Ritbhatmarathi

Search
Close this search box.

लता नवरा गेल्यावर फार एकटी पडली होती. नवरा असतानाही गरिबीने कधी पिच्छा सोडला नाही आणि आता आणखीनच नवरा गेल्याचं निमित्त. हातावरचं पोट होतं. पाटलांच्या शेतात रोजाने जायची कामाला. त्यात कधी पाटील साहेब पैसे द्यायचे तर कधी कधी दिवसभर राबवूनही पैसे द्यायला कानकून करायचे. त्यात हि एकटी आणि कमजोर पडायची. पाटलांचा दबदबा असताना पैशांसाठी कोण त्यांसोबत भांडणार म्हणून गपगुमान जेवढे पैसे दिले त्यावरच ती समाधान मानायची.

रोजच्या मिळणाऱ्या पैशातून कसंतरी तेल मीठाचं भागायचं आणि त्यातूनही मिळणाऱ्या पैशातून लता रोज  थोडे पैसे बंड्याच्या शिक्षणासाठी साठवून ठेवायची. ती जरी अशिक्षित होती तरी बंड्याला शिकवायची तिला फार हौस होती. अशिक्षित असल्याने नवरा गेल्यावर पाटलांकडून आणि इतर लोकांकडून होणारी फसवणूक तिने चांगलीच अनुभवली होती. शेतातलं काम झाल्यावर पाटलांच्या घरी धुणी भांडी करायला जायची ती.

१० वर्षांचा बंड्या अजून तसा लहानच होता. म्हणून लता बंड्या शाळेतून आला कि त्यालाही ती पाटलीण बाईंच्या घरी घेऊन जायची. काम झालं कि पाटलीण बाई घरात शिल्लक राहिलेलं द्यायची. कधी भाकरीचा तुकडा, कधी शिल्लक राहिलेलं कालवण तर कधी न जमलेले पदार्थ जसे कि शंकरपाळ्या केल्याचं तर उरलेल्या ओबढया धोबडया आकारांच्या आणि करपलेल्या  शंकरपाळ्या देत. परंतु बंड्याला तेही कधी मिळालंच तर त्यातही फार समाधान वाटायचं. पाटलीण बाई तशा कडक स्वभावाच्या होत्या. पाटलांसारखेच त्यांनाही लोकं अर्थात त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाया त्यांना खूप घाबरायच्या.

रंगीबेरंगी पैठणीच्या नाहीतर खणाच्या साड्या आणि त्यावर त्याला शोभून दिसेल अशी सोनेरी जरीची काठ. चोपून चापून केसांचा बांधलेला अंबाडा आणि त्यावर न चुकता रोज एखादातरी माळलेला गजरा. दोन्ही हातात एक एक डझन काचेच्या बांगड्यांमध्ये घातलेल्या सोन्याच्या पाटल्या वर डोकवायच्या. कपाळावर मोठं नाण्याएवढं कुंकू आणि गळ्यात सोन्याची ठुशी आणि सोन्याचंच लांबलचक मंगळसूत्र…. असा पाटलीण बाईंचा रोजचा साज असायचा. सणावाराला तर विचारूच नका. त्यांचा साज दुरून का होईना न्याहाळता यावा म्हणून बायका काहीतरी कारण करून पाटलीण बाईंच्या घरी यायच्या.

बघता बघता नवरात्र आली. पाटलीण बाईंच्या घरी घट बसायचे. कुणालाही भावेल असा साज दरवर्षी घरच्या देवीचा असायचा. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी बंड्या नित्यनियमाने शाळेत गेला. बंड्याच्या मित्राने डब्याला पुरणाची पोळी आणली होती.

बंड्याचा मित्र – “ए बंड्या आज बघ मी पुरणाची पोळी आणली हाय डब्यात….काल आईनं घटाच्या दिवसी पुराण घातलं व्हतं….म्याला तर लय आवडते पुरणपोळी..मह्या काल रात्रीच आईले सांगून ठेवलं व्हतं कि आज महाले डब्यात पुराणपोळीचं पाहिजे….घे रे बंड्या म्हाया आईच्या हातची पुरणपोळी”

असं म्हणून मित्र बंड्याच्या हातात पुरणपोळीचा एक तुकडा ठेवतो. पण बंड्यालाही पुरणपोळी अतिशय आवडायची. वर्षातून एकदातरी लता कशीतरी काटकसर करून पुरणाचा स्वयंपाक बनवायची. पण नवरा गेल्यापासून तेही बंद झालं होत.

मित्राच्या डब्यात असलेल्या पुरणपोळी समोर बंड्याला त्याच्या डब्यातली तेल मीठ लावलेली भाकरी कुठे गोड लागणार होती. पण भुकेपायी मित्राच्या तोंडाकडे बघत बघत त्याने तीही गोड मानून खाल्ली. आज बंड्याचं शाळेतही लक्ष लागत नव्हतं. मित्राच्या घरी पुरणपोळी मिळेल म्हणून काहीतरी गृहपाठाचं निमित्त काढून तो मित्राच्या घरी गेला पण मित्राच्या आईने काही थारा दिला नाही आणि हताश होऊन शेवटी त्याला घरीच यावं लागलं.

बंड्या – “आई मले पुरणपोळी खायची हाय….लई दिवस झालं तू केली न्हाय… आन बाबा गेल्यावर तर तू केलीच न्हाय कधी”

लता चुलीवर भाकऱ्या थापत होती – “तुले लई दिवसातून पुरणाची पोळी आठवली रं?”

बंड्या – “अगं आये….आज त्या श्याम्याने डब्यात पुरणाची पोळी आणली व्हती….त्याच्या आईनं काल घटाच्या दिवसी बनवली व्हती….लयं ग्वाड लागली बघ….पण तुझ्या हातच्या पोळीची सर नव्हती बघ. “

लता – “बरे मले कळाले तुला पोळी खायची हाय त्यासाठी मले चनाच्या झाडावर चडू नको….अर राजा तुले तर माहित आहे रोज पोटासाठी किती कष्ट करावं लागतं….मले जेवढं पैक मिळत त्यात रोज २ टाईमचं जेवण पण नाही मिळायचं आपल्याला….पाटलीण बाई शिल्लक राहिलेलं देतात तेवढं तरी बरं हाय रे….पुरणपोळी करायची म्हटली तर त्याले गूळ, साखर, डाळ आली आन एक दिवसाच्या पुरणपोळी साठी आपल्याला पुढचं २-३ दिवस उपाशी राहावं लागल”

“ऐकतोय कारे राजा..?? “

लताचं बोलणं अर्धवटच ऐकून न बंड्या तिथेच झोपून गेला होता. रात्री झोपेतही “आये आज तू पुरणाची पोळी केली!!!!दे मले पटकीस खायला..भूक लागली न्हा व्ह मले” असं बरचाळत होता.

लता झोपेतून उठली आणि तिने बंड्याला जवळ घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत रडू लागली कि काय परिस्थिती ओढावली.

“म्हाया राजाने कुठलं खेळणी न्हाय मागितली का कुठली महागडी वस्तू….पण म्या त्याला पुरणाची पोळी बी न्हाय देऊ शकत”

दिवस सरले….नवरात्रीचे नऊ दिवसही….पण रोज बंड्या लताकडे हट्ट करायचा कि आई आजतरी पुरणाची पोळी देईन…एक दिवस लताने चिडून बंड्याला खूप बदडलं….त्यानंतर त्याने कधीच तिच्यासमोर पुरणाच्या पोळीचं नाव नाही काढलं. 

नवव्या दिवशी पाटलीण बाईने दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीहि कन्यापूजन (कंजक पूजन) करायचं ठरवलं. लताच्या हातच्या पुरणपोळ्या किती स्वादिष्ट होतात हे पाटलीण बाईंनाही माहित होतंच. त्यासाठी त्यांनी तिला स्वयंपाकाचा निरोप धाडला. ठरल्याप्रमाणे लता नवमीला सकाळीच पाटलीण बाईच्या घरी पोहोचली. बंड्याला झोपेतूनच उठवलं आणि त्यालाही सोबत घेऊन गेली. लताने पुरणाची सगळी तयारी केली आणि पोळ्या लाटायला घेतल्या. तेवढ्यात नऊ कन्या देखील आल्या. त्या सगळ्या जणी सांगल्याच घरच्या होत्या. कुणी पाटलीण बाईंच्या नात्यातलं तर कुणी खास त्यांच्या जवळिकीतलं….

पोरीही मस्त नटून थटून आल्या. आल्याबरोबर पाटलीण बाईंनी त्यांचे पाय धुतले. त्यांना गंध तिला लावून त्यांची पूजा केली.

पाटलीण बाई – “लता अगं झाल्या का गं पोळ्या”

लता – “व्हय मालकीण बाई झाल्याच ….”

गरम गरम पोळ्या भाजताना लताला मात्र बंड्याचा चेहरा दिसत होता. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते हा विचार करून कि समोर घास असताना तो माझ्या लेकराला देता येईना.

बंड्याही तिथेच एका कोपऱ्यात बसला होता. फुग्यासारख्या टम्म फुगणाऱ्या प्रत्येक पोळीला तो न चुकता न्याहाळत होता. लताने प्रत्येक पोळी दुमडून पोळ्यांच्या टोपल्यात ठेवली कि निदान ह्या पोळीवर तरी माझं नाव असेल असा कटाक्ष विचार करत होता तो.

पाटलीण बाईंनी सगळ्या पोरींसाठी केळाची पानं वाढली….त्यात एका बाजूला साजूक तुपातली पुरणाची गरम गरम पोळी. एकीकडे आमटी, भात त्यावर एक चमचा वरणाचा आणि भातावरून ओघळतं साजूक तूप….गरम गरम भजी….पापड….जोडीला श्रीखंड आणि देवीचा पहिला मान म्हणून चण्याची घुगरी आणि त्याला जोड पुऱ्या देखील.

जशी पानं वाढली तशी पोरींनी त्यावर ताव मारायला सुरुवात केली. पाटलीण बाई पोरींसमोरच त्यांना काय हवं नको ते बघायला बसल्या होत्या. लतालाही पोरींसाठी एक एक पुरणाची पोळी वाढताना निदान एकदातरी पाटलीण बाईंनी म्हणावं कि बंड्यालाही ह्यातली एखादी पोळी द्यावी असं वाटत होतं. बंड्या मात्र पोरींच्या तोंडाकडे बघत राहिला आणि त्याहीपेक्षा जास्त आपल्या आईकडे एका आशेने बघत होता.

थोड्या वेळात पाटलीण बाई – “लता एक अजून पान वाढ गं”

लताने त्यांना कुठलाही प्रश्न न विचारता गपगुमानने अजून एक पण तयार केलं. पानात सगळं व्यवस्थित वाढून झाल्यावर पाटलीण बाईंनी तिला ते बंड्याला द्यायला सांगितलं.

“वाढलं पान? दे ते तुझ्या बंड्याला….तोही सकाळपासून आला आहे….बिचाऱ्याने सकाळपासून काही खाल्लं नाही….बरं पण लता गुणाचं पोरगं आहे बघ तुझं….एवढ्या वेळचं एका कोपऱ्यात बसलं आहे पण एकदाही तुझ्या कडे आलं नाही आणि मला भूक लागली म्हणून सांगितलं नाही….जा खाऊ घाल त्याला….अजून काही कमी पडलं तर सांग आणि घेऊन जा इथून”

पाटलीण बाईंचं ऐकून लताला आपले अश्रू आवरता नाही आले आणि ती त्यांच्या समोरच ओक्शाबक्षी रडू लागली.

“मालकीण बाई लयं उपकार झालं व्ह तुमचं…. खरं सांगू तर म्हाया बंड्याले खूप दिवसापासून पुरणपोळी खायची व्हती पण मी गरीब एकटी बाई न्हाय देऊ शकले त्याले पुरणपोळी….तुमचं लयं लयं आभार”

पाटलीणबाई – “अगं त्यात आभार कसले ….मलाही समाधान वाटेनं कि नऊ कन्यांसोबत एक बाळकृष्णही आज माझ्या घरी जेवला”  

लताने जरासाही विलंब न करता बंड्याला आपल्या हाताने मनसोक्तपणे पुरणपोळी खाऊ घातली. पाटलीणबाईंनी ३-४ पोळ्या सोबत बांधून दिल्या होत्या. ज्या बंड्याने दुसऱ्या दिवशी शाळेत डब्याला नेल्या आणि त्यातली आर्धी पोळी त्याने मित्रालाही वाटली.

आणि अशाप्रकारे बंड्याचं पुरणपोळी खाण्याचं एक छोटंसं स्वप्न पूर्ण झालं.

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories