Skip to content Skip to sidebar Skip to footer

रेशीमधागे

मेहेंदळे व रोकड्यांची घरं अगदी बाजूबाजूला होती. दोन्ही शेजारणींमधे अगदी बहिणीबहिणीसारखं सख्य होतं. गावं जवळची होती. त्यामुळे खाणंपिणं,राहणीमान यात बरंच साम्य होतं. मालू आणि हेमा..सख्ख्या शेजारणी. दोघींचीही लग्न एकाच वर्षातली. वयातही दोनेक वर्षांचा काय तो फरक. सकाळी उठल्यापासनं दोन्ही घरातल्या माणसांचा एकमेकांकडे राबता असायचा. समोरचे दिगुअण्णा चेष्टेने म्हणायचे..अरे ती मधली भिंत पाडा रे.

मालूचे यजमान मनोहर व हेमाचे हेमंत दोघे एकाच कंपनीत कामाला होते. जाताना एकमेकांशी गप्पा मारत जायचे. येतानाही किरकोळ खरेदी एकत्र करत..कुठे गाडीवर वडापाव खात..कधी कैलाशची मलईदार लस्सी पिऊन घरी परतत.

मालू जेंव्हा गर्भार राहिली तेंव्हा हेमाला कोण आनंद झाला. नुकतीच हेमाची आईही तिच्याकडे रहायला आली होती.

मालूची आई नसल्याने मालूचे डोहाळे पुरवण्याचं काम हेमाच्या आईने हौसेने केलं. एकदा तर मालूला दगड खावेसे वाटू लागले. हेमाची आई हसली..म्हणाली,काय गं बाई हे डोहाळे. तिने मग भडभुंज्याच्या दुकानात खायचे दगड मिळतात म्हणे ते मालूला आणून दिले.

मालूच्या पोटात अन्नाचा कण रहात नव्हता.  हेमा तिला पेज करुन द्यायची, कधी बळेबळे थोडा वरणभात खाऊ घालायची,तिच्या तोंडाला चव यावी म्हणून सोबतीला सुक्या चटण्या,लोणची वाढायची.

मालूला हेमाच्या आईने आई नसल्याची उणीव मुळी जाणवूच दिली नाही. गावी जातानाही जपून रहा गो मालू असं अधिकारवजा बजावून गेली. दुपारी पाणी यायचं तेंव्हा खरी धावपळ व्हायची. खाली नळ होते,तिथून आणावं लागायचं. हेमा मालूला पाणी आणायला मदत करायची तरी एकदा लाकडी जिन्यातनं मालूचा पाय घसरला. चारचौघी शेजारणींनी मिळून तिला डॉक्टरकडे न्हेलं. डॉक्टरांनी तिला तपासलं व बाळ अगदी व्यवस्थित असल्याचा निर्वाळा दिला. मग मात्र चाळीतलेच शेजारीपाजारी मालूचं पाणी भरु लागले.

मालूचे दिवस भरत आले तसे सख्याशेजारणी मालूवर अधिकच लक्ष ठेवू लागल्या. एकदा रात्रीच्या वेळी नेमकं मालूच्या पोटात दुखू लागलं.  शेजारीपाजारी मदतीला आले. मालूला एडमिट केलं.  डॉक्टर येऊन तपासणार इतक्यात मालूची प्रसुती झालीदेखील. छान लांबलचक तीन पौंडाची छोकरी झाली मालूला.

इवल्याशा गुलाबी मुठी आवळत ते लालगुलाबी बाळ डोळे किलकिले करत बघू लागलं. नर्सने हेमाच्या हाती बाळ दिलं. बाळ अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी किंचीत ओठ वाकडा करत मंदस हसलं.

हेमा किती खूष झाली! छकुलीस म्हणाली,मी तुझी मावशी बरं का! छकुलीपण जुनी ओळख असल्यासारखी खुदकन हसली नि मग जणू काही आपण फार मोठ्ठं काम केलंय..या आविर्भावात इवलुशी जिवणी उघडून जांभई देऊ लागली. हेमाने घरुन आणलेल्या सुती साडीच्या दुपट्यात तिला अलगद गुंडाळलं तसं ती एखाद्या जत्रेतल्या बाहुलीसारखीच दिसू लागली.

मालूच्या छातीशी छकुलीला धरुन हेमा उभी राहिली मात्र, तिला जाणवलं तिलाच पान्हा फुटतोय. स्वतःच्याच मनाशी ती गोड हसली. मालूचं लक्षच नव्हतं हेमाकडे..ती छकुलीचं जावळ बोटांनी कुरवाळत होती. दोन्ही अंगाला छकुलीला धरुन झालं. छकुली दूध पितापिता गाढ झोपली. आईचं दूध तिच्या ओठाच्या कडांतून ओघळलं. छकुलीच्या अंगाला आता आईच्या दुधाचा एक विशिष्ट सुगंध येऊ लागला. हेमाने तो भरभरुन घेतला.

सिस्टर बोलली..कितीवेळ घेऊन रहाणार तिला असं. झोपवा त्या पाळण्यात.. तसं काहीशा नाराजीनेच हेमाने छकुलीला अलगद पाळण्यात ठेवलं. छकुली छान झोपी गेली. तितक्यात मनोहरभावजी आले. त्या दोघांना खाजगी बोलायचं असणार हे जाणून हेमा दोनचार शब्द मनोहरभावजींशी बोलून तिथून निघाली. आता तिला मालूसाठी मेथीचीभाजी पोळीचा डबा करायचा होता,डिंकाचे लाडू करायचे होते. तिने कुठुनसं ऐकलेलं..मेथीची भाजीपोळी,डिंकाचे लाडू बाळंतीणीला द्यावी असं.

दोन रात्री हेमा मालूसोबत इस्पितळात राहिली. बाळबाळंतीणीला घेऊन आली. मालूचं दार उघडून तिने मालू व तिच्या हातातल्या छकुलीवरनं भाकरतुकडा ओवाळून टाकला. मालूच्या पायावर पाणी ओतलं, मायलेकींच्या डोळ्यांना पाणी लावलं.  दोन्ही घरात आता छकुलीच्या रुपाने आनंद नांदणार होता. हेमाने छकुलीला आंघोळ घालायचं काम स्वतःच्या अंगावर घेतलं. मालूसाठी मालीशवाली शोधून घेऊन आली.

महिनाभर हेमाने बाळाला हौसेने आंघोळ घातली. हळूहळू मालूही सावरु लागली. ती थोडीथोडी घरातली कामं व छकुलीस सांभाळणं करु लागली. हेमा तर सावलीसारखी त्यांच्या अवतीभवती असायची.

लग्नाला दोन वर्ष झाली तरी हेमाला मुल होत नव्हतं. दोघांचही चेकअप निष्णात डॉक्टरांकडून झालं होतं. हेमंतमधे दोष होता. आपला नवरा मुल देण्यास पात्र नाही हे धड ती मालूस..तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणीसही सांगू शकत नव्हती. आतल्या आत दु:ख रिचवून ती चेहऱ्यावर हास्य ठेवण्याचा बेमालूम प्रयत्न करायची.

छकुलीला आता सारखं कडेवर घेतलेलं हवं असायचं. हेमा तिला कडेवर घेऊन गाड्या,कबुतर,पोपट चिऊकाऊ दाखवायची. छकुली मग हात वर करुन आनंद व्यक्त करायची. आजुबाजूच्या बाया हेमाच्या कडेवर छकुलीला पाहून म्हणायच्या..”आता छकुलीसंग खेळाया आणा लहानगं. बगा मनावर घेवा.”हेमाचं काळीज तुटायचं तरी ती हसून प्रतिसाद द्यायची.

छकुलीचं आरोही हे नाव शाळेपुरतच मर्यादित राहिलं.
छकुली आई,मावशीच्या प्रेमळ सावलीत मोठी होऊ लागली. बघता बघता लग्नाच्या वयाची झाली. छकुलीचं लग्न तिला आवडलेल्या चिन्मय इंगळेशी झालं. छकुलीचे आईबाबा मग ही खोली सोडून गावी रहावयास गेले. छकुलीने आईच्या खोलीत संसार थाटला. हेमामावशी तिथे असल्याकारणाने छकुलीची मालूला काळजी नव्हती.

हेमाच्या यजमानांना अल्पशा आजारात देवाज्ञा झाली. मालू व मनोहर , हेमाचं सांत्वन करायला येऊन गेले. जाताना मालूने लेकीला सांगितलं,”हेमामावशीची अवस्था बघवत नाहीए. जोडीदाराचं जाणं फारच मनाला लावून घेतलंय तिने. अशीच राहिली तर डिप्रेशनमधे जाईल ती.”

छकुलीकडून हेमामावशीला यातून बाहेर काढण्याचं आश्वासन घेऊनच मालू व मनोहर गावी जायला निघाले.

छकुली ऑफिसवरून येताना हेमामावशीसाठी भाजी,फळं,इतर सामान आणू लागली. तिला औषध,गोळ्या आणून देऊ लागली. शक्य असेल तेवढा वेळ तिच्यासोबत घालवू लागली. सुट्टीच्या दिवशी तिला बागेत, तळ्याकाठी न्हेऊ लागली. छकुलीच्या मायेमुळे का होईना हेमामावशी परत माणसांत येऊ लागली.

मावशीभाचींच्या दोस्तीत चिन्मयची मात्र गोची होऊ  लागली. त्याला हे आरोहीचं सतत मावशी मावशी करणं आवडंंत नव्हतं.

एकदा तो आरोहीला(छकुलीला) नाटक बघायला न्हेण्यासाठी ऑफिसातनं लवकर घरी आला तर घराला कुलुप. त्याने जवळच्या चावीने कुलुप उघडलं व आरोहीला फोन केला तर आरोही हेमामावशीसोबत दवाखान्यात गेली होती. चिन्मय जाम चिडला.

आरोही घरी येताच त्याने सगळा राग आरोहीवर काढला..”का केलंसच का लग्न तू..रहायचं होतंस मावशीच्या कुशीत..कधी बाहेर जायचं..खरेदीला जायचं..बागेत जायचं..तर तू आपली पळालेली मावशीकडे. तिचं तिला डॉक्टरकडे जाता येत नाही का.. एका लिमिटपर्यंत तुझं मावशीप्रेम ठीक पण तुम्हा दोघींच्या गट्टीत मला माझी बायको मिळतच नाहीए. कळतय का तुला..लग्न करून पस्तावतोय मी.”

आरोहीला खरंतर चिन्मयला गुड न्युज द्यायची होती. लाजतमुरडत मुखकमलावर तळवे धरत चिन्मय तू बाबा होणारैस असं सांगायचं होतं..पण..चिन्मयच्या बोलण्याने आरोही दुखावली गेली.

आरोहीलाच बरं वाटत नव्हतं म्हणून हेमामावशी तिला दवाखान्यात घेऊन गेली होती.

त्यादिवशी आरोही बाजारात डोळ्यासमोर अंधारी आल्याने पडतच होती पण हेमामावशीसोबत असल्याने मावशीनेच तिला सावरलं होतं. तिचं घामानं चिंब झालेलं अंग पुसलं होतं..हे सारं आरोहीने रडतरडत चिन्मयला सांगितलं नि भिंतीला तोंड करुन मुसमुसत राहिली. चिन्मय हे असं एवढं काही बोलेल याची तिला कल्पनाच नव्हती. हुंदक्यांनी आरोहीचं अंग गदगदत होतं.

चिन्मयला आता त्याच्या वागण्याचा,आततायीपणाचा पश्चाताप झाला. त्याने मनोमन हेमामावशीचे आभार मानले व लहान बाळासारखा कान पकडून आरोहीच्या समोर जाऊन बसला.

“आरोही, चुकलो मी. सॉरी गं..खरंच एक्स्ट्रीमली सॉरी.” तो अगदी काकुळत्या सुरात म्हणाला. आपल्या बोटांनी त्याने आरोहीच्या गालावरची आसवं पुसली.

“माफ नाही करणार तुझ्या चिन्मयला..” तो तिच्या डोळ्यांत बघत आर्जव करू लागला. नवऱ्याचं ते सॉरीलं रुपडं पाहून आरोहीचा राग कुठल्याकुठे पळाला चिन्मयच्या छातीवर लाडीक गुद्दे मारत ती चिन्मयच्या कुशीत शिरली. सॉरी गं राणी खरंच सॉरी म्हणत चिन्मयने तिच्या पापण्यांवर रेंगाळलेले अश्रु पुसले.

आरोहीच्या औषधगोळ्या हेमामावशीकडेच राहिल्याने हेमामावशी लगबगीने गोळ्या देण्यासाठी म्हणून आली होती. ती दार ठोकवणार तोच चिन्मय व आरोहीतलं रुसव्याफुगव्याचं संभाषण तिच्या कानावर गेलं..तिचे पाय तिथेच रेंगाळले.. चिन्मयचा त्रागा, आरोहीचं मुसमुसणं, त्यांची समेट, त्याचं आरोहीला मनवणं ती ऐकत होती.

चिन्मयचं आधीचं बोलणं तिच्या काळजाला लागलं. घरी येऊन हेमा खूप रडली मग मात्र डोळे पुसलेन. स्वत:शी आत्मसंवाद साधला..”हेमा इथं तू तुझ्या दु:खाला साजरं करत बसली आहेस. तुला सावरण्यासाठी छकुली जीवतोड प्रयत्न करतेय, सावलीसारखी अवतीभवती असते खरी पण यात तिचं वेवाहिक जीवन धोक्यात येतय हे कसं कळलं नाही तुला!”

  हेमाने मनाशी पक्कं ठरवलं,”झालं ते आलं. माझ्या छकुलीची प्रेमवेल मी अशी खुरटू देणार नाही.

मी छकुलीला चिन्मयवर प्रेम करण्याचे धडे देईन, होता होई तो स्वत:च्या दु:खाचा, वेदंनांचा भार त्या दोघांवर पडू देणार नाही.”

आता हेमा फक्त चिन्मय नसतानाच आरोहीकडे जाऊ लागली. “आरोही बाळा, आता अरबटचरबट खायचं नाही, वातूळ पदार्थ खाल्लेस तर बाळाला त्रास होईल हं.” तिने आरोहीला दटावणीच्या सुरात सांगितलं.

हेमा तिला चिन्मयच्या आवडीचा स्वैंपाक करायला सांगू लागली. आरोहीने हेमावशीच्या रेसिपीनुसार चिन्मयच्या आवडीच्या ओल्या नारळाच्या करंज्या केल्या.  त्याच्या आवडीचा मसालेभात , छोले, कढी..हे असं आवडीचं खाऊन, आरोहीला त्याच्या मनासारखं सजलंधजलेलं पाहून चिन्मय अगदी गुल होऊ लागला. चिन्मय ऩ आरोहीतली रुसवाफुगवी कमी होऊ लागली.

आरोहीला कोरड्या उलट्या व्हायला सुरूवात झाली. अन्नाचा कण टिकेना तिच्या पोटात तेंव्हा तिची स्थिती पाहून चिन्मय गोंधळून गेला. त्याने हेमामावशीला बोलवून आणलं. हेमाने तिला घरगुती औषध करून दिलं. तिच्या आईला द्यायची तसाच मऊभात, मेतकूट ती आता आरोहीला बळेबळेच खायला घालू लागली.

हेमामावशीच्या जीवावर आरोहीला सोडून चिन्मय ऑफिसला जाऊ लागला. आता त्याला जाणवत होतं, तो हेमामावशीला कबाबमें हड्डी समजत होता पण ते चूक होतं. हेमामावशीसारख्या वडिलधाऱ्या माणसांची साथ मोलाची असते हे तो समजून चुकला. परत कधीच त्याने आरोहीला हेमामावशीवरून बोल लावले नाहीत उलटपक्षी तोच आता हेमामावशीला आईप्रमाणे जपू लागला. तिच्या तब्येतीची चौकशी करू लागला.

ही नाती रक्ताची नव्हतीच, अलवार विणलेले मायेचे रेशीमधागे होते ते, गैरसमजाची निरगाठ मधे पडतापडता हेमामावशीच्या सजगतेने वाचली होती. हेमामावशीच्या प्रेमळ स्वभावाने तिने चिन्मयचं मनंही जिंकलं नि रक्ताची मुलं नसतानाही आज्जी होण्याची स्वप्नं ती हक्काने पाहत होती.

—–समाप्त

©® सौ. गीता गजानन गरुड.

==================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.