निश्चय

कुमुदिनीचे यजमान जाऊन महिना होत आला होता. तिची मुलगी आश्विनी दूर तिकडे बँगलोरला रहायला होती. आश्विनीच्या मुलाची बारावीची परीक्षा असल्याने ती आईला भेटायला येऊ शकली नव्हती. जावईबापू आशिष मात्र येऊन भेटून गेला होता. मुलगा वीरेंद्र व सून कीम परदेशातनं आली होती. तीही पंधरवड्याने आपल्या कर्मभूमीकडे गेली होती.
नाही म्हणजे कुमुदलाही बोलावलं होतं त्यांनी..जरा जागा बदललीस तर बरं वाटेल असं समजावलं होतं पण ते वरवरचं असावं हे कुमुदच्या सुजाण नजरेने ओळखलं व इथे माझ्या ओळखीपाळखीची माणसं आहेत,आठवणी आहेत तुझ्या वडिलांच्या..असं घासून तयार केलेलं गुळमुळीत उत्तर दिलं होतं. सासूची परदेशात येण्यास नापसंती ऐकून कीमला हायसं वाटलं होतं न् आपण विचारायचं कर्तव्य केलं याचं वीरेंद्रला समाधान वाटलं होतं.
ग्रंथालयात जाऊन कुमुदिनी पुस्तकं घेऊन यायची पण हल्ली मन इतकं नाजूक झालं होतं की पुस्तकातल्या पानावरली अक्षरं तिला मुळी दिसायचीच नाहीत. नुसतीच शाई..इथेतिथे पेरलेली..अर्थहीन,संदर्भहीन असे ठिपके..
दुपार तर रस्त्यावर पसरलेल्या म्हशींप्रमाणे हट्टी झाली होती. पुढे रेटतच नसायची. कुमुद डोळे झाकायचा प्रयत्न करायची. झोपायला बघायची..शेवटी न राहवून एखाद्या वांड मुलाला आई बाहेर पडू देत नाही, घरात बंद करुन ठेवते तसं डोळ्यांना पापण्यांआड गच्च बंद करुन ठेवायची. चुकून डोळा लागला की तिला भूतकाळातले गजबजीचे दिवस आठवायचे. पहाटे चारला आलेला नळ, लगबगीने केलेले पोळीभाजीचे डबे, घाईघाईत तेल चोपडून बांधलेल्या आश्विनीच्या वेण्या आठवायच्या. वीरेंद्रला शिकवलेला शिष्यवृत्तीचा अभ्यास आठवायचा.
एकदा तर ती झोपेतच ओरडली..आशु,वीरु..आता काय कपाळं फोडणार आहात का एकमेकांची. बंद करा तो खेळ. पप्पा यायला झालैत. सगळं आवरुन ठेवा तासाभरात. महत्प्रयासाने कुमुदने डोळे उघडले पण तिला पुढ्यात आशु,वीरु दिसेनात..कुठे गेली माझी पोरं..
अर्ध्या दिवसाचं ऑफिस होतं असल्याने साडेतीनास येणारे तिचे यजमान साडेचार वाजले तरी आले कसे नाहीत या विचाराने ती भयभीत झाली. तिने नळ सुरु केला. गार पाण्याचे हबकारे तोंडावर मारुन घेतले नि आरशात पाहिलं तशी वास्तवाची जाणीव झाली तिला.
समोरच्या आरशात उभा होता अजगरासारखा पहुडलेला भयाण रस्ता जो तिला एकटीला पार करायचा होता. शेवटचं स्टेशन येईस्तोवर एकटीने चालायचं होतं. तिने पदराने तोंड पुसलं.
चहा करावा म्हणून पातेलं ग्यासवर ठेवलं, पेलाभर पाणी घातलं. साखर घातली. पाणी उकळत आलं तशी चहापावडर घातली. दूध आणायला म्हणून फ्रीजजवळ गेली तर आपण फ्रीज नेमका कशासाठी उघडला हेच आठवेना तिला न् तिथेच बसून राहिली.
का कोण जाणे पण कुमुदच्या भावाला आज कुमुदची जास्तच आठवण आली. जुन्या काही भांडणांवरून कुमुदकडे येणंजाणं सोडलं होतं तिच्या भावाने,कौस्तुभने. भावोजींच तसं झालं तेंव्हा तोंडदेखलं जाऊन आला होता. तरी मनात सलत होतं बरंच काही. त्याचं त्यालाच अपराध्यासारखं जाणवू लागलं होतं.
कौस्तुभ, कुमुदताईपेक्षा आठ वर्षाने लहान होता. कुमुदताईने आई शाळेत गेली की आईच्या मायेने कौस्तुभचं न्हाऊमाखू केलं होतं,त्याला शाळेत घेऊन जायची ती. लहानग्या कौस्तुभला कुणी मारलं,बोचकारलं तर तो ‘ताईला नाव’ असं म्हणत हाताचं बोट हलवत रडायचा आणि कुमुदताईही कमेरवर हात ठेवून भावाची बाजू घेऊन भांडायची
कुमुदताई म्हणजे एकेकाळी जीव होता कौस्तुभचा पण पुढे कौस्तुभने त्याच्या आईवडिलांकडे केलेलं दुर्लक्ष पाहून कुमुदताई रागे भरलेली त्याच्यावर. तेंव्हापासनं कौस्तुभ कुमुदकडे राखीला,भाऊबीजेलाही जायचा बंद झाला होता.
दोघांत निर्माण झालेली रागाची निसरडी गाठ कौस्तुभच्या बायकोने अधिकच घट्ट कशी होईल याची पुरेपुर काळजी घेतली होती पण आताशी तीही संधिवातामुळे वैतागली होती.
कौस्तुभ बायकोला सांगून बाहेर पडला. कौस्तुभच्या बायकोनेही त्याला अडवलं नाही..त्याला अडवायचा धीर झाला नाही तिचा. तीही शारिरीक वेदनेने गलितगात्र झाली होती. कौस्तुभ गाडी करुन थेट बहिणीच्या घराजवळ गेला. बेल वाजवूनही आतून काहीच आवाज येईना तसा तो घाबरला. त्याने शेजाऱ्यांकडून चावी मागून घेतली. दार उघडून पहातो तर घरात सगळीकडे धूर पसरला होता. त्या धुरात कुमुदताई बेशुद्ध होऊन पडली होती. ग्यास चालू होता. त्यावर ठेवलेलं चहाचं पातेलं काळठिक्कर पडलं होतं.
कौस्तुभने ग्यास बंद केला. धूर जाण्यासाठी खिडक्या खोलल्या. कुमुदताईला उचलून गादीवर झोपवलं नि पहिला वीरेंद्रला फोन लावला..त्याला आईची अवस्था सांगताच वीरेंद्र म्हणाला,”चील मामा,तू आलाएस ना तिथे. तू बघ आईकडे. मी बिझी आहे. इथे माझी महत्त्वाची मिटींग चालू आहे. हवं तर हॉस्पिटलाइज कर तिला आणि एखाद्या ओल्ड एज होममध्ये..” कौस्तुभने भाच्याचा फोन कट केला नि भाचीला फोन लावला. मुलगी म्हणून तिला आईबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेल या अपेक्षेने पण तिनेही ओल्ड एज होमचाच पर्याय सुचवला. निदान आई शुद्धीवर आली का हेही विचारावसं वाटलं नाही त्यांना.
कौस्तुभने कुमुदताईच्या चेहऱ्यावर पाणी शिपडलं तशी शुद्ध आली तिला. कौस्तुभला बघून म्हणाली,”अरे कौ कसा देवासारखा धावून आलास बघ. तुलाच फोन करणार होते. माझी आशु नि वीरु मी ओरडले म्हणून कुठे निघून गेली रे. किती हाका मारल्या..येतच नाहीएत. हेही आले नाहीत अजून कामावरुन. हे आले की काय सांगू यांना?’
कौस्तुभ
तिच्या त्या अवस्थेकडे दीनवाणेपणे पहात राहिला. तिला वास्तवात आणायचा धीर त्याच्याने होईना. . दारात उभे असलेले शेजारी कुमुदताईच्या डोक्यावर नक्कीच परिणाम झाला या नजरेने एकमेकांत कुजबुजू लागले.
कौस्तुभने भराभर कुमुदताईचे कपडे एका ब्यागेत भरले. ब्लॉकचं दार बंद केलं न् कुमुदताईला गाडीत बसवलं. ज्या ताईने लहानपणी त्याच्यावर अखंड माया केली होती,त्याची पाठराखण केली होती त्या कुमुदताईला तिच्या अंतिम क्षणापर्यंत सांभाळायचं असा निश्चय करत त्याने गाडी स्टार्ट केली.
©️®️सौ. गीता गजानन गरुड.
1 Comment
liliana
Do you like my nips? http://prephe.ro/Bdsn