जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे (sadetin shaktipeeth) आणि त्यांचा इतिहास

sadetin shaktipeeth : आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिरांना आणि धर्मस्थळांना खूपच महत्व आहे. आपल्या महाराष्ट्रात खूप मंदिरे आहेत आणि प्रत्येकाची काहीना काहीतरी आख्यायिका आहे. आपल्या हिंदू पुराणात त्यांचा उल्लेख कुठे ना कुठे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. नवरात्र हा आपल्याकडे प्रचंड उत्साहाने आणि नाचून साजरा करण्यात येतो. नऊ दिवसांचा हा महोत्सव अगदी नवचैतन्य निर्माण करणारा आणि उत्साहाने भारलेले असतो यात शंकाच नाही.
नवरात्र म्हटल की आठवते ती आपले श्रद्धास्थान असलेली देवी आणि तिची मंदिरे. आपल्याकडे एकूण १०८ देवीची शक्तीपीठे आहेत पण त्यातील महत्वाची आणि खास महत्त्व प्राप्त झालेले साडेतीन शक्तिपीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकमाता आणि नाशिकची वणीची सप्तशृंगी देवी. या तीर्थक्षेत्रना मोठा मान असून या शक्तीपीठ बद्दल अनेक अख्यायिका आहेत. ही सगळीच स्थळे जागृत मानली जातात. म्हणूनच तर अनेक भाविक लोक येथे मनोभावे भेट देतात. नवरात्रात या मंदिरात जरा जास्तच गर्दी असते.
शक्तीपीठ म्हणजे काय ??
आता जिथे जिथे शक्तिपीठे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी काहीतरी खूप महत्त्वाचे प्रसंग घडले आहेत असा हिंदू पुराणात उल्लेख सापडतो. त्यानंतर ते देवीचे स्थान म्हणून त्या ठिकाणी देवीची मंदिरे उभारण्यात आली. खरतर आपल्या हिंदू धर्माची प्रकृती आणि पुरुष अशी परमात्म्याची विभागणी आहे. आता प्रकृती आणि पुरुष म्हणजे काय ? तर निर्गुण निराकार शून्य स्वरूप म्हणजे पुरुष किंवा त्यालाच आपण शिव असे म्हणतो. तर सगुण साकार तत्व म्हणजे प्रकृती म्हणजेच शक्ती.
म्हणजेच निर्गुण निराकार परमात्मा आणि सगुण साकार तत्व म्हणजे शक्ती. आणि याच शक्तीच्या उपासनेचे मंदिर किंवा केंद्र म्हणजे शक्तीपीठ. आपल्या हिंदू धर्माच्या देवीचे स्थान म्हणजे शक्तीपीठ. याच मंदिरांचे अनन्य साधारण महत्व असल्यामुळे यांना आपण शक्तीपीठ असे म्हणतो. थोडक्यात काय तर जिथे देवीच्या शक्तीचा वास आहे ते केंद्र म्हणजेच शक्तीपीठ. भारत आणि भारताबाहेर अशी एकूण १०८ शक्तीपीठ आहेत. त्यातील मुख्य ५२ मानली जातात तर त्यातील सर्वश्रेष्ठ मानली जाणारी साडेतीन शक्तिपीठे ही आपल्या महाराष्ट्रात आहेत.
अर्धपीठ आणि पूर्णपीठ :
विश्वातील सर्व ध्वनीचे आणि अक्षराचे बीज म्हणजे प्रणव ध्वनी मनाला जातो. तो म्हणजेच ओम. याचे रूप हे अ, ऊ, म आणि उर्ध्व मात्र मिळून तयार झाला आहे. याच ध्वनीचे साकार स्वरूप म्हणून साडेतीन शक्तिपीठे ओळखली जातात.
यातील माहूरगडची रेणुका ही अकार मानली जाते, तुळजापूरची तुळजाभवानी उकार, कोल्हापूरची महालक्ष्मी मकार ही झाली तीन पूर्ण शक्ती पीठे तर वणीची सप्तश्रुंगी ही ओमकरातील उर्ध्व मात्रा म्हणून अर्धेपीठ म्हणून ओळखली जाते.
आणि या बीजाक्षराचे साकार स्वरूप म्हणजे आदीशक्तीची साडेतीन शक्तिपीठे.
गाभाऱ्याचे महत्व :
सर्वच मंदिरातील देवीचा गाभारा ही अतिशय पवित्र गोष्ट आहे. येथे फक्त पुजाऱ्यांना प्रवेश दिला जातो. देवीला कडक सोवळे म्हणजेच खूप स्वच्छ्ता लागते. अनेक भाविक तेथे दर्शनासाठी येत असतात त्यात अनेक महिला भाविक असतात.पण सोवळे कडक असल्यामुळे पूजाऱ्या शिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. कडक सोवळ्यात पूजा केली जाते. गाभाऱ्याच्या पावित्र्य राखण्यासाठी पुजारी सुद्धा कोणाकडून स्पर्श करून घेत नाहीत.
१. कोल्हापूरची महालक्ष्मी :

कोल्हापूर नगरीतील महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तीपीठपैकी एक आहे तर महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक आहे आणि यांचा उल्लेख पुराणात आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तीपीठ, दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे तुळजापूरची तुळजाभवानी आणि सप्तशृंगीची देवी हे अर्धपिठ मानले जाते. पुराण कथेनुसार शक्तिपीठात देवीची शक्ती जनकल्याण करण्यासाठी भक्तजनांच परी पालन करण्यासाठी सदैव उपस्थित असते. आपल्याकडे अशी सहा शक्तिपीठे उपस्थित आहेत आणि कोल्हापूर हे त्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ आहे.
आख्यायिका :
कोल्हापूर हे तीर्थस्थान मातृकक्षेत्र म्हणजे करवीर मातृपुजेचे आद्यक्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराची स्थापना चालुक्य राजवटीतील राजा कर्णदेव यांनी सातव्या शतकात केली आणि त्यांनीच हे मंदिर बांधले आहे अशी आख्यायिका आहे. म्हणूनच देवीला करवीर निवासिनी म्हटले जाते. कोल्हापूर निवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी जगदंबा यांच्या मंदिरामुळे कोल्हापूरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मंदिराचे उल्लेख पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत या प्राचीन ग्रंथात आढळतो. ऐतिहासिक शिलालेख,ताम्रपट अशा पुरणांवरून मंदिराच्या नोंदी नवव्या शतकपासून सापडतात.
मूर्तीची वैशिष्ट्ये :
महालक्ष्मी मंदिरातील देवीची मूर्ती काळ्या दगडावर कोरलेली असून चार हात इतकी उंच म्हणजेच तीन फुटांची असून चौकोनी आहे. देवीच्या डोक्यावर भरगच्च दागिन्यांनी मधवलेल ४० किलो ग्रॅम वजनाचे मुकुट आहे. मंदिराच्या एका भिंतीत दगडावर देवी अंबाबाईचे चित्र कोरलेले आहे. देवीच्या मूर्ती मागे देवीचे वाहन सिंह याची प्रतिमा आहे. या शिवाय विष्णूच्या शेषनागची साडेतीन वेटोळाची प्रतिमा देवीच्या मुकुटात आहे. नागाचा फणा समोरील बाजूस असून फण्याच्या मागे लिंग व योनी ही तत्व व पुरुष यांची प्रतीके आहेत. देवीच्या चार हातात वेगवेगळी आयुधे धारण केलेली आहेत. डावीकडील खालच्या हातात गदा आणि ढाल, तर उजवीकडील खालच्या हातात पान पत्र आहे. हिंदूंच्या इतर मंदिरांमध्ये देवी पूर्व व उत्तर मुखी असते पण या मंदिरात पश्चिमेस मुख धारण केले आहे.
हे मंदिर तरकाकृती असून मुख्य मंदिर महाकाली, महासरस्वती, गणेश मंडप आणि शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम केले आहे. मंदिराच्या गर्भगृहात दगडी चबुतरवर दहा खांब असणाऱ्या मेघदंबरित करवीर निवासिनी अर्थात जगदंबेची मूर्ती आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी वसलेले तीन गर्भगृह असलेले पश्चिम मुखी मंदिर हेमाडपंथी आहे. या मंदिरात चारही बाजूने प्रवेश करता येतो आणि महाद्वारातून प्रवेश केल्यावर देवीचे दर्शन होते. मंदिरा बाहेर जे स्तंभ आहेत त्यावरील नक्षीकाम मन प्रसन्न केल्यावाचून रहात नाहीत. या मंदिरा बाहेर शिलालेख आहेत. असे म्हणतात की मंदिरात स्थापित महादेवाची प्रार्थना सुमारे सात हजार वर्षे जुनी आहे. आदिशक्ती देवीच्या साडेतीनशे पिठं मधील हे एक पूर्ण पीठ आहे.
२. तुळजापूरची तुळजाभवानी :

उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तुळजापूरच्या तुळजाभवानीचे प्राचीन मंदिर हे एक तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर पूर्ण व आद्यापिठ आहे. बऱ्याच हिंदू पुराणात देवीची महती पाहायला मिळते. माता तुळजाभवानी ही स्वराज्य स्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या घराण्याची कुलदेवता आहे. देवीने स्वतः महाराजांस दृष्टांत देऊन महाराष्ट्र वरील दुष्टचक्रचे निवारण करण्यासाठी भवानी नावाची तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे.
या मंदिराचे निर्माण महामंडलेश्वर माराडदेव कदंब ( कदम ) यांनी केला असून जीर्णोद्धार अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला. याचे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर, महाराष्ट्र येथे आहे.
अवताराचे कारण :
जेंव्हा जेंव्हा असुरानी देवतांना त्रास देऊन जेरीस आणले होते, त्या त्या वेळी सगळ्या देव देवतांनी मिळून देवीचा धावा केला, प्रार्थना करून प्रकट होण्यास विनंती केली. त्या प्रत्येक वेळी असुरांचा,दैत्यांचा संहार करून जगात निती आणि धर्मचरण यांची परत स्थापना व्हावी यासाठी देवीने अवतार धारण केला आहे. हे काम प्रत्येक युगात देवी करत आली आहे म्हणूनच आजही असंख्य भाविक श्रद्धा पूर्वक तिच्या चरणी नतमस्तक होतात.
मंदिराची रचना :
या मंदिरात जाण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत.
१. राजे शिवाजी महाद्वार.
२. राजमाता जिजाऊ महाद्वार
या देवीचा उजवा पाय महिषासुर रक्षसावर तर डावा पाय जमिनीवर आहे. दोन्ही पायांच्या मध्ये या राक्षसाचे मस्तक आहे. देवीच्या आठही हातात अनेक देवतांनी महिषा सुराला मारण्यासाठी दिलेली शस्त्रे आहेत. यात त्रिशूळ, बीचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पान पात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत.
मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेश द्वारल परमार दरवाजा असे म्हणतात. कारण जगदेव परमार नावाच्या एका महान भक्ताने या दरवाजावर सात वेळा देवीच्या चरणी प्रार्थना केलेले आज्ञापत्र आहे. हे मंदिर बालाघाट मधील डोंगरमाथ्यावर असल्यामुळे खूप जवळ गेल्यावरही या मंदिराचे कळस दिसत नाही. काही भागाची बांधणी हेमाडपंथी आहे. या देवीची मूर्ती चल आहे. इतर ठिकाणी नवरात्र उत्सव हा नऊ दिवसांचा असतो पण तुळजापूरला हा उत्सव २१ दिवस चालतो.
छाबिना : हे तुळजापूरच्या देवीचे एक खास वैशिष्ट्य आहे. दर मंगळवारी आणि पोर्णिमेच्या एक दिवस आधी आणि एक दिवस नंतर देवीची मूर्ती गाभाऱ्यात तून हलवून श्री देवीच्या असलेल्या अनेक वाहणांपैकी एका वाहनावर चांदीची मूर्ती आणि पादुका चांडीच्याच मेघडांबरीत ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. यालाच छबिना असे म्हटले जाते.
हे नक्की वाचा
हम गया नाही, हम जिंदा है – श्री स्वामी समर्थ आख्यायिका
जाणून घ्या सप्तशृंगी मातेच्या मुखात पानाचा विडा का ठेवला जातो
३. माहूरची रेणुकादेवी :

माहूरची रेणुकामाता ही अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले. याच ठिकाणी दत्तात्रेय प्रभूचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. साडेतीन शक्तिपीठे पैकी मूळ जागृत पीठ म्हणून हे ओळखले जाते. रेणुका मातेला श्री परशुरामाची आई म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यामुळेच रेणुकामाता सोबतच श्री दत्तात्रेय आणि श्री परशुराम यांचीही प्राचीन मंदिरे इथे बघायला मिळतात.
आख्यायिका :
माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. राजाने तिचे नाव रेणू असे ठेवले. पुढे रेणुचे भगवान शंकराचा अवतार असलेल्या जमदग्नी ऋषी सोबत लग्न झाले. त्यांच्याकडे अनेक धिष्या शिकत असत. त्यांच्या आश्रमात सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारी कामधेनू गाय होती. तिथे येत असलेल्या सहस्त्रार्जुनाला कामधेनूचा मोह झाला. तशी कामधेनू त्याने ऋषी जमदग्नीकडे मागितली पण त्यांनी सरळ नकार दिला. सहस्त्रार्जुनल राग आला आणि आश्रमात त्यांचा पराक्रमी मुलगा श्री परशुराम तसेच माता रेणुकादेवी नाहीत अशा वेळी जमदग्नी ऋषी एकटेच असताना त्यांच्यावर हल्ला केला आणि ऋषींना मारून टाकून कामधेनू पळवून नेली.
जेंव्हा परशुराम तिथे आले आणि सगळे काही पाहिले तेंव्हा घडला प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली. पण त्या आधी आपल्या मृत पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी जमीन पाहण्यासाठी ते रानोमाळ भटकत माहूरगडवर आले. यासाठी त्यांनी कावडीच्या एका पारड्यात जमदग्नीचे पार्थिव तर दुसऱ्या पारड्यात माता रेणुकादेवी यांना उचलून घेतले होते.
पुढे माहूर गडावर रहात असलेल्या श्री दत्तात्रेय यांनी परशुराम यांना कोरी भूमी दाखवली आणि इथेच अंत्यसंस्कार कर असे सांगितले. मग श्री परशुरामांनी बाण मारून मातृतीर्थ आणि सर्वतीर्थ निर्माण केले. याच पाण्याने स्नान घालून ऋषिंवर अंत्यसंस्कार केले, या वेळी सर्व अंत्यविधी दत्तात्रेय यांनी केले तर माता रेणुकादेवी सती गेल्या.
आपले आई वडील असे अचानक गेल्याने पराक्रमी परशुराम खूप दुःखी झाले होते. त्यांना रेणुका मातेची खूप आठवण येत होती. त्यामुळे दुःखी होऊन शोक करत असतानाच आकाशवाणी झाली, ती अशी की तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल पण तू मागे वळून पाहू नकोस. पण परशुरामांनी ते पाळले नाही. त्यांची आईला पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि त्यांनी मागे वळून पाहिले, त्यावेळी रेणुका मातेचे फक्त मुख जमिनीतून वर आले होते तेवढेच परशुरामांनी दिसले. पुढे याच तांदळा रुपतल्या मुखाची पूजा माहूरल सुरू झाली. या डोंगरावर परशुरामांनी आपल्या आईचे मुखदर्शन झाले म्हणून याला मातापुर म्हणू लागले , त्याच्या शेजारील भागात ऊर म्हणजे माऊर आणि पुढे याचेच माहूर झाले.
माहूर स्थान :
माहूर मधील रेणुका मातेचे मंदीर नांदेड जिल्ह्यात किनावत तालुक्यात आहे. हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले आहे. ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करणे सोपे व्हावे म्हणून तसेच एक नमुना म्हणून भगवान विष्णूंनी सृष्टीच्या अगोदर सात कोस लांब आणि सात कोस रुंद अशा मोठ्या प्रमाणात हा गड निर्माण केला.
मंदिराची रचना :
या मंदिराला चार दरवाजे असून दरवाजे आहेत तिथे एक स्थान आहे.
१. पूर्वेकडे हतकेश्र्वर असून बंजरा नदीचा धबधबा आहे.
२. दक्षिणेला पैनगंगेच्या काठी फुल सावंगी गावाजवळ एका टेकडी जवळ विमले श्वरा चे स्थान आहे.
३. पश्चिमेला इजनी गावाजवळच्या पहाडात दर्दरेश्र्वर आहे.
४. उत्तरेकडे सिध्देश्वर आणि कपेश्र्वर स्थान आहेत.
या क्षेत्राच्या तीनही बाजूस पैनगंगा नदी वहाते. नदी ओलांडून गेल्यावर दोन चार मैलांवर पहाडच्या पायथ्याशी माहूर क्षेत्र आहे. येथे रेणुका माता, दत्तात्रेय आणि अनुसुया या तीन वेगवेगळ्या डोंगरावर असलेल्या मंदिरांना जोडणारा महुरचा डोंगर किल्ला आहे. महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू, सहा मैलांचा परिसर व्यापणारी तटबंदी, हत्ती दरवाजा, किल्ल्यावरचे तळे ( ब्रह्मकुंड ), कारंजी, हौद यांचे अवशेष असलेला चिनी महाल आपल्या कडे असलेल्या वैभवाची साक्ष देतो.
मंदिराचे प्रवेशद्वार हे चांदीच्या पत्र्याने माढवले आहे. सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेचा मान असणाऱ्या महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरात ५ फूट उंच व ४ फूट रुंद तांदळा म्हणजेच देवीचे मुख आहे. बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे. येथे देवीला खलबत्त्यात पान कुटून नैवेद्य दाखवतात. किल्लेदार जयसिंग ठाकूर यांनी हा सभामंडप बांधला आहे.
४. नाशिकची वणीची सप्तशृंगी :

ही देवी नाशिक पासून ६५ किमी अंतरावर ४८०० फूट उंचीवरील सप्तशृंग गडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगावरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगी गड. एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे छाती दडपून टाकणारे कडे आणि त्यात फुललेली नाजूक हिरवाई. असा निसर्ग घेऊन उभी असलेली देवी महाराष्ट्रातील अर्धेपीठ म्हणून ओळखले जाते. इथे असलेल्या सुंदर निसर्गाशी जणू नातेच सांगत आहे असे वाटते. आपल्या महाराष्ट्रातील हे एकमेव अर्धपीठ आहे. कारण याशिवाय अर्धपीठ असल्याचा कुठेही उल्लेख नाही. या देवीचे महात्म्य खूप मोठे आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.
आख्यायिका :
नाशिकच्या तपोवनात राम, लक्ष्मण आणि सीता वनवास साठी आलेले असताना ते या गडावर येऊन गेल्याची अख्यायिका आहे. जेंव्हा महिषासुर देवतांना त्रास देत होता तेंव्हा त्याच्या नाशासाठी देवा दिकानी देवीची याचना केली आणि होमा द्वारे ही देवी प्रकट झाली. हिचे प्रकट रूपच सप्तश्रुंगीचे होते. म्हणूनच या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असे म्हणतात. कारण ब्रह्मदेवच्या कमंडलू पासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रुप म्हणजे सप्तश्रुंगी देवी. तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तश्रूंगी देवी.
मूर्ती आख्यायिका :
या देवीच्या मूर्तीची अख्यायिका आपल्याला हिंदू पुराणात पाहायला मिळते. ती अशी की, एका धनगराला झाडाला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्या धनगराने त्यात काठी खुपसली तेंव्हा काठीला शेंदूर लागला. पोळे काढल्यानंतर तिथे देवीची मूर्ती सापडली. अशी दंतकथा आहे.
मूर्तीची वैशिष्ट्ये :
डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरापात आठ फूट उंच देवीची मूर्ती आहे. या देवीला अठरा हात आहेत. मूर्ती शेंदूर अर्चित असून, लाल रंगाची आहे. डोळे टपोरे आणि तेजस्वी आहेत. सगळे हात एकमेकांना लागून आहेत. या हातात सर्व देवांनी महिशा सूराशी काढण्यासाठी देवीला दिलेली शस्त्रे आहेत.
तर अशा या साडेतीन शक्तिपीठांची रंजक माहिती ऐकून दर्शन घेण्याची इच्छा झाल्यावाचून राहणार नाही. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत जाऊन दर्शन घेऊनच या. देवी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो.
==============