
ऋग्वेद एक अतिशय शांत आणि जबाबदार मुलगा…एका प्रतिष्ठित कंपनीत मोठ्या हुद्यावर कार्यरत असलेला…कुठलीही गोष्ट उघडपणे सांगण्याचा संकोच असलेला मुलगा मग बायकोही त्याला अगदी विरुद्ध स्वभाव असलेली मिळाली म्हणजे फारच बोलकी…हसून खेळून राहणारी…अगदी नावाप्रमाणेच ध्येयवादी…आशावादी ‘ स्पृहा ‘ नाव तीच…दोघांचंही लग्न होऊन वर्ष उलटून गेलं…तरी ऋग्वेद स्पृहाशी मनमोकळेपणाने बोलायला लाजायचा स्पृहा एकदम बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावाची असल्याने मनातलं अगदी बोलून दाखवायची…आपला मुलगा बोलायला लाजतोय ही गोष्ट मालती ताई आणि शेखर काकांच्या लगेच लक्षात आली म्हणून आपलं मत एकदम परखडपणे न बोलता शेखर काका आपल्या मुलाला बोलू लागले…
शेखर काका – ऋग्वेद…अरे स्पृहाला घेऊन कुठेतरी बाहेर जा की…सारखं काम काम नको करुस स्पृहाला घेऊन कुठेतरी बाहेर जा की जरा तेवढाच तुलाही थोडासा बदल…वेळ एकत्र घालवत जा एकमेकांबरोबर…
ऋग्वेद – अहो पण…वर्क फ्रॉम होम घेतलंय मी…माझी पोस्ट काय आहे ठाऊक आहे ना तुम्हाला….मग जबाबदारीने वागायला पाहिजे ना जरा…
मालतीताई – ऋग्वेद…अरे माहिती आहे आम्हाला…पण तुम्ही एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवला पाहिजे असं मला तरी वाटतं…
ऋग्वेद – [ विषय बदलून म्हणतो ] आई…आज काय भाजी केलीय…खूप दिवसांपासून भरली ढेमश्याची भाजी खाल्ली नाहीय…करतेस का प्लीस…
मालतीताई – ऋग्वेद…स्पृहाला विचार… करेल तीही…नाहीतरी तुझ्या फर्माईशी तिनेच पूर्ण करायला हव्यात आता…मला नाही होत बाबा…
ऋग्वेद – स्पृहा…स्पृहा….[ स्पृहा लगबगीने दिवाणखान्यात येते ] आज तुला भरल्या ढेमश्यांची भाजी करायचीय…
शेखर काका – अरे…असं काय करतोस…भरली ढेमशी करायचेत ना मग आधी मार्केट मध्ये जाऊन आणावी लागतील…आता कपडे बदललेच नाहीयेस तू तर घेऊन जा स्पृहाला…म्हणजे पिशव्या बिशव्या पकडायला मदत होईल तुला…स्पृहा बाळा जा तयारी करून ये…आज बाहेर मार्केट मध्ये जायचंय तुला…
स्पृहा – ठीक आहे बाबा…
स्पृहाही तयार होऊन पटकन येते…दोघेही मार्केटमध्ये जातात…आणि शेखर काका आणि मालतीताईंची कुजबुज चालू होते…
शेखर काका – बघ…मला कसं डोकं आहे…
मालतीताई – काय डोकं…आता भांडण झाली नाहीत तर बरं होईल…
शेखर काका – काहीच नाही होणार तसं…आणि झाली भांडण तर होऊ देत की…त्याच्याशिवाय गोडी नाही वाढणार संसाराची म्हणजे तेव्हाच तर खऱ्या अर्थाने सुरुवात होईल संसाराला…नाही का…
मालतीताई – हो ना…जाऊ देत मी वाटण करून ठेवते…एकतर नवीन आहे या घरात…मदत करायलाच हवीय मी तिला नाहीतर मसाल्याचं प्रमाण चुकलं तर रागावेल तिच्यावर…
शेखर काका – एवढा रागीट नाही गं आपला ऋग्वेद…आपल्याला तरी असं जाणवलं का कधी…
मालतीताई – अहो म्हणून तर मी मघाशी ऋग्वेदने स्पृहाशी बोलावं म्हणून तिलाच भाजी करायला सांग असं म्हणाले ….म्हणजे ऋग्वेद बोलला तरी तिच्याशी…केवढी बोलकी स्पृहा आहे हो…पण हा आपला ऋग्वेद एक शब्दही तिच्याशी आपणहून बोलला नाहीय अजून…
इकडे अर्ध्या रस्त्यात स्पृहा आणि ऋग्वेद आलेले होते तसं स्पृहा आपली एकटीच गाडीच्या खिडकीमधून बाहेरचं दृश्य पाहत होती…ऋग्वेदही तिच्याकडे चोरून पाहत होता…तिच्या गोऱ्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या तसं ऋग्वेदने गाडीतला ए.सी. सुरु केला थंडगार असलेल्या गारव्याने स्पृहा मनामधून सुखावली…आणि आपल्या केसांच्या बटा बाजूला सारवत एक हसरा कटाक्ष ऋग्वेदकडे टाकला…ऋग्वेदही भानावर आला आणि आपल्या बायकोला लाजतच म्हणाला…
ऋग्वेद – ही पिशवी घे आणि…चांगली भाजी घेऊन ये…
स्पृहा – अहो…पण तुम्ही या ना सोबत…तेवढंच…मलाही कळेल तुमच्या आवडी निवडी…
ऋग्वेद – माझ्या आवडी निवडी माझ्या आईला खूप चांगली माहिती आहे…तेव्हा तू तिलाच विचारावं असं मला वाटत…रागावू नकोस…पण माझ्या पेक्षा जास्त तुम्हा दोघींमध्ये संवाद पाहिजे…
स्पृहा – ते तर आहेच की…पण मी बोलते हो त्यांच्याशी….तुम्ही हवं तर बाबांना विचारून पहा…मी घरात सर्वांशी मिळून मिसळून वागते…असं नाहीय की एकलकोंडासारखं राहते…पण त्यांच्याइतके तुमच्याशीही मला बोलायला आवडतं….म्हणूनच तर आता माझ्या सोबत भाजी आणायला तुम्हाला मी बोलावतीय…पण तुम्ही आहेत की माझ्या पेक्षा इथेच बसणं पसंत करताय…तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीय…हे बरोबर ना…
ऋग्वेद – स्पृहा…असं नाहीय…तू एक काम कर…जाऊन भाजी घेऊन ये…मग घरी गेल्यावर आपण सविस्तर बोलूयात या विषयावर… इथे नको बोलायला…
स्पृहा – मग कुठे बोलायचं…मी बायको आहे तुमची…कुणी वैरीण नाही….लग्नाला दीड वर्ष होईल पण आपण असे बोललोच नाहीय कधी…तुम्हाला मी नाही आवडत का…?
ऋग्वेद – स्पृहा…तसं काही नाहीय…मला तू नसती आवडली तर मी लग्न का केलं असत तुझ्याशी….आवडली म्हणूनच तर मी लग्न केलंय ना तुझ्याशी…
स्पृहा – पण मला असं कधीच जाणवलंही नाहीय…राहू द्यात काही सांगू नका तुम्ही…तुमचं माझ्यावर प्रेमाचं नाहीय…ना तुम्ही माझी कधी काळजी घेत ना कधी माझ्याशी हसून बोलत….नेहमी धीरगंभीर असता तुम्ही…फक्त तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करायच्या…पण माझी अपेक्षा काय आहे तुमच्याविषयी त्याच काय…फक्त माझ्याशी प्रेमाने बोला ना एवढं तरी करू नाही शकत तुम्ही माझ्यासाठी….बरोबर आहे एका पॉईंट नंतर बायको नवऱ्याला नकोशीच वाटते…आतापर्यंत ऐकलं होत…मी मात्र आता अनुभवतीय…मला साधं आय लव्ह यू तरी म्हणाला आहेत का तुम्ही…
ऋग्वेद – स्पृहा…एका पॉईंट नंतर म्हणजे…नक्की काय म्हणायचं आहे तुला…?
स्पृहा – म्हणजे काय तर बाई म्हणजे एक उपभोगाची वस्तू असते…जाऊ द्यात मी भाजी आणते…
असं म्हणून स्पृहा गाडीमधून खाली उतरली आणि आपल्या लटक्या रागात भाजी मार्केट मध्ये इतरत्र फिरू लागली तेवढ्यात मार्केट मध्ये काही टवाळ मुले बसलेली होती त्यातल्या अगदी निगरगट्ट मुलाने स्पृहाला पाहून कमेंट केली…” धूप में निकाला नं करो…रूप की राणी गोरा रंग काला ना पड जाये…” स्पृहाने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले….आपली बायको असल्याने ऋग्वेद अगदी काळजीपूर्वक स्पृहाला नकळत तिच्या मागे मागे जाऊन तिची निगराणी करत होता…म्हणजे नवरा असल्याचा एक धर्मच बजावत होता असं म्हणायला काहीच हरकत नाही…या गोष्टीपासून स्पृहा मात्र अनभिज्ञ होती…स्पृहा थोडी शहारली…पण चेहऱ्यावर रणरागिणी असल्याचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता…पण सगळं फोल ठरत होतं…त्या निगरगट्ट मुलाचा उत्साह पाहून बाकीच्या उरल्या सुरल्यांच्या अंगात हळू हळू संचारू लागलं म्हणून एकाने तर स्पृहाची वाट चक्क अडवली…आणि तिचा हात पकडण्यासाठी पुढे सरसावला…स्पृहाने घाबरून एकदम आपले डोळे बंद केले आणि कानावर हात ठेऊन ओरडू लागली…स्पृहाच्या अशा रिऍक्शन नंतर आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमू लागली….तेवढ्यात ऋग्वेद आला आणि त्या छेड काढणाऱ्या टवाळखोराचा हात आपल्या मजबूत हातात पकडून पिरगाळून ठेवला आणि त्या टवाळखोराची अवस्था पाहून बाकीच्या टवाळखोरांचं अवसान गळून पडलं आणि एकाएकाने धूम ठोकायला
सुरुवात केली…सगळे जिकडल्या तिकडे पसार झाले तसा स्पृहाच्या जीवात जीव आला…ऋग्वेदने स्पृहाचा हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि स्पृहाला जवळ जवळ ओढतच गाडीमध्ये नेऊन ठेवलं…तिच्या हातातून भाजीसाठीची पिशवी घेतली व स्वतः भाजी आणण्यासाठी गेला….अर्ध्या तासांमध्येच ऋग्वेद भाजी घेऊन आला…एकही शब्द न बोलता गाडीत बसला…स्पृहाही गप गुमान गाडीमध्ये जाऊन बसली…
घरी आल्यानंतर जणू काहीच झालं नाही असा भाव आणला आणि नेहमीप्रमाणे स्पृहा आणि मालतीताईंनी स्वयंपाकाचं बेत आखून स्वयंपाक केला…घडला प्रकार जराही उघडकीस आला नाही याचं विशेष… पण ऋग्वेद मात्र स्पृहाशी तुटकपणे वागू लागला…या आधी थोडा संवाद व्हायचा पण आता तर तोही संपुष्टात आला….स्पृहाच्या मनावर मात्र या अबोल्याचा परिणाम होऊ लागला….स्पृहाने जमेल त्या पद्धतीने माफी मागण्याचा प्रयत्न केला कागदावर लिहून सॉरी म्हणून झालं…व्हाट्सअँप वर माफीनामा लिहून झाला पण ऋग्वेद मात्र ढिम्मसारखं स्पृहाशी अबोला धरून बसला…याचा धसका घेऊन स्पृहा मात्र खूप आजारी पडली…आपली अवस्था कोमेजलेल्या कळीसारखीच करून घेतली….संसार फुलण्याआधीच स्पृहा कोमेजून गेली अशक्तपणाने स्पृहा बेशुद्धावस्थेत होती त्याच कंडिशनमध्ये स्पृहा हॉस्पिटलाईस झाली…ग्लुकोस चे सलाईन चढवून स्पृहाला अधून मधून शुद्ध येत होती त्याच शुद्धीमध्ये ऋग्वेद स्पृहाला रडवेला होऊन तिची शुश्रूषा करताना दिसायचा पाच सहा दिवसांनी स्पृहा पूर्णपणे शुद्धीवर आली आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या डोळ्यांनी ऋग्वेदने स्पृहाचा नाजूक हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला…” स्पृहा….आय लव्ह यू…” स्पृहानेही आपल्या मनातला राग कायमचा सोडून ऋग्वेदला मिठी मारली आणि म्हणाली…” ऋग्वेद…मला माफ कर रे…में खूप चुकीची वागले तुझ्याशी…” ऋग्वेद म्हणाला…” माफ करेल पण एका अटीवर…” स्पृहा लगेच बिलगून म्हणाली…” कुठली अट…” त्याच प्रेमाने ऋग्वेद आपल्या बायकोला म्हणाला…” आता परत असं रागवायचं नाही…मी तुझाच आहे ग…” स्पृहाही अगदी आपल्या नवऱ्याच्या प्रेमाच्या दोन शब्दाने अगदी ठणठणीत बरी झाली…हेच तर आहे संसाराचं गमक…’ प्रेम द्या आणि प्रेम घ्या…’ आपल्या नवऱ्याच्या चिडण्यातही एक आपलेपणा शोधा….कवी नक्ष ल्यालपूरी म्हणतातच ना..’ प्यार का दर्द है मीठा…मीठा…प्यारा…प्यारा…..’
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.