Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रेशीमगाठी (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२”

©आशिष म. देवरुखकर

“ए आई, नको ना बघू मुली माझ्यासाठी.”

“का रे? कोणी आवडते का तुला?”

“नाही. तुम्ही लहानपणापासून जातवालीच हवी म्हणून बजावून ठेवलं होतत मग कसे मला कोण आवडेल.”

“असे का बोलतो रे.”

“मग काय बोलू आई, जी आवडायची ती आपल्या जातीतली नव्हती आणि जिला मी आवडायचो तिचीही तीच कहाणी.”

“मग आता लग्नाला का नाही बोलतोस?”

“जाऊ दे ना आई.”

“अरे, कसे जाऊ देऊ? २९ वर्षांचा झालास घोड्या.”

“होऊ दे. उशिरा लग्न होत नाहीत का जगात?”

“होतात ना पण मग मूल उशिरा, त्यांचं शिक्षण होईपर्यंत तुला जॉब करावा लागेल.”

“अग आई, कुठच्या कुठे पोहचली तू.”

“कोणी आवडत असेल तर सांग.”

“नाही आवडत.”

“मग?”

“मी मानसिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीये लग्नासाठी.”

“मानसिक दृष्ट्या??? २९ चा झालास की अजून किती अक्कल यायला हवी.”

“आई, तुला कळत नाहीये.”

“बर नाही कळत पण मग आर्थिक दृष्ट्या काय असत? जे आहे ते तुझेच आहे ना?”

“नाही. जे पप्पांच्या मालकीचे आहे ते पप्पांचेच आहे, माझे नाही.”

“पण आमच्या नंतर ते तुझेच होणार आहे.”

“मला नकोय काही.”

“का?”

“बहिणीचा हिस्सा आहे अर्धा त्यातला तो तिला देऊन टाका, मला काही नको त्यातलं. सगळाच बहिणीला दिलात तरी चालेल.”

“का तोडून बोलतोय इतकं?”

“हे बघ आई, पप्पांनी शून्यातून सुरवात केलेली म्हणून मीपण शून्यातून सुरवात केली.”

“हो, अभिमानच आहे त्याचा आम्हाला.”

“पण आई, तुला माहितेय ना मी पाहुण्यांच्या घरात राहतो.”

“हो, मग त्याचा तुझ्या लग्नाशी काय संबंध?”

“आई. कोण लग्न करेल असे दुसऱ्याकडे राहणाऱ्या मुलाशी.”

“लग्न ठरलं की घेऊ की घर.”

“मला तुमचे पैसे नकोत.”

“बर भाड्याने घेऊन राहा.”

“अग, चांगली २३,००० ची नोकरी सोडून तुझ्या नातेवाईकांमुळे मी ८,००० ची नोकरी करतोय.”

“हो माहितेय बाळा, आपण ८,००० पगार नाही सांगायचा आणि ३ ४ महिन्यात तू पर्मनंट होशील तेव्हा पगार वाढेलच की.”

“आई तिथे काही भविष्य नाहीये.”

“उगाच नकारघंटा नको. आपण मुलीला २०,००० पगार सांगू.”

“मग तर अजिबात मुलगी बघू नका.”

“का?”

“असे खोटे बोलून मला माझ्या नात्याची सुरवात करायची नाही.”

“तडजोड करावीच लागते बाळा.”

“तडजोड नात्याची गरज असावी आई, बेस नाही.”

“बर, कर तुला काय करायचे ते.”

“आई, बहिणीचे लग्न होऊ दे मग बघू.”

“ठीक आहे.”

कसेबसे त्याने आईला समजावले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. चार वर्षे उलटली तरी तो पर्मनंट नव्हता झाला ना पगार वाढला. २०१७ साली रेल्वेची भरती निघाली आणि त्याने फॉर्म भरला. पण भरताना चुकीच्या ग्रुपचा फॉर्म भरला. त्यात बहिणीच लग्न ठरलं. मुळात तो खूप हुशार होता आणि रेल्वेची पहिली फेरी तो सहज पास झाला आणि दुसऱ्या फेरीसाठी म्हणजे फिटनेस टेस्टसाठी तो पात्र ठरला. डिसेंबर २०१८ ला बहिणीचे लग्न झाले आणि मार्च २०१९ ला तो नागपूरला दुसऱ्या फेरीसाठी गेला. नशिबाने इथेही साथ सोडली. १००० मीटर धावायला ४ मिनिटे २० सेकंदाचा वेळ होता पण त्याला ४ मिनिटे २७ सेकंद लागली. अवघ्या ७ सेकंदांसाठी तो दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला. 

भरीस भर ऑक्टोबर २०१९ ला त्याला व्हर्टिगो झाला. त्यामुळे तो सव्वा महिना घरीच होता. ज्यांच्याकडे तो राहायचा त्यांनी त्याला स्वतंत्र राहायला सांगितले. सतत लग्नासाठी होणार दबाव आणि घर सोडायला लावणं यामुळे तो वैतागला आणि जानेवारी २०२० ला तो स्वतंत्र भाड्याच्या खोलीत राहू लागला. पण दुर्दैव त्याची साथ सोडायला तयार नव्हत. मार्चमध्ये कोरोना आला आणि सगळं जग ठप्प झालं. मार्च, एप्रिल आणि मेचा अर्धा पगार आला. मग कळलं की नोकरी गेली. सगळं दुःख गिळून तो गावी गेला पण असे रिकामे बसणे त्याला स्वस्थ बसून देत नव्हतं. ऑक्टोबरला तो पुन्हा विरारला आला. सुदैवाने त्याला जुन्या कंपनीत पुन्हा  बोलावणं आले आणि पण ४ वर्षांपूर्वी ती कंपनी सोडताना त्याला २३,००० पगार होता तोच देणार असे सांगण्यात आले. ८,००० पेक्षा २३,००० बरे म्हणून नोकरी स्वीकारली. नोव्हेंबरमध्ये तो चांगल्या सोसायटीमध्ये भाड्याने राहू लागला. आता मुलगी बघायला हरकत नाही असे त्याने घरी कळवले. आई खुश झाली आणि तिने तो ज्या नातेवाईकाकडे राहत होता त्यांनाच मुलगी बघायला सांगितले. 

     त्याने मस्त बायोडेटा बनवला आणि अपेक्षांच्या रकान्यात आपल्या अपेक्षा लिहिल्या. अनुरूप, मनमिळावू, उंची कमीतकमी ५’४” , इंजिनियर किंवा डॉक्टर असावी. 

     त्याची स्वतःची उंची ५’६” होती आणि त्याला आपल्या दिसण्यावर नाज होता. तो दिसायला गोरापान आणि हँडसम होताच. पहिलेच स्थळ आले. मुलगी ५’४”, गोरीपान, दिसायला जणू परीच पण शिक्षण १४ वी पास. त्याला फक्त बायोडेटा आलेला, शिक्षण बघून त्याने नकार द्यायचा ठरवल पण एकदा फोटो बघूया म्हणून फोटो पाहिले आणि त्याला ती इतकी आवडली की त्याने लगेच होकार कळवला. बायोडेटा मधली शिक्षणाची अट त्याने काढून टाकली. पण नशिबाने इथेही त्याला साथ नाही दिली. ३ दिवसांनी कळवतो असे उत्तर आले पण नंतर काहीच रिप्लाय नाही आला. 

     त्याचा जीव कासावीस झाला. त्याने तिला फेसबुकवर शोधून काढले पण दुर्दैव इथेही पाठलाग करतच होते. तिला फ्रेंड रिक्वेस्ट टाकायला तिच्यात आणि त्याच्यात कोणीतरी कॉमन फ्रेंड हवे अशी सेटिंग होती. पण त्याने हार नाही मानली. तिच्या शाळेची माहिती तिथे होतीच. त्याने ते उघडले आणि आपल्या समाजातील आणखी कोणी त्या शाळेत शिकले आहे का ते शोधले. एक मुलगी मिळाली त्याला. तिला त्याने रिक्वेस्ट टाकली. तिने घेतली सुद्धा. आता आलेले पहिले स्थळ आणि त्याच्यात कॉमन फ्रेंड असल्याने त्याने स्थळाला रिक्वेस्ट टाकली. 

       हे सगळं घडेपर्यंत जानेवारी उजाडला. त्याला स्थळ येतच होती पण त्याला त्याच्या अपेक्षा पूर्ण करणारी मिळतच नव्हती आणि जी अपेक्षा पूर्ण करणारी होती त्यांच्या अपेक्षा भयानक होत्या. बर त्याला मिळणारे नकार तर पटणारे नव्हतेच. त्याला अशी कारणे देऊन नकार मिळाले.

“विरार नको, खेडेगाव टाईप आहे ते.”

“मुलाचे स्वतःचे घर हवे, मुलीला भाड्याच्या घरात राहायची सवय नाही.”

“कमीतकमी १bhk तरी हवा.”

“मुलाला पगार फारच कमी आहे.”

“आई वडील सोबत नकोत.”

“मुलाकडे कार तरी हवी निदान. माझ्या मुलीला एसटीची सवय नाही.”

“मुलगा डॅशिंग नाही.”

“कंपनी मोठी नाही.”

“कंपनीची स्वतःची वेबसाईट नाही.”

“आम्हाला बोरिवली मध्ये राहणार हवा, बोरिवलीत घर घ्या.”

“मुलाकडे स्थावर मालमत्ता काहीच नाहीये.”

“तुमचे गावचे घर काय कामाचे, मुंबईत निदान १ bhk हवा.”

इत्यादी इत्यादी….

    असली कारणे ऐकून मात्र तो खचत निघाला. त्यात ते पहिले स्थळ काही केल्या फ्रेंड रिक्वेस्ट घेत नव्हते. फेब्रुवारीमध्ये त्या स्थळाने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट घेतली. डायरेक्ट नको विचारायला म्हणून हा फक्त gm gn वगैरे मेसेज करत होता. थोडीफार ओळख झाली आणि एप्रिलमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागले. मग दोघांनाही बराच वेळ मिळाला बोलायला. त्याने ठरवले की तिला सगळं सांगायचे. एकेदिवशी त्याने मेसेंजरला बोलायला सुरवात केली.

“Hi.”

“Hi.”

“कशी आहेस?”

“मी मस्त, तू कसा आहेस?”

“मीपण मस्त.”

“मला तुला काही सांगायचे होते.”

“हो सांग ना.”

“खरतर मला तुझ स्थळ आलेले.”

“अच्छा, मला नाही आठवत.”

“डिसेंबरमध्ये आलेले.”

“मग तूच नकार दिला असशील.”

“मी का नकार देऊ?”

“कारण तू इंजिनियर मी १४ वी पास.”

“मला तू आवडली होती पण तुझ्याकडून काही उत्तर नाही आले.”

“मला खरेच माहीत नाही काही.”

“बरे.”

“एक काम कर ना, बाबांना कॉल कर ना माझ्या मग परत.”

“ठीक आहे, करतो.”

      तो खूप खूप खुश झाला आणि त्या आनंदाला आणखी एक जोड मिळाली. तिच्याच वडिलांचा त्याच्या घरी फोन आला आणि डिटेल्स मागवून घेतल्या. 

      तो आता प्रचंड खुश होता पण जे होऊ नये तेच झाले. तिच्या घरातून काहीच उत्तर नाही आले. त्याने तिला मेसेज केला.

“तुझ्या बाबांनी घरी कॉल केलेला, डिटेल्स घेतल्या पण उत्तर नाही.”

“मला तुझी पत्रिका नाही मिळाली.”

“असे कसे.”

“अरे खरेच.”

     मध्ये काही दिवस गेले आणि तिने स्वतःहून त्याला मेसेज केला.

“ऐक ना, मला तुला काही सांगायचे आहे.”

“सांग ना.”

“तू दुसरी मुलगी बघ.”

“का?”

“मी चांगली नाहीये.”

“म्हणजे?”

“माझं २०१८ ला लग्न ठरलं होतं आणि मे २०१८ ला साखरपुडा झाला पण ऑक्टोबरमध्ये मुलाकडून लग्न मोडलं.”

“हा मग.”

“मग, तुला कारण जाणून नाही घ्यायचं?”

“मला जाणून काय करायचं आहे? तसेही तुझा भूतकाळ मला जाणून नाही घ्यायचा.”

“अरे, तुला लोक हसतील.”

“का?”

“लग्न मोडलेल्या मुलीशी लग्न करत आहेस म्हणून.”

“मला जगाची पर्वा नाही.”

“पण मला तुझं आयुष्य नाही खराब करायचं.”

“कोण बोललं असे?”

“तू दुसरी बघ प्लिज.”

“मी किंवा माझ्या घरातले तुला कधीच तुझं ठरलेलं लग्न का मोडलं हे कधीच विचारणार नाहीत.”

“तुला माझ्यापेक्षा सुंदर मुलगी मिळेल.”

“मला तूच हवी.”

     त्याने खूप प्रयत्न केला समजावून सांगण्याचा पण ती ऐकतच नव्हती. एकेदिवशी तर तिने मेसेज केला.

“तू स्मोक करतोस?”

“नाही.”

“ड्रिंक?”

“नाही.”

“तंबाकू, गुटखा?”

“नाही.”

“मग तर तू दुसरी मुलगी शोधच.”

“आता काय झालं?”

“मी स्मोक करते.”

“बर मग.”

“अरे तू स्मोक करत नाही मग तुला स्मोक करणारी बायको कशी चालेल.”

“चालेल मला.”

    त्याने तिला तिच्या स्मोकिंगच्या व्यसनासाकट स्वीकारण्याची तयारी दाखवली. पण ती ऐकायला तयारच नव्हती.

“मी नुसती सिगारेट नाही ओढत, मला विड सुद्धा लागते.”

   त्याला विड म्हणजे काय माहीतच नव्हतं, तरीही त्याने उत्तर दिल.

“चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही.”

   तो तिला खूप सांभाळून घेत होता पण ही तयार होतच नव्हती. एकेदिवशी तर कहरच केला.

“मला दर शनिवारी वोडका लागतो, तुला चालणार आहे का?”

“हो, मला काही प्रॉब्लेम नाहीये.”

“अरे असा कसा तू, तुझी बायको सिगारेट पिणार, वोडका पिणार तुला कसे चालेल.”

“तू माझी बायको झाली म्हणून मी तुला तुझ्या व्यक्तिगत आवडीनिवडी बदलायला सांगणार नाही.”

“मी तुझ्या पाया पडते पण प्लिज तू दुसरी कोणीतरी बघ.”

“मी नाही.”

     असेच दिवस जात होते पण ती लग्नासाठी नाहीच म्हणत होती. त्याचवेळी त्याच्या हातात ‘सिक्रेट’ नावाचे law of attraction वर आधारित पुस्तक पडले आणि त्याचा चेहरा खुलला. त्यातली एक ट्रिक त्याने आजमवायची ठरवली. आयुष्यात त्याला १० गोष्टी मिळाल्यात आणि त्यासाठी तो ब्रम्हांडाचा आभारी आहे असे एका कागदावर लिहिले आणि त्या १० गोष्टीत त्याने तिचेही नाव लिहिले होते. त्याची ती ट्रिक यशस्वी होताना दिसत होती. त्या १० गोष्टींमध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन, आय फोन ह्या गोष्टी सुद्धा होत्या आणि त्याला त्या २ महिन्यातच मिळाल्या. तिच्याशी बोलणं मात्र सुरू होत. तिचा अजूनही नकार होता लग्नाला आणि त्याचे प्रयत्न सुरूच होते. 

    मुळात तो चांगला लेखक होता आणि आपलं लिखाण त्याने आता फेसबुकवर टाकायला सुरवात केली. त्याने एक कथा लिहिली होती. एक अविवाहित पुरुष आणि एका विवाहित महिलेवर जे एकेमकांचे क्रश असतात. ती स्टोरी तिने वाचली आणि त्याला मेसेज केला.

“एक विचारू?”

“हो विचार ना.”

“खर सांगशील.”

“हो अगदी खरं सांगेन.”

“रागावणार नाही ना?”

“नाही रागावणार.”

“तू कोण्या विवाहित महिलेच्या प्रेमात पडला आहेस का?”

“नाही.”

“खर सांग.”

“खरेच सांगतोय आणि तुला हे कोणी सांगितलं?”

“तुझ्या त्या पोस्टवरून कळलं मला.”

“अग ते काल्पनिक आहे सगळं.”

“मला नाही वाटत.”

“का?”

“इतकं रिअल कोणी अनुभूवल्याशिवाय नाही लिहू शकत.”

“अग सगळं काल्पनिक आहे. लेखक कल्पना करू शकतो ना.”

“इतकं रोमँटिक?”

“बघ आता तूच, तुलाच इतका रोमँटिक नवरा नकोय.”

“आलास परत तिथेच, तुला दुसरी चांगली रोमँटिक बायको मिळेल.”

ती ऑफलाईन गेली.

     त्याचा श्री स्वामी समर्थांवर खूप विश्वास होता, भक्ती होती. तो रोज स्वामींकडे मागणी टाकायचा पण स्वामी काही त्याला उत्तर देत नव्हते. एकदा तर तो भांडला त्यांच्याशी. तिचा मेसेज येऊन आठवडा उलटला होता आणि एकेदिवशी तिचा मेसेज आला.

“मला तुला काहीतरी सांगायचे आहे.”

“सांग ना.”

“मला माफ कर.”

“का?”

“मी तुझ्याशी खोटे बोलले.”

“मला माहितेय तू माझ्याशी खोटे बोललीस.”

“काय खोट बोलली आणि तुला कस कळलं?”

“हेच की तू सिगारेट, दारू पिते हे सगळे तू खोटे बोलली.”

“तुला कस कळलं?”

“तुला बघूनच कळलं ते.”

“बघून कसे कळले.”

“कळले आणि तुझे घरचे इतके चांगले आहेत तर तू असे वागणार नाही ह्याची मला खात्री आहे.”

“सॉरी रे. खरतर तुझ्यात नकार देण्यासारखे काहीच नाहीये. तू परफेक्ट मॅच आहेस माझ्यासाठी पण….”

“पण काय?”

“तू फेसबुकवर मित्र झालास तेव्हा मी माझ्या वर्गमित्राला डेट करत होते आणि ज्यादिवशी तू मला मागणी घातली त्याच दिवशी त्यानेही घातली. मला त्याला नाही म्हणता येत नव्हतं.”

“बरे.”

“म्हणून मी तुला खोट सांगितलं की मी व्यसनी आहे असे.”

“अच्छा.”

“मी त्याला नकार नाही देऊ शकत म्हणून मी तुला नाकारल. खरतर मी त्यावेळी खूप द्विधा मनस्थितीत होते आणि मी त्यालाच सोल्युशन मागितले तर त्याने तुला नकार कळव सांगितले.”

“मग तू मूर्ख आहेस.”

“रागावणार तू मला माहित होतं.”

“रागावलो नाही मी, तू त्याला भेटते मग तो तुला मला नकार देच बोलणार.”

“ते आता कळतंय मला पण आमचं लग्न ठरलं आहे आता.”

“अजूनही वेळ गेलेली नाही.”

“म्हणजे?”

“लग्न ठरलं आहे, झालेलं नाही ना. मग ये माझ्याकडे. जशी आहेस तशी तुला स्वीकारेन मी.”

“तू नको वाट पाहू माझी, मला माफ कर.”

“मी वाट पाहणार.”

“मी ब्लॉक करतेय तुला.”

“बरे.”

     हा धक्का त्याला पचवणे अवघड होते पण त्याने मनाला समजूत घातली. त्यारात्री तो आपल्या देव्हाऱ्यासमोर उभा राहून स्वामींशी खूप भांडला पण स्वामी फक्त स्मितहास्य देत आहेत असेच त्याला जाणवत होते. त्याचे कामात लक्ष लागत नव्हते. त्याने आपल्या परीने प्रयत्न सुरूच ठेवले. एकेदिवशी मेसेंजरवर तिचा कॉल आला.

“Hi.”

“Hi.”

“कसा आहेस?”

“तुझ्याशिवाय अपूर्ण.”

“माहितेय मला पण सावर स्वतःला.”

“हो. पण आज अचानक कॉल.”

“अरे आठवण आली म्हणून सहजच केला.”

“अच्छा.”

“तुझी कर्क रास आहे ना?”

“हो.”

“तुझे दोन्ही डोस झाले का?”

“नाही. एकच झालाय.”

“माझे दोन्ही झालेत.”

“अरे वाह.”

“मग तू बाईक वरून विरार कांदिवली अप डाऊन करतो?”

“नाही.”

“मग जॉबला कसा जातो?”

“मी आता वसईला जॉबला आहे पण तुला कसे माहिती की कांदिवली जॉबला होतो?”

“मला सगळं माहीत आहे तुझ्याबद्दल, तुझी पत्रिका, फोटो सगळं आहे माझ्याकडे.”

“तरीही मला नकार देते आहेस.”

“नको ना तो विषय.”

“बरे.”

“बाकी तुझा आय फोन काय म्हणतोय?”

“तुला कसे कळले मी आय फोन घेतला?”

“मी तुझ्या प्रत्येक पोस्ट वाचते.”

“हो का.”

“होच.”

“माझे मन तेव्हढे वाचता नाही आले तुला.”

“तू उशीर केलास यायला.”

“आपण दसऱ्याच्या दिवशी बोलू, मी बाहेर आहे.”

“ठीक आहे.”

    तो आता कुठे सावरत होता तर तिने कॉल करून आणखी धक्का दिला.   त्याची बरीच माहिती तिने ठेवली होती. आता तिचा होकार येणार नाही हे कळल्यावर त्याने आईला मुली बघायला सांगितले. पण त्याच नशीब इतकं खराब की नातेवाईक त्याला वाट्टेल ती स्थळ आणायला लागली. त्याच वय ३५ झाले होते पण तो आजही २६ चा वाटत होता कारण त्याने स्वतःला तसे मेंटेन ठेवलं होतं आणि बायकोही तशीच असावी त्याची अपेक्षा होती पण नातेवाईक त्याला एकतर खूप हेल्दी किंवा खूप स्लिम स्थळ आणायचे आणि हा नकार द्यायचा.

“तू मोठा राजकुमार आहेस का इतकं स्थळ नाकारतो.” त्याचे नातेवाईक बोलले.

“हो आहेच मी.”

“स्वतःच घर नाही की चांगला जॉब नाही. कोण देणार आहे तुला मुलगी.”

“नसू दे माझ्याकडे काही, म्हणून तुम्ही कोणीही मला पसंद नसलेली मुलगी गळ्यात बांधणार का?”

“प्रेम होतं नंतर.”

“मला नाही होणार.”

“अरे जाड मुली लग्नानंतर बारीक होतात.”

“नाही झाल्या तर?”

“होणार.”

“प्रश्न त्यांच्या जाड असण्याचा नाहीये, पुढे जाऊन खूप हेल्थ इशू होतात म्हणून मला जाड मुलगी नकोय.”

“आलं मोठा, बघू तुला कोण अप्सरा देतंय.”

नातेवाईकांचे हे उत्तर त्याच्या मनाला खूप लागलं. त्या दिवसापासून त्याचे वागणे एकदम बदलेले. तो खूप निराश राहायला लागला पण ती त्याच्या लिखाणाच्या प्रेमात पडायला लागली होती. तो दिवसेंदिवस खूप प्रेमाच्या आणि भावनिक कथा लिहायला लागला आणि तिला ते असह्य होऊ लागलं. त्या पोस्टवरून दोघांच्यात वाद झाले आणि तिने त्याला ब्लॉक केले.

     आता सगळेच रस्ते बंद झाले होते. ह्यातुन बाहेर पडायला त्याला कोणीतरी डायरी लिहायला सांगितली आणि मेडिटेशनचा सल्ला दिला. त्याने ते सुरू केले पण डायरीच्या प्रत्येक पानावर तिचाच उल्लेख असायचा. नातेवाईक तर कहर करत होते. एकदा त्याला physically handicapped मुलीचे स्थळ आणले. हा मन नसताना लग्नाला तयार झाला पण मुलीनेच नकार कळवला. तिने सांगितले की मी अशी व्हील चेअरवर बसणारी त्याचे आयुष्य का बरबाद करू. नंतर नंतर तर त्याला त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुली आणायला सुरवात केली. त्यामुळे त्याचे आई वडील सुद्धा मानसिक धक्क्यात होते. 

     त्याने एक दिवस आपल्या डायरीत लिहिले.

‘आता बस झालं. मला आणखी सहन होत नाहीये. माझ्यामुळे माझे आई पप्पा त्रासात आहेत. मीच जर नाही राहिलो तर त्यांना पुढे त्रास नाही होणार, आता थोडे दिवस त्रास होईल.’

      त्याची ही अवस्था त्याच्या एका मैत्रिणीला कळली आणि तीने त्याला तिच्या ग्रुप सोबत गिरनारला येणार का म्हणून विचारणा केली. त्याने विचार केला की रात्री गिरनार चढताना कुठल्यातरी कड्यावरून उडी मारू. कोणालाच कळणार नाही की आत्महत्या केली, पाय घसरून पडला म्हणतील. तो तयार झाला. पण योगायोगाने प्रवासात त्याची ती डायरी गिरनारला नेणाऱ्या मैत्रिणीला सापडली आणि त्याचा हा आत्महत्येचा प्लॅन तिला कळला. तिने ग्रुपमध्ये एक वयस्कर काका होते त्यांना सांगितले. काकांनी शांत राहा, गिरनार पर्वतावर मी त्याला काय ते सांगेन. तोपर्यंत त्याला सांभाळून वरती न्यायची जबाबदारी आपली.

    गिरनार चढताना ग्रुपमधल्या कोणीही त्याला एकटे सोडले नाही. सगळे त्याच्याभोवतो घोळका करून होते. त्याला चान्सचं मिळाला नाही. वरती पर्वतावर दर्शन झाल्यावर मात्र तो खूप भावनिक झाला आणि बाहेर आल्यावर सगळ्यांसमोर तो खूप रडला. त्या वयस्कर काकांनी त्याला जवळ बोलावले आणि सांगितले. ज्यांच्याकडे तू तुझ्या मनातलं सांगतो ना त्यांना आत मंदिरात जाऊन एकदा हाक मार बघ ते तुला मार्ग दाखवतील.

तो मंदिरात गेला आणि श्री स्वामी समर्थांना हाक मारली. पण तो पुढे काहीच बोलू शकला नाही. तो गिरनार वरून पुन्हा विरारच्या घरी आला. थोडेदिवस असेच निघून गेले आणि एका रात्री त्याला स्वप्नात स्वामी दिसले. ते बोलले.

“बाळा, तुला जे हवे ते तुला माझ्या अंगणात मिळेल. मला भेटायला ये. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”

     तो खडबडून जागा झाला. घड्याळात पाहिले तर पहाटेचे ४ वाजले होते. लाईट लावली आणि देव्हाऱ्याच्या समोर हात जोडले तर स्वामी चक्क हसत होते. त्याला झोप येईना. त्याने रेल्वेची वेबसाईट उघडली आणि शुक्रवारच मुंबईहुन सोलापूरसाठी गदग एक्सप्रेसचे तिकीट काढले. परत यायचे सिद्धेश्वरचे रविवारचे तिकीट काढले. कुठून कसे जायचे सगळा प्लॅन बनवला. त्याच्या चेहऱ्यावर एकप्रकारची लकाकी आलेली होती. 

   शुक्रवारी हाफ डे टाकून तो घरी आला. आपली ट्रॅकिंग बॅग भरली आणि तो cst ला आला. जेवला आणि आपल्या डब्याकडे निघाला. सीट नंबर होता B1 30. तो डब्यात शिरला आणि आपल्या सीटकडे निघाला. तोंडाला मास्क होतेच. ३० नंबर म्हणजे वरची सीट. आपल्या सीटपर्यंत पोहचल्यावर त्याला धक्काच बसला. तिथे २५ ते २९ सीटवर ज्यांचे रिजर्वेशन होते ते बसले होते. २ तरुण आणि ३ तरुणी होत्या तिथे. त्यातली एक तरुणी म्हणजे तीच मुलगी होती जी त्याला आवडत होती पण त्याला नाकारत होती. त्याला पटकन स्वप्न आठवलं. त्याने बॅग ठेवली आणि तो तडक दाराजवळ निघून आला. डोळे पाण्याने डबडबले होते. तिनेही त्याला पाहिलं होतं. तिलाही धक्काच होता तो. 

     तो बराचवेळ तिकडेच उभा होता. ते ५ जण म्हणजे शाळेपासूनची मैत्री होती. त्याची ती सोडली तर चौघांपैकी एक कायदेशीर लग्न झालेले जोडपं होत आणि दुसरं कपल होते त्यांचा एकमेकांशी साखरपुडा झाला होता. पाचवी व्यक्ती म्हणजे त्याची ती. थोड्यावेळाने त्यांच्यातला एक तरुण दरवाज्याजवळ आला आणि त्याला नावाने हाक मारली.

“तुला माझे नाव कस माहिती?” त्याने तिच्या मित्राला विचारले.

“आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीवर तू जीवापाड प्रेम करतो आणि त्याच नाव आम्हाला माहीत नाही असे कधी होईल का?”

“म्हणजे?”

“आम्हा चौघांना तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे.”

“ओहह.”

“तुला पाहून ती तर चाटच पडली पण तू लगेच निघून गेल्यावर ती रडायला लागली.”

“ती का रडली? तीच तर लग्न ठरलं आहे ना तिच्या बॉयफ्रेंड सोबत.”

“ठरलं होतं.”

“होत म्हणजे?”

“म्हणजे मोडलं.”

“काय?” मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्याला पण दाखवू शकत नव्हता. 

“हो, झाले काहीतरी. ती सिंगल आहे आता.”

तोपर्यंत त्याची बायको बाहेर आली.

“काय मग, कसा आहेस?”

“तू सुद्धा ओळखते मला.”

“म्हणजे काय. आम्ही सगळे ओळखतो तुला.”

“बरे.”

“चल आतमध्ये, तू दारात उभा राहून प्रवास करतोय तिला भीती वाटतेय.”

“म्हणजे?”

“ती काळजी करतेय तुझी, तुला कळत नाहीये का.”

“आलो एक दहा मिनिटात.”

“नक्की ये, आम्ही जातो.”

    ते दोघे आत निघून गेले. तोपर्यंत त्याला आईचा कॉल आला.

“हॅलो आई, बोल.”

“सुटली का गाडी?”

“हो आई, आताच.”

“बसायला मिळाले ना?”

“आई…. रिझर्व्हेशन आहे.”

“अंगावर काही घेतले आहेस का?”

“हो आहे.”

“ऐक, मी तुला एक स्थळ व्हाट्सअप्प केलंय ते बघ.”

“आई, मला देव दर्शनाला तरी जाऊ दे नीट.”

“बर, सोमवारी बघ आणि कळव.”

“हो.”

     पुन्हा कोणीतरी मुलगी आणली असणार म्हणून त्याने आईने केलेला मेसेज चेकच नाही केला. तो तीच लग्न का मोडलं ह्याच विचारात होता. इतक्यात बराचवेळ तो आत गेला नाही म्हणून शेवटी तीच बाहेर आली.

“तुला एकदा सांगून कळत नाही का?”

    ती अशी डायरेक्ट येऊन बोलली पण तिला पाहताच तो तिच्यात गुंग झाला. ती परत बोलली.

“अरे ए, तुझ्याशी बोलतेय. तुला आत ये समजत नाही का?”

ती मात्र गुंगच. शेवटी तिने हाताने हलवले त्याला.

“माकडा, तुला बोलतेय. दरवाज्यात उभा राहून प्रवास करायचा होता तर जनरल डब्याने यायचे ना, कशाला एसीचे तिकीट काढले.”

“तू माकडीन.”

“तूच माकड. चल आत.”

“कशी आहेस?”

“मी ठीक आहे.”

“खोट.”

“कशावरून?”

“डोळे सांगत आहेत.”

“अरे ते डोळ्यात पाखरू गेलं म्हणून चोळला.”

“दोन्ही डोळ्यात एकदम गेलं का?”

“गप ना, चल आतमध्ये.”

“नको, इथे मजा येते.”

“मला भीती वाटते.”

“कसली भीती. ये इथे.”

“नको.”

“ये ग.”

“पकड हा मला.”

“हो ग. इथे ह्या पायरीवर एक पाय ठेव आणि इथे पकडून उभी राहा.”

“तू आहेस ना मागे?”

“हो, एक हात माझा तुझ्या बाजूनेच आहे, हा बघ.”

     त्या उभ्या हँडलला पकडून ती चालत्या रेल्वेच्या दारात उभी राहिली. ट्रेनने नुकतेच परेल ओलांडले आणि वेग कमी होत होता दादरसाठी. त्याने खबरदारी म्हणून केलेला स्पर्श तिला सुखावत होता आणि तिचे उडणारे केसांचा त्याच्या चेहऱ्याला होणार स्पर्श खूप आनंद देत होता. दादर आल्यावर दोघे आत गेले.

“आलास का?” तिची मैत्रीण बोलली.

“हो, यावे लागले. ही काय सोडते का.”

“बरे झाले.”

“मग काय प्लॅन उद्याचा?”

“उद्या पहाटे सोलापूर उतरले की सरळ पंढरपूर आणि तुळजापूर. मग संध्याकाळी अक्कलकोट मुक्काम. परवा सकाळी गाणगापूर आणि रात्रीच्या ट्रेनने मुंबई.”

“एवढे सगळं होत २ दिवसात. मी नेहमी करतो.”

“आम्ही उद्या अक्कलकोट आणि परवा तुळजापूर एवढाच प्लॅन केला आहे.”

“हॉटेल बुकिंग आहे का?”

“नाही.”

“मग आपण एकत्रच फिरू की “

“पण मग आमची एक अट आहे.”

“कसली अट?”

“आम्ही पाच जण आहोत एक ग्रुप आहे तर तू आमचा सहावा पार्टनर आणि तेही कायमचा बनायचं. चालेल का?”

“पण तुम्ही तर आम्हाला आताशी ओळखता मग डायरेक्ट ग्रुप मेंबर?”

“आम्ही आता ओळखतो पण ही तर तुला गेले वर्षभर ओळखते लेखक साहेब.”

“ओहहह.”

“मग काय काय माहीत आहे तुम्हाला माझ्याबद्दल?”

“हेच की…” मैत्रिणीचे बोलणं अर्धवट तोडत ती म्हणाली, “शांत व्हा रे. तू जेवला आहेस का?”

“कोण जेवण देणार?”

“म्हणजे?”

“मी एकटा राहतो माहितेय ना तुला. हाफ डे निघालो आणि बॅग घेऊन सरळ ट्रेन पकडली.”

“म्हणजे उपाशी.”

“हो, पण येईल ना काहीतरी खायला.”

“ट्रेनमध्ये येणारे नाही खायचे काही.”

“मग उपाशी राहू?”

“नाही. ठाण्याला आमचं जेवण येईल IRCTC कडून बुक केलंय. त्यातला आपण दोघे अर्धे अर्धे खाऊ.”

“अग नको.”

“खावे लागेल.”

“बर.”

      ठाण्याला त्या पाच जणांचे जेवण आले. तिने आपले जेवण त्याच्याशी शेअर केले. कल्याण पर्यंत जेवण झाले आणि कर्जत सोडल्यावर सगळे झोपायला निघाले. 

“माझ्यासोबत चल ना.”

“कुठे जायचे आहे?”

“वॉशरूम.”

“चल.”

    ती वॉशरूममध्ये गेली आणि हा बाहेर ब्रश करत होता. ती बाहेर आली.

“तू लंगडत का आहेस?”

“अरे काही नाही. असच.”

“सांगतेस का मला.”

“काही नाही रे.”

“आणि हे ओठाला काय झालंय. सुजलाय तो.”

“काही नाही झालंय. चल बरेच वाजलेत झोपुया. तुला झोपेची गरज आहे.”

“मला सांग काय झालंय.”

    तिचे डोळे भरून आले.

“त्याने मारले मला.”

“कोणी?”

“बॉयफ्रेंड.”

“काय? आणि का?”

“जाऊ दे ना ते.”

“सांग.”

“अरे तुझ्याबद्दल बोललो बोलता बोलता तर संशय घेतला माझ्यावर आणि मला मारले त्याने.”

“इतके?”

“हो. लाथ मारली म्हणून लंगडत आहे.” ती रडू लागली. त्याला राहवले नाही. त्याने तिला मिठीत घेतले आणि तिला समजावू लागला.

“झालं ते झालं. तू पुढे काय ठरवले आहेस?”

“तिने काहीच ठरवलं नाही. आम्ही ठरवलं. आम्ही ब्रेकअप घडवून आणला त्यांचा सकाळीच आणि सगळे इकडे निघून आलो.” तिचा एक मित्र बाहेर येत बोलला. मित्र येताच मिठी सुटली. 

     मग बराचवेळ सगळं घडलेलं सांगितलं तिने आणि मग तिघे आत आले. चौघांनी अप्पर आणि लोवर सीट मटकावली होती. आता दोघांसाठी मधल्या सीट्स रिकाम्या होत्या. ती मधल्या सीटवर गेली. त्याने ब्लॅंकेट तिच्या अंगावर नीट दिले आणि नकळत तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. 

“गुड नाईट.”

“गुड नाईट.”

      सकाळी सोलापूर स्टेशनला उतरल्यावर एक ट्रॅव्हल्स कंपनीने गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर परत सोलापूर असा प्लॅन दिला आणि फक्त १६ सीटर बस होती. ह्यांनी तो प्लॅन घेतला. बस सोलापूरच्या एका हॉटेलला थांबली. तिथे अंघोळ, नाश्ता वगैरे होणार होता. तो रेडी होऊन टेबलावर तिची वाट पाहत होता. थोड्यावेळाने ती आली. तिला पाहताच तो एकदम खुश झाला. त्याच्याकडे तिचा जो फोटो होता त्याच फोटोतली साडी ती नेसून आलेली. खूप गोड दिसत होती. तिला मिठीत घ्यावं म्हणून तो उठला पण ती आपली फक्त मैत्रीण आहे हे लक्षात आल्यावर तो आपल्या खुर्चीवर बसला. तिलाही ते जाणवले की त्याला मिठीत घ्यायचं होत. 

     नाश्ता झाल्यावर ह्यांचा प्रवास सुरु झाला. गाणगापूर पोहचल्यावर दर्शन झाल्यावर ते अक्कलकोटच्या दिशेने निघाले. त्या सगळ्यांसाठी एक कॉमन हॉल देण्यात आला होता. अक्कलकोटला दर्शनच्या रांगेत तो खूप भावुक झाला. त्याला स्वप्न आठवत होत. त्याचे डोळे डबडबले होते. स्वामींच्या अंगणात त्याच स्वप्न साकार होत. तिला लग्नासाठी विचारायचं असे त्याने ठरवले पण अशा ठिकाणी प्रपोज करणे म्हणजे त्याला अवघड वाटत होतं. स्वामींनी सांगितलं तर स्वामीच वाट दाखवतील. त्याचे डोळे बघून त्याच्या पुढे उभी असणारी ती बोलली.

“काय झालं? डोळे का भरून आलेत?”

“काही नाही. बऱ्याच वर्षांनी आलो ना म्हणून.” त्याने वेळ मारून नेली.

     रांग हळूहळू पुढे सरकत होती. दोघांच्या हातात फुल आणि पूजेचे सामान होते. ते दोघे एकदम पाया पडायला समोर आले तर तर तिथले भटजी म्हणाले.

“या वहिनी, या दादा. वेगवेगळी परडी कशाला आणली?”

“अहो काका, आम्ही मित्र आहोत.”

“ओहह, माफ करा.”

     घटनेचा फायदा घेत तो मोठ्याने बोलला.

“हे स्वामी, आज ही माझी मैत्रीण म्हणून सोबत आहे. पुढच्यावेळी माझी बायको म्हणून आम्ही दर्शनाला येऊ असा आशीर्वाद द्या.”

“अरे.” ती त्याच्याकडे बघत बोलली.

“लग्न करशील माझ्याशी?” डोळ्याचे पाते लवते ना लवते त्याने तिथेच मागणी घातली. ती एकदम भावनिक झाली, डोळे भरले आणि ती बोलली.

“हो.”

     आजूबाजूच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि स्वामींच्या नावाचा जयजयकार झाला. तेवढ्यात भटजी काका म्हणाले.

“बाळा, मिळाले ना जे हवे होते ते. गेले कित्येक महिने तू स्वामींना सांगत होतास ना. त्यांनी सांगितले तसेच झाले ना?”.

  हे ऐकून त्याला धक्काच बसला. त्याने होकारार्थी मान हलवली आणि ते हॉलवर निघून गेले. हॉलवर आल्यावर त्याने आपली डायरी काढली आणि त्यात लिहिले. 

‘जसे स्वामींनी स्वप्नात सांगितले होते तेच झाले. माझं स्वप्न पूर्ण होतंय.’ त्याने डायरी पुन्हा बॅगेत ठेवली. 

       इतक्यात त्याचा फोन वाजला.

“हॅलो.”

“हा एच. आर. सर. इतक्या संध्याकाळी फोन आणि तो ही शनिवारी.”

“हो, कामही तसेच होते “

“अच्छा, बोला ना.”

“सोमवारी येऊ शकता का सकाळी कंपनी मध्ये?”

“सोमवारी नाही जमणार कारण मी सध्या बाहेरगावी आहे. मंगळवारी जमेल.”

“नक्की जमेल का मंगळवारी की तुमची कंपनी पुन्हा काचकूच करेल.”

“नाही करणार, मी येईन मंगळवारी.”

“ओके. तुम्हाला मेल केलाय तो चेक करा.”

“ओके.”

“गुड नाईट.”

“गुड नाईट.”

      त्याने मेल चेक केला तर त्याला अपॉइंटमेंट लेटर आले होते. मंगळवारी जॉइनिंग होते आणि ४५,००० पगार देणार होती कंपनी आणि ते ही ८ तासांचे. आता ज्या कंपनीत होता तिथे १२ तासांची ड्युटी होती. एका मागोमाग एक सुखद धक्के त्याला मिळत होते. 

     आईला सांगावे म्हणून कॉल केला पण आई व्यस्त असल्याने बोलणं नाही झालं म्हणून तिला व्हाट्सअप्प करायला गेला आणि पाहतो तर काय. जिच्याशी त्याला लग्न करायचं होतं तिचेच स्थळ आले होते त्याला. सगळ्या गोष्टी अशा जुळून आलेल्या की विश्वास बसत नव्हता.

     रात्री बॅगमधून ब्लॅंकेट काढताना ती डायरी खाली पडली पण त्याला ते कळलेच नाही आणि नेमकी ती डायरी तिला सापडली. तो खूप दमला होता आणि आनंदात होता, त्यामुळे बऱ्याच महिन्यांनी तो गाढ झोपला. पण ती झोपली नव्हती. ब्लॅंकेटमध्ये मोबाईल टॉर्च लावून ती त्याची डायरी वाचू लागली. जस जसे ती वाचत पुढे जाऊ लागली तस तसे तिला कळून चुकलं की त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे आणि पुढे जे वाचले ते खूप धक्कादायक होत. काल येण्यापूर्वी त्याने डायरीमध्ये लिहिले होते.

‘जसे सांगितले आहे तसे मी स्वामींच्या अंगणात जात आहे. ट्रेनमध्ये ती होती पण तिच्यासोबत वाईट घडलं. तिचा ब्रेकअप झालाय पण तिला अशावेळी आपल्या भावना सांगणे चूक होईल. तिला गमवायच नाहीये. कस सांगू माझं किती प्रेम आहे तिच्यावर. असो जे होईल ते होईल.’

     आज त्याने लिहिले होते.

‘जसे स्वामींनी स्वप्नात सांगितले होते तेच झाले. माझं स्वप्न पूर्ण होतंय. पण आता वेगळीच भीती वाटतेय मला. माझ्याकडे स्वतःचे घर नाहीये ना कार आहे. एक जुनी बाईक आहे. घरी सुखसोई आहेत पण अपुऱ्या आहेत. माझा पगारही तोकडा आहे. ती जॉब करते की नाही माहीत नाही पण हे सगळं समजल्यावर ती लग्नाला तयार होईल का? तीच राहणीमान माझ्यापेक्षा कितीतरी उच्च आहे. ती ऍडजस्ट करेल की नकार देईल मला काय माहित. इतर मुलींनाप्रमाणे तिच्याही काही अपेक्षा असतील. स्वामी इथवर साथ दिलीत पुढेही द्या.’

       ‘ती आली आणि दिवस बदलले. नवीन नोकरी लागली, पगार ठीक आहे पण आता तिच्या शेवटच्या उत्तराची वाट पाहतोय.’

      ते सगळे शब्द तिच्या डोळ्यासमोर फिरू लागले. तिने ती डायरी गुपचूप त्याच्या बॅगेत ठेवली आणि मनाशी काहीतरी ठरवून ती झोपून गेली. आता उद्या पूर्ण दिवस आणि प्रवासातील रात्र त्यांच्याकडे होती. सकाळी उठल्यापासून अगदी बायको असल्यासारखी ती त्याच्यासोबत वागत होती. दोघे एकमेकांना समजून, अनुभवून घेत होते. ठरल्याप्रमाणे तुळजापूर आणि पंढरपूर करून ते सगळे सिद्धेश्वर मंदिरात आले आणि मग रात्री त्यांनी सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडली.

      इथे मात्र प्रॉब्लेम झाला. त्याचे तिकीट दुसऱ्या डब्यात होते. तिने त्यांच्या इथलं एक तिकीट खूप विनंत्या करून त्याच्या तिकिटाशी बदलून घेतले आणि तो ह्या पाच जणांसोबत आला. गप्पा मारल्यावर झोपायची वेळ झाली. तिच्या अंगावर ब्लॅंकेट टाकल्यावर त्याने पुन्हा तिच्या कपाळावर किस केला पण तिने त्याचा चेहरा हातात घेतला आणि त्या मंद प्रकाशात आपले ओठ तिच्या ओठांना लावले. त्याला तशीच मिठी मारली.

“मी फक्त तुझीच आहे. मला माफ कर मी तुझी डायरी वाचली. तू जसा आहेस तसाच मी तुला स्वीकारलं आहे. गेले वर्षभर मी तुझ्याशी इतकं वाईट वागूनही तुझ्या प्रेमात तसूभरही फरक नाहीये. गेल्या २ दिवसात तू मला खूप समजून घेतलंस, काळजी केलीस. एकदाही विनाकारण किंवा हेतुपुरस्सर स्पर्श नाही केलास. काल रात्री तुझ्या बाजूला झोपले पण तरीही अजिबात स्पर्श नाही उलट मध्ये मध्ये उठून अंगावर ब्लॅंकेट आहे की नाही बघत होतास. मला माफ कर रे. तुला ओळखू शकले नाही पण माझी चूक मी सुधारली आहे. मला माझा सखा, माझा प्रियकर, माझा जीवन सोबती मिळालाय. Love you so much.”

   तिच्या मानेवर त्याचे अश्रू पडले तेव्हा ती भानावर आली आणि तिने मिठी सोडली. त्याने काहीच उत्तर नाही दिले आणि तो आपल्या जागेवर झोपून गेला. सकाळी दादरला उतरल्यावर निरोप घेताना थोडं जड गेलं पण जाणे भाग होते. तो तसाच त्याच्या कंपनीत गेला आणि राजीनामा दिला कारण उद्यापासून तो नवीन कंपनीमध्ये जाणार होता. सगळं पार पाडून तो घरी आला तर दारात हे ५ जण बसले होते. 

     पुढे लग्नाची बोलणी झाली आणि १ महिन्यात साखरपुडा झाला, पुढच्या १५ दिवसात दोघांच्या इच्छेने कोर्ट मॅरेज झालं. हा हा म्हणता म्हणता लग्नाला २ वर्ष झाली. २०२४ मध्ये त्यांच्या समाजाचा एक कार्यक्रम होता आणि त्यात ही बोलत होती.

“इथे उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. खर सांगायचं तर इथे उपस्थित असलेल्या बऱ्याच विवाहित आणि अविवाहित तरुणींचे मी आभार मानते कारण त्यांनी नकार दिला होता म्हणून मला इतका चांगला, सामंजस्य, प्रेमळ, काळजी करणारा राजकुमार मिळाला. हो राजकुमारच. त्याला तुम्ही नाकारलेत कारण तो विरारला राहतो, मान्य तिकडे गर्दी असते पण निदान ते सेफ तरी आहे. तुम्ही नाकारलेत त्याच्याकडे स्वतःचे घर नाही, गाडी नाही, आई वडील नकोत, चांगला जॉब नाही वगैरे वगैरे. आज आमच्या लग्नाला २ वर्ष झालीत आणि आज आमच्याकडे स्वतःचा २ bhk फ्लॅट आहे, कार आहे, देवासारखे सासू सासरे माझ्यासोबत राहतात. एवढेच काय त्यावेळी तो २३,००० महिना कमवत होता आता तो ५५,००० महिना कमावत आहे. सगळ्या गोष्टी तशाच राहत नाहीत. काही बदलतात. म्हणजे हे असे झाले in search of Gold, you lost the diamond. तो डायमंड माझ्या आयुष्यात आहे आता. मीही त्याला २ वेळा नाकारलं होत पण जेव्हा मी वाईट परिस्थितीत होतो तेव्हा हाच माझ्या मागे उभा राहिला. मी जशी आहे तशी त्याने स्वीकारलं. आमचं लग्न झालं तेव्हा त्याच्याकडे स्वतःच घरही नव्हतं पण त्यावरून आमच्यात कधी भांडण नाही झालं. दोघांनी कष्ट करून एवढं उभारलं. त्याचा स्वभाव इतका छान आहे की गेल्या २ वर्षात मला पिरएड्स आल्यावर त्याने ते ५ दिवस मला काहीच काम करू नाही दिल. सकाळी चहा नाश्ता करून जायचा तो कामाला. दुपारचं जेवण बाहेरून मागवायचे आणि रात्रीचे जेवण आम्ही बाहेर करायचो. माझ कायम wfh, कधी कधी रात्री काम करावे लागायचे पण कधी कसली नाराजी व्यक्त नाही केली. गेल्यावर्षी कळलं की माझ्यात दोष आहे म्हणून आम्हाला बाळ होऊ शकत नाही. पण हे जर इतरांना कळलं असत तर सगळ्यांनी मला नावे ठेवली असती म्हणून दोष त्याच्यात आहे म्हणून त्याने सगळ्यांना सांगितलं. अगदी माझ्या घरी सुद्धा कोणाला माहीत नव्हतं की खरा दोष माझ्यात आहे. त्यानंतर ट्रीटमेंट करून मला दिवस गेले पण पाचवा महिना सुरू असताना एका अपघातात बाळ पोटातच गेले. तरीही हा एकदम हळवा माणूस अगदी खंबीरपणे माझ्या सोबत उभा राहिला. पुन्हा कधी आई होणार नाही म्हणून घटस्फोट घेऊन दुसरं लग्न कर म्हणून मागे लागलो होतो तर आपल्याला बाळ नसलं म्हणून काय झालं, ज्या बाळांना आई बाप नाहीत त्यांचे आपण आई बाप बनू. आजच्या तारखेला आम्ही ३ मुली आणि १ मुलाचे आई बाबा आहोत. भले ते चौघे त्या आश्रमात रहातात आणि त्यांना माहीतही नाही व तरीही ती आमची मूल आहेत.  खरेच या लग्नाच्या गाठी वरती बांधल्या जातात पण त्या जुळेपर्यंत खूप कष्ट करावे लागतात. जाता जाता इतकेच सांगेन. भौतिक सुखाच्या मागे लागू नका, वेळेच्या आधी आणि नाशीबापेक्षा जास्त काहीच मिळत नाही. जेवढ्या लवकर या गाठी जुळवून घ्याल तितकेच चांगलं आहे.

जाता जाता  

डिअर नवऱ्या,

उमटली या नशिबी,

नाजुक अशी आठी..

जुळलं नातं तुझ्याशी,

बाधंत रेशीमगाठी…..!!

Love you नवऱ्या.”

        इतकं बोलून ती स्टेजवरून खाली उतरली. कार्यक्रम संपल्यावर त्यांना त्यांच्या गाडीतून परत जाताना बघून त्याला नाकारलेल्या मुली मात्र स्वतःला कोसत होत्या.

(समाप्त)

©आशिष म. देवरुखकर

======================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *