Skip to content Skip to sidebar Skip to footer

पूर्वग्रह भाग १

आशुतोषचा आज ऑफिसचा पहिलाच दिवस होता. आई-वडिलांना नमस्कार करून, आपल्या नव्या कोर्‍या बाईकला कीक मारून आशुतोष ऑफिसच्या दिशेने निघाला. खरंतर मनात एक धाकधूक होती. जरी तो अभ्यासात हुशार होता, कामात चाणाक्ष होता तरी असं कुणाच्या हाताखाली काम करणं किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करणं हा त्यासाठी पहिलाच अनुभव होता. आशुतोषने जरा दबक्या पावलांनी कंपनीत प्रवेश केला. चकचकीत आय. टी कंपनी पाहून त्याचं मन सुखावलं. तो इंटरव्ह्यू ला आला तेव्हाच त्याला ही कंपनी खूपच आवडली होती. याच कंपनीत आपल्याला जॉब मिळावा असं त्याच्या मनानं घेतलं होतं आणि ते पूर्णही झालं. आशुतोषच्या ऑफिसमधली एका कलिगने त्याला वेलकम करीत त्याचं टेबल दाखवलं. नवीन कामासाठी शुभेच्छा दिल्या आणि काही लागलं तर मला कधीही हाक मार असं सांगितलं. तिच्यातला आत्मविश्‍वास, काम समजून देण्याची पद्धत आशुतोषला फारच आवडली. रिया तिचं नाव होतं, त्याच्यापेक्षा ती नक्कीच मोठी होती. लग्न वगैरे झालेले असावं असा त्याने अंदाज बांधला.
ती आपल्या जागेवर गेली, आणि तिथेच उभं राहून तिने सर्व कलिगना हाक दिली. तर मित्र-मैत्रिणींनो, आज आपल्या कंपनीत आशुतोष सरदेसाई हा नवीन मेंबर जॉईन झाला आहे. त्याचं आपल्या पद्धतीने आपण स्वागत करू. आशुतोष इंजिनिअरिंगमध्ये 9.2 पॉईंट मिळालेले आहेत. तसंच आपल्याच कंपनीत पहिल्यांदाच इंटरव्ह्यू आला आणि लगेचच त्याचं सिलेक्शन झालं आहे. जॉबचा त्याचा हा पहिलाच अनुभव आहे, आपण त्याला योग्य ते सहकार्य करूच अशी मी आशा व्यक्त करते. मग त्यांच्या स्टाईलने क्लॅप वाजवून त्याचे स्वागत झाले आणि प्रत्येकाने जागेवरूनच त्याला वेलकम केलं. आणि दहा मिनिटांतच ऑफिसमध्ये पिनड्रॉप सायलेन्स पसरला. जो तो आपल्या कामात मग्न झाला.
काही वेळातच आशुतोषला मॅडमकडून बोलावणं आलं आणि सगळ्यांच्या नजरा उंचावल्या. रिया आशुतोषच्या जवळ आली आणि कानात हळूच कुजबुजली. ‘‘शी वॉज डॅम स्ट्रीक्ट, बी केअरफूल, बट डोण्ट वरी..’’ आशुतोषने कृतज्ञतेनं तिच्याकडे पाहिलं. तिच्या बोलण्यातून, वागण्यातून त्याला चांगलाच सपोर्ट मिळत आहे असं त्याला वाटलं. तो आत्मविश्‍वासाने मॅडमच्या केबिनकडे गेला.
‘‘मे आय कमइन मॅडम?’’
‘‘येस प्लीज..’’
त्यांनी मान वरही न करता सांगितले.
त्यांनी त्याचा बायोडेटा काढला आणि नाव परत मोठ्याने वाचलं आशुतोष अभय सरदेसाई ऽऽऽ
त्यांनी मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्या शॉकच झाल्या. ह्या मुलाच्या इंटरव्ह्यूच्या दिवशी आपण नव्हतो नाहीतर हा आज आपल्या समोर असा बसलाच नसता. त्यांची मनातल्या मनात चडफड झाली. तोच चेहरा, तसाच ड्रेसअप, जणू एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा. आपली आणि अभयची पहिली भेट झाली तेव्हाही त्याने असाच व्हाईट शर्ट आणि जीन्स पँट घातली होती. त्यांचे डोळे एकदम स्वप्नाळू झाले. डोळ्यात पाणी आल्यासारखे झाले. कदाचित आशुतोषला काहीतरी जाणवले असावे.
‘‘मॅडम, आर यू ओके?’’ त्याने खूपच काळजीने विचारले.
‘‘येस आय अ‍ॅम ओके? पण हा प्रश्‍न का विचारलास?’’ त्यांनी जरा रागानेच विचारलं.
‘‘नाही, मला वाटलं.’’
‘‘मिस्टर आशुतोष, मी ओके असले तरच ऑफिसमध्ये येते आणि मी नेहमीचे ओके असते कळलं ना? असले खाजगी प्रश्‍न मला विचारत जाऊ नका. इथे आपण फक्त कामासंबंधी बोलू.’’ बिचार्‍या आशुतोषचा चेहरा खर्रकन उतरला. खरंतर या मॅडम त्याला आईच्या वयाच्या होत्या. त्याने खरंच काळजीने विचारलं होतं, हे मॅडमच्या लक्षातही आले होते, पण पूर्वग्रहीत दोषामुळे आणि एकंदर त्यांचा स्वभाव फटकळच असल्याने त्या तसं बोलल्या होत्या.
मग कामाचं जुजबी बोलणं झालं, पण आशुतोषचा चेहरा उतरलेलाच राहिला आणि त्यामुळे मॅडमच्या चेहर्‍यावर एक खुनशी हसू आलं होतं. बिचारा आशुतोष पहिल्याच दिवशी नाऊमेद झाला होता.
तो बाहेर येऊन बसला आणि कामाला सुरुवात केली. त्याचा पडलेला चेहरा रियाच्या लक्षात आल्यावाचून राहिलं नाही की काहीतरी बिनसलंय. तशी रिया मॅडमची खास या कॅटेगरीतली होती. अगदी ऑफिस भाषेत म्हणायचा झालं तर चमचीच म्हणा ना, पण आशुतोषबद्दल का कुणास ठाऊक तिला बघताक्षणी माया, प्रेम, आपुलकी निर्माण झाली होती. अगदी आपला लहान भाऊच असावा हा असं तिला वाटलं होतं.
लंच टाईममध्ये ती आशुतोषच्या जवळ आली. ‘लंच टाईम ऽऽ’’ तिने हसत म्हटलं. आशुतोष गप्पच होता. मग ती त्याच्या समोर बसली. आणि तिने आपला डबा उघडला. खरंतर काही खावं अशी त्याला अजिबात इच्छा नव्हती. मग केबिनमध्ये काय झालं हे आशुतोषने तिला सांगितलं. खरं तर आशुतोष एका अतिशय संपन्न कुटुंबातील मुलगा होता. आई-वडिलांचा, आजी-आजोबांचा, आत्या, मावशी सर्वांचा सर्वांचा लाडका. आजपर्यंत त्याला कुणीही दुखावलं नव्हतं, कारण तो होताच तसा, अभ्यासात हुशार वागायला नम्र. शाळा-कॉलेजात पण सर्व शिक्षकांचा लाडका, पण … पण आज ऑफिसमध्ये आल्या आल्या त्याचा अपमान झाला आणि तोही विनाकारण… ते त्याला फारच झोंबलं. त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली.
रिया जास्त काही बोलली नाही, पण तिने त्याला समजावलं, अगदी फिल्मी स्टाईलमध्ये, ‘‘बडे बडे देशो में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है!।’’ मग इकडच्या तिकडची गोष्टी सांगून त्याला हसवायचा प्रयत्न केला. त्याचा मूड जरापैकी स्थिर झाल्यावर ती म्हणाली, ‘‘आशुतोष, मॅडमना कोणत्याही भावना नाहीत, त्यांना फॅमिली नाही, त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीत त्यांना रस नाही, त्या सगळ्यांवर डाफरत असतात, आपण कामाव्यतिरिक्त त्यांच्याशी काही बोलायचं नाही…’’ तेवढ्यात रियाची मैत्रीण तिथे आली आणि म्हणाली, ‘‘आज का ग्यान समाप्त’’ त्यावर सर्व जण खळखळून हसले आणि लंच टाईम संपलं. सर्व जण कामाला पळाले.
क्रमश:
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
**

=================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.