Skip to content Skip to sidebar Skip to footer

सहसंवेदना (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२

©️®️ दीपाली थेटे-राव

केतकी…पाहताक्षणीच आवडली उमाकांतला. तिथेच त्याने घरच्यांना पसंती कळवली. तिच्या सावळ्या वर्णावर, काळ्याभोर बोलक्या डोळ्यांवर पुरता लट्टू झाला होता तो.तिच्या नजरेची भाषा त्याला घायाळ करून गेली होती.    मुलगी बघायला म्हणून गेली आणि लग्नाची तारीख ठरवूनच मंडळी परतली.
        मंगलाष्टकांच्या पवित्र नादात, देवा- ब्राह्मणांच्या साक्षीने, थोरामोठ्यांच्या आशीर्वादात केतकी आणि उमाकांत बोहल्यावर चढले. लग्नानंतरचे फुलपाखरी दिवस….दोघांचीही स्वप्न गुलाबी गुलाबी.. लग्नानंतर नोकरी सोडून गृहिणीपद भूषणवण्याचा केतकीचा निर्णय उमाकांतला मान्य होता. सधन होतं कुटुंब त्यांचं.उमाकांत आणि त्याचे बाबा घरचा प्रिंटिंगचा बिझनेस सांभाळायचे. त्याच्या आईलाही केतकीची कंपनी फार आवडायची.केतकी होतीच अशी.आयुष्य भरभरून जगणारी..रोजच्या दिवसाला उत्सव बनवणारी..उमाकांतला तर तिच्याशिवाय आता चैनच पडत नसे.त्याच अवघं जग केतकीमय झालं होतं.        आई बाबा कधीकधी चेष्टेने म्हणायचे सुद्धा,” उमा घरात आम्हीही आहोत बर का!”केतकी लाजेने चूर व्हायची आणि अजूनच सुंदर दिसायची. दिवस एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले….     सासरी आल्यानंतर गच्चीवर कितीतरी फुलझाडं नव्याने लावली तिने.तिच्या हाताचा अमृत स्पर्श झाडांना नवसंजीवनी द्यायचा…………………………..     निमाताई मैत्रिणीकडे जायला बाहेर पडल्या. केतकी घरी एकटीच होती…
“केतकी! अगं किती वेळ अशी इथेच बसून आहेस. घरभर शोधलं तुला.गॅसवर ठेवलेलं चहाचं आधण पार करपून गेलं होतं. भांडण जळाल्याचा वास सगळीकडे पसरला आहे बघ.केतकी sssकेतकीsssअगं लक्ष कुठे आहे तुझं?”तिला गदागदा हलवत निमाताई बोलत होत्या. केतकीचं झाडांवरचं प्रेम लक्षात घेऊन त्यांनी ताडलं होतं की ती तिथेच सापडेल.केतकीने वर  त्यांच्याकडे पाहिलं तश्या त्या चरकल्या….’इतकी अनोळखी नजर?’काही मिनिटच..”अं ? काय म्हणालात आई? तुम्ही कधी आलात?”निमाताई काहीच बोलल्या नाहीत.तिला घेऊन त्या खाली आल्या.”अगोबाई हे चहाच भांड कोणी ठेवलं गॅसवर? पार करपून गेलं की सगळं.राहू दे. मी तुम्हाला आणि मला मस्त  कडक कॉफी बनवते.”केतकीने कॉफी करायला घेतली आणि निमाताई भांबावल्यासारख्या तिच्याकडे पाहतच राहिल्या. त्यांनी वसंतराव घरी आल्या आल्या त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली.        “राहू दे ग. गडबडली असेल पोर. तशी नवीनच आहे आपल्या घरात. आताशी कुठे वर्ष होतंय त्यांच्या लग्नाला. आपण आहोत ना सांभाळून घ्यायला.” वसंतराव म्हणाले पण निमाताईंच्या डोक्यातून केतकीची ती अनोळखी नजर काही हटेना………………………काही दिवसांनंतर चीच गोष्ट…”केतकी इथे काय करतेस? किती वेळ झाला बघतोय तुला. ही भाजीची पिशवी हातात घेऊन इथेच उभी आहेस कधीची. कोणी येणार आहे का? कोणाची वाट बघत आहेस का?        अगं घरी लवकर निघालो. म्हटलं आज दोघेजण मस्त पिक्चरला जाऊया. पण तू इथेच भेटलीस.काय ग भाजी घ्यायची आहे ना?केतकीssss” उमाकांत गाडी रस्त्यात मधेच थांबवून केतकीशी बोलत होता. केतकीने त्याच्याकडे बघितलं आणि तो हादरला.कुठलीच ओळख नव्हती त्या नजरेत.”केतकी गाडीत बस” तो ओरडला.तिने न ऐकल्यासारखं केलं. ..    तसं गाडीतून बाहेर येऊन तिचा विरोध झुगारून त्याने बळेच तिला गाडीत ढकललं.   आजूबाजूची मंडळी संशयित नजरेने त्याच्याकडे पाहत होती.पण त्याची पर्वा न करता त्याने वेगाने गाडी घराकडे घेतली……”अरे मी तर भाजी आणायला निघाले होते. हे मधेच असं गाडीत कशी काय आले?” गाडी पार्क करून त्याने तिला हाताला धरून घरात आणलं.”हे काय उमाकांत! बघतील ना घरातले. लग्न होऊन वर्ष होऊन गेलं म्हटलं. हे असं धरून गृहप्रवेश म्हणजे…”ती लाडीकपणे उमाकांतशी बोलत होती पण त्याचं चित्त सैरभैर झालं होतं…पुढे पूर्ण दिवसभर ती जणू काहीच घडलं नाही अशीच वागत होती.      रात्री केतकी झोपली आहे हे बघून तो खोलीच्या बाहेर आला. ती अनोळखी नजर त्याचा अजुनही पाठलाग करत होती. काहीच सुचेनासं झालं होतं.     पाणी प्यायला म्हणून बाबा त्यांच्या खोलीतून बाहेर आले. किचनमध्ये जाताना त्यांना हॉलमध्ये एकटाच बसलेला उमाकांत दिसला.”काय रे झोप येत नाही का? काही टेन्शन आहे का? का भांडलात दोघे?केतकी कुठे आहे? ती एकटीच आत मध्ये रडत तर नाही ना बसलीये?”बाबा प्रश्नांवर प्रश्न विचारत होते आणि उमाकांतचा तोल ढळला.त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले.बाबांनी त्याला जवळ घेतले आणि ते विचारपूस करू लागले.”उमा बेटा काही टेन्शन असेल तर आत्ताच सांगा. गोष्टी वेळीच निस्तरल्या तर बरं असतं नाहीतर…””बाबा भांडण वगैरे काहीच नाही हो. सगळं छान चालू आहे. पण…”उमाकांतने दुपारची हकीकत बाबांना सांगितली. केतकीची ती नजर त्याला राहून राहून आठवत होती.    आता मात्र बाबांनाही टेन्शन आलं.त्यांनी त्याला निमाताईंबरोबर घडलेला प्रसंगही सांगितला. त्यानंतरही बऱ्याचदा केतकीच हे हरवलेपण त्यांच्या दोघांच्या लक्षात आलेलंही सांगितलं. पण त्यांनी ती घाबरली असेल , बावचळली असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.      दुसऱ्या दिवशी उमाकांत केतकीला घेऊन त्यांच्या फॅमिली डॉक्टर कडे गेला.
   “अहो इकडे कशाला आलो आहे आपण? कोणाला दाखवायचे आहे? बरं वाटत नाही का तुम्हाला?”  उमाकांतच्या कपाळाला हात लावत केतकीने विचारले. केतकीच्या प्रश्नांना काहीतरी गुळमुळीत उत्तर देऊन तो डॉक्टरांशी बोलण्यासाठी म्हणून त्यांच्या केबीन मध्ये गेला.त्याने डॉक्टरांना आत्तापर्यंतच्या सगळ्या घटना सांगितल्या. डॉक्टरांनी केतकीसाठी काही टेस्ट लिहून दिल्या आणि औषधेही………..रिपोर्ट आले होते. केतकीचं हरवलेपण “त्या” आजाराची सुरुवात होतं…कालांतराने हे अनोळखीपण कदाचित वाढत जाणार होतं…      आपल्याला काय झालंय आणि इतकी औषधं का घ्यायची?… हे न कळूनही केवळ  उमाकांतच्या सांगण्यावरून तिने गोळ्या घेतल्या होत्या.आता ती  गाढ झोपली होती.तिच्या डोक्यावरून हात फिरवत उमाकांत ढसाढसा रडत होता.     समोरच तिचे आई-वडील सुन्न बसून होते.”आम्हाला ही काहीच कल्पना नव्हती हो याची.    या आधी एकदा असं कॉलेज मधून परतताना रस्ताच आठवला नाही काही मिनीटं… असं म्हणाली होती पण वाटलं परिक्षेचा ताण, जागरण यामुळे झालं असेल…नाहीतर खरंच आम्ही हे लग्न नसतं हो केलं” त्यांच्या शब्दांत अगतिकता आली होती.       निमाताई आणि वसंतराव बाहेर हॉलमध्ये चिंतातुर मनस्थितीत येरझाऱ्या घालत होते.       एका रिपोर्टने पूर्ण घराचा आनंद ढवळून काढला होता.        केतकीच्या आई-वडिलांना तिच्या आजारपणाची चिंता भेडसावत होती तर उमाकांतच्या आई-वडिलांना त्याच्या भविष्याची……
       पाचही जण हॉलमध्ये बसले होते. केतकी अजूनही आत झोपलेली होती.काहीतरी ठरवणे भागच होतेकेतकीचे आई वडील शेवटी निर्णयावर आले. रडत रडत ते म्हणाले,”आम्ही घेऊन जातो तिला घरी परत”
खूप विचारांती उमाकांतने तिला परत न पाठवण्याचा निर्णय घेतला.”उमाकांत! अरे दिवसेंदिवस परिस्थिती अजून बिकट होत जाईल. तुझ्यापुढे तुझंही पूर्ण आयुष्य पडलं आहे. स्वतःचाही थोडा विचार कर रे.” त्याच्या आणि तिच्याही आई-वडिलांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला.पण…..त्याचे प्रेम त्याला तिच्यापासून दूर कसे राहून देणार होते?       बेडरूममधे हालचाल जाणवली तसा उमाकांत केतकीकडे धावला.तिनेही हे सगळे ऐकले होते.तिला सगळे समजून चुकले होते.
“उमाकांत.. मी खरच जाते परत माहेरी. तू तुझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू कर आणि सुखाने जग. माझ्याबरोबर ना तुला संसाराचे सुख मिळेल ना आयुष्याचे समाधान. माझा तुला तुझ्या आयुष्यासाठी काहीच उपयोग नाही.” उमाकांतच्या मिठीत ती हमसून हमसून रडत होती.”अगं वेडे ! पहिल्यांदा तुला पाहिलं आणि तुझ्यावर भाळलो.प्रेम म्हणजे ‘सहसंवेदना’ती आपोआप जोपासली जाते…. त्यासाठी वेगळं काही करावं नाही लागत ग. प्रेमात स्वार्थ नाही.. त्यात देण्या घेण्याचे हिशेब नाहीत की काही मिळवणं.. गमावणंही नाही.  फक्त अनुभुती आहे ही…
       उलट आता तर आयुष्याला खरी रंगत येणार. तू मला रोज नव्याने भेटणार. रोज नव्याने आपलं नातं बहरणार ..फुलणार..कालचा तोचतोचपणा आपल्या आयुष्यात कधीच नसेल म्हणून आपल्या प्रेमाच्या चित्रातले रंग कधीच फिके होणार नाहीत. आपला कॅनव्हास रोज नव्या सुंदर रंगांनी रंगणार….” तिला अजून जवळ घेत उमाकांत उत्तरला…………केतकीच्या नजरेत अनोळखीपण दाटत होते…    भाळण्यापासून सुरू झालेला प्रेमाचा प्रवास आता “सां”भाळण्यापर्यंत येऊन ठेपला होता….xxxxxxxxxxx
आभारी आहे

4 Comments

Leave a Comment

error: