सखी (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२
©️®️ सौ. मधुर कुलकर्णी
रश्मीने केसांवरून एकदा परत कंगवा फिरवला.डबा पर्समधे टाकला आणि ऑफिसमधे जायला निघाली.
“झाला का नट्टापट्टा? ना रूप ना रंग,तरी दहा वेळा आरशासमोर.आता ह्या वयात कोण लग्न करणार तुझ्याशी? चाळिशीला आलीस तु. खायला काळ आणि भुईला भार.”मंगल रश्मीकडे बघत तिरसटासारखं बोलली.
ते ऐकून रश्मीच्या तळपायाची आग मस्तकात गेली.आई आहे का कोण ही?सावत्र आईसुद्धा इतकं वाईट वागत नसेल.इतकी मी तिरस्करणीय आहे का?
सहा महिने झालीत, हीअंथरुणाला खिळलीय.बाबा जाऊन वर्ष होतंय आणि हिचे हे विखारी शब्द अजूनच ऐकावे लागताहेत.आयुष्याचा सगळा राग ती आता माझ्यावर काढतेय.रश्मीने महत्प्रयासाने राग आवरला.
घरात पडल्याचं निमित्त झालं आणि मंगलच्या कम्बरेचं हाड मोडलं. दोन ऑपरेशन्स झाली पण चालता येत नव्हतं.नवऱ्याची नोकरी प्रायव्हेट कंपनीची होती म्हणून पेन्शन तुटपुंजी. तिच्या औषधालाच सगळी खर्ची पडायची.घराचा सगळा खर्च रश्मी निभावत होती,तरी तिला हे ऐकून घ्यावं लागतं होतं.लहानपणापासून सतत मंगलने रश्मीला तिच्या सामान्य रूपाची जाणीव करून दिली.
मंगल अतिशय देखणी होती पण नवरा मात्र सुमार.घरची परिस्थिती हलाखीची.मनासारखा, सुंदर नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य तिच्याकडे नव्हतं.वडिलांनी स्थळ पसंत केलं आणि ती मुकाट्याने बोहल्यावर चढली.रश्मीने वडिलांचा रंग,रूप घेतलं. मंगल नवऱ्याचा राग राग करत होतीच,आता रश्मीचा देखील करू लागली.तिच्या लेखी रूप म्हणजे सगळं काही होतं.
रश्मीला कळायला लागल्यापासून तिला हे जाणवू लागलं होतं.कथा,कादंबरी,चित्रपटात अशा गोष्टी घडतात असं तिने ऐकलं होतं.पण तिच्या आयुष्यात प्रत्यक्षच घडत होतं.ती मुळातच शांत होती.वाद घालण्याचा तिचा स्वभावच नव्हता.लहानपणापासून सतत पडतं घ्यायचं हेच अंगवळणी पडलं होतं.आईचं बोलणं ऐकून घ्यायची सवयच लागली होती.पण वडील कायम तिच्या पाठीशी राहिले.तिला फुलासारखं जपलं.त्यांचं रंग,रूप ती घेऊन आली म्हणून आणि तिला मंगलचं सतत ऐकून घ्यावं लागतं, ह्यासाठी त्यांना अपराधी वाटायचं.ते गेले आणि रश्मी एकाकी झाली.तिचा भावनिक आधारच गेला.
रश्मीने परत एकदा आरशात स्वतःला बघितलं.रंग सावळा,नाक अपरं. तिने डोळे मिटून घेतले.टपोरे,बोलके डोळे आणि लांबसडक केस इतकंच काय ते देवाने मनापासून दिलं होतं.आता इतकी वर्ष रडून रडून, डोळेही कोरडे झाले होते.रडायला सुध्दा येत नव्हतं.
तिने पर्स घेतली,देवाला नमस्कार केला आणि ऑफिसला निघाली.मंगलसाठी दिवसभराची एक मुलगी लावली होती.खर्च खरं तर आवाक्यापलिकडे होता,पण काही इलाज नव्हता.
ऑफिसमधे आल्याबरोबर शिपायाने तिला सांगितलं की साहेबांनी केबिनमधे बोलावलं आहे.तिने घड्याळ बघितले.वेळेत तर पोहोचले आहे.कशाला बोलावले असेल?
“मे आय कम इन सर?” रश्मीने केबिनच्या दरवाजातून विचारले.
“येस प्लिज.” साहेबांनी पुढची फाईल बंद केली.
“मिस देसाई, स्टाफमधे नवीन व्यक्ती ट्रान्सफर होऊन आली आहे,मिस्टर प्रसाद काटकर. त्यांना प्लिज कोऑपरेट करा.तुम्ही ते खूप चांगल्या प्रकारे करता म्हणून मी दर वेळेस तुम्हाला सांगतो.” साहेब स्मित करत म्हणाले.
“येस सर,नक्की मदत करेन.”रश्मी म्हणाली.
रश्मी केबिनच्या बाहेर आली.तिची ऑफिसमधली मैत्रीण श्रुती; हिच्याकडून तिला कळलं होतं की रावेतच्या जागी कुणीतरी नवीन व्यक्ती रुजू झालीय.तिला रावेतच्या टेबलवर एक नवीन चेहरा दिसला.साधारण चाळीसच्या आसपास असावा.चेहऱ्यावर मृदू भाव पण काहीतरी लपवतो आहे असा.
रश्मी त्याच्याजवळ आली.”मिस्टर काटकर?”
“हो मॅडम,गुड मॉर्निंग.”प्रसाद हात जोडून म्हणाला.
“नमस्कार, मी मिस रश्मी देसाई.या फाईल्स.काही अडचण आली तर मी आहेच आणि सिनिअर क्लार्क शिंत्रे साहेब आहेत.आपण आधी कुठे होता?” रश्मी टेबलवर फाईल्स ठेवत म्हणाली.
“मी यवतमाळला होतो.तिथून आता इथे नागपुरला बदली झालीय.”
“ओके,हॅव अ गुड डे.” रश्मी तिच्या जागेवर येऊन बसली.
प्रसाद चार दिवसातच ऑफिसमध्ये छान रुळला. कामात अगदी सातत्य,सचोटी होती.लंच ब्रेक मधे बोलता बोलता रश्मी आणि प्रसादची छान ओळख झाली.एक दिवस प्रसाद स्वतः पुढाकार घेऊन रश्मीला म्हणाला, ” आज कॅफे मधे थोडावेळ बसून गप्पा करू.ऑफिसमध्ये घरच्या गोष्टी करता येत नाहीत.या ऑफिसमध्ये सुरेंद्र आणि तुमच्याशी जास्त ओळख झालीय.जरा वेळ निवांत बसून बोलू.चालेल?”
रश्मीलाही प्रसादबरोबर निर्धास्त वाटायचं.इतकी वर्षे नोकरी करून तिला पुरुषाची चांगली,वाईट नजर कळायला लागली होती.
एका छोट्या कॉफी हाऊस मधे दोघे बसले.
प्रसादने ऑर्डर दिली आणि त्याचा मोबाईल वाजला.त्याने फोन घेतला, “पिल्लू,तुझी आज खूपच आठवण येतेय ग.कशी आहेस ग?काकुला त्रास नको देऊस हं.मी येतोच शनिवारी. छान अभ्यास कर.शहाण्या मुलींसारखी वाग.”
प्रसादने फोन बंद केला आणि रश्मीकडे बघितलं. तिची प्रश्नार्थक नजर बघून तो म्हणाला,
“माझी मुलगी रुही. पाच वर्षांची आहे.मी डीव्होर्सी आहे. माझ्या पत्नीच्या आवडनिवडी खूप वेगळ्या होत्या.नाही जमलं दोघांचं.दोष कुणाचाच नाही.तडजोड करणं दोघांनाही अशक्य झालं आणि निर्णय घेतला. ती आता एक प्रथितयश कलाकार आहे. उणापुरा दहा वर्षांचा संसार आमचा. तिच्या करिअर मधे अडथळा नको म्हणून रुहीची जबाबदारी मी घेतली.आमचं एकत्र कुटुंब.मोठा भाऊ,वहिनी,त्यांची दोन मुलं,मी,रुही आणि माझी आई.यवतमाळला मोठं घर आहे.पण आता इथे नागपूरला मला रुहीला घेऊन येणं शक्य नाही.वहिनी तिचं सगळं मायेने करतात.”
“ओह,सॉरी. पण ओढूनताणून संसार नकोच.”रश्मी म्हणाली. तिच्या डोळ्यासमोर आई आली. तिच्या मनाविरुद्धच ती बाबांशी संसार करत होती.कधीही न जुळलेली मनं.
रश्मी प्रसादशी मोकळेपणाने बोलत होती.पण तिला आश्चर्य वाटलं,प्रसादने एकदाही तिची सखोल चौकशी केली नाही.तिला वाटलं,ह्याला कदाचित माझ्याविषयी सगळं माहिती असावं. रश्मी पर्स घेत उठली, “निघते मी,आई बेडरीडन आहे.दिवसभराची मुलगी घरी गेली असेल.मला जायला हवं.उद्या भेटू ऑफिसमधे.”
त्या दिवसांनंतर रश्मी-प्रसाद मधे अजूनच मोकळेपणा आला.रश्मीने स्वतःबद्दल प्रसादला सगळे सांगितले.तिचा एकाकीपणा,आईचं वागणं ह्यावर ती अनेकदा प्रसादशी बोलली.रश्मीच्या मनात फक्त मैत्रीची भावना होती कारण तिला हे पक्कं ठाऊक होतं, प्रसाद तिच्याकडे फक्त एक चांगली मैत्रीण म्हणून बघत होता.तिला पूर्ण जाणीव होती की कुठलाही पुरुष तिच्यासारख्या सामान्य रूपाच्या मुलीच्या प्रेमात पडणं अशक्य होतं.
रश्मी; तिच्या आणि प्रसादच्या मैत्रीविषयी श्रुतीला सगळं सांगत असे.एकलकोंड्या रश्मीची प्रसादशी वाढती मैत्री बघून श्रुतीलाही आनंदच झाला.रश्मी जरा मोकळी वागतेय, आनंदी दिसतेय हे बघून श्रुतीलाही खूप बरं वाटलं.
एक दिवस हॉटेलमधे कॉफी पीत असताना अचानक प्रसादने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला.त्याने सरळच तिला विचारलं,
“रश्मी,लग्न करशील माझ्याशी? रुहीला आईची माया देशील?ती आईच्या वात्सल्याला पोरकी झालीय.”
त्याचं ते बोलणं ऐकून रश्मीला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही.ती एकदम चिडलीच.
“अच्छा,म्हणजे तुला तुझ्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी बाई हवीय.तुला साथ हवी म्हणून नकोय.माझ्यासारख्या सामान्य रूपाची बायको कोणाला हवी असणार?एक मुलगी पदरात आहे म्हटल्यावर तुझ्याशी लग्न करायला कोणी तयार नसेल.आणि मला आजपर्यंत कोणी पसंत केलं नाही,हे देखील तुला माहितीय.मी हुरळून जाईन असं वाटलं तुला? यापुढे मला भेटू नकोस आणि माझ्याशी बोलायचा देखील प्रयत्न करू नकोस.गुडबाय.” रश्मी तडकाफडकी तिथून चालती झाली.
प्रसाद अवाक् होऊन तिच्याकडे बघायला लागला.त्याला हे अनपेक्षित होतं. रश्मीच्या सहवासात आल्यावर ती खरच त्याला आवडायला लागली होती.तिचा साधेपणा,आणि प्रेमळ स्वभाव त्याला आवडला होता.आयुष्यात एकदा सौंदर्याला महत्व देऊन तो पोळला होता.आता त्याला रश्मी सारखी समंजस जोडीदार हवी होती.आपण तिला विचारून फार मोठी चूक केली ह्याचा त्याला पश्चाताप झाला.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधे रश्मी आणि प्रसादच्या वागण्यात एक विचित्र दरी निर्माण झाली.रश्मीने तर पूर्णपणे दुर्लक्ष केलं.ऑफिसमधला दिवस कसातरी पार पडत होता.एक चांगलं नात संपुष्टात आलं.
रश्मीने प्रसादशी बोलणं बंद केल्यापासून ती अस्वस्थ असायची.प्रसादशी ओळख झाल्यापासून तिला एक चांगला मित्र मिळाला होता.पण ते नातं तिनेच संपवलं होतं. आता तर ऑफिसला जाणं सुद्धा तिला नको वाटायला लागलं.
आज सकाळपासूनच रश्मीचं डोकं गरगरत होतं. ऑफिसमध्ये जायची इच्छा पण होत नव्हती पण आठ दिवसांवर ऑडिट आलं होतं. जाणं भाग होतं.स्वतःच आवरून ती ऑफिसमध्ये जायला निघाली. स्कुटी पार्क करून ती ऑफिसच्या दरवाजापाशी आली आणि तिथेच कोसळली.
————————————————————–
रश्मीने डोळे उघडले तर ती हॉस्पिटलच्या बेडवर होती.डोकं जड झालं होतं.तिने आजूबाजूला बघितलं.
श्रुती खुर्चीत वाचत बसलेली दिसली.तिने हाक मारली.
“श्रुती,काय झालंय मला? दवाखान्यात का आणलं?”
“रश्मी,तुझं ब्लड प्रेशर एकदम लो झालं होतं.तु ऑफिसच्या दारातच कोसळली आज सकाळी.म्हणून तुला इथे आणलंय.हेडसरांनी मला इथे तुझ्याजवळ बसायला सांगितलं आहे.काळजी करण्यासारखं काहीही नाही.डॉक्टर म्हणाले,कुठलातरी स्ट्रेस आहे.उद्या डिस्चार्ज देतील.मी रात्री झोपायला येतेय परत.आणि आईची काळजी करू नकोस.दिवसभर सांभाळणाऱ्या मुलीला आज रात्री झोपायला ये म्हणून सांगून आलेय मी.” श्रुतीने तिच्या कपाळावरून हात फिरवला.
“श्रुती,हॉस्पिटलमधे ऍडमिट करताना पैसे तु भरले असशील न.मी देते नंतर तुला.” रश्मी थकलेल्या स्वरात म्हणाली.
“रश्मी,ही वेळ पैशाचं बोलण्याची आहे का? आणि बाय द वे,पैसे प्रसाद सरांनी भरले.तु दारात कोसळल्यावर त्यांनीच उचलून तुला आत ऑफिसमध्ये आणून बेंचवर झोपवलं.त्यांनीच सगळी धावपळ करून तुला इथे ऍडमिट केलंय.”
“प्रसादने ऍडमिट केलं?” रश्मीने आश्चर्याने विचारलं.
“हो रश्मी,ऍडमिट करून प्रसाद सर लगेच गेले.तु त्यांच्याशी बोलणं बंद केलंस,त्यांना बघून तुला अजून त्रास होऊ नये म्हणून क्षणभर पण ते थांबले नाही.रश्मी,प्रसाद अतिशय सज्जन माणूस आहे.त्यांना नकार देऊन,त्यांचा अपमान करून तु फार मोठी चूक केली आहेस.घरी गेल्यावर, जरा बरं वाटलं की विचार कर ह्या गोष्टीचा. चल,मी घरी जाऊन येते,आराम कर.आणि हा तुझा मोबाईल. जवळ ठेव.मी सिस्टरना सांगून जाते.” श्रुती खुर्चीतून उठत म्हणाली.
रश्मीला घशात एकदम आवंढा आला.प्रसादला फोन करावा का?नकोच.कदाचित त्याने माणुसकी म्हणून हे सर्व केलं असावं.परत विचारांचे दुष्ट चक्र सुरू झाले.तिने मोबाईल घेतला.प्रसादला व्हाट्स अप वर मेसेज टाकला..”सॉरी अँड थँक्स”…
मोबाईल व्हायब्रेट झाला म्हणून तिने मेसेज बघितला.प्रसादचा होता…”कशासाठी सखी?”
तिने परत मेसेज टाकला…”सखी?”
प्रसादचा मेसेज आला…”हो सखी.तु मला नकार दिलास तरी तु माझी सखी राहशीलच.मला एक चांगली मैत्रीण गमवायची नाहीय.”
प्रसादचा मेसेज वाचून रश्मीचे डोळे वाहायला लागले.तिला कळून चुकलं की ती प्रसादवर प्रेम करायला लागलीय.तिचा नकार एका उदासीनतेमधून आला होता.तिलाही प्रसादचा सहवास हवाहवासा वाटत होता. डोक्यातल्या सततच्या ह्या विचारांनी तब्येतीवर परिणाम झाला होता. तिने थरथरत्या हाताने प्रसादला फोन लावला.पण तोंडातून शब्द निघत नव्हता.
“सखी” पलीकडून प्रसाद बोलला आणि रश्मी हुंदके देऊन रडायला लागली.
“रश्मी,फोन बंद कर. मी दवाखान्यात येतोय.”प्रसाद म्हणाला.
पंधरा मिनिटात प्रसाद रश्मीच्या रूममधे आला.त्याला बघून रश्मी मूकपणे रडत होती.प्रसादने तिचा हात हातात घेतला, “रश्मी,मला फक्त बायको नकोय ग.एक सखी हवीय.एक सखीच एक उत्तम बायको होऊ शकते.मैत्रीचं नातं असेल तर संसार बहरतो. आणि रुहीची पण तु मैत्रीण होऊ शकतेस.”
“प्रसाद,मला व्हायचंय तुझी सखी आणि सहचारिणी.पण मी आईला एकटं सोडू शकत नाही.माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे ते.”
रश्मी रडत म्हणाली.
“आईची काळजी करू नकोस.तु माझ्या आयुष्यात आल्यावर त्यांना सांभाळणं ही माझी पण जबाबदारी आहे. पण तुझा निर्णय पक्का आहे न?नाहीतर उद्या परत म्हणशील,मला तुझं तोंडही दाखवू नकोस.”
प्रसाद रश्मीला चिडवत म्हणाला.
“प्रसाद”….रश्मीने हसत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
एका गोड नात्याची सुरवात झाली होती…..
———-x———–
©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे
==========================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते १४ फेब्रुवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/