Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

सावंतवाडीच्या मधल्या आळीतलं आपलं घर अर्थात भाड्याचं. मोठा वाडा, वाड्यात तीन-चार भाडेकरू. तेव्हा कसं मस्त वातावरण असायचं शेजारपाजारचे सगळे अगदी गुण्या-गोविंदाने राहायचे. शेजार्‍यांकडे आपण जाताना किंवा ते आपल्याकडे येताना विचार करायला लागायचा नाही, झोपले असतील का? कोणी आलं असेल का? पाहुणे असतील का? मनात आलं की, शेजारी आपल्या घरात किंवा आपण शेजारच्या घरात. मी, माझे आईवडील आणि दोन भाऊ. एक मोठा भाऊ आणि एक छोटा भाऊ असे त्या वाड्यातल्या भाड्याच्या घरात राहात असू. म्हणजे आमचं बिर्‍हाड होतं. त्याकाळी भाडेकरूला बिर्‍हाड म्हटलं जात असे. मजाच सगळी.
मी एकटी मुलगी त्यामुळे साहजिकच आई-वडिलांची पण नी भावांची पण लाडकी. तशी आमची परिस्थिती उत्तम होती. म्हणजे भाड्याने जरी राहात होतो तरी आम्ही काही गरीब वगैरे नव्हतो, पण त्याकाळी स्वत:चं घर हवंच असा फार काही अट्टाहास नसे. माझी आई आणि बाबा दोघंही सर्व्हिस करत असत. आई सरकारी नोकरीत आणि बाबा हायस्कूलला शिक्षक. बायकांनी सर्व्हिस करणं तेव्हा इतकं कॉमन नव्हतं. 50 टक्केच स्त्रिया नोकरी करत असत. दोघांच्याही उत्तम नोकरीमुळे आम्हाला काहीच कमी पडलं नाही.
एखादी गोष्ट मला हवी आहे आणि ती मिळाली नाही, असं कधीच झालं नाही, किंबहुना कधीतरी मी काही मागायच्या आधीच ते घरात हजर झालेलं असायचं. वाड्यात पण खूप मजा असायची. घराच्या मागे चिंचा, बोरे, आवळे अशी खूप झाडं होती, पण माझ्याबरोबर खेळणारं कुणी नव्हतं. मला कधीकधी वाटायचं माझ्या बरोबरीचं कुणीतरी वाड्यात यायला हवं म्हणजे खूप मजा येईल सर्व मिळून खेळू, अभ्यास करू.
मी साधारण सहावीत असेन एक दिवस आमच्या शेजारी एक बिर्‍हाड आलं. त्यांचं सामान उतरवणं सुरू होतं मी पाहात होते कोण कोण येत आहे? तेव्हाची भाड्याची घरं अगदी चिकटून असायची म्हणजे आपल्या घरात बसून आपण दुसर्‍याच्या घरात सहज डोकावू शकायचो किंवा दुसर्‍याच्या घरातलं पण सहज ऐकू यायचं म्हणूनच ती म्हण निघाली असावी- ‘भींतीलाही कान असतात.’ त्या सामानाच्या टेंपोतूनच हळूहळू माणसं उतरू लागली आणि मी एकदम खूशच झाले. कारण ती दोघं नवरा-बायको आणि त्यांची तीन मुले होती. एक मुलगी तर अगदी माझ्याबरोबरचीच होती. आमच्या बरोबर विरुद्ध दोन मुली नी एक भाऊ.
हळूहळू त्यांचं सामान लागलं. आम्ही त्यांना यथायोग्य मदत करून शेजारधर्म पाळला. आमचा खूप घरोबा झाला. काकू घरातच असायच्या. माझी आई सर्व्हिसला जायची त्यामुळे त्या काकू घरात आहेत त्यांच्या मुलांची काळजी घेतात, मला खूप छान वाटायचं. त्यांच्या लहान मुलीशी माझी खूप मैत्री झाली. त्या तीन मुलांत मोठी मुलगी होती ती माझ्या भावाबरोबरची तिचं नाव होतं नमू. धाकटी होती चंदा ती माझ्याबरोबरची. आणि मधला मुलगा तो माझ्यापेक्षा थोडा मोठा त्याचं नवा होतं बंड्या. मग काय धमालच धमाल. आमचं सर्वांचा खूप छान ग्रूप तयार झाला.
आम्ही सगळे एकत्र डबाऐसपैस, लगोरी, आंधळी कोशिंबीर असे त्यावेळचे खेळ खेळत असू. कधी पत्ते, कॅरम चा डाव रंगायचा. एकत्र बसून नाश्ता करायचा तर कधी जेवायची ताटंही एकमेकांच्या घरात घेऊन जात असू. भर पावसात खिडकांच्या रेझातून पाऊस बघत बसायचं, मुसळधार पावसात कागदाच्या होड्या करून त्या पाण्यात सोडून त्याच्या मागे धावायचं असे छान छान खेळ होते आमचे. विशेष म्हणजे बिनपैशाचा ते खेळ पण अमाप सुख, समाधान द्यायचे.
अशी दोन-तीन वर्ष मजेत गेली. माझा मोठा भाऊ म्हणजे माझा दादा माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठा होता. मला आठवतंय नवीनच शेजार्‍या आलेल्या बिर्‍हाडातील नमूचं आणि माझ्या दादाचं खूप पटायचं दोघं बरोबरीचीच होती. सतत एकत्र अभ्यासाला बसायची, हसायची, गप्पा मरायची. मला फारसं काही कळत नव्हतं मला वाटलं जशी मी आणि माझी मैत्रीण चंदा तशीच ती दोघं एका वयाची असतील म्हणून त्यांचं पटत असेल.
सगळं मजेत चाललंय असं मला वाटत असतानाच एके दिवशी घरात मोठं भांडण झालं. आई दादाला खूप ओरडत होती आणि त्या नमूशी जर परत बोललास तर बघ असं काहीतरी सांगत होती. मला कळलंच नाही असं का? कारण त्यांचे नी आमचे संबंध तर चांगले होते. दादा खाली मान घालून सगळं ऐकून घेत होता. दुसर्‍या दिवसापासून नमू आणि दादा दोघं एकमेकांशी बोलायचे बंद झाले. मला तिच्या लहान बहिणीकडून म्हणजे माझी मैत्रीण चंदा हिच्याकडून कळलं की, त्या दोघांचं प्रेम जमलं होतं. मला तर आश्‍चर्यच वाटलं. माझा दादा अभ्यासात हुशार दहावीत 80 टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारा आणि असा कसा वागला? कशाला असले उद्योग केले? कारण त्याकाळी प्रेम म्हणजे काहीतरी मोठा गुन्हा होता. मला जास्त आश्‍चर्य वाटलं ते याचं की, या चंदाला कळलं नी मला कसं कळलं नाही काय माहीत? मी माझ्याच मूर्खपणावर हसले.
‘‘चंदा, मग आता दादा आणि नमू बोलणार नाहीत पण आपली मैत्री?’’
‘‘अगं आपण बोलायचंच ग.’’ चंदा.
‘‘नक्की ना?’’ मी विचारलं.
तेवढ्यात चंदाचा भाऊ बंड्या तिथे आला तो म्हणाला,
‘‘काय चाललंय गं?’’ त्याने मला विचारले.
‘‘अरे आता आपण कसं बोलायचं एकमेकांशी?’’ मी भोळसटपणे विचारलं.
‘‘आपण सगळ्यांनी एकमेकांशी बोलायचं. ते जे काही आहे ते दादा आणि नमूच्यात आहे. तुम्ही कुणी काही त्याबद्दल बोलू नका.’’ बंड्याने आम्हाला समजावलं. तो हुशारही होता आणि समजूतदार.
आता नमूलाही तिच्या एका मामेबहिणीने समजावलं की, तू दादाचा नाद सोडून दे. त्याच्याही घरी पसंत नाही. तुमचं वय अजून लहान आहे. आमच्या आई-बाबांना आणि तिच्या आई-बाबांना काय प्रॉब्लेम होता मला कळलंच नाही. दोघंही सुंदर होती, हुशार होती. फक्त एकच वय लहान होतं. आणि पालक या दृष्टीने त्यांचं बरोबर होतं या वयात हे उद्योग केल्यावर पुढे शिक्षण, नोकरी कसं होणार? नमूही समजूतदार होती, तिने दादाशी बोलणं बंद केलं.
दादाही त्यातून बाहेर पडला, पण त्याच्या मनावर मात्र या सर्वाचा फार परिणाम झाला. बारावीत तो चक्क नापास झाला. पुरं एक वर्षं त्याला या सर्वातून बाहेर पडायला लागलं. मग मात्र त्याला आई-बाबांनी खूप समजावलं आणि तो जरा स्थिरस्थावर झाला. इकडे मी, बंड्या, चंदा, माझा छोटा भाऊ चिराग आम्ही सर्व एकत्र खेळत असू. आणि यात आणखी एकाची भर झाली होती तो म्हणजे आमच्या वर्गातला ऋषी. त्याचं आजोळ आमच्या शेजारीच होतं. आता तो रोज आजीकडे येत असे. हा ऋषी माझ्याच वर्गात होता त्यामुळे तर जास्तच मैत्री झाली माझ्यात नी त्याच्यात. आम्ही सर्व धमाल करत असू. वेगळे झाले होते ते फक्त नमू आणि दादा.
लहानपणात हे सर्व पाहिल्याने माझ्या मनावर प्रेम म्हणजे खूप वाईट असतं असाच पगडा पडला. मीही आता नववीत गेले होते. मी सुंदर दिसत होते, म्हणजे सगळे तसे म्हणायचे. मोठे केस, सुंदर डोळे, छान उंची, गोरा वर्ण आणि घरात असणारी समृद्धता. आरशात पाहिलं की मीही माझ्या रूपावर फिदा होत होते.
मला कधीतरी वाटायचं बंड्या माझ्यात जास्तच इंटरेस्ट घेतोय. मी आणि चंदा अभ्यासाला बसलो की, तो यायचा आमचा अभ्यास घ्यायचा. काही गोष्टी सांगायचा. सतत माझ्या मागे असायचा असं मला वाटायचं. एकदा मी गणितं सोडवत होते पाटीवर तेवढ्यात बंड्या कुठूनसा आला, घरात कोणी नव्हतं. त्याने माझी पाटी घेतली आणि त्यावर काहीतरी लिहिलं. ते मला दाखवलं. मी एकदम घाबरलेच. बहुतेक आय लव्ह यू असं काहीतरी लिहिलं असावं. मी पटकन त्याच्या हातून पाटी ओढून घेतली आणि त्याला सांगितलं, ‘‘तू आत्ताच्या इथून जा.’’ त्याबरोबर तो निघून गेला.
मला जाम धडधडत होतं कुणी पाहिलं तर नाही ना असं वाटत होतं, खरंतर मी काहीच केलं नव्हतं, पण आईने पाहिलं तर? असं वाटत होतं कारण दादाच्या वेळचा आईचा रुद्रावतार पाहिला होता. माझी नववी-दहावीची महत्त्वाची वर्ष होती आता. मी बंड्याशी बोलणं कमी केलं, तो माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायचा, पण मी त्याला टाळू लागले. शेवटी एकदा मी त्याला निक्षून सांगितलं, ‘‘माझी दहावीची परीक्षा होईपर्यंत माझ्याशी बोलू नकोस.’’ तसा तो गरीब आणि साधा होता. त्याने माझं ऐकलं.
साहजिकच चंदाशी बोलणंही मी टाळू लागले आणि ऋषीची नी माझी घट्ट मैत्री झाली. माझे आई-बाबा जॉबला असल्याने बर्‍याच वेळा मी घरात एकटीच असे. कारण दोन्ही भाऊ कुठेतरी खेळायला किंवा बाहेर असत. ऋषी आता रोजंच सारखा येऊ लागला. त्याच्या नी माझ्या शाळेतल्या, वर्गातल्या गप्पा रंगत. आमचा वर्ग भारी होता. अतिशय हुशार मुलं होती वर्गात, पण त्यांच्या तितक्याच भानगडी होत्या. नुकतंच वयात आल्याने काहींची चक्क प्रेमप्रकरणं पण सुरू होती अर्थात हे मला ऋषीकडून कळत असे. मी शिक्षकांची मुलगी असल्याने माझ्या वाट्याला कोण जात नसे आणि मी तशी हुशार असले तरी पुढे पुढे करत नसे त्यामुळे शाळेत माझ्याकडे फारसं कोणाचं लक्ष नसे. आम्ही पाठी पडणार्‍या मैत्रिणी आपल्या या हुशार मुलींचीच चर्चा करत बसत असू. त्यामुळ ऋषी सांगतोय त्या गप्पांत मला फार इंटरेस्ट वाटायचा. ऐकायला मजा यायची.
हळूहळू ऋषी माझ्याकडे का येतो हे मला समजलं. त्याचं आमच्याच वर्गातल्या एका मुलीवर प्रेम बसलं होतं. मला तर हे ऐकून धक्काच बसला होता. माझ्याकडून तिला विचारणा व्हावी यासाठी मला गळ घालत होता, पण मी असं काही करू शकेन असं मला तरी वाटत नव्हतं. मी तसं त्याला सांगितलं पण होतं, पण त्यामुळे त्याच्या नी माझ्या मैत्रीत दरी पडली नाही. तो येत असे तिच्या बद्दल बोलत असे.
अशीच नववी-दहावीची वर्ष गेली. दहावीची परीक्षा झाली आणि परत बंड्याचं सुरू झालं. तो परत माझ्याशी बोलायला येत असे, पण मी दुर्लक्ष करत असे. तसा बंड्या दिसायलाही चांगला होता, हुशार होता, पण माझ्या मनाने प्रेम वाईट हेच घेतलं होतं, आणि शिवाय आधीचं दादा आणि नमूच्या प्रकरणामुळे या घराचा परत विचार नको असा विचार मी केला. बंड्याचा विचार मनातून जावा यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं मला वाटू लागलं. त्याच दरम्यानं आमचे जे घरमालक होते आपटे त्यांच्या बायकोच्या भावाचा मुलगा त्यांच्या घरी राहायला आला. दिसायला साधा, अभ्यासात हुशार, कुणाच्या अध्यात मध्यात नसणारा, परंतु तो खेडेगावातून आला होता म्हणून त्याच्या मनातच एक न्यूनगंड होता किंवा तो मुळातच अबोल असेल, नक्की मला काही कळत नव्हतं कारण त्याचं नाव गावही मला माहीत नव्हतं. मी आणि ऋषी त्याच्याबद्दल चर्चा करत असू त्याचं नाव माहीत नव्हतं म्हणून आम्ही त्याचं नाव ‘घासू’ ठेवलं. मी हळूहळू त्याचं निरीक्षण करू लागले. तो गोरापान, कुरळ्या केसांचा, उंच, बारीकसा, अभ्यासू एकंदर छान व्यक्तिमत्त्व. माझ्या मनाने उगाचंच घेतलं की, बंड्याचा विचार मनातून काढून टाकण्यासाठी आपण या ‘घासू’चा विचार करायला हवा. मग मी सतत त्याचाच विचार करू लागले. किती वेडा विचार होता हा. ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्या गावाचा विचार करायचा नाही म्हणून दुसर्‍याच गावाचा विचार. मला वाटतं त्या वयाचाच तो दोष असावा.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *