ऋषिपंचमी व्रत विधी आणि कथा

१. ऋषिपंचमी बद्दल माहिती
rishi panchami katha in marathi: माणूस मात्र भूलना पात्र अशी म्हण प्रचलित आहे आपल्याकडे. याचा अर्थ असा की माणूस म्हणलं की त्याच्या हातून चुका या होणारच. आपल्याकडून रोजच्या जगण्यात कळत नकळत अनेक चुका होतात. कधी कधी त्या चुका पाप ठरतात. मग अशा वेळी त्यांचे पाप प्रक्षालन कसे करावे म्हणजेच झालेल्या पापातून मुक्तता कशी मिळवावी हे कळत नाही. त्याचे ओझे मनावर तसेच रहाते.
खूप प्राचीनकाळी जेंव्हा सृष्टी निर्माण झाली तेंव्हा ही आपण चुकत होतोच आणि आजही आपण चुकत आहोतच. पण त्यावेळी आपल्याला म्हणजे मानावांना मानव बनवले, मानवावर उत्तम संस्कार केले,जीवनाचा सन्मार्ग दाखवला असेल तर ते म्हणजे अखंड तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त करणारे ऋषी मुनींनी. त्या काळात ऋषींनी जगण्याला उपयोगी पडतील आणि आयुष्य सार्थकी लागतील असे सिद्धांत दिले, चिंतन मनन करायला शिकवले.
त्यांनी दिलेल्या ज्ञानाची आठवण करण्यासाठी आणि चुकून घडलेल्या पापातून मुक्तता मिळवण्यासाठी आपण भाद्रपद शुद्घ पंचमीला जे व्रत करतो त्याचे नाव आहे ऋषी पंचमी. खरतर भाद्रपद महिना म्हटलं की आठवते ती हरितालिका आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी होणारे गणपती आगमन. या नंतर पंचमी दिवशी ऋषी पंचमी येते.
आता पाप म्हणजे नक्की कोणते पाप ?? आपण एखाद्याला चुकून नको नको ते बोलून दुखावतो, कधी एखाद्यावर अन्याय करतो, कधी एखाद्याची चूक नसताना उगाच त्याच्यावर राग काढतो, कधी खोट बोलतो. अशा प्रकारे कुठेना कुठे तरी चूक करतो. पण ऋषी पंचमी यापैकी कोणत्याही चुकीसाठी पाप मुक्तता करत नाही. तर स्पर्शास्पर्श म्हणजेच मासिक पाळीत होणारा स्पर्श दोष नाहीसा करण्यासाठी आपण ऋषी पंचमी हे व्रत करतो. तसेच आपल्या भारतीय इतिहासात घडून गेलेल्या दिग्गज ऋषिंविषयी कृतज्ञता म्हणून आपण हा दिवस किंवा हे व्रत करतो.
२. ऋषिपंचमी पूजा मंत्र
कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:।
गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।
३. ऋषीपंचमीची पूजा कशी करावी
कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक सुपारी आणि ऋषी वशिष्ठ यांच्या पत्नी अरुंधती यांची एक सुपारी अशा आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते.
एका पाटावर किंवा चौरंगावर मूठ -मूठ तांदळाच्या आठ राशी ठेवतात. त्या राशीवर उजवीकडून डावीकडे सप्तर्षीची प्रतीके म्हणून एक-एक सुपारी ठेवतात. वसिष्ठांच्या शेजारी म्हणजे आठव्या सुपारीवर अरुंधतीचे प्रतीक म्हणून पाण्याने भरलेला कलश चौरंगावर ठेवून त्यात गंध, फूल, अक्षता व सुपारी घालतात. कलशाला पांढरे वस्त्र गुंडाळतात. मग अरुंधतीसहित कश्यपादी ऋषींची षोडशोपचारे पूजा करतात.
४. ऋषीपंचमीची कथा
युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले, “हे श्रीकृष्णा! सर्व पातकांचा, जाणते अजाणतेपणी स्त्री-पुरुषाच्या हातून घडणाऱ्या दोषांचा नाश करणारे असे एखादे श्रेष्ठ व्रत आहे का? असेल तर ते मला सांगावे.” श्रीकष्ण म्हणाला, घरात स्त्रीकडून शिवाशिव झाली तर तो दोष ब्रह्महत्येसमान ठरतो व त्याचे फळ त्या स्त्रीला व तिच्या पतीलाही केवळ याच जन्मी नव्हे तर पुढील जन्मातही भोगावे लागते. म्हणून दरवर्षी भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवशी ऋषिपंचमीचे व्रत करावे. म्हणजे सर्व पापदोषांचा नाश होतो.
यासंबंधी एक प्राचीन कथा आहे. ती मी तुला सांगतो ती ऐक. “पर्वी विदर्भ देशात सुमित्र नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव होते जयश्री. एकदा त्या ब्राह्मणाच्या पत्नीला शिवायचे नव्हते परंतु तिने तशाच स्थितीत श्राद्धाचे अन्न तयार केले. सगळीकडे शिवाशिव केली. तिच्या हातून हा मोठाच दोष घडला. काही काळानंतर त्या सुमित्र ब्राह्मणाला व जयश्रीला मृत्यू आला. जयश्रीला तिच्या पूर्वजन्मातील दोषामुळे कुत्रीचा जन्म मिळाला व सुमित्र ब्राह्मणाला बैलाचा जन्म प्राप्त झाला. त्या जन्मात ते दोघेही त्यांच्या पूर्वीच्या जन्मातील त्यांच्या पुत्राच्या घरी राहत होते.
हेही वाचा
जाणून घ्या करवा चौथ व्रत, पूजा विधी आणि उद्यापन कसे करावे
एकदा त्या पुत्राच्या घरी श्राद्धकर्म होते म्हणून त्याच्या पत्नीने श्राद्धाचा सगळा स्वयंपाक केला. खीर केली. श्राद्धासाठी ब्राह्मणांना भोजनाला निमंत्रण दिले होते. त्या वेळी एक विचित्र घटना घडली. “खिरीचे भांडे उघडे होते. त्यात एका विषारी सापाने तोंड घातले. त्या खिरीत सापाचे विष पडले. दारात असलेल्या कुत्रीने ते पाहिले. तिने विचार केला, ही विषारी खीर ब्राह्मणांनी खाल्ली तर आपल्या मुलाला व सुनेला ब्रह्महत्येचे पाप लागेल म्हणून त्या कुत्रीने स्वयंपाकघरात शिरून त्या खिरीच्या पातेल्याला स्पर्श केला. ब्राह्मणाच्या पत्नीने ते पाहिले.
तिला त्या कुत्रीचा अतिशय राग आला. तिने चुलीतील पेटते लाकूड घेऊन त्या कुत्रीला झोडपले. नंतर तिने ब्राह्मणांसाठी दुसरी ताजी खीर तयार केली. त्या दिवशी त्या कुत्रीला काहीही खायला मिळाले नाही. रात्री ती कुत्री रडत रडत आपल्या पतीकडे म्हणजे त्या बैलाकडे गेली. तिने त्याला घडलेली सगळी हकीकत रडत रडत सांगितली. त्या वेळी तिचा पती म्हणजे तो बैल तिला म्हणाला, ‘तू गेल्या जन्मी तुला शिवायचे नसताना श्राद्धाचा स्वयंपाक केलास. सगळीकडे शिवाशिव केलीस. त्या दोषामुळे तुला हा कुत्रीचा जन्म मिळाला. तू माझी पत्नी असल्यामुळे मलाही दोष लागला. त्यामळे मला हा बैलाचा जन्म प्राप्त झाला.
—————–
आज माझ्या मुलाने मला दिवसभर नांगराला जुंपले. खूप मारले. मला अन्नपाणी दिले नाही. मी सुद्धा आज तुझ्याप्रमाणे उपाशीच आहे. आज आपल्या पुत्राने केलेले श्राद्ध फुकट गेले.’ “कुत्रीचे व बैलाचे हे बोलणे त्यांच्या त्या पुत्राने ऐकले. त्याला अतिशय वाईट वाटले. त्याने त्या बैलाला भरपूर वैरण घातली. पाणी पाजले. कुत्रीलाही अन्नपाणी दिले. त्या दोघांना त्याने नमस्कार केला. त्याला फार दःख झाले होते.” “दुसऱ्या दिवशी तो रानात गेला.
तेथे त्याला काही ऋषी भेटले. त्याने त्या ऋषींना सगळी हकीकत सांगितली व आपल्या आईवडिलांच्या म्हणजे त्या कुत्रीच्या व बैलाच्या उद्धारासाठी काय करावे, असे त्याने त्या ऋषींना विचारले. तेव्हा ऋषी त्याला म्हणाले, ‘त भाद्रपद महिन्यातील शुद्ध पंचमीला ऋषिपंचमीचे व्रत कर म्हणजे तुझ्या आईवडिलांचा उद्धार होईल.’ “मग त्या ब्राह्मणपुत्राने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे यथाविधी ऋषिपंचमीचे व्रत केले. त्यामुळे त्या कुत्रीचा व बैलाचा म्हणजे त्याच्या आईवडिलांचा उद्धार झाला, व ते स्वर्गलोकी गेले.” या गोष्टीचा बोध इतकाच, की मनुष्याने सदैव पवित्र राहावे.
५. ऋषिपंचीमीच्या दिवशी काय करावे ?
आपल्या हातून जाणते- अजाणतेपणी अनेक दोष घडतात व त्याचे फळ भोगावे लागते. म्हणून वर्षातून एकदा तरी अरुंधतीसह सप्तर्षीचे स्मरण-पूजन करावे. वर्षातून एकदा तरी स्वकष्टाने मिळवलेल्या अन्नाचे सेवन करावे हा यामागील उद्देश आहे. अंगणात किंवा शेतात लावलेल्या भाज्या आपण खाव्या. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खात नाहीत. म्हणजेच न नांगरलेल्या अन्नाचे सेवन करायचे असते. त्यामुळे अंगणात लावलेल्या भाज्या, कंदमुळे खातात. ऋषिपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते.
अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ (भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. या दिवशी पवित्र राहावे. आपल्या घरी असलेल्या गाय-बैल, कुत्रा इत्यादी प्राण्यांना प्रेमाने अन्न द्यावे. अशा या ऋषिपंचमी व्रताचरणाने घरात सुख नांदते. सर्व तीर्थांच्या स्नानाचे पुण्य लाभते. स्त्रीचा संसार सुखाचा होतो. मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. आपले जीवन सफल होते.
६. ऋषिपंचमीचा व्रत करण्या मागील उद्देश कोणता ??
गृहस्थाश्रमी पुरुषांना आचार प्रणालीची ओळख व्हावी आणि गृहस्थाश्रम आचार संपन्न व्हावा हा या व्रतामागील उद्देश आहे. शक्यतो सगळे सण वार, व्रत वैकल्ये स्त्रियाच करतात. पण ऋषी मुनी हे स्त्री आणि पुरुष दोघांचेही होते त्यामुळे हे व्रत स्त्री आणि पुरूष दोघेही करू शकतात. ऋषी मुनींनी विकसित केलेला स्वकष्टार्जित या गुणामुळे या दिवशी विशिष्ठ आहार आणि ऋषींचे स्मरण याला खूप महत्त्व आहे.. त्याचे आचरण केले तर व्रत सफल होते.
तर अशा प्रकारे हे व्रत करून कळत नकळत झालेल्या चुकांपासून मुक्ती मिळवा आणि आयुष्य सफल करा.
========================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.