Skip to content Skip to sidebar Skip to footer

पुरंदरे वाडा

आपल्या भल्या थोरल्या पुरंदरे वाड्यात वसंतराव आणि मंदाताई आपापली कामं करत होते आणि हातासोबत नेहमीप्रमाणे च तोंडंही अखंड चालू होती दोघांची,” हा एवढा मोठा वाडा पण काय उपयोग आहे का? एकालाही वाटत नाही की किमान सणासुदीला तरी यावं इकडे, पण ते शहरातले खुराडे सोडवतील तर ना!”इति वसंतराव!

त्यात भर म्हणून मंदाताई ” मग काय, एवढं केलंत भावांसाठी ,शिक्षण केलीत ,लग्न लावून दिलीत,सगळ्यांचं सगळं केलंत,मीही कुठे कमी पडले नाही हो, पाठच्या जावांना अगदी बहिणींची माया दिली पण एकीने ही त्याची पोच ठेवली नाही हो,शेवटी आपण आणि आपलं नशीब! आपण मरे पर्यंत वाडा सांभाळू!”

हे रोजचे संवाद ऐकून माधव अर्थात वसंतराव आणि मंदाताईंचा लेक अगदी वैतागला होता.” आई बाबा रोज काय हो काका,काकू च्या नावाने खडे फोडता! सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत,कोणीही तुम्हांला विसरलं नाहीये, दर वेळी अनंत काका, शरद काका, कुसुम काकू कोणी ना कोणी तुम्हांला फोन करत असतात, त्यांच्या कडे चार दिवस तरी या म्हणून आग्रह करतात, पण तुम्हीच जात नाही, वाट्टेल ती कारणं पुढे करता,तरीही न थकता ते तुम्हांला बोलवतात आणि जेव्हा भेटू तेव्हा योग्य मान ही देतात,उगाच एखाद्या वेळी त्यांना जमले नाही तर किती गहजब तुमचा!”

“घ्या, आता आपलं नाणं ही खोटं च ठरतंय म्हणा तर इतरांना काय दोष द्या! अरे ह्या वाड्याची शान होती एकेकाळी, दिवाळीत पूर्ण वाडा उजळून जायचा, दारात मोठ्या रांगोळ्या, परसदारात किल्ला, कोपऱ्या न कोपऱ्यात दिवे सगळं अगदी पाहण्यासारखं! आता हे त्या शहरात काय ‘दिवे ‘लावत असणार!!” इति वसंतराव.

माधव ने नाईलाजाने मान हलवली आणि तो वाड्याची साफसफाई करायला निघून गेला, उद्यावर दिवाळी आली होती आणि ह्या दोघांची नेहमीप्रमाणे फक्त चिडचिड सुरू आहे, सण म्हणून काही आनंद बाजूलाच राहिला!

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मंदाताई ओसरीवर बसून वाती वळत होत्या आणि अचानक फोन खणखणला,मंदाताई फोन घ्यायला वळल्या तोवर वसंतराव पोहोचले ही होते आणि रिसिवर कानाला असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर चे भाव सांगत होते की काहीतरी अघटित घडलं आहे. त्यांनी फोन ठेवला आणि म्हणाले,” मंदा, आवर लवकर, तिकडे अनंता ला हार्ट अटॅक आलाय आणि त्याला हॉस्पिटलमध्ये हलवलय,आपल्याला निघायला हवं”

मंदाताईंनी देखील चपळाई दाखवत आवराआवर केली,

वाड्यातल्या नोकरांना सूचना दिल्या, किमान दिवे तरी लावा दिवाळीचे म्हणत दोघे निघाले, माधव गाडी घेऊन तयारच होता. सगळे तातडीनं शहरात जायला निघाले.

दोन चार तासांचा प्रवास ही आता वसंतराव आणि मंदाताईंना कधी संपतोय असं झालं होतं. अखेर शहरी पोहोचताच माधव ने गाडी अनंत काकांच्या घरीच वळवली.तो वसंतराव गरजले” अरे माधव, अनंत हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या घराकडे का जातोय आपण? ” माधव ने हातानेच त्यांना शांत राहा म्हणून समजावलं.

गाडी एका टुमदार बंगल्यासमोर थांबली.वसंतराव मंदाताई गाडीतून उतरले तो दारात भव्य रांगोळी, कोपऱ्यात लहानसा किल्ला, ठिकठिकाणी लावलेल्या पणत्यांनी त्यांचे स्वागत केले. हा काय प्रकार आहे दोघांनाही कळेना. आत जावे तर अनंत काका,शरद काका ,काक्या, त्यांची मुलं-सुना, नातवंडं असा भला मोठा कुटुंब कबिला त्यांचे स्वागत करायला सज्ज होता.

सर्वांना एकत्र पाहून वसंतराव आणि मंदाताई अगदी हरखून गेले.” आपण म्हणतो ,तेवढे काही अनंताचे घर खुरड्या इतके लहान नाही ,आणि दिवाळीची सगळी तयारी आपल्या वाड्यासारखीच तर आहे, आणि आपल्याला पाहून ह्या सर्वांना झालेला आनंद ही कृत्रिम वाटत नाहीये!”वसंतराव मनातल्या मनात म्हणाले आणि मंदाताईंनी ही त्याला दुजोरा दिला.

माधव फक्त लांबून हसत होता.

अनंत काकांनी ही त्याला हसून दाद दिली,” माधवा, इतकी वर्षं आम्हाला जमलं नाही पण तू जमावलस बाबा,माधव ने सांगितल्या प्रमाणे शेवटी हार्ट अटॅक चे खोटे कारण पुढे करावे लागले आणि दादा वहिनी वाडा सोडून बाहेर पडले!”

“दादा वहिनी, आमच्या साठी तुम्ही तितकेच महत्वाचे आहात जितके आमच्या लहानपणी होतात, तुम्ही आमच्या साठी जे केलंत ते कधीही न विसरण्यासारखच आहे पण आता आमचीही कुटुंब विस्तारली आहेत त्यामुळे त्यातच गुंतून जायला होते आणि गावी येता येत नाही पण त्याचा असा अर्थ नव्हे की आम्ही तुम्हांला किंवा आपल्या वाड्याला विसरलोय, तुम्ही कायमच आमच्या हृदयात आहात आणि तुमचे स्थान अढळ आहे”

अनंतरावांनी दादा वाहिनीकडे पाहत आपलं म्हणणं मांडलं.

इकडे वसंतराव-मंदाताईंचे डोळे ही आनंदाश्रूनी वाहत होते.” आम्हाला माफ करा,मोठे असूनही तुम्हाला समजून घेऊ शकलो नाही,काहीतरी पूर्वग्रह करून रागावून बसलो होतो आणि त्या नादात कितीतरी आनंदाचे क्षण वाया घालवले. शेवटी आनंद हा मानण्यावर असतो, दिवाळी वाड्यात केली काय किंवा इथं शहरात ह्या बंगल्यात केली काय, आपली जिवाभावाची माणसं आजूबाजूला असणं महत्वाचं!”

दोघांनी सर्वांना जवळ घेतलं,पोटभर अशिर्वाद दिले.

आणि ह्या वेळची दिवाळी ‘ पुरंदरे वाड्याला’ साजेशी च साजरी झाली होती हे वेगळं सांगायला नकोच!!

– सौ बीना समीर बाचल©️®️

=================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: