पूर्वग्रह भाग 2

घरच्यांना वाईट वाटायला नको म्हणून आशुतोषने घरी जाताना चेहरा धुतला. जणू झालेल्या अपमान धुऊन काढला आणि पेढ्यांचा बॉक्स घेऊन तो हसतमुखाने घरी गेला. घरी आई चातकाची वाट पाहात होती, आशुतोषला वाटलं, जणू आपण शाळेतूनच पहिल्या दिवशी आलोय अशी आई वागतेय. तिने त्याच्यासाठी मस्त कॉफी केली आणि मग प्रश्नांची सरबत्ती. आशुतोषनेही तिच्या सर्व प्रश्नांची न कंटाळता उत्तरं दिली. आईला काहीही जाणवू दिलं नाही, पण तरीही तिला वाटत होतं कुठेतरी पाणी मुरतंय. त्याचे बाबा दोन दिवस ऑफिसकामासाठी बाहेरगावी गेले होते. आईला असल्या गोष्टींचं टेंशन येतं त्यामुळे तिला काही सांगायला नको, बाबांनाच विचारू कसं हँडल करावं मॅडमना? नाहीतरी आता त्यांना खूप अनुभव असेल. आशुतोषने मनाशी ठरवलं. तसं फोनवर बाबाशी बोलणं झालं होतं, पण त्याने जुजबी सांगितलं. आल्यावर डीटेलमध्ये बोलू असं ठरवलं.
आशुतोष कंपनीत जात येत होता. त्यानंतर मॅडमची आणि त्याची फारशी भेट झाली नव्हती, फक्त एकदाच त्यांनी त्याला केबिनमध्ये बोलावलं होतं, कामापुरतं बोलणं झालं होतं. बाकी विशेष काही नाही. पण त्यांच्या नजरेत त्याला एक प्रकारची तुच्छता दिसत होती, ती त्याला बोचत होती, अशी नजर त्याने आजपर्यंत कधीही अनुभवली नव्हती. त्याला ऑफिसमध्ये जाणं नकोसं वाटायचं, पण पहिल्याच कंपनीत अशा प्रकारे तेही अशा कारणाने राजीनामा देणं त्याच्या करिअरच्या दृष्टीने योग्य नव्हतं. तसंच रियाही त्याला तसं करू देणार नव्हती. एक रिया सोडली तर बाकी कुणालाही अशी कल्पना नव्हती. पण आशुतोष मनातून नाराजच होता हे मात्र खरं. तरीही त्याने त्याच्या कामावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. तो आपल्या कामात चोख होता.
आशुतोषचे बाबा म्हणजे अभय सरदेसाई कंपनीचं काम आटोपून घरी आले. एक-दोन दिवसांनंतर आशुतोष कंपनीचं काम संपवून थेट वडिलांच्या ऑफिसवर गेला. आज पण मॅडमनी त्याला झापलं होतं. खरंतर पुन्हा काही तसा प्रकार झाला नव्हता म्हणून आशुतोषने वडिलांना हे सर्व सांगायचं नाही, असंच ठरवलं होतं. काल रात्री बोलता बोलता तो बाबांना बोलला होता, ‘‘बाबा, बॉस जर का बाई असेल तर तिचा मूड सांभाळणं फारच कठीण असतं बरं का?’’
त्यावर बाबा मजेत म्हणाले, होते, ‘‘मी येऊ का? सगळं हँडल करतो.’’
‘‘अहो, तुमच्या जिभेला काही हाड?’’ आईने त्यांना झापलं होतं. पण आता खरंच बाबांची मदत घ्यायला हवी असं आशुतोषला मनापासून वाटलं आणि तो वडिलांच्या ऑफिसमध्ये दाखल झाला. अभय सरदेसाई. शहरात प्रमुख बिझनेस मनमध्ये त्यांचं नाव अगदी अग्रगण्य होतं. हुशारीत त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हतं. खरंतर वडिलांच्या ओळखीने दुसर्या कोणत्याही कंपनीत आशुतोष यू म्हणता जॉब करू शकला असता, पण त्याला तसं करायचं नव्हतं, वडिलांच्या मित्रांच्या कंपनीत किंवा त्यांच्या ओळखीने त्याला जॉब मिळवायचा नव्हता. आपलं कतृत्व त्याला सिद्ध करायचं होतं, पण आता उगाचंच आपण असा विचार केला असं त्याला वाटत होतं. तो वडिलांच्या कंपनीत आला खरा, पण अभय मिटींगमध्ये बिझी होता, त्यामुळे त्याची त्याच्याशी भेट होऊ शकली नाही. आणि अभयशी या विषयावर बोलणेच राहून जात गेले.
एक दिवस आशूतोषने आणलेली भाजी रियाला खूप आवडली म्हणून रियाला आशुतोषने आईचा नंबर शेअर केला. त्या दोघींच्या गप्पा होऊ लागल्या. चांगली मैत्री झाली दोघींची. बाकी सर्व सुरळीत चालले होते. एक दिवस आशुतोष ऑफिसमध्ये उशिरा पोहोचला. इतके दिवस काहीही कारण न मिळालेल्या मॅडमना त्याच्यावर जाळ काढण्याचे चांगलेच कारण मिळाले. त्यांनी त्याच्यावर तोंडसुख घेतले आणि बिचारा आशुतोष चांगला हिरमुसला. आज त्याच्या वडिलांचा वाढदिवस होता, त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट खरेदी करण्याच्या नादात त्याला उशीर झाला आणि ते या मॅडमच्या चांगलंच पथ्यावर पडलं. आशुतोषच्या सगळ्या मूडवर पाणी फिरले. पण बिचार्याची पंचाईत अशी होती की, तो आजच्या दिवशी तरी हे घरी दाखवून देऊ शकत नव्हता. संध्याकाळी मोठी पार्टी होती. रियाला बोलावणं होतं.
आशुतोष खूप प्रयत्न करत होता, पण तरीही त्याच्या चेहर्यावर निराशेचे ढग स्पष्ट दिसत होते. त्याने राजीनामा लिहून तयार ठेवला होता आणि दोन दिवसांनी हा राजीनामा तो देणार होता. संध्याकाळी पार्टीसाठी तिघेही छान तयार झाले होते. आई, बाबा, आशुतोष.. यांचे सर्व मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आले होते. रियाची फॅमिलीही होती. आईची आणि रियाची पहिलीच भेट होती ती. वाढदिवस उत्तम साजरा झाला. सर्व जण जायला निघाले. रिया निघाली तशी आई तिला सोडायला गेट वर आली आणि म्हणाली, ‘‘तू मला मुलीसारखीच, मी तुला एक प्रश्न विचारू का?’’ रिया दचकलीच. तशी जराही वेळ न घालवता आई म्हणाली, ‘‘आशुतोषला कंपनीत काही प्रॉब्लेम आहे का?’’
‘‘नाही… बस जरा आमच्या बॉस म्हणजे लीना मॅडम… कडक आहेत एवढंच.’’ रिया सहज बोलतोय असं भासवत म्हणाली.
‘‘लीना… पूर्ण नाव काय तुमच्या बॉसचे?’’ आईने विचारले.
‘‘लीना पोतनीस..’’
‘‘अच्छा… अत्ता आलं लक्षात..’’ आई विषण्णपणे सहली. आपला भूतकाळ असा आपल्या समोर येईल असं तिला वाटलंही नव्हतं. आपल्या मुलाला होणार्या त्रासाचं कारण आपणच दोघं आहोत या जाणिवेने तिला जरा अपराध्यासारखं वाटलं.
आज आशुतोषने रजा टाकली होती. डोकं दुखतंय या सबबीवर तो घरात झोपून राहिला होता. याचाच फायदा घेऊन आई घरातून बाहेर पडली. आणि थेट आशुतोषच्या कंपनीत पोहोचली.
‘‘मॅडम अपॉइंटमेंटशिवाय भेटत नाहीत कुणाला.’’ रिसेप्शन काऊंटरवरच्या मुलीने सांगितले. आईने रियाला फोन लावला. आईला तिथे बघताच रिया हादरली. पण कुणालाही न जुमानता आई म्हणजे पूर्वा मॅडमच्या केबिनमध्ये गेली.
तिला बघताच लीना दचकली. ‘‘माझ्या परवानगीशिवाय आत येण्याचं धाडस कसं केलंत तुम्ही मिसेस…’’
‘‘मिसेस सरदेसाई, माझं नाव.’’ पूर्वा जोरात बोलली.
मग केबिनचं दार बंद केलं गेलं. ‘‘लीना, माझ्या मुलासोबत तू जे वागते आहेस ते योग्य नाही.’’
‘‘तुम्ही दोघं माझ्या बरोबर जे वागलात ते योग्य होतं?’’ लीनाने प्रतीप्रश्न केला.
‘‘हे बघ अभयचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. अभयचं माझ्यावर प्रेम होतं. तू त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होतीस, बरं ही गोष्ट तू कधी सांगितली ही नाहीस कारण तुला भीती वाटत होती, तो नाही म्हणेल. तुला नकार ऐकून घ्यायची सवय नव्हती. म्हणून तू गप्प बसलीस… आमचं लग्न झाल्यावर तुझ्या बेस्ट फ्रेंडकडून नंतर मला कळलं की, तुझं अभयवर प्रेम होतं, त्याच्या बिचार्याच्या तर हे गावीही नाहीये अजूनही.’’
‘‘पण…’’
‘‘पण काय लीना? आणि तू कबुली न दिलेल्या प्रेमाचा तू असा सूड एका मुलावर अशाप्रकारे घेते आहेस, त्याचं करिअर बरबाद करत आहेस, तो कोणत्या मनस्थितीतून जात आहे याची तुला कल्पना आहे का?’’
लीना आणि पूर्वा एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या. तशी खास मैत्रिणी नव्हत्या, पण थोडीफार ओळख होती, पण लीनावर राग काढायला आलेल्या पूर्वाला मात्र लीनाची अवस्था पाहून वाईट वाटले. लीना एका श्रीमंत वडिलांची हुशार मुलगी होती, तिला प्रचंड इगो होता. अभयवर तिचं प्रेम होतं, पण आपणहून कसं कबूल करायचं म्हणून तिने ते मनातच ठेवलं. त्यानंतर तिने लग्न केलं, पण ते लग्न काही हिच्या स्वभावामुळे टिकलं नाही. आणि आता ती एकाकी जीवन जगत होती.
अभयचा मुलगा आशुतोष हिच्या हाताखाली जॉईन झाल्यावर हिने उगाचंच त्याच्यावर सूड उगवला. पण आज पूर्वाशी बोलून तिला मोकळं मोकळं वाटत होतं, पूर्वाने सुरुवातीला रागाने आणि नंतर प्रेमाने तिला समजावलं. पूर्वा आणि ती दोघी हातात हात घालून कॉफी प्यायला गेल्यावर मात्र तोंडात बोटं घालण्याची पाळी रियावर आली.
पूर्वाने घरी आल्यावरही आशुतोषला काही सांगितले नाही, दुसर्या दिवशी जेव्हा तो ऑफिसला निघाला तेव्हा त्याचा चेहरा आनंदी नव्हता. तो ऑफिसमध्ये गेला, आणि दहा मिनिटांनी मॅडमच्या केबिनमध्ये गेला.
‘‘मे आय कम इन मॅडम?’’ आशुतोषने नरम-गरम आवाजातच विचारले
‘‘येस प्लीज..’’ मॅडमच्या आवाजात पण जरा नरमाई वाटली त्याला.
त्याने आपला राजीनामा दिला. तिने तो उघडून पाहिला आणि फाडून फेकला. आशुतोष चिडला,
‘‘मॅडम, मी इथे नोकरी करू शकत नाही.’’
‘‘आशुतोष, हळू बोल. मला माहीत आहे, मी तुझी अपराधी आहे. काल पूर्वाने मला माझी चूक दाखवून दिली तेव्हापासून मला फारच गिल्टी वाटत आहे, सोन्यासारख्या मुलाला आपण उगाचंच त्रास दिला असं मला वाटत आहे, आधी पूर्वाची आणि माझी नुसती तोंडओळख होती आता ती माझी बेस्ट फ्रेंड झाली आहे, आणि तू तिचा बेस्ट मुलगा! तेव्हा आता हा विचार सोडून दे, या मावशीला जमलं तर माफ कर.’’ तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.
‘‘मॅडम, तुमच्या डोळ्यांत पाणी?’’ आशुतोषने न राहवून विचारलंच आणि नंतर जीभ चावली. तुम्हाला असले खाजगी प्रश्न विचारायचे नाहीत नाही का?’’ त्याने डोक्यावर टपली मारून म्हटलं. पण माझी आई ग्रेट आहे मला काही बोलली पण नाही.
‘‘ती न बोलताच फार काम करते. आणि एक .. तू मला प्रश्न विचारलेस तर मला आवडेल.’’ मॅडम हसत म्हणाल्या आणि आशुतोष खुशीतच केबिनमधून बाहेर आला.
नंतर एका दिवशी लीना मॅम त्याच्या घरी आल्या आणि त्या तिघांच्या कॉलेजमधल्या गप्पांना चेव आला. आशुतोषने हसणार्या मॅमचा फोटो कॅमेर्यात कैद केला आणि त्यावर कमेंट लिहिली, ‘‘दुर्मीळ छायाचित्र’’ आणि तो फोटो रियाला पाठवायला तो विसरला नाही. आता पूर्वग्रहामुळे दूषित झालेले सर्व वातावरण निवळले होते आणि आशुतोषचे ग्रह चांगलेच पॉवरफूल झाले होते.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
=========================
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.