Skip to content Skip to sidebar Skip to footer

साद

चंद्राबायला लग्न झाल्यापासनं पंधरा वर्षतरी पोरटोर झालं नव्हतं. गंडेदोरे, नवससायास, वैद्य, डॉक्टर, हकीम सारं काही करून लग्नानंतर सोळाव्या वर्षी तिला मुलगा झाला. झाला तेंव्हा अगदी किड्यावानी होता. अगदीच कमी वजनाचा. जातोय का र्हातोय असा पण चंद्राबायनं नं तिच्या दादल्यानं पोराला जगवण्याचा विडाच जणू उचलला. मुलाचं नाव खंबीर ठेवलं. खंबीर हे काय नाव झालं म्हणून गावातली डोकी त्या जोडप्याला हसायची पण त्यांना त्यांचा पोरगा अगदी खंबीर झालेला बघायचा होता.

चंद्रीबाय खंबीरला दूधपोळी खाऊ घाली. खास खंबीरसाठी त्यांनी शेळी पाळली होती. शेळीच्या दुधाने खंबीर अंग धरू लागला. अगदी गुबगुबीत दिसू दिसला, पाटलाच्या लेकावानी. ं..संक्ष।फ़क्षहैँ
त्रठ
आयाबाया खंबीरकडे बघून तोंडात बोटं घालायच्या. काय बाय भरवतीस तरी काय पोराला विचारायच्या. चंद्री म्हणायची,”पायाबुडी बघा तुमच्या.” तिन्हीसांजेला खंबीरला चुलीसमोर उभा करून त्याच्यावरून मीठ,मोहरी, सुकी मिरची,तुरटी..ओवाळून म्हणायची आल्यागेल्याची भायरल्याभुतुरल्याची, वाटेच्या वाटसरूची काय पिडा आसली तर जावंदेत. मग तो ऐवज चुलीत टाकून खंबीरच्या पापण्यांना पाणी लावायची.

चंद्रीने खंबीरसाठी रंगीत कापडांच्या कुंच्या शिवून घेतल्या होत्या. त्या झुलींच्या कुंचीत पावडरटिका ल्यालेला चंद्रीचा बाळ आभाळातल्या चांदव्यावानी दिसे.

दिवस, महिने, वर्ष सरत गेली. आईबापाच्या छत्रछायेखाली खंबीर मोठा झाला. खरंतर त्याला चंद्रीला नि बालाही आईबापू म्हणायला लाज वाटे कारण इतर मुलांचे आईवडील चंद्री नि बापेक्षा कितीतरी तरूण दिसायचे. तो चंद्रीला शाळेतही येऊ देत नसे.

थोडक्यात त्याला म्हाताऱ्या आईवडलांची लाज वाटायची. त्याला कारणही होतं. एकदा बाजारात खंबीर त्याच्या बाच्या खांद्यावरनं फिरत होता. सोबत चंद्रीही होती. शाळेतल्या एका मुलाने खंबीरला पाहिलं पण खंबीरने मान फिरवली. दुसऱ्या दिवशी त्या मुलाने खंबीरला गाठून विचारलच. काल तुझ्या आज्याच्या खांद्यावर व्हतास नं तू. मंग वळख का न्हाई दावलीस?

खंबीरच्या घराशेजारी रहाणारा बबन्या खदाखदा हसू लागला. इतका हसला,.इतका हसला की त्याच्या डोईवरली टोपी खाली पडली नि करगोट्याला अडकवलेली पाटलण खाली सांडू लागली तशी आजुबाजूची पोरंबी हसू लागली. पाटलण दोन्ही हातांनी वर करत करगोट्यात अडकवीत तो म्हणाला,”आजा न्हवं त्यो तेचा. बाच हाये केसपिक्या.हे ऐकून पोरं परत फिदीफिदी हसली.”तेंव्हापासनं त्याला जन्मदात्यांची लाजच वाटायची जणू. खंबीरनं ठरवलं होतं..’एसएससी झालं की शेराकडं जाऊन शिकाचं. इथं परत अवसेपुनवेला कवातरी पाय लावायचं. गावाकडं हाय तरी काय माळरान,दगडधोंडं, डोंगार, नि झाडी.’

पुढच्या शिक्षणाला खंबीर शहरात गेला खरा पण इकडे चंद्रीचा नि तिच्या दादल्याचा जीव नुसता वरखाली व्हायचा. महिनाभर तर त्यांना भाकरी गोड लागलीच नाही. खंबीरच्या आठवणीने पुढ्यातल्या ताटात टिपं गळू लागायची. दोघं म्हाताराम्हातारी एकामेकाला धीर द्यायची.

खंबीरकडे जाऊन एकडाव त्याला बघून येतील तर त्या सायबाने काही पत्ताबित्ता दिला नव्हता त्यांना. चंद्रीच्या गळ्यातली चेन मोडून पैसे मात्र खर्चाला घेऊन गेला होता. अधनंमधनं सहा महिन्यातनं एखादी फेरी मारायचा, तोच चंद्रीला दिवाळीदसरा वाटायचा. माझा लेक शिकतोया..दुसऱ्या वर्षाला, तिसऱ्या वर्षाला,फायनलला गेला असं ती अभिमानाने शेजारपाजारणींना हातवारे करत सांगायची.

खंबीरला नोकरीही चांगली मिळाली, सचिवालयात. चंद्रीने त्याच्यासाठी मुली बघायला सुरूवात केली. “नणंदेचीच पोरगी सून करून घेऊ, डोळ्याम्होरं वाढलेली पोर हाय शिवाय तिच्या मनात नात्यामुळं पिरेमाचा झरा आसिलच. आपल्यालाबी हवं नको ते बघील ती.”चंद्री दादल्याला बोबली.

तिचा दादला पडत्या फळाची आज्ञा मानीत बहिणीकडे गेला. बहिणीने भावाला पुरणपोळीचं जेवण करून घातलं. गोडाधोडाचं खाऊन तो सोप्याला टेकला नि बहिणीच्या लेकीसंबंधी बोलू लागला. बहिणीची लेक बकुळा तिथेच खांबाला टेकून उभी होती. ती लाजून आत पळाली.

बहीण म्हणाली,”दादा, दूधात साखर मिसळावी तशी माझी बकुळा तुझ्या घरात मिसळून जाईल बघ. तिलाबी लय आवड हाय शेराकडची. खंबीरसंग लगीन झालं तर तिच्याबी मनातली इच्छा पुरी व्हईल. तुमाले काय कमी पडू देनार न्हाय ती, दुधावरल्या सायीवानी जपल तुमाला.”

बहिणीचं हे बोलणं ऐकून गडी खूष झाला. बहिणीच्या नवऱ्यानेच मग खंबीरचा पत्ता मिळवला नि त्याला जाऊन भेटला. खंबीरला बकुळ आवडतच होती. लग्नाचे कपडे वगैरे घेणं झालं पण खंबीरने आईबापाला बोलवलं नाही.

सोनंखरेदीसाठी मात्र गावी आला. तेवढ्यापुरता गोड बोलला. आईच्या पाटल्या आईने काढून त्याच्या हातात ठेवल्या..मी आता हे घालून कुठं जानार हाय मिरवायला. माझं ते सुनेचच म्हणाली. खंबीरने ते सोनाराकडे देऊन त्याबदल्यात बायकोसाठी मणीमंगळसूत्र केलं.

लग्न रीतीप्रमाणे मुलीच्या घरी लागलं. साताठ दिवस राहून नवीन जोडपं शहरातल्या घरी निघून गेलं. सोबत म्हणून नि शिकायला म्हणून बकुळाचा लहानगा भाऊही त्यांच्यासोबत गेला.

झालं..पुन्हा घरट्यात बकुळा नि म्हातारा दोन्ही एकटीच. ‘सणासुदीला खंबीर बायकोला घेऊन ईल. सुनेशी चार शबुद बोलाय मिळतील, काय दुखतयखुपतय ते सांगाय मिळल, काय खाऊसं वाटलं तर करून घालं बाय म्हून आग्रेव करता इल’ अशा आशेने दोघंबी त्यांच्या वाटेकडे डोळे लावून रहात. तरी बाजुची सगुणा म्हातारी सांगी,”गाव सोडून गेलली अशी सहजासहजी मागे बघित नैत. नका उगा आशा करू. जोडीन हात. जोडीन रावा. खूश रावा. खाऊनपिऊन रावा.”

आताशा म्हाताऱ्याला रानातली कामं जमत नव्हती. एकदा दुपारचा रानात भोवळ येऊन पडला. बघ्यांनी कालवा केला. डाक्टरांना आणलं. सरकारी हास्पितलात दहा दिवस होता. एक बाजूच कशी लुळी पडली. खंबीर येऊन बघून गेला. ‘आई तू आता कसं काय करणार, माझ्याकडे चला..’चंद्रीला वाटलं बोलावं त्याने पण त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर पडला नाही की आईच्या हातावर एक रुपया ठेवला नाही. सासूसासऱ्याला घेऊन आला होता. त्यांच्यासोबतच निघून गेला. चंद्री मनात म्हणाली,’आपलंच नाणं खोटं तर लोकांना तर काय म्हून दोष देयाचा.’

चंद्री दादल्याची डोळ्यात तेल घालून सेवा करीत होती पण म्हाताऱ्याला परसाकडला जाता येईना झालं नं म्हाताऱ्यान अन्नपाणी टाकलं. अंथरूणातसून दिसेना झाला.. ऊसाचं चिपाड जसं. त्याला तसं पाहून चंद्रीचं काळीज हळहळे.

एकेकाळचा रुबाबदार ,तालमीतला गडी त्याची ही दशा! कुठे गेलं ते रुप, कुठे गेला तो बाणा. चंद्री आपल्याच कर्माला दोष द्यायची आणि एके रात्री म्हाताऱ्याची शुद्ध हरपली. सकाळपर्यंत खेळ खलास. आजुबाजूच्यांनी चंद्रीच्या नातेवाईकांना बोलावून घेतलं.

खंबीर आला पण बायको गरोदर म्हणून एकटाच आला. सगळं काय ते शांत शांत झालं. चंद्रीच्या कपाळीचं रुपयाएवढं कुंकु नाहीसं झालं. तरी चंद्री दु:ख आवरून लेकाला करून घालत होती.

एकदा लेकाने पेपरांवर चंद्रीचा अंगठा घेतला. आई आता एकटी कशी रहाणार तू इथं. चल माझ्यासंग म्हणत रान, घर विकलं. चंद्रीला घेऊन शहरात आला. मिळालेल्या पैशात भर घालून आता त्याने चार खोल्यांचा ब्लॉक घेतला. चंद्रीला एका खोलीत ठेवू लागला. त्याचे सासूसासरे, मेहुणाही येऊन रहात होते. घरात एवढा प्रसंग घडला पण इकडे पार्टीबिर्टी चालू होतं. बकुळाला मैत्रिणी मिळाल्या होत्या..त्यांच्या पार्टी वेगळ्या.

चंद्रीला हॉलमधे येण्याची परवानगी नव्हती कारण तिला आई म्हणून संबोधायची खंबीरला लाज वाटे, लाज वाटे चंद्रीच्या सुरकुतल्या कातडीची, पिक्या केसांची. सासूला मात्र तो आई आई म्हणे, मित्रांशी ओळख करून देई. त्याच्यापरीस कितीतरी पावसाळे जास्त बघितलेल्या चंद्रीला सगळं काय ते कळत होतं. तिच्या डोळ्याच्या पापण्या ओलावत होत्या, सोडून गेलेल्या सख्याची याद काढत ती बसून रहायची.

चंद्रीची सून बाळंत झाली. गुटगुटीतशी नात झाली पण चंद्री हात लावू गेली तर सुनेची आई सांगे,”विहिनबाई, मी हाय नव्हं. मी करते बाळीचं. तुमी ती वायच भांडी पडलेत. तेंचेवर हात मारून येवा जा.” फरशी पुसणं, भांडी घासणं, कपडे धुणं ..चंद्रीच्या वाट्याला आलं होतं. तिची गत मोलकरणीसारखी झाली होती . त्यातल्या त्यात सुख म्हणजे बाळीची दुपटी धुवायला मिळायची.मोरीत बसून चंद्री मग त्या दुपट्यांचा वास घ्यायची. त्यांचे मुके घ्यायची.

नात रांगू लागली, दोन पावलांवर चालू लागली, दुडूदुडू धावू लागली. चंद्री हे सूख लांबून का होईना पहात होती. नात मात्र आपसूक चंद्रीआज्जीजवळ जाऊ लागली. आईने कितीही ओरडलं तरी तिला चंद्रीच्या हातून ममं खायचा असायचा. चंद्रीसोबत खाली बागेत जायचं असायचं.

अशी चंद्री आता नातीच्या धर्माने बाहेर जाऊ लागली, देवळात जाऊन बसू लागली. किर्तनात मन रमवू लागली. भजनीमंडळासोबत भजन करू लागली. तिलाही चार पैसे मिळू लागले ते मात्र लेकाला न दाखवता कनवटीला ठेवू लागली.

देवळात रहाण्यासाठी कुणीतरी हवं होतं. ट्रस्टी शोधात होते. चंद्री पुढे झाली. मी राहीन, दिवाबत्ती करत जाईन म्हणाली. चंद्रीनं आपलं लेकाकडचं गाठोडं उचललं नि देवाच्या दारात आली. देवाची सेवा करू लागली. लेकाने एका शब्दानेही का जातेस  म्हणून विचारलं नाही पण त्याची खंत वाटून घेण्यापल्याड चंद्री आता गेली होती.

डोळे आता पैलतीराकडे लागले होते. त्या काठावरनं तिचा दादला तिला साद घालत होता आणि ती म्हणत होती,”आले ओ. वायच या देवाची सेवा करीते. त्यानं सोडलं की मंग विगी विगी येते. तवर वायच दम धरा.”

समाप्त

©️®️ गीता गरुड.

==========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

1 Comment

  • Pramod Narayan Shirasekar
    Posted Sep 6, 2022 at 3:57 pm

    किती सरळ सध्या पणे कथा मांडली आहे ती पण कुठेही फिल्मी न होऊ देता.
    धन्यवाद लेखिका गीता गरुड यांचे

    Reply

Leave a Comment

error: