Skip to content Skip to sidebar Skip to footer

पश्चाताप…

संध्याकाळची वेळ होती अरूणा संध्याकाळची दिवाबत्ती करून निषादची वाट पाहत बसली होती…पण त्याअगोदर आपले सासरे गणपतराव यांच्यासाठीचा सगळा स्वयंपाक करून ठेवला होता…चहापानही झालं होत…पाच वर्षांचा निरव नेहमीप्रमाणे विडिओ गेम्स खेळत होता…गणपतराव आपल्या सुनेशी नेहमीप्रमाणे बोलत असतात…घरात इनमिन चार माणसं…अरूणा दिवसभर कामात असल्याने घरात निरवशिवाय मनोरंजनाचं साधन काहीच नव्हतं…

टीव्ही पाहून पाहून तरी किती पाहणार…म्हणून पाच वर्षाच्या निरवबरोबर आजोबा बोबड्या बोलत खेळत असे…बोलत असे….अनायसे अरुणाचाही स्वयंपाक,चहा,दिवेलागण सगळं झालं असल्याने आवरून थोडासा मोकळा वेळ मिळाला होता म्हणून निवांत गणपतरावांशी बोलत बसली होती.

अरूणा – काय मग…बाबा.. गुडघेदुखी जाणवतेय अजून…तेल घेऊन येऊ आम्ही आज येताना…चालेन..

गणपतराव – तू आहेस म्हणून सगळं कसं ठेपशीर चाललंय…नाहीतर कुत्रे हाल नसते खाल्ले माझे…

अरूणा – बाबा…असं का हो बोलता…हे काय इतके वाईट नाहीत हा…त्यांच्या डोळ्यात नेहमी मी तुमच्याबद्दलची काळजी पाहत आलेय…तुम्ही गैरसमज करून घेऊ नका…

गणपतराव – नाही ग पोरी…मला खूप अपराध्यासारखा वाटतंय…त्यात त्यात निषादचीही चूक नाहीय…

अरूणा – [विषय बदलून म्हणते] बाबा…तुम्ही असं का नाही करत…आमच्याबरोबरच चला ना आज डिनरला..खूप मस्त वाटेल तुम्हाला…निरवने काल हट्ट केला म्हणून यांनी आज डिनरचा प्रोग्रॅम केला…[निरव आपल्या बोबड्या बोलत आजोबाना म्हणतो]

निरव – आजोबा…टिकलं खूप मज्जा आहे ना आज…या ना आज्जो…

गणपतराव – [डोळ्यात पाणी आणून म्हणतात] नको बाळा…नको बाहेरच नाही खात मी जास्त…तुझ्या आज्जोची तबियत बिघडेल की…मग डॉकटर अंकल इंजेकशन देतील मला…

इतक्यात आपल्या वडिलांच्या गाडीचा आवाज निरवला येतो…आवाज आल्या-आल्या अरूणा परत सगळे अस्ताव्यस्त पडलेलं सामान आवरायला घेते…आणि गणपतराव सुनबाईंना म्हणतात..

गणपतराव – अरूणा पोरी…माझ्यासाठी जास्त स्वयंपाक नाही ना करून ठेवला…उगाच वायाला जाईल गं…

अरुणा – नाही हो बाबा….आणि राहिलंच ना शिल्लक काही तर बघुयात उद्याच उद्या…हे आलेतच मीही आवरून ठेवलंय…यांना चहा वैगेरे देऊन निघतोच आहोत आम्ही…पण बाबा तुम्ही जेवण करून घ्या हा नक्की…[तेवढ्यात दारावरची बेल वाजते…अरुणा दरवाजा उघडते दारातच निषाद एक रंगीत कटाक्ष टाकत उभा असतो…आणि रागाने आपल्या बायकोला म्हणतो]

निषाद – अरुणा…आवरून ठेव म्हटलं होत तुला मी…अजून पसारा जसाच्या तसा दिसतोय…चल चहा आन मला निघायचंय लगेच…मी तोवर फ्रेश होऊन येतो…

आपल्या वडिलांशी न बोलताच निषाद अंघोळीसाठी जातो तेवढ्यात छोटा निरव आजोबांजवळ जाऊन बसतो…आणि आपल्या बोबड्या बोलांनी आजोबांवर माया करत असतो…काही वेळातच अरुणा आपलं आवरून बाहेर येते…निषादही अंघोळीहून बाहेर येतो…चहाचा घोट घेता-घेता आपल्या वडिलांना खोचकपणे म्हणतो…

निषाद – तीर्थरूप…शेफारून ठेऊ नका निरवला…नाहीतर तुमच्यासारखाच भविष्यात स्वतःच्या बायकोला गिळंकृत करेल…[हे ऐकताच अरुणा बाहेर येते आणि म्हणते]

अरुणा – निषाद…तुम्हाला कळतंय का काय म्हणताय ते…निदान या निरवसमोर तरी तुम्ही तुमचं पूर्ववैमनस्य उकरून काढू नका…

निषाद – तुला माहिती नाहीय काही…त्यामुळे तू गप्प बसलीस तरी चालेल आम्हाला…आवरलं असेल तर चटकन निघ…मी बाहेर गाडी बाहेर काढून येतोय…निरवला घेऊन खाली येशील पटकन…

निषाद झरझर जिने उतरून खाली जातो….गणपतराव अगदी खाली मन घालून अगदी मनातून खजील होऊन बसतात….अरुणाकडे फक्त नजरेने हळू आवाजात म्हणतात …

गणपतराव – जा…निरवला घेऊन खाली जा…नाहीतर परत पारा चढेल त्याचा…जा–जा…निरव जा बाळा पटकन ..

अरुणा – बाबा…काळजी घ्या पण तुम्ही स्वतःची…आम्ही लवकरच येतोय….!

गणपतराव – हो…हो …जा …बाय निरव…

निरव – बाय…आज्जो…!

दोघेही आजोबांचा निरोप घेऊन खाली येतात…गाडीमध्ये बसताचक्षणी अरुणाच्या डोळ्यातून पाणी येत…अगदी चिडीचूप शांतता गाडीत पसरते…गाडीमध्ये मागच्या सीटवर अरुणा बसलेली असते…पुढच्या सीटवर निरव आणि त्याचे वडील निषाद बसलेले असतात…निषादला आरश्यामधून आपल्या बायकोच्या डोळ्यातले पाणी दिसते….नंतर निषाद हॉटेलला गेल्यानंतर अरुणाला विचारतो…

निषाद – काय झालं रडायला….?

अरुणा – बायकोच्या डोळ्यातलं पाणी दिसत…आपल्या वडिलांच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसत तुम्हाला….!

निषाद – घ्या…बायकोच्या डोळ्यातलं पाणी दिसावं म्हणून….काही बायका सारख्या धडपडत असतात…इथं तर वेगळंच दृश्य आहे…मी का रडतीयस हे विचारतोय पण वेगळंच ऐकायला मिळतंय मला….चुकलंच माझं तुझी चौकशी करतोय ते….

निरव – पप्पा…तुम्ही मघाशी आज्जोला कसं बोललात ते आठवून रडू येतं होतं मम्माला…

अरुणा – पहा….काय वय आहे हो याच…याला कळलं सगळं…पण सगळं कळूनसुद्धा काहीच कळलं नाही याचा खोटा आव आणताय तुम्ही…ते म्हणतात ना झोपलेल्याला जागं करता येतं पण जागं असताना झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं उठवायचं…!

निषाद – अरुणा…तुला माहिती नाहीय काहीच…

अरुणा – मग मला अंधारात ठेवायचं का तुम्हाला कायम….

निषाद – हे बघ असं काहीच नाहीय….आणि तुला सांगून काय होणार आहे… 

अरुणा – कधीही सांगा तुम्हाला जसं जमेल तसं…पण निरव समोर नका सांगू एवढंच माझं म्हणणं आहे…

निषाद – ठीक आहे…पण ते मेनूकार्ड घे आणि ऑर्डर कर की पहिलं…

तिघेही त्यादिवशीची जेवणाचा आनंद घेतात…घरी मात्र गणपतराव आपली बायको निर्मला हिच्या आठवणीत रडत असतात…एकट्याला घर खायला उठतं…एक एक अशा आठवणी ताज्या होतात…त्याच आठवून गणपतराव जेवण करून घेतात… …त्यानंतर आरामखुर्चीत बसून एकटाच विचार करत असतात…निर्मला मी कधी तुझा विचार केलाच नाही…आज मला तुझी खूप आठवण येतेय…मी कारण नसताना तुझ्यावर हात उचलायचो…त्याची शिक्षा मला आज मिळतेय…माझा पोटचा पोरगा आज माझ्याशी नीट बोलत नाहीय यापेक्षा वाईट कुठली गोष्ट असू शकते…खरंच आज मला याचा पश्चाताप होतोय…असा विचार करता करता डोळ्यातल्या अश्रुंचे ओघळ गालावर पडत होते…डोळ्यावरचा चस्मा अश्रूंनी भिजला याचेही भान गणपतरावाना राहत नव्हते…इतक्यात दारावरची बेल वाजते…तसे गणपतराव भानावर येतात…आपल्या डोळ्यातले अश्रू घाई-घाईत पुसतात आणि दरवाजा उघडतात…दारात सुनबाई…आपला नातू आणि मुलगा उभे असतात…अरुणा आपल्या सासरेबुवांची चौकशी करते…जेवण करून घेतलंय असं कळताच सगळे फ्रेश होऊन येतात…दिवाणखान्यात आल्या आल्या…निषाद आपल्या वडिलांना ओरडून म्हणतो-

निषाद – तुम्हाला झोपायला काय झालं…? एवढा वेळ जागरण करून काय मिळणार आहे आत्ता…कुठली मीटिंग आहे की काय उद्या….नाही म्हणजे त्याच प्रिपरेशन करायचं की काय आता…गरज नसतानाही तुम्ही रिटायर झालात काय वय होत तेव्हा तुमचं…कमी वयात जबाबदारी एकट्याने पेललीय मी…माझी आई लवकर मला सोडून गेलीच नसती…कसलं निमित्त झालं…कधी काळजी घेतली नाही तिची तुम्ही…आणि आता विचार करण्यात काय अर्थ आहे…

अरुणा – अहो….रात्र खूप झालीय बाबांनाही झोपू द्यात….आत्ता काय वाद घालत बसण्याची वेळ आहे….वाजलेत किती हे तरी पहा ना निदान…

आपल्या बायकोचा चिडलेला आवाज ऐकताच निषाद झोपण्यासाठी गेला….निरवही तोपर्यंत झोपी जातो…बेडमध्ये येताच निषाद शांत होतो….गणपतराव मात्र आपल्या बेडवर पडल्या-पडल्या घराच्या छताकडे एकटक पाहत राहतात…अरुणा पाणी आणण्याच्या बहाण्याने किचनमध्ये जाते….आपल्या बेडमध्ये येताच निषादला पाणी देते…पहिला राग शांत करते…आपल्या नवऱ्याच्या शेजारी बसून मनातलं जाणून घ्यायला लागते…

अरुणा – निषाद…आता तरी सांगाल मला…का एवढा राग आपल्या जन्मदात्या बापावर…?

निषाद – मी दहा वर्षाचा होतो…बाबा असेच उशीरा येत असायचे सारखे…आई  रोज त्यांच्यासाठी जेवणाची

थांबायची…पण तरीही बाबा कधीच तिच्याशी बोलत नव्हते…तेव्हा या घरात माझे काका,काकू,अंतरा दीदी,आजी-आजोबा असे सगळे एकत्र राहायचो…बाबा नेहमी घरातल्या सगळ्या बायकांसाठी साड्या आणायचे पण नेहमी नवीन साडी पहिली निवडून घेण्याचा मान काकूला द्यायचे..आईने भरल्या घरात नेहमी दुसऱ्यांचाच विचार केला..स्वतःसाठी म्हणून ती कधीच जगली नाही…बाबांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधायची कायम आपलं मन मारत जगली ती…किती खस्ता खाल्ल्या आईने….एका आजाराचं निमित्त झालं गं…गर्भाशयाचा  कर्करोग  झाला होता आईला …सुरुवातीलाच तज्ज्ञांची ट्रीटमेंट घेतली असती तर…आज आई आपल्यामध्ये असती…

अरुणा – आईंनी सांगितलं नव्हतं तेव्हा कुणाला…

निषाद – कशी सांगणार…त्यावेळेस परिस्थिती खूप हलाखीची होती आमची…जेव्हा गरज होती अगदी त्याचवेळेला या माझ्या बापाने स्वतःची नोकरी सोडली…मला नाईलाजाने स्वतःच शिक्षण अर्धवट सोडून काम पकडावं लागलं…

अरुणा – पण त्यातून वाईट काहीच झालं नाही…उलट तुम्हाला चांगला कामाचा अनुभव मिळाला…आज तुम्ही स्वतःच्या पायावर तरी उभे आहात…ते फक्त बाबांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे…तुम्हाला तुमची जबाबदारी कळली तरी…

निषाद – सगळ्या नातेवाईकांचं करून घेतलं माझ्या आईकडून त्यांनी…पण तिच्यासाठी कुणीच उभं राहिलं नाही…बाबा तर दारू पिऊन यायचे आणि माझ्या आईला मारहाण करायचे…हे सगळं मी पाहिलंय…म्हणून मला या माणसाशी चांगलं बोलू वाटत नाही…एक प्रकारे खुनीच आहे माझा बाप…!

अरुणा – बाबांबद्दल उगाच काहीही बोलू नका…उद्या निरवही तुमच्याबाबतीत असं वागला तर कसं वाटेल तुम्हाला…काय अवस्था होईल तुमची तेव्हा.. ? याचा विचार करा आधी…

निषाद – मी काय माझ्या बायकोला मारहाण करत नाही…माझ्या क्रूर बापासारखं…

अरुणा – अहो…पण झालं…गेलं उगाच उगाळत बसण्यात काही अर्थ नाहीय….परवादिवशी आईंच श्राद्ध आहे…मला हे सगळं नकोय निदान त्यादिवशी तरी…तुम्हाला कुणी सांगितलं त्यांच्या मुळे हे सगळं झालंय…आपला हेका दाखवण्याचं तेही एक वय असत…जसं आत्ता तुम्ही राग धरून बसलात…केवढा हा राग…

निषाद – ज्यांनी अनुभवलंय…त्यांनाच माहिती आहे सगळं…तू पाहिलं नाहीस ते जवळून म्हणून तू अशी बोलतेस..

अरुणा – मी नसेलही पाहिलं…पण बाबांच्या डोळ्यातले अश्रू रोज पाहते मी…ते आजही आईंना खूप आठवत आहेत…

निषाद – मी नाही मानत हे सगळं…नाटक करत असतील…सिम्पथी मिळवण्यासाठी कुणी काहीही करेल…

अरुणा – ठीक आहे…तुम्हाला पटत नसेल तर याचाही अनुभव घ्याल तुम्ही एकदा…अनुभव येईल तेव्हा येईल…

असे म्हणून अरुणा बेडमधले दिवे विझवते…आणि डोळे मिटून पडते…पडल्या पडल्या मनाशीच काहीतरी ठरवत असते…खूप वेळ जागी राहते…पहाटे ३ वाजता डोळा लागतो…सकाळी ६ वाजताच अलार्म वाजताच जाग येते…सकाळचं सगळं आवरून…आपल्या सासूबाईंच्या श्राद्धाची तयारी करत असते…श्राद्धाची सगळी तयारी झाली असल्याने श्राद्धाच्या दिवशी फार धावपळ होत नाही…अरुणा निर्मलाताईंचा फोटो काढून स्वछ पुसून टेबलवर मांडते…नैवेद्य वाढून ठेवते…आपल्या आईच श्राद्ध म्हणून निषादही हाफ डे येणार असतो…नेहमीप्रमाणे बाकीची आवरा आवार करायला अरुणा स्वयंपाकघरात जाते…घरात कुणाचंच आपल्याकडं लक्ष नाहीय याचा अंदाज घेऊन गणपतराव भरल्या डोळ्यांनी निर्मलाताईंच्या तस्विरीपुढे उभे असतात…आणि म्हणतात, ” निर्मला…मला माफ कर गं…खूप चुकीचा वागलो मी तुझ्याशी…खूप छळल मी तुला…मीच कारणीभूत आहे सगळ्यासाठी…प्रत्येक वेळी तुला गृहीत धरायचो मी…तुही माझ्या स्वभावामुळे माझ्याशी बोलायची हिंमत करत नव्हतीस…मी खूप घालून-पाडून बोलायचो तुला…तरीही तू सगळं सहन करायचीस माझ्यासाठी आपल्या संसारासाठी…याचीच शिक्षा मी आत्ता भोगतोय गं…मी नोकरीसाठी बाहेर असायचो सारखा…त्यामुळं मला काहीच वाटत नसायचं…खरंच खूप सहन करायचीस तू घरी राहून…माझा मारही खुप खाल्लास तू…खूप क्रूर आहे ना मी…माझ्या बायकोच मन नाही ओळखू शकलो मी…..तू माझ्याशी अजूनही तितकंच प्रेम करतेस का गं….?” मागे अरुणा उभी राहून सगळं भरल्या डोळ्याने ऐकत असते…आणि गहिवरून आपल्या सासऱ्यांना म्हणते…” आईचं तुमच्यावर प्रेम होत म्हणून तर त्या सवाष्णं गेल्या ना….अगदी कपाळावर ठसठशीत कुंकू ठेऊन गेल्या…बाबा…त्या अजूनही खूप प्रेम करतात तुमच्यावर….जीवापाड प्रेम करतात…!” दरवाजा उघडाच असल्याने निषाद डायरेक्ट घरात आला आणि आपल्या वडिलांचं सगळं बोलणं ऐकलं मग मात्र निषादला…’आपल्या आईबद्दल अजूनही वडिलांच्या मनांत सॉफ्ट कॉर्नर आहे’ याची जिवंत जाणीव झाली…मग निषाद आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून अगदी हमसून-हमसून रडून घेतो…अरुणाने गॅलरीतच नैवेद्य ठेवला होता…एक कावळा नैवेद्य उचलत असताना जवळच्या पेल्याला कावळ्याच्या शेपटीचा धक्का लागतो म्हणून निरव गॅलरीत पाहायला जातो आणि आपल्या आईला म्हणतो…” मम्मा….हे बघ एक क्रो ने सगळं प्रसाद खाऊन टाकला..” हे ऐकताच अरुणा पाहते आणि निषादला बिलगून म्हणते….” पाहिलंत….आज खऱ्या अर्थाने आईंवर अंत्यसंस्कार झालेत…ते पहा…आज खऱ्या अर्थाने आई अनंतात विलीन झाल्या…आता तरी तुम्हाला कळलं ना बाबांना खरंच पश्चाताप होतोय….” आपल्या बायकोचे शब्द ऐकून निषादही हमसून-हमसून रडू लागतो….

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.