळे मी जास्तच त्याचा विचार करू लागले असं मला आता वाटतं. आणि जरी मी ठरवलं की त्याचा विचार करायचा नाही तरी मन कुठे माझं ऐकत होतं, ते खूप खट्याळ होतं, वार्‍याच्या वेगाने धावत होतं. बहिणाबाई म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘आता होतं भुईवर, आता आभाळात.’’ त्याप्रमाणे मी विचार करायचा नाही असं ठरवलं की, तोपर्यंत तो काय करतोय इकडे माझं लक्षं लागलेलं असायचं.
त्याची परिस्थिती सुमार असावी किंवा त्याला छानछौकीची आवड नसावी. त्याच्याकडे दोनच शर्ट होते ते सुद्धा डेंजर कलरचे. लाल आणि पिवळा. ते शर्ट हँगरला अडकवलेले मला माझ्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा घरात कुठेही बसले की दिसत. तो घरात आहे की नाही याचं ठोकळ गणित मी मांडलं होतं एकच शर्ट दिसला की, तो बाहेर गेलाय आणि दोन्ही शर्ट दिसले की, तो घरात आहे. तेव्हा गाड्या वगैरे फारशा नव्हत्या. मुलं सायकलीवर फिरून पण हिरोगिरी करत असत.
आम्ही फारसं बोलायचो नाही, कधीतरीच तो आमच्यात येत असे बोलत असे, खेळत असे, पण कधीच असं मनमोकळं बोलला नाही. माझ्याशी तर तो आपणहून कधीच बोलत नव्हता. नेहमी आपल्याच विचारात गर्क. कधीतरी शाळेत जाता येता तो मला दिसत असे, पण माझ्याबरोबर नेहमीच मैत्रिणींचा गोतावळा असे, त्यातून मी कधीही घरातून एकटी बाहेर जात नसे. त्यामुळे त्याच्याशी बोलण्याचा कधीच प्रश्‍न आला नव्हता. आणि मला असं वाटायचं ‘हा कशाला माझा विचार करेल?’’ पण एक दिवस दहावीच्या सुट्टीत मी माझ्या आत्याकडे गेले होते तळ्याजवळ. तिथेच त्या ‘घासू’ची दुसरी आत्या राहात होती. मी आत्याच्या घरातून बाहेर पडले, थोडी पुढे आले आज मी एकटीच होते म्हणून मी झपझप चालत होते. तर पाच मिनिटांनी मला पाठीमागून कुणीतरी शुकशुक केलं. कुणीतरी मैत्रीण असेल म्हणून मी पाठीमागे पाहिलं तर हा घासू माझ्याकडं बघत हसत उभा. मी जाम टरकले.
‘‘कुठे निघालीस?’’ त्याने विचारलं.
‘‘घरी..’’ मी घाबरत घाबरत बोलले.
‘‘आज एकटीच कशी?’’
‘‘असंच.’’ मला काही सुचत नव्हतं. त्याने ते जाणलं असावं.
‘‘मला सांग ऋषी आणि तुझं काही आहे का?’’ त्याने सरळ विषयालाच हात घातला.
‘‘अं .. अं… ’’
‘‘अशी काय अं.. अं करतेस?’’ त्याने जरा रागानेच विचारलं.
‘‘तू असं का विचारतोयस?’’
‘‘तो सारखा तुझ्याकडे का येतो?’’
‘‘तो माझा मित्र आहे. आणि आमचं एक गुपीत आहे.’’
‘‘काय आहे ते?’’ त्याने मला विचारलं.
‘‘ते मी तुला का सांगू?’’ म्हणून मी धूम ठोकली माझ्या छातीत धडधडत होतं हा असा कधी माझ्याशी बोलेल अस मला जन्मात वाटलं नव्हतं कारण तो कुणाशीच बोलत नव्हता. मी त्याच्याबद्दल विचार करते हे याला समजले का काय? असं वाटून मी त्याच्याशी बोलणं टाळलं आणि एकदाची घरी पोचले, पण नंतर मात्रं सारखं वाटायला लागलं की, याला मी सांगितलंच नाही की माझं आणि ऋषीचं काही नाही आता हा काहीतरी गैरसमज करून घेईल. आणि वर वेड्यासारखं सांगितलं की तो माझा मित्र आहे आणि आमचं एक गुपीत आहे.
झालं मनात नाना विचार यायला लागले, बरं दोन दिवस तो दिसला, पण हसला नाही की काही नाही. एकतर स्वत: परवा आपणहून बोलला आणि आता ओळखही दाखवेना. काय करावं, असा विचार सारखा मनात येत होता. एक दिवस तो बाहेर जाताना दिसला मीही त्याच्या मागून पटकन बाहेर पडले, त्याला हाक मारली,
त्याने विचारलं, ‘‘काय?’’
‘‘काही विशेष नाही, पण तू परवा विचारत होतास ना ऋषीचं आणि माझं काही आहे का? तर तसं काही नाहीये.’’ हे माझं वाक्य ऐकताच त्याच्या चेहर्‍यावर जरा हसू पसरलं.
‘‘हो का, मग त्या दिवशी असं का सांगितलंस?’’ त्याने परत रागात विचारलं.
‘‘मी घाबरले होते.’’
‘‘मी काय राक्षस आहे का?’’ त्याने हसत विचारलं.
‘‘तसं नाही तू कधी बोलला नाहीस ना माझ्याशी, परवाच पहिल्यांदा बोललास म्हणून मी घाबरले होते.’’
‘‘बरं गुपित काय ते सांग मग आता.’’
‘‘आमच्या वर्गात एक मुलगी आहे ती त्याला आवडते, तर तो मला म्हणत होता की तू तिला माझ्याबद्दल विचार.’’
‘‘अच्छा, असं आहे का ते गुपित, मग एक काम कर, तू जे त्या मैत्रिणीला त्याच्याबद्दल विचारणार आहेस ते माझ्याबद्दल स्वत:ला विचारून घे.’’
‘‘का ऽ ऽ य?’’ मला काहीच समजेना.
तो पटकन निघून पण गेला मी मात्र विचारत करत बसले. मला क्षणभर काहीच अर्थबोध होईना, पण नंतर कळलं की, मी तिला विचारणार ऋषी तुला आवडतो का? तेच याच्याबद्दल मला म्हणजे? म्हणजे? बापरे मी याला आवडते का काय? कसं शक्य आहे. मी घरापासून जवळच होते त्यामुळे परत लगेच घरी आले.
काही असलं तरी आपण या फंदात पडायचं नाही असं मी ठरवलं होतं याचे कारण म्हणजे माझे आई-बाबा. दोघंही खूप प्रेमळ होती आणि विशेष म्हणजे माझ्यावर त्यांचा खूप जीव होता. आई नोकरी करायची तरी तिला विविध पदार्थ करायची आवड होती. ती खरंतर मोठ्या पोस्ट वर होती, पण तिने कधीही त्याची शेखी मिरवली नाही. काही काळ तिची दुसर्‍या गावी बदलीही झाली होती. ती जाऊन येऊन जॉब करत होती. लवकर सकाळी बाहेर पडलेली ती रात्री 8 वाजता दमून-भागून येत असे. तरीही तिच्या चेहर्‍यावर मी कधी कंटाळा पाहिला नाही. रोज आल्यावर ती आम्हा मुलांना गरम गरम पोळ्या करून घालत असे. सुट्टीच्या दिवशी आमचं घर पाहुण्यांनी भरलेलं असे. दोन दिवस राहिला आलेला पाहुणा चार दिवस हक्काने राहून जात असे, वर एकदम समाधानी असे. आणि माझ्यावर तिचं अतोनात प्रेम होतं, जरी दोन मुलगे होते तरी ती माझ्यावर खूप प्रेम करायची.
आता आपण कोणी आलं तर किती कंटाळतो ना? रेणूच्या मनात आलं. आणि बाबा ते तर शाळेत शिक्षकाची नोकरी करून आणखी एक-दोन बिझनेस करत होते, सतत कामात व्यस्त. जुन्या लोकांकडून हेच शिकण्यासारखं आहे. ते सतत काहीतरी करत राहतात. फक्त त्यांच्यात एक दोष होता म्हणजे ते अतिशय तापट होते, कधीतरीच चिडत पण चिडले की काही खरं नाही, तसं बाहेरच्या कुणावर ते चिडत नसत, पण घरी मात्र आम्ही सर्व त्यांना घाबरून असायचो. यामुळे बर्‍याच वेळा आईची कुतरओढ व्हायची.
बाबांचा राग शांत करण्याची जबाबदारी माझ्यावर असायची. मी एकटीच अशी होते की, बाबांशी बोलून त्यांना शांत करत असे, तरीही मी त्यांना घाबरत नव्हते असं नाही, पण त्यांचा मात्र माझ्यावर खूप जीव होता. असे प्रेमळ आई-वडील लाभल्यामुळे त्यांना दुखवावं असं माझ्या मनात अजिबात नव्हतं त्यामुळे आपण हा प्रेम वगैरे विचार मनातून काढून टाकावा हे उत्तम असं मी त्यादिवशी ठरवलं.
आठ दिवस मी त्याच्याकडे बघायचं नाही असं ठरवलं. त्याच्या चेहर्‍यावरचा गोंधळ मला स्पष्ट दिसत होता. त्याच्या डोळ्यांतून तो जणू खुणेने मला विचारता होता, ‘‘तुझं उत्तर सांग.’’ पण मी दुर्लक्ष करत होते.
पण म्हणतात ना, ‘सोळावं वरीस धोक्याचं…’’ एका मनानं एक ठरवलं तर दुसरं मन कुठे ऐकायला त्याचं आपलं चालूच होतं, त्याचं निरीक्षण करणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं माझी अगदी द्विधा झाली होती, बाहेरही पोषक वातावरण होतं त्या द्विधेला. म्हणजे त्याच काळात आलेले पिक्चर, ‘मैने प्यार किया, कयामत से कयामत तक.’ त्यातले हिरो-हिरॉईन्स, मित्र-मैत्रिणी यांच्यातील प्रेमप्रकरणं आणि दुसर्‍या कुणाला कशाला दोष द्या, मलाही तो खूप आवडू लागला होता, मी त्याच्या प्रेमातच पडले होते. कळत, होतं आपलं काहीतरी चुकतंय मनात आई-वडिलांचा विचार मनात यायचा आणि मी परत आपण हा विचार करायचा नाही असं ठरवायचे.
या आठ दिवसांत आणखी एक घटना घडली. माझी एक वही मी त्या घासूच्या चुलत भावाला दिली होती. तोही माझ्याबरोबरचाच होता. तशा आता शाळेला सुट्ट्याच होत्या, पण त्याला कशाला तरी ती हवी होती. त्याने ती दोन दिवसांनी मला आणून दिली. दरम्यान माझी एक मैत्रीण माझ्या घरी आली होती. तिने माझ्याकडे तीच वही मागितली मला आश्‍चर्य वाटलं आता ही वही हिला कशाला हवीय? मी तिला दाखवली तिने सगळी वही उलटीपालटी करून पाहिली तिला काहीच दिसलं नाही. मी तिला विचारलं की, ‘‘तू काय पाहते आहेस?’’ तर ती म्हणाली,
‘‘काही नाही.’’ मग मी तिला शपथ घातली तसं तिने सांगितलं की, तो समोरच्या घरात जो मुलगा राहतो त्याचा चुलतभाऊ जो आपल्या वर्गात आहे त्याने मला सांगितलं की, त्याने तुझ्या वहीवर त्याचं नाव लिहिलं आहे, ‘तुमचं काही आहे का?’ मला तर जाम शॉकच बसला. अजून कशात काही नाही आणि हे असं उगाच सगळीकडं व्हायला लागलं तर काय करायचं? प्रचंड राग, भीती सगळं काही साठून आलं होतं.
‘‘नाही ग माझं तसं काही नाही.’’ तिलाही नाव कुठे दिसलं नव्हतं त्यामुळे तिनेही माझ्यावर विश्‍वास ठेवला आणि ती निघून गेली. माझं मन अजूनच बेचैन झालं. एकतर तो मला आवडत होता, पण त्याने असं केलं म्हणून त्याचा रागही येत होता.
दिवसेंदिवस हे मनातलं द्वंद्व मला असह्य झालं. आणि एक दिवस त्याला घरातून बाहेर पडताना मी पाहिलं आमच्याही घरातही कुणी नव्हतं मीही त्याच्या मागोमाग बाहेर पडले. मला येताना पाहून तो जरा सुखावला. तो हळूहळू चालू लागला. दुपारची वेळ होती, रस्त्याला पण फारशी गर्दी नव्हती. एका ठिकाणी तो थांबला. मीही थांबले. पण असं थांबून बोलणं योग्य नव्हतं मी त्याला म्हंटलं,
‘‘आपण चालत चालत बोलू.’’
‘‘बरं.’’ तो म्हणाला.
‘‘तू माझ्या वहीवर तुझं नाव लिहिलंस का?’’ मी डायरेक्ट त्याला विचारलं.
‘‘हो.’’
‘‘तू असं का केलंस? हे बघ मलाही तू आवडतोस.’’ मी हळूच म्हटलं.
त्याचे डोळे आनंदाने लकाकले. ‘‘पण…’’
‘‘आता पण कसला?’’ तो म्हणाला.
‘‘मी अजून खूप लहान आहे, आणि मला घरच्यांना दुखवायचं नाहीये आमच्या घरात हे खपवून घेतलं जाणार नाही, तूही अजून शिकतोयस, मीही शिकतेय तर कुणालाही हे कळता कामा नये.’’ मी धाडधाड मनातलं बोलून टाकलं.
तोही हुशार होताच, त्यालाही ते पटलं होतं. तो काही बोलायच्या आतच मी पटकन माघारी फिरले आणि घरात आले. एकतर फार भीती वाटत होती, आपण केलं हे चूक का बरोबर काहीच कळत नव्हतं. कुणाला सांगावं? कुणाशी बोलावं? सगळंच अवघड होतं. नंतर वाटलं उगाच जाऊन सांगायचा आगाऊपणा केला, पण आता काय उपयोग होता. भात्यातून बाण निसटला होता.
क्रमश:

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.