सगळं गणितच सोप्पं करुन गेली ती..

©® सौ. गीता गजानन गरुड.
“आई, अगं दिवे तरी लावायचेस नं?”
“कोण सचिन, तू न कळवता आलास तो?”
“अगं आज या साइटला काम होतं थोडं? लवकर आवरलं नि आलो तुझ्याकडे..पण हे काय अशी अवेळी झोपलीस ती..”
“काही विशेष नाही रे. गुडघे दुखताहेत खूप.”
“आई, मला फोन का नाही केलास? मी सकाळीच येऊन तुला डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो ना.”
“हो रे. किती बोलशील. जरा आराम कर. पंख्याखाली बैस. शर्ट बघ किती भिजलाय, घामाने. शॉवर घेऊन ये तोवर मी पियुष बनवते तुझ्या आवडीचं. श्रीखंड आहे डब्यात, ताकही आहे. लगेच करते.”
“अगं पण गुडघे दुखताहेत ना तुझे.”
“जळली मेली ती ढोपरं. त्यांचंही वय झालंय आता. कुरबुरायचेच. मी टॉवेल लावून ठेवते. जा तू.”
सचिन आंघोळीला गेला नं शुभाताईने पियुष बनवायला घेतलं. ताक वाडग्यात घेऊन तिने त्यात डब्यातलं केशर श्रीखंड घातलं, साखर घातली व रवीने घुसळू लागली. मिक्स होत आलं तसं वरती जायफळ किसून घातलं..थोडी वेलचीपूड घातली व सचिनच्या आवडीच्या काचेच्या ग्लासात ओतून ठेवलं. सचिनचं न्हातान्हाता नामस्मरण चाललं होतं. शुभाताईला, खेळावरुन मातीच्या पायांनी घरात आलेला सचिन आठवला..सोबत त्याला पाय घासून धुवायला लावणारे त्याचे नाना आठवले तसे तिने आपले पाणावलेले डोळे पदराच्या शेवाने पुसले.
सचिन बाहेर आला.
“आई डोकं पुसतेस जरा..”
शुभाताईने त्याला डोकं पुसून दिलं.
“आई, तुझे डोळे गं..रडलीस का!”
“काही नाही रे. हल्ली असंच हळवं होतं मन. काहीबाही जुनं आठवतं नि डोळ्यात ढग दाटतात. कितीही कठोर व्हायचं म्हंटलं तरी नाही रे जमत.”
“म्हणून तर सांगतोय तुला, नाना जाऊन वर्ष झालं तरी एकटी रहातेस. तू आमच्याकडे रहायला ये आता.”
”अरे हे घर..”
“हे घर विकायचं नाही आई. भाड्याने देऊ ना कुणा गरजूला.”
“तुझं सगळं खरं रे. मी विचार करुन सांगते. तू पियुष घे बरं प्यायला? कसा झालाय रे?”
“आई, तुझ्या हातची चव उतरलेय बघ यात. खरं सांगू..मला ठाऊक होतं, तू श्रीखंड जपून ठेवलं असणार माझ्यासाठी नं मी आल्यावर मला असं थंडगार पियुष करुन देणार.” सचिन आईचा हात कुरवाळत म्हणाला.
लेकाने केलेल्या स्तुतीने शुभाताईला अंमळ बरं वाटलं. पियुष पिणाऱ्या त्याला न्याहाळत म्हणाली , “वेडा आहेस अगदी..रागिणी बरी आहे ना रे?”
“बरी! अगं खूष आहेत बाईसाहेब. माझं प्रमोशन झालंय ना. पगार वाढलाय माझा..तिची कॉलर टाइट.”
रिकामा ग्लास स्वैंपाकघरात न्हेऊन ठेवत ती म्हणाली, “बरी आहे ना..मग झालं तर. दगदग होते का रे तुला कामाची? व्याप वाढला असेल ना.”
“होते थोडीफार. ऑफिसात दोघेतिघे जळकूही भरलेत पण त्यांना करतो मी हँडल.”
“आणि गुड्डी रे. आली नाही इकडे हल्ली. फोनसुद्धा नाही तिचा.”
“आई, अगं म्याडम चारपाच क्लासेसना जातात. झोपायला तेवढी घरी येते. तिची आई तिच्या करिअरबद्दल फार सजग आहे.”
“म्हणजे रे?”
“म्हणजे गुड्डी अभ्यास करताना नो टिव्ही, नो फोन कॉल्स, नो गप्पाटप्पा..तुला तर ठाऊकच आहे..म्हणून तर तुम्ही दोघं तिथे अवघडून जायचा नि दोनचार दिवसांवर रहायला मागत नव्हता. ते जाऊदे. आपण आता डॉक्टरांकडे जातोय. तू तयार हो बघू.”
“अरे पण.”
“पण नाही नं बिण नाही. अंगावर काढत राहिलीस नि कुठेतरी धडपडलीस म्हणजे..”
सचिन, आईला घेऊन डॉक्टरांकडे गेला. तपासणी वगैरै केल्यावर दोन्ही गुडघ्यांची रिप्लेसमेंट करावी लागेल असं डॉक्टर म्हणाले. गोळ्या लिहून दिल्या. सचिनने आईला घरी सोडलं व आपल्या घराकडे वळला.
रागिणी दारातच उभी होती.”काय रे किती उशीर!”
“आईकडे गेलो होतो.”
“अडलेलं का काही..”
“काही म्हणजे..”
“हेच ते. लहान बाळ आहेस का तू! आठवण आली की चालला आईकडे.”
“काय झालं गेलो तर. तू नाही का जात तुझ्या आईकडे!”
“सचिन, अरे सध्या परीक्षा सुरु आहे गुड्डीची.आपण दोघं घरात असणं महत्त्वाचं आहे तिच्यासाठी.”
“अगं पण आई तिकडे एकटी..”
“त्यांना इथे यायला अडवलय का मी?”
“हो पण तुझा मिलिटरी खाक्या ! टीव्ही नाही लावायचा, बोलायचं नाही, शेजाऱ्यांकडे जाऊन जास्त वेळ बसायचं नाही..वगैरै वगैरे.”
“तू तरी कशाला रहातोस माझ्या मिलिटरी जाचात. जा तुझ्या आईकडे.”
“आता जावंच लागणार आहे.”
“म्हणजे?”
“म्हणजे knee replacement करायची आहे आईची.”
”मी नाही म्हंटलं तर..”
“तू म्हणू शकतेस पण तुझं ऐकायचं की नाही ते माझ्या हातात आहे.”
“सचिन, तू उगाच भांडण वाढवतोयस. शांत डोक्याने विचार कर. त्या अजून किती वर्ष जगणार? गरज आहे का या वयात knee replacement ची ?आहेत तेच चालवा म्हणावं.”
रागिणीचा वरचा सूर लागला होता ज्याने गुड्डीला डिस्टर्ब होत होतं.
ती बाहेर येत म्हणाली,”मम्माड्याडा, काय चाललय तुमचं? हळू बोला की जरा.”
“अगं तुझ्या ड्याडाचं मात्रुप्रेम उतू चाललय. नी रिप्लेसमेंट करायचीय म्हणे आजीची.”
“मग करुदेत की.”
“अगं इकडे आणायचं म्हणतोय तिला.”
“नाही हं मुळीच नाही. आजीला मी पिझ्झा, बर्गर खाल्लेलं मुळीच आवडत नाही. उगा लेक्चर देत बसते.. शिवाय अभ्यासात व्यत्यय. कुठचं जुनंपुराणं काढून बरळत बसते..तेच तेच परत परत सांगत रहाते. शिवाय बाहेरचं कुणी आलं की अभ्यासात लक्ष लागत नाही माझं.”
यावर सचिन म्हणाला.”गुड्डी, आजी बाहेरची कशी गं! असो..तुझी परीक्षा संपली की आणू आपण आजीला. मग तर झालं. तुही आमच्यासोबत आजीची काळजी घेऊ शकशील.”
“No way. मी, छबुमावशी,आई नं चिल्लरपार्टी वेकेशन ट्रीपसाठी जाणार आहोत, केरलाला. तुही येणारैस ड्याडा आमच्यासोबत.”
“अच्छा. तुमचं सगळं आधीच ठरलय तर मी तुमच्या आनंदावर विरजण नाही घालणार. तुम्ही दोघी खुशाल जा पण मी माझ्या आईकडे जाणार. सुट्टीवर राहून तिचं ऑपरेशन करुन घेणार आणि हो खर्चही मीच लावणार.”
रागिणी नाक मुरडून आत निघून गेली.
गुड्डीची परीक्षा संपताच दोनेक दिवसांत त्या केरळला रवाना झाल्या. सचिनने निकडीची कामं लवकर संपवली व रजा टाकली. तो आईकडे जायला निघाला.
शुभाताईने सुनेचे रागरंग पाहून एकटं रहाणं स्वीकारलं होतं खरं पण आताशा हा एकटेपणा तिच्या अंगावर धावून येत होता.
तिला जागाबदल हवा होता. सूनेने कधी आई,.तुम्ही आमच्याकडे रहायला या असा आग्रह केला नव्हता. तरी शुभाताईला सगळे मानापमान सोडून लेकाकडे जायचं होतं.
या नी रिप्लेसमेंटच्या निमित्ताने तरी लेकाच्या घरी महिनादोनमहिने रहाता येईल. एकलकोंडेपणापासून काही काळापुरती का होईना सुटका होईल अशा विचाराने तिने जायची सगळी तयारी करुन ठेवली व ती सचिनच्या वाटेकडे डोळे लावून बसली.
दाराची बेल वाजताच शुभाताईने दार उघडलं. दारात सचिनला पहाताच तिचा चेहरा खुलला.
“सचिन, अरे शंभर वर्ष आयुष्य बघ तुला. तुझीच आठवण काढत होते आता. हातपाय धू नि जेवायला बैस. निघायचंय नं आपल्याला. गुड्डी वाटत बघत असेल, माझी. आणलं कि नाही तिला? आलं लक्षात. इतक्या वर्षांनी आजी येतेय रहायला म्हणून रुम आवरुन ठेवत असेल ना.
ए पण मी गुड्डीसोबतच निजेन हं. गेस्टरुममधे नकोच. लहानपणी गुड्डी इकडे आली की आम्हा दोघांच्या कुशीत निजायला हट्ट करायची लबाड. आता नाना नाहीत, मी एकटी पण मी अगदी कुशीत घेईन गुड्डीला. .आणि हो डब्बा राहिला बघ कट्ट्यावर. रागिणीला आवडतात म्हणून घारगे केलेत लाल भोपळ्याचे. बाजूच्या दिगूला सांगून आणून घेतला भोपळा, मंडईतनं.
कडवे वाल नि गावठी मुगही आणून घेतलेत नि थोडेसे हुलगेही. तुला हुलग्यांचं माडगं करुन घालेन. मुगाच्या पीठाचे लाडू वळेन. बरंच काही करुन घालावंसं वाटतय रे तुम्हाला. मी पण बघ कशी इथेच बोलत बसले. तू जा. फ्रेश हो नं जेवायला बैस. मी वाढते तोवर.”
“आई..आई तू जरा ऐकशील का माझं.”
शुभाताई केविलवाणा चेहरा करत म्हणाल्या, “काय ऐकायचय. टीव्हीचं ना नाही पहायची मी टीव्ही. या मोबाईलमधे बरेच व्हिडीओ आहेत रे. कानाला प्लग लावले की कुणाला आवाजही यायचा नाही. . आणि हो रात्रीचं दूध ही प्यायचं बंद केलय मी. त्यावरनं सूनबाई वैतागायची ना. बरोबरच आहे म्हणा तिचं. या वयात कशाला जीवास नसते शौक.
कमीतकमी खायचं नि इतरांना त्रास न देता आटोपशीर रहायचं ठरवलंय मी.
पुर्वीसारखं मासे,चिकनही आणावयास आग्रह करणार नाही.
मला फक्त तुमच्यात रहायचय रे. एवढीच अपेक्षा.
गेल्याच आठवड्यात समोरचे भानुशाली दोघंही घरात म्रुत अवस्थेत मिळाली रे. हे असं ऐकलं की मला एकटं रहायची भयंकर भिती वाटते रे बाळा. मला घेऊन जा सचिन तुझ्या घरी. शहाण्या बाळासारखी राहीन मी. वाटल्यास ती नी रिप्लेसमेंटही नका करुन घेऊ माझी.”
सचिन आईचे हे बोल ऐकून गहिवरला.”आई गं, कसं समजावू तुला. गुड्डी व रागिणी दोघी केरळ ट्रीपला गेल्याहेत. तिथे रिकाम्या घरात कसा घेऊन जाऊ तुला!आई पण ना तु चिंता करु नकोस. मी आहे ना मी रजा घेतलीय, तुझ्यासाठी..चांगली महिनाभराची. तुझं नी रिप्लेसमेंट करुन तु व्यवस्थित चालू लागेस्तोवर मी कुठे जायचा नाही.”
शुभाताई डोळ्याला पदर लावत म्हणाली,”सचिन अरे मला वाटतं ना नातीसोबत, सुनेसोबत रहावं. कधी एकदोन शब्दाने वेडंवाकडं बोललेही असेन रागिणीला. मी त्याबद्दल माफी मागते म्हणावं रागिणीची.
मला कुटुंबात रहायचय रे. हे होते तोवर ठीक होतं. आता एकटेपण नाही सहन होत बाळा मला. मला पिसं लागेल रे एकटीला. हळवं झालंय माझं मन फार. ऐकतोस ना सचिन..ऐकतोस ना.”
“आई,.तू बैस बघू इथे. पाणी पी जरा. हे बघ फोटो..गुड्डीचे, रागिणीचे.”
“किती रे मोठी झाली गुड्डी. अगदी मम्माज गर्ल दिसते आणि रागिणीचे केस पिकले का रे..मेंदीने रंगवलेत ते.” छान दिसताहेत मायलेकी. चल वाढते तुला.”
शुभाताई लेकाला घारगे वाढत होती. घारगे, वरणभात, वालाचं बिरडं, लिंबाचं लोणचं, सचिनचं पोट भरलं..तरी शुभाताई वाढतच होती. “आई, पुरे मला. पोट भरलं माझं.”
शुभाताई सगळं आवरुन लेकाजवळ बसली.
“आई गं गुडघ्यांना तेल लावून देऊ तुझ्या?”
“नको रे. तू ये. असा खाली बैस.”
सचिन तिच्या पायांत बसला.
“काही नाही रे. उलीसं लसणीचं तेल केलंय. मालीश करते तुझं डोकं.”
शुभाताईची तेलबोटं लेकाच्या केसातनं फिरु लागली तशी त्याला आईच्या पायांतच झोप लागली.
सकाळी कधी डोळे उघडले बघतो तर आई तशीच बसलेली.
“आई, तू इथेच अजून. उठून झोपायचं होतंस ना,” म्हणत तो पाठी फिरला. शुभाताईची मान कलंडली होती. सगळं रात्रीच कधी संपलं होतं. आई गं त्याने टाहो फोडला. शेजारपाजारची जमा झाली.
दुसऱ्या दिवशीपर्यंत रागिणी लेकीला घेऊन आली.
विमनस्क अवस्थेत बसलेल्या नवऱ्याच्या खांद्यावर तिने हातांची बोटं टेकली.
सचिन रुद्द कंठाने म्हणाला, “रागिणी, आई गेली बघ. आता तु कितीही दिवस ,कुठेही जा बिनधास्त..आणि हो पैसे वाचले तुझे. आईच्या नी रिप्लेसमेंटला खर्च येणार होता ना. सगळं गणितच सोप्पं करुन गेली ती.”
समाप्त
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============