१३ वर्षे आयटी मध्ये नोकरी केल्यानंतर जयंती कठाळे (purnabramha jayanti kathale) ह्यांनी स्वतःच हॉटेल सुरु केलं. आज परदेशातही शाखा आहेत.

purnabramha jayanti kathale : मोठे स्वप्न बघा, ते पूर्ण करण्यासाठी धडपड करा, वाटेत ठेच लागून खाली पडाल, तरीही उठून मार्गक्रमण करा, पुन्हा सर्व ताकदीनिशी उठा, सर्व प्रयत्न पणाला लावा यश नक्की तुमचेच होईल….
असा मोलाचा मंत्र सगळेच उद्योजक आणि उद्योजिका देतात आणि पाळतात सुद्धा. असे अनेक उद्योजक आहेत जे हा मंत्र पाळून यशस्वी तर झालेच आहेत पण अनेकांना रोजगार सुद्धा मिळवून दिला आहे. भारतातील सर्वच अस्सल मराठमोळ्या पदार्थांची अस्सल चव चाखायला देणाऱ्या, “पूर्णब्रह्म” ची निर्मिती करणाऱ्या स्वयंपाक तज्ञ “जयंती कठाळे” यांच्या यशाची रंजक कहाणी जाणून घेऊया.
जयंती ताई या पूर्णब्रह्मच्या व्यवस्थापकीय संचालिका असून हा मनस्विनी फुड्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा प्रकल्प आहे. जगभरात मराठी खाद्य पदार्थांची गुणवत्तापूर्ण उपहारगृहे उभारणे आणि मराठी खाद्य संस्कृती दूरवर पोहचवणे हे या प्रकल्पाचे मुख्य कार्य आहे. “अन्न हे पूर्णब्रह्म” याचा जयंती ताईंनी प्रसार करून हे वाक्य त्यांच्या कामाने खरे करून दाखवले.
१. जयंती कठाळे ह्यांचे पूर्वायुष्य
जयंती कठाळे या मूळच्या नागपूरच्या. जयंती ताई यांनी एमसीए मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे आणि माहिती तंत्रज्ञानातील इन्फोसिस यात प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर त्या १३ वर्षे कार्यरत होत्या. नोकरीच्या निमित्ताने त्यांना देश विदेशात नेहमी फिरावे लागत असे. त्यांचे लग्न झाल्यावर त्यांनी त्यांच्या पतीसोबत अनेक परदेश वाऱ्या केल्या पण नेहमीच त्यांना अमराठी भागात किंवा परदेश वारीत मराठी पदार्थांची असलेली कमतरता जाणवत राहिली. त्यांचे बाळ तीन महिन्याचे असताना २७ तासाच्या प्रवासात सलेड शिवाय त्यांना एकही शाकाहारी पदार्थ खायला मिळाला नाही. २००० साली नोकरीनिमित्ताने जयंती ताई यांची बदली बंगळूर येथे झाली. तिथेही जयंती ताईना मराठी पदार्थांची कमतरता जाणवली. त्यांचं दरम्यान जयंती ताई यांचे पती नोकरी साठी पॅरिसमध्ये गेले होते. त्यावेळी ते पत्र लिहून जयंती ताईंशी संवाद साधत असत. त्यात त्यांनी लिहल होते की इथे भारतीय पदार्थ शोधूनही सापडत नाहीत. खूप शोध घ्यावा लागतो आणि आताही मी उपाशीच आहे. त्यांच्या पतीचे हे पत्र वाचत असताना त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचे काही थेंब हे पत्रावर पडून पत्र ओले झाले होते असे जयंती ताई सांगतात. त्यावेळी जयंती ताई यांच्या मनात पहिल्यांदा मराठी पदार्थांची चव देणारे हॉटेल उघडण्याचा विचार आला.
बऱ्याचदा जयंती ताईंना मराठी पदार्थांसाठी होणाऱ्या आबाळीला सामोरे जावे लागले. बऱ्याच परप्रांतीय ठिकाणी मराठी पूर्णान्न न मिळाल्याने होणारी मराठी माणसांची अडचण जयंती ताईंनी लक्षात घेतली आणि त्यावरच काहीतरी तोडगा काढण्याचे त्यांनी ठरवले.
जयंती ताई लहानणापासूनच एकत्र कुटुंब पद्धतीत वाढल्या होत्या तसेच त्यांच्या आजींना स्वयंपाकातील बारकावे आणि जेवण बनवण्याची उत्तम समज होती. जयंती ताईंनी त्यांच्या आजींच्या हाताची चव आणि बारकावे शिकून घेतले. त्यांनाही आधीपासूनच नवीन नवीन पदार्थ बनवून खाणे आणि खाऊ घालायला खूप आवडत होते त्याच कौशल्याचा वापर करून मराठी पदार्थ न मिळण्याची अडचण सोडवण्याचा त्यांनी निश्चय केला.
२. जयंती कठाळे ह्यांनी हॉटेल पूर्णब्रह्मची सुरुवात कशी केली
जयंती ताई नोकरी करत होत्या. गळगठ्ठ पगाराची नोकरी होती त्यांना. ही नोकरी सांभाळून त्या उत्सवात मोदक आणि पुरणपोळी करून विकत असत. यासाठी त्यांनी “आर्कुट” या सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला. पूर्णब्रह्म सुरु करण्याआधी त्यांनी सहा महिने बंगरुळ मधील प्रत्येक छोट्या मोठ्या हॉटेलमधे जाऊन तेथील परिस्थिती,पदार्थ, सेवा, दर आणि गुणवत्ता यांचा अभ्यास केला. महाराष्ट्रातल्या मुख्य शहरात जाऊन चव चाखली. आपल्याला वेगळे काय करता येईल? याचा विचार केला.सगळ्या गोष्टींची नीट पडताळणी,अभ्यास करून २०१२ मध्ये वीस लोकं बसतील इतके साठ स्क्वेअर फूट असलेले पाहिले हॉटेल उभारले. पूर्णब्रह्म मध्ये सुरुवातीला त्यांनी कोणता पदार्थ विकला असेल तर तो म्हणजे बाप्पाचा लाडका “मोदक”. नंतर त्यांनी पूर्णब्रह्ममध्ये वरणभात,पुरणपोळी आणि थालीपीठ विकण्यास सुरुवात केली. हॉटेल सुरू केल्यानंतर सुरुवातीला भाषेची समज नसणे, मराठी पदार्थ कसे असतात कसे खातात हे माहीत नसणे,आर्थिक अडचण अशा बऱ्याच प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. पण जयंती ताई थांबल्या नाहीत,डगमगल्या नाहीत उलट त्यांनी बंगरुळ मधील लोकांना कानडी आणि मराठी पदार्थ मधला फरक समजावून सांगितला. तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आणि अमराठी लोकांना रोजगार मिळवून दिला.
नक्की वाचा
करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज नवऱ्यासोबत चालवतेय स्वतःची कंपनी
बँकेची नोकरी सोडून ५० वर्षे वयामध्ये सुरु केली कंपनी…आता आहे तब्बल ८०० कोटी कंपनीची मालक
कमी खर्चात महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरु करता येईल अशा ११ आयडिया
आयुष्यात थोडे हादरे बसले, म्हणून काही संपूर्ण आयुष्य वाया जात नाही – अजय पुरकर
३. हॉटेल पूर्णब्रह्मची वैशिष्टये
१. आज जयंती ताईची अपार मेहनत आणि योगदान यामुळे बंगरुळ येथील HSR लेआऊट या उच्चभ्रू वस्तीत ५७०० स्क्वेअर फूट मध्ये पूर्णब्रह्म थाटलेले आहे.
२. एकावेळी २०० माणसे बसू शकतील अशी चौरंग पाटाची भारतीय बैठक आहे .
३. जेवण मराठी असल्यामुळे तेथील वातावरण मराठीच असावे असा जयंती ताईंचा आग्रह असतो. त्यासाठी ज्या जयंती ताई नोकरी करत असताना जीन्स आणि शर्ट वर वावरत होत्या त्या स्वतः नऊ वारीत वावरतात आणि हॉटेल मधील कर्मचारी सुद्धा साडी,धोतर आणि पडगी अशा पारंपरिक वेशात वावरतात.
४. इथे महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठमोळ्या पदार्थाची अस्सल चव चाखायला मिळते. अगदी श्रीखंड पासून ते पुरणपोळी पर्यंत.
५. परदेशातील भारतीय मराठी माणसाला आपल्या देशाची कमतरता भासू नये यासाठी गरमागरम तूप,भात आणि मेतकूट यासाठी स्वतः जयंती ताई दिवस रात्र एक करतात.
६. गर्भवती स्त्रियांच्या आरमासाठी खास आराम खुर्च्या तयार करण्यात आल्या आहेत आणि या दिवसात आवश्यक असणारे आळीवाचे लाडू जे परदेशात कुठेही मिळत नाहीत ते पूर्णब्रह्म मध्ये मिळतात.
७. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने कामगार घेताना खास महिलांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे इथे ५०% महिला कर्मचारी आहेत आणि सगळ्यात महत्वाचे पगारात स्त्री पुरुष असा भेदभाव केला जात नाही. दोघानाही सारखाच पगार आहे.
८. पूर्णब्रह्मचीअजून एक विशेषतः अशी की इथे सगळे जेवण संपवणाऱ्या ग्राहकाला ५% सूट दिली जाते आणि ताटात अन्न तसेच ठेवणाऱ्या ग्राहकांना आहे त्या किमतीपेक्षा २% जास्त रक्कम भरावी लागते. त्यामुळे डिस्काउंट साठी सगळे लोक संपूर्ण ताट स्वच्छ करतात आणि त्यामुळे अन्न वाया जात नाही.
४. पूर्णब्रह्मची व्याप्ती
पूर्णब्रह्म हे केवळ बंगरुळ पुरते मर्यादित राहिले नसून सुरुवातीला तीन शाखा जयंती ताईंनी काढल्या होत्या. आज पुणे,अमरावती पासून ऑस्ट्रेलिया मधील ब्रिसब्रेन इथे पूर्णब्रह्मची अनेक हॉटेल्स आहेत.
जयंती ताई या अभियांत्रिकी क्षेत्रात असल्याने इन्फोसिसच्या संस्थापिका सुधा मूर्ती या त्यांच्या आदर्श आहेत. त्यांनीही जयंती ताईंच्या आग्रहाखातर त्यांच्या पूर्णब्रह्मला भेट दिली आणि त्यांनीही याचे खूप कौतुक केले शिवाय त्यांना हा उपक्रम इतका आवडला की पुणे आणि बंगरुळ मधील इन्फोसिस कंपनीत त्यांनी पूर्णब्रह्मची शाखा सुरु करण्याची परवानगी दिली.
केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर फिलाडेल्फिया आणि शिकागो इथेही त्यांच्या शाखा आहेत.
५. जयंती ताईंचे स्वप्न
जयंती ताईंनी आजवर अनेक लोकांना स्वयंपाकाचे प्रशिक्षण तर दिलेच शिवाय रोजगारही मिळवून दिला. मराठी पदार्थांची अस्सल चव चाखायला देऊन त्यांनी कित्येकांचे जीभीचे चोचले तर पुरवलेच शिवाय गरमागरम खाऊ घालून आशिर्वाद ही मिळवले.
पण त्या इथेच थांबल्या नाहीत पूर्ण जगात पूर्णब्रह्मच्या तब्बल ५००० शाखा उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे. हैद्राबाद,मुंबई, दिल्ली येथील विमानतळावर आणि अमेरिका,लंडन सारख्या परदेशातही शाखा उघडण्याचा त्यांचा विचार आहे.
स्वतःला मराठी पदार्थांची येणारी अडचण तर जयंती ताईंनी लक्षात घेतलीच शिवाय अनेकांची अडचण सोडवली. आजवर अनेक महिलांना रोजगार देऊन महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला खूप हातभार लावला आहे. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि स्वप्न पूर्तीसाठी अनेक शुभेच्छा !!!!
==================