Skip to content Skip to sidebar Skip to footer

रंगात रंगले मी ! (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२

©️®️ स्वाती  बालूरकर

बिजलीच्या दुकानात आज सगळ्या प्रकारच्या आधुनिक व कलात्मक शोभेच्या वस्तु होत्या. तिच्या दुकानाचा पत्ता घेवून लोक खरीदीसाठी यायचे पण तिचं आयुष्य  आज जसं दिसतय तसं पूर्वीपासून नव्हतं.

  बिजली नावाप्रमाणेच दिसायला बिजली होती. वीज चमकताना जन्मली होती म्हणून बापाने बिजली असं नाव दिलं होतं.

दिसायला तेज , बोलायला तेज, शिकण्याचं प्रचंड  वेड.

लहानपण तांड्यावर  व भटकंतीत गेलं. मिळालं ते खायचं , मिळेल तसं रहायचं . . तक्रार न करता सहन करायचं हा स्वभावंच बनला होता.

कुठल्यातरी तांड्यावर राहताना एकदा तिने   शिकवणार्‍या शिक्षिकेला पाहिलं. 

कुतुहलाने झाडाखाली भरलेल्या शाळेला बघत बसली. 

त्या बाई तिला फार आवडल्या. 

त्या मुलांना बघून तिलाही मनापासून शिकावं वाटायला लागलं.

 दप्तर घेवून शाळेत जावं असं वाटायला लागलं.

शिक्षिकेनी तिला जवळ बोलावलं तर ती घाबरून धूम पळाली. 

 सगळ्या शिकणार्‍या  मुलामुलींचं , त्याच्या लिखाणाचं  तिला खूप कौतुक वाटायचं. 

सगळेच जण तसं नशीब घेवून जन्माला येत नाहित  जिथे शिकावं वाटल्यावर शिकायला मिळेल.

पाहून पाहून दोन चार अक्षरं ती शिकली होती. 

एक दिवस एक ग्रामसेविका त्यांच्या तांड्यावर भेट द्यायला आल्या . 

बिजलीला काटक्याने मातीत अक्षरं गिरवताना पाहून त्यांना खूप आश्चर्य  वाटलं.

आई वडिलांनाही नवलच वाटलं कारण त्यांच्या  नकळत ती हे शिकत होती.

ग्राम सेविकांनी आई-वडिलांना शिक्षणाचं महत्व समजावलं व शाळेतल्या जेवणाचं अमिशही दाखवलं . 

तिच्या तांड्यावरून जवळ असलेल्या गावात  शाळेत तिला भरती करायला लावलं.

तांड्यावरची ५-६ मुलं मुली तयार झाली .

बिजली किती आनंदाने शाळेला जात होती. अधाशासारखे  शिकत होती. 

आता शिकले नाही तर पुन्हा संधी मिळेल की नाही ही धास्ती तिला होती.

त्यामुळे काही महीनेच ती शाळेत नियमित पणे गेली. कारण कुटुंबाने काम बदललं.

तिथे मराठी अक्षरांची ओळख झाली, अक्षरं जुळवून वाचायला शिकली, तेव्हा तिला खूप शिकल्यासारखं , काहीतरी दिव्य केल्यासारखं  वाटायला लागलं होतं.

तिथेच ती आकडे , पैशाची ओळख व बेरीज – वजाबाकी आणि हिशोब शिकली.

जगण्यापुरतं तरी आपण शिकलोय असं समाधान तिला वाटायला लागलं होतं. 

पुन्हा- पुन्हा तर बापाने काम बदललं की यांची वाडी , तांडा व गाव बदलायचं. .  .घरही बदलायचं कारण जाईल तिथे नवीन खोपटी, झोपडी बांधावी लागायची.

 भटक्या जमातीतील पोर. . तिला स्थिरता कुठली. ?

यामुळे ही शाळा सुटली पण जिथे जिथे म्हणून वाचायला लिहायला मिळेल किंवा कविता पाठ करायला मिळेल तिथे ती करायची.

पण जिथे जाइल तिथे ती सर्वांचं लक्ष वेधून यायची.  लक्षात  रहायची.

लोकांच्या  तिच्याकडे वळणार्‍या नजरा  व तिचं चुणचुणीत असणं पाहून बापाने  काळजी पोटी किंवा जिम्मेदारीतून  मुक्त होण्यासाठी कुणीतरी  सोम्या -गोम्या मजूरी  करणारा मुलगा पाहून पैशासाठी तिचं  लग्न लावून दिलं.

त्यांची जिम्मेदारी  संपली होती. 

अजून एक मुलगी व लहान मुलगाही होता.

पोरी म्हणजे डोक्याला भार आणि पोरगं म्हणजे कमावते हात अशा विचारांचे भटके लोक होते ते!

अशिक्षित  लोकांना वाटतं  की लग्न झाले की सगळे प्रॉब्लेम  सुटतील. 

पण लग्नामुळे आयुष्यात समस्या वाढतात अन आयुष्याची वाताहतही होते हे पण त्यांना कळत नाही. 

दुर्दैवाने बिजलीचा नवरा मजूर होता , रोज कमवायचा  पण  व्यसनी होता.

 हिचं तेज, सुंदर  दिसणं पण त्याला कधी कधी खटकायचं  . ती त्याला वरचढ होऊ नये म्हणून तो तिला सतत धाकात ठेवायचा. 

मग तो तिला रात्री पिऊन येवून शिविगाळ करायचा.

हळूहळु ती परिस्थिती  समजून चुकली , नवर्‍याच्या भरवशावर बसले तर  उपाशी मरेन  असे वाटायला लागले. मग ती  दिवसा   आजूबाजूच्या घरी घरकामं करायला लागली.

त्यानंतर  दिवसांगणिक ती स्वावलंबी बनत चालली होती. 

दरम्यान तिला  एक मुलगी  झाली. किमान यानंतर तरी नवर्‍याचं  वागणं बदलेल असा विश्वास तिला वाटला.  मग हळूहळू तो मुलीला खेळवत बसायचा , कधी कधी कामाला जायचा नाही. 

काही दिवसांनी त्याची कमाई पूर्णच बंद झाली. 

बिजली  स्वतःच्या व मुलीच्या चिंतेने खंगत चालली होती.  ती जिथे कामाला जायची तिथे तिने सर्वांची मने जिंकली होती. पण बिजलीचं चेहर्‍यांवरचे  तेज मंद होत गेलं. 

तिथे तिच्या घराजवऴच्या  मंजीरी मॅडम  घरात पॉट पेंटिंग चे क्लास घ्यायच्या.

शिकायला आलेल्या मुलींना पॉट देणे, रंग देणे, कलर मिक्सिंग प्लेटस धूणे , लादी पुसणे अशी बरीच कामें ती आनंदाने  करायची. 

हळूहळू  तिने ते काम शिताफीने शिकून घेतलं. रिकाम्या वेळात मुलींसोबत बसून ती पण काही पॉटस व हॅंगरस खूप छान रंगवायची.

ते काम करताना ती भान हरवून जायची, स्वतः ची दुखं विसरायची. 

मुलगी  २- ३ वर्षांची झाली.

 तेव्हा मात्र नवर्‍याचं  काम पूर्णच बंद झालं व नवीन काम करण्याची लक्षणंही दिसेनात . आता तो तिला काही बाही बोलायचा व मारहाण करायचा. तिने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण काही बदल नाही. 

याउलट आता तो तिच्याकडे पिण्यासाठी पैसे मागू लागला . 

दिवसेंदिवस  परिस्थिती  हालाखीची होत चालली. माहेरची पण आधीच गरीबी , त्यांचा तर कुठे ठाव ठिकाणा नव्हता . त्यांना ती काय सांगणार.

या चक्रातून  सुटका कशी होणार या विचाराने ती बसली असता एक दिवस नवरा तिला पैसे मागण्यासाठी आला. ती नाही म्हणताच त्याने मारण्यासाठी विळा उचलला. ती समजाउ लागली , मुलीची शपथ घालू लागली. तो ऐकेचना.  मग त्याने मुलीला उचललं . आता मात्र बिजली एक अनामिक भीतीने शहारली .

तिने पवित्र बदलला . विनवणी च्या सूरात आली व  पैसे देण्याच सोंग केलं .बटव्यातून पैसे  काढले अन थोड़े लांब जमिनी वर  फेकले. 

मुलीला खाली ठेवून , शिवी हासडून तो पैसे घेण्यास वाकला अन तिने विळा उचलला .. 

बिजली ने चालाकीने आपलं कपड्याचं गाठोडं उचललं , त्याला जोर लावून ढकललं.

 तो पडला आणि मग मुलीला कडेवर घेवून ते गाठोडं  खांद्याला अडकवून ती तत्परतेने  बाहेर आली व चालाकीने  घराची कडी लावली . जोरात पळ काढला. 

पळण्याच्या नादात रस्यावर येणार्‍या  ट्रॅक्टर  ची धडक लागली व ती रस्त्यावर पडली. 

पुढे जे झालं ते चांगलच झालं अन तिचं नशीब पालटलं.

ती ट्रॅक्टर  एका वीट भट्टीची होती. त्या माणसाची बायको खूप दयाळू होती. तिने बिजलीच्या मुलीला उचललं . बिजलीला खरचटलं होतं तिला दवाखान्यात नेलं .

तिची पूर्ण कहाणी ऐकल्यानंतर तिला आपल्या घरी नेलं. 

बिजली या उपकाराच्या बदल्यात त्यांना मदत करू लागली. 

हळूहलू  ती मातीच्या वस्तू बनवू लागली आणि भट्टीत भाजल्यावर रंगवू लागली. बिजली दिवसेंदिवस नवीन प्रयोग करत गेली.

कामात सफाई येत गेली. त्या कुंभारणीला खुप आनंद झाला. मूलबाळ नसलेलं, वीट भट्टी चालवणारं जोडपं तिला मुलीसारखं व मुलीला नातीसारखं वागवू लागलं .

२ वर्षात बिजलीच्या कामात खूप सफाई आली आणि ती आपल्या वस्तू रस्त्यावर  विकायला लागली. त्यातून तिची बरीच कमाई होवू लागली.

मुलीला जवळच्या शाळेत घातलं ,  बिजलीचे खरे आई वडिल कुठे हे तिला कळाले नव्हते पण जे तिच्यासोबत  आहेत तेच आईवडील समजून ती रहात होती.

तिच्यासोबत शिक्षणाविना झालं ते मुलीसोबत होऊ नये हाच उद्देश  होता आता जगण्याचा ! 

एक दिवस कुणीतरी जुन्या तांड्यवरच्या माणसांनी येवून सांगितलं की तिचा  नवरा ठर्रा  पिऊन सट्टा खेळताना पकडला गेला. व्यसनी सोबत्यांनी त्याच्यावर चोरीचा आळ घातला आणि पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले . 

ऐकल्यावर वाटलं की काहितरी करावं पण घरातून निघाली तेव्हाच तिने त्याच्या नावाचे गळ्यातले मणी तोडले होते . 

आता फ़क्त मुलगी अन ती एवढच तिला कळत  होतं .

ही नवर्‍याबद्दलची बातमी तिच्या मानलेल्या आईला पण कळाली. तिने समजावण्याचा प्रयत्न  केला पण बिजली ऐकायला तयार नव्हती.

आता बिजली रंगकामात हरवून जाते , शोभेच्या सुंदर  वस्तु बनवते आणि छान पैसे कमवून आनंदात राहते. 

हळू  हळू कुणा- कुणाच्यवकृपेने, व रसिक कलाप्रेमी लोकांच्या मदतीने तिने दुकान थाटलं  होतं .

जवळ जवळ दीड वर्षानंतर बिजलीच्या नवर्‍याची शिक्षा संपली तेव्हा कुंभार दांपत्य चांगली समज देवून बिजलीच्या नवर्‍याला परत घेवून आले. तुरुंगवासातल्या दिवसात नवरा खूप बदलला होता. पश्चातापाने सुधरला होता. याशिवाय पोलिसांनीही त्याच्याकडून लेखीमधे काही गोष्टी घेतल्या होत्या. 

काही दिवस तो आश्रितासारखा  राहिला मग कुंभाराला भट्टीत व माती आण ण्यास मदत करू लागला. 

त्याची मेहनत पाहून बिजलीने त्याला माफ केले. तिच्या मुलीलाही बापाचा लळा लागला होता. हळू हळू तो बिजलीच्या दुकानातही मदत करू लागला. 

बिजलीला आता आयुष्याकडून काही अपेक्षा नव्हती. आई वडिलांचं प्रेम , तिच्या मेहनतीची कमाई आणि छान त्रिकोणी कुटुंब! 

बिजलीच्या बाबतीत प्रश्न पुस्तके किंवा शाळेचा नव्हताच , तिच्या त्या शिकण्याच्या धडपडीचा होता.

बिजलीच्या  शिकण्याच्या वृत्तीने बिजलीला  रंगात रंगवलं आणि स्वावलंबी बनवलं. 

©®  स्वाती  बालूरकर , सखी

=======================

फोटो साभार – Subhash Gijare

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते फेब्रुवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.