समाधान (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२
© सौ.ऋचिता दवंडे
हातात बायकोच्या रिपोर्ट्सची भलीमोठी फाईल सांभाळत दामलेकाका डॉ. कारखानिसांच्या केबिनच्या बाहेर बसले होते. सोबत मुलगा अमेय देखील होताच. नंबर येताच ते आत गेले. त्यांना पाहताच “या या दामले काका बसा, काय म्हणता कसे आहात?” असे प्रसन्नपणे हसत डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितले. रिपोर्ट्समध्ये काय आहे ह्याची उत्सुकता आणि काळजी दोन्ही दामले बापलेकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. डॉक्टरांनी रिपोर्ट्सची फाईल पाहायला सुरवात केली. एक एक रिपोर्ट्स पाहत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत आहेत हे दामलेकाकांच्या नजरेतून सुटले नाही. सगळे रिपोर्ट्स पाहून फाईल बंद करत आणि शक्यतितके नॉर्मल राहत डॉक्टरांनी त्यांना सांगितले कि दामलेकाकुंना दुसऱ्या स्टेज मधील लिव्हर कॅन्सर झाला आहे. हे ऐकून दोघा बापलेकाच्या पायाखालची जमीनच सरकली. सर्दीपडसाशिवाय कधीही जास्त काही न झालेल्या काकुंना आज कॅन्सर व्हावा ह्याचा धक्का त्यांना बसणे साहजिकच होते. डॉ. कारखानीस फार वर्षांपासून दामले कुटुंबियांचे फॅमिली डॉक्टर होते. त्यामुळे डॉक्टरांचे त्यांच्याशी एक भावनिक नाते तयार झाले होते. दामले काका आणि अमेय दोघांनाही शांत करत डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांविषयी सांगितले. लवकरात लवकर उपचार सुरु करावे लागतील आणि काकुंना त्याची कल्पना द्यावी लागेल अशी सुचनाही त्यांनी केली. ‘ठीक आहे कळवतो’ एवढेच बोलून दामलेकाका उठुन केबिन बाहेर पडले. पाठोपाठ अमेयही निघाला. कारमध्ये बसुन ते घरी निघाले. पण दोघेही एकमेकांशी एकही शब्द बोलले नाहीत. घर येताच “तु आता घरी जा पण सध्या आईला काहीही बोलू नकोस” एवढे सांगून दामले काका कारमधून उतरले.
पुण्याच्या उच्चभ्रू सोसायटीत दामले काकांचा टु बी एच के फ्लॅट होता. ऑफिस दूर पडत असल्याने दामलेकाकुंच्या सुचनेवरूनच मुलगा आणि सुन ऑफिस जवळ राहत होते. दामले काका बँकेतुन रिटायर्ड झाले होते. घरी पोहचताच मालती काकुंनी नेहमीप्रमाणे हसत दार उघडले. काकाही त्यांच्याकडे पाहून हसले पण हे हास्य रोजचे नाही हे त्यांना जाणवले. मात्र त्यांनी ते जास्त मनावर घेतले नाही. काका अचानक बसलेल्या धक्क्यातून सावरत नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होते. जेवताना मात्र काकुंनी विचारलंच “काय म्हणतायेत माझे रिपोर्ट्स?” त्यावर “काही विशेष नाही गं रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि तेच औषधं सुरु ठेवायचे आहेत” असे बोलून त्यांनी तिथेच विषय संपवला.
दुपारी काकु वामकुक्षी घ्यायला गेल्या पण काकांना मात्र आज झोप येत नव्हती. ते गॅलरीमध्ये आपल्या आवडत्या झोपाळ्यावर येऊन बसले. काकांचे मन उदास असले कि ते हमखास त्या झोपाळ्यावर येऊन बसायचे. तात्पुरते का होईना त्यांना बरे वाटायचे तिथे. आज मात्र त्यांना चैन पडत नव्हते. झोपाळ्यावर बसून विचार करता करता काकांचे मन थेट त्यांचे आणि काकुंचे लग्न झाले त्या काळात गेले. लग्न झाले तेव्हा आपण बँकेत साधे क्लार्क होतो. घरी आई आणि दोन लहान बहीण भावाची जबाबदारी. क्लार्कचा पगार आणि गावाकडील शेतीची थोडीफार मिळकत ह्यातच निभवावे लागत होते. पण मालतीने कधीही नाराजी दर्शविली नाही. सगळे निगुतीने पार पडत होती. स्वतःची हौसमौज बाजुला ठेऊन पदरमोड करत संसार करत होती आपल्याबरोबर. लहान बहीण भावाचे शिक्षण ,लग्न सगळे व्यवस्थित पार पाडू शकलो आपण तिच्या साथीने. आईचेही शेवटपर्यंत सगळे केले. ह्या जबाबदारीतून मुक्त होत नाही तोच अमेय आणि अंकिता आले आयुष्यात. आधी दीर नंणद आणि सासु ह्यांच्यासाठी आणि आता मुलांसाठी प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करत सगळे योग्य रीतीने निभावले. तिने काटकसर केली म्हणून संसार आणि दोन्ही मुलांची उच्च शिक्षणं करू शकलो. मालतीच्याच प्रोत्साहनामुळे आपण बँकेच्या एक एक परीक्षा देत ऑफिसर पदावर पोहचलो. दोन्ही मुलांचे इंजिनीरिंग आणि मेडिकलचे शिक्षण, त्यांचे लग्न ,आपली नौकरी ह्यासगळ्यामधे मालतीची हौसमौज, तिची आवड ह्याकडे आपण कधीच लक्ष दिले नाही. तिनेही ते कधी जाणवु दिले नाही. तिचा चेहरा नेहमी हसतमुखचं. रिटायर्ड झाल्यावर मालतीला वेळ द्यायचा हे ठरवले होते पण मुलीसाठी वरसंशोधन त्यानंतर साखरपुडा, लग्न ह्या सगळ्यात पुन्हा दुर्लक्ष झाले तिच्याकडे. अलीकडे मात्र तिच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या होत्या. पाठ आणि कंबरदुखीचा त्रास होत होता. वय आणि ताणामुळे असेल म्हणून गोळ्या आणि मालिश चालु होते. जेवणही हल्ली कमीच झाले होते. दुखणे वाढल्यावर सगळ्या टेस्ट्स केल्या आणि आज त्याचे रिपोर्ट्स आले होते. कॅन्सर हा शब्द ऐकून होतो पण आज त्याचा आपल्याच घरात शिरकाव व्हावा हे पचनी पडण्यासारखे नव्हतेच. पण “आलिया भोगासी असावे सादर” हेच आता हातात होते. जवळून कधी कॅन्सर पेशंट पहिला नाही पण केमोथेरपी, रेडिएशनथेरपी ह्यामुळे काय हाल होतात हे ऐकून आहोत आणि आता हे सगळे आपल्या मालतीला सहन करावे लागणार ह्या कल्पनेनेच काकांच्या अंगावर शहारा आला आणि ते त्यांच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. काका थोड्यावेळ झोपाळ्यावर बसले आणि रणरणत्या उन्हात अचानक थंड हवेचा झोत यावा तसे काहीसे त्यांचे झाले आणि मनाशी एक निश्चय करून ते उठले. काकु झोपल्या आहेत ह्याची खात्री करून घेत त्यांनी अमेयला फोन लावला. पुढे काय करायचे हे अमेयालाही समजत नव्हते पण बाबा फोन करतीलच ह्याची त्याला खात्री होती. काकांनी अमेयला सांगितले की ‘आपण डॉक्टरांनी सांगितले ते सगळे उपचार लवकरात लवकर करून घेऊ पण त्या आधी मला फक्त एक दिवस हवा आहे. मी डॉक्टरांनाही तसे कळवतो’. एक दिवस कशासाठी हवा आहे आणि त्यात अमेयला काय काय करायचे आहे हे त्यांनी नीट समजावून सांगितले. आपल्या वडिलांचा हा विचार अमेयला मनापासून पटला आणि ” डोन्ट वरी बाबा सगळे होऊन जाईल” असे म्हणत त्यांच्या निर्णयाला साथ दिली. ‘उद्या सगळी तयारी कर आणि परवा सकाळी कार आणि ड्राइवर पाठवून दे’ असे सांगत काकांनी फोन ठेवला. दुसऱ्यादिवशी काकांच्या सांगण्याप्रमाणे अमेयने सगळी तयारी केली. इकडे काकांनी देखील काकुंच्या नकळत सोसायटीच्या आवारातून चमेलीचे फुलं तोडून स्वतःच्या हाताने गजरा तयार केला. सगळा दिवस दुसऱ्यादिवशीची तयारी करण्यात आणि त्याची वाट पाहण्यात गेला. रात्री काकुंना ‘उद्या सकाळी दहा वाजता अमेयच्या लग्नातील पैठणी नेसून छान तयार हो आपल्याला बाहेर जायचे आहे’ एवढेच सांगितले आणि दोघेही झोपले.
सकाळी दामले काका नेहमीपेक्षा जरा लवकरच उठले. काकु उठल्यावर दोघांनी रोजच्या सारखा गॅलेरीत बसून चहा घेतला. नंतर काका आपली आंघोळ आणि पूजापती आटोपायला गेले. बरोबर आठ वाजता स्वयंपाकाला येणारी वर्षा आली. काकुंना तब्येतीचा त्रास सुरु झाल्यापासून सगळ्यांच्या खास करून सुन आभाच्या आग्रहावरून वर्षाला स्वयंपाकाला ठेवले होते. तिला नाश्ताच्या सूचना देऊन काकु आपले आटोपायला गेल्या. काकांनी वर्षाला मालतीने जरी तुला उपमा करायला सांगितला आहे तरी तू तिला आवडतो तसा बदाम पिस्ता घालून साजूक तुपातील शिरा कर आणि सकाळचे जेवण आज बनवू नकोस आणि संध्याकाळी पण माझा फोन आला तरच ये असे सांगितले. शिरा करून आणि ओटा आवरुन वर्षा निघून गेली. काकु आंघोळ आटोपून येताच काकांनी त्यांना स्वतः खुर्चीत बसवले. काकुंना वाढण्यासाठी कढई उघडताच त्यात उपम्याऐवजी आपला आवडता शिरा पाहताच काकुंना आश्चर्य वाटले. ‘आश्चर्य नको वाटून घेऊस मीच वर्षाला शिरा करायला सांगितला’ हे ऐकताच काकुंना खूप छान वाटले. दोघांनीही नाश्ता केला. काकांनी आपल्या हाताने काकुंना गोळ्या दिल्या आणि आता पैठणी नेसून तुला आवडतील ते दागिने घाल आणि लवकर ये. आपल्याला दहाला निघायचे आहे असे म्हणत काका तयार व्हायला गेले. काकांच्या मनात आज काय सुरु आहे ह्याचा थांगपत्ता काही काकुंना लागत नव्हता. पण बरेच दिवसात दुखण्यामुळे बाहेर पडलो नाही तेव्हा निदान आज बाहेर बरं वाटेल असे म्हणत काकु खोलीत निघून गेल्या.
दामले काका छान झब्बा कुर्ता घालून तयार झाले. काकुपण तयार होऊन आल्या. हिरवीकंच पैठणी, गळ्यात मंगळसूत्र आणि ठुशी, हातात मॅचिंग बांगड्या आणि पाटल्या खुलून दिसत होत्या. मुळातच गोऱ्या असणाऱ्या काकुंना हिरवीकंच पैठणी शोभून दिसत होती. काका तर बघतच राहिले. इतक्या वर्षात आपण कधी मालतीला इतक्या बारकाईने पहिलेच नाही असे त्यांना उगीचच वाटून गेले. त्यांनी स्वतः बनवलेला चमेलीचा गजरा काकुंच्या केसात माळला. ‘आज एकदम गजरा वगैरे? काय स्पेशल आहे?’ असे त्यांनी विचारताच ‘बघ आज सगळे सरप्राईस आहे’ हसत हसत काकांनी सांगितले. ड्राइवर कार घेऊन आला आहे असा अमेयचा फोन येताच काका काकुंना घेऊन खाली आले. स्वतः कारचा दरवाजा उघडून काकुंना बसायला सांगितले. अमेयने ड्रायव्हरला आज कुठे कुठे जायचे आहे हे आधीच सांगितले असल्यामुळे काकांनी काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता. कार सुरु झाली. काकांनी इशारा करताच ड्रायव्हरने टेप सुरु केला. आधीच सेट करून ठेवलेले “जीवनात हे घडी अशीच राहू दे” हे काकुंचे आवडते गाणे सुरु झाले. आपले आवडते गाणे ऐकताच काकु सुखावल्या आणि नकळतच त्यांची तंद्री लागली. कार थांबताच त्या तंद्रीतून बाहेर आल्या आणि समोर पाहतात तर दगडुशेठचे गणपती मंदिर. ‘चल मालती आजच्या आपल्या दिवसाची सुरवात गणपतीच्या दर्शनाने करूया’ काकांचे वाक्य कानावर पडताच काकु खाली उतरल्या. दोघांनी मिळून गणपतीचे दर्शन घेतले. आज बरेच दिवसांनी ते दोघेच असे मंदिरात आले होते. त्यामुळेच त्या दोघांना खूपच प्रसन्न वाटत होते. दर्शन घेऊन पायरीवर बसले असताना ‘अहो सांगा ना काय आहे आज तुमच्या मनात’ ह्या काकुंच्या प्रश्नावर ‘ आगे आगे देखो होता है क्या’ असे बोलून काकांनी त्यांना उठवले. कारमध्ये बसताच ‘ स्वारी आज वेगळ्याच मूडमध्ये आहे आणि हे सगळे अचानक काय आहे’ असे विचार काकुंच्या मनात सुरु झाले. थोडा वेळ जात नाही तोच कार “बालगंधर्वला” येऊन थांबली आणि समोर “व्हराड निघालंय लंडनला” असा बोर्ड दिसताच काकुंच्या मनात आनंद आणि आश्चर्य दोन्ही भावनांची गर्दी झाली. मुळातच नाटकांची आवड असणाऱ्या मालती काकुंना हे नाटक बऱ्याच दिवसांपासुन पाहायचे होते. बोलता बोलता काकांना हे सांगितलेले त्यांना आठवले. सहज म्हणून बोललेलं लक्षात ठेऊन काकांनी ह्या नाटकाला आणले म्हणून त्यांना फार छान वाटले. काकुंनी नाटक खूप एन्जॉय केले. आज त्या अगदी मनापासून हसल्या आणि त्यांना तसे हसताना पाहून काकांना पण बरे वाटले. इंटर्वलमध्ये तर काका पॉपकॉर्न पण घेऊन आले. नाटक संपल्यावर दामले दाम्पत्य कारमध्ये बसून निघाले. ‘अहो तुम्ही वर्षाला सांगितले होते ना कुलूप उघडून स्वयंपाक करून ठेव म्हणून?’ काकुंच्या ह्या प्रश्नावर काकांनी फक्त होकारार्थी मान डोलावली. मग दोघांनी मिळून आज पाहिलेल्या नाटकाविषयी गप्पा मारल्या. काम आणि जबाबदारी पार पाडताना मोजकी काही नाटकं सोडली तर त्या दोघांनी बरेच दिवसांनी असे निवांतपणे नाटक पाहिले होते. गप्पा मारता मारता कधी कार “वैशाली हॉटेल” समोर येऊन थांबली हे त्या दोघांनाही कळले नाही. काकुंकरता हा अजून एक सुखद धक्का होता. कारण वैशाली मधील डोसा काकुंना फार आवडायचा आणि म्हणूनच काकांनी आज त्यांना इथे आणले होते. अमेयने आधीच टेबल बुक करून ठेवला होता त्यामुळे वेटिंगचा प्रश्नच नव्हता. दोघांनी चवीने आणि छान एन्जॉय करत जेवण केले. आज ज्याप्रमाणे काकांनी काकुंना एकानंतर एक आश्चर्याचे धक्के दिले होते त्यानुसार आता काय असा प्रश्न साहजिकच काकुंना पडला. तेवढ्यात काकांनी विचारले ‘मालती तुला जास्त थकवा जाणवत नसेल तर सारसबागेत जाऊया का? आपल्या काही जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करूयात’. ह्या प्रश्नावर काकुंनी नकळतच होकार दिला आणि दोघांची स्वारी सारसबागेकडे रवाना झाली. तिथे एका बाकावर बसून काका काकुंनी आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. लग्नानंतर काही वेळा घेऊन आले होते काका इथे काकुंना. तेथील काही लहान मुलांना खेळताना पाहून त्यांना छोटे अमेय आणि अंकिता आठवले. पोरांना फार आवडायचे सारसबागेत. अश्याच काही जुन्या आठवणी काढत आणि गप्पा मारता मारता कधी साडेचार पाच झाले हे कळलेही नाही. आता काकुंना थोडा थकवा जाणवतो आहे असे काकांच्या लक्षात आले तेव्हा दोघेही उठले. सारसबागेच्या गणपतीचे दर्शन घेऊन दोघेही कारमध्ये बसले. आजच्या दिवसाचा शेवटचा टप्पा होता “सुजाता मस्तानी”. थोडे अंतर पार करून कार थांबली थेट सुजाता मस्तानीसमोर. नाव पाहताच काकुंना आता फक्त हर्षवायूचं व्हायचा बाकी होता. काकांनी टेबलवर बसतच ऑर्डर दिली “वन बाय टु मँगो मस्तानी विथआऊट आईस”. आज किती दिवसांनी प्रत्यक्ष येऊन मस्तानी पिण्याचा योग्य आला होता त्यामुळे त्यांना ती जास्तच गोड लागत होती. मस्तानी झाल्यावर आजचा अख्खा दिवस एकमेकांच्या सहवासात खूप एन्जॉय केलेले ते दोघे घराकडे परत निघाले.
घरी आल्यावर फ्रेश होऊन काकुंनी देवाजवळ दिवा लावला आणि सोफ्यावर पेपर चाळत बसलेल्या काकांजवळ आल्या. आजच्या सरप्राईस डे मुळे काकुंना थोडा शारीरिक थकवा जाणवत होता. पण त्यांचे मन मात्र ताजेतवाने झाले होते आणि साहजिकच त्यामुळे त्यांचा चेहराही टवटवीत दिसत होता. ‘ये मालती बस’ असे म्हणत काकांनी त्यांना आपल्याजवळ बसवले. काकांचा हात हातात घेत काकुंनी ‘मला आज तुमचा हा सरप्राईस डे खूप आवडला. छान आणि फ्रेश वाटते आहे. कुठलाही विशेष त्रास जाणवला नाही आज’ असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. पण आज अचानक हे सगळे का? काकुंच्या ह्या प्रश्नावर काकांनी पण आयुष्यात आजपर्यंत कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडताना आपल्याला आपल्या दोघांचाच असा फार कमी वेळ मिळाला. मला तुझ्या आवडीनिवडीपण नीट जपता आल्या नाही. तू मात्र विनातक्रार मला साथ देत राहिली. म्हणून आजचा हा दिवस होता अश्या शब्दात आपल्या भावना मांडल्या.
येत्या काही दिवसात काकुंचे किमो आणि इतर उपचार सुरु होतील. ते सगळे चक्र सुरु होण्याआधी काकांना काकुंसोबत फक्त त्यांचे दोघांचे असे क्षण घालवायचे होते. शिवाय काकुंनी बऱ्याच दिवसात त्यांच्या आवडीचे जे जे केले नव्हते ते ते सर्व काही करायचे होते. म्हणूनच काकांनी आजचा दिवस प्लॅन केला होता आणि त्याचा परिणामही दिसत होता. गेल्या काही दिवसात दुखण्यामुळे बेजार झालेल्या काकु आज फ्रेश दिसत होत्या. हातात हात घेऊन एकमेकांचा सहवास अनुभवत असलेले दामले काका काकु फोनची रिंग वाजताच भानावर आले. काकुंच्या भावाचा फोन होता. त्या फोनवर बोलेपर्यंत काका त्या दोघांसाठी दूध आणि काकुंचे औषधं घेऊन आले. विशेष भूक नसल्याने आणि दिवसभराचा थोडा थकवा जाणवत असल्याने थोडे थोडे दूध पिऊन लवकर झोपू असे त्यांनी ठरवलेच होते. त्यांच्या बेडरूमच्या खिडकीतून छान थंड वारा येत होता. चंद्राचा प्रकाश खिडकीतून खोलीभर पसरला होता. काकुंना तर पलंगावर पडताच झोप लागली. पण आज इतक्या वर्षात काकांना काकुंच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसत होते आणि काकुंचा पुढील कठीण काळ सुरु होण्याआधी आपण त्यांना आज भरभरून आनंद देऊ शकलो आणि संसाराच्या रहाटगाडग्यात जे सुखाचे क्षण द्यायचे राहिले होते ते आज आपण देण्याचा प्रयत्न केला ह्याबाबतीतील समाधान काकांच्या चेहऱ्यावर पसरले होते. थकलेले ते दोन जीव समाधानेच्या लाटेवर स्वार होत निद्रादेवीच्या अधीन झाले होते……….
सौ. ऋचिता बोधनकर दवंडे
==================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/