पुन्हा तेच

“लीना अगं लीना, आज काही उठायचा विचार आहे की नाही?” आईच्या हाकेने लीना खडबडून जागी झाली. आजही ऑफिसला उशीर होणारा आणि मॅडमच्या शिव्या खाव्या लागणार या विचाराने तिने धावत-पळत सर्व आटपले.
“आई, निघते गं.” म्हणत ती बाहेरच पडली.
“अग, थोडं खाऊन जा…” आईचे शब्द ओठातच विरले
काय करावं बाई या मुलीचे. काही कळत नाही. आज वर्ष झालं लीनाला माहेरी आली त्या दिवसाला. कधी वाटतं सावरलीय, कधी वाटतं. फार दु:खी आहे. काय करणार मी तरी. शेवटी मी एक आई आहे. मुलीला होणारा त्रास मी कशी बघू शकेन. लीना पण आपल्याच विचारात बाहेर पडली. आईशी जरा फटकूनच वागलो आपण तिच्या मनात आले, पण माझं काय चुकलं? मला माझ्या नवर्याकडे-मुलीकडे जावंस वाटतंय तर हिचा आग्रह का? की मी इथंच राहावं. तसंही आईचं बरोबरच आहे म्हणा. कुठच्या परिस्थितीत आपण माहेरी आलो. आपल्या मुलीला होणार्या त्रासाच्या विचाराने रात्रंदिवस तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. किती त्रास दिला आपल्याला निनादने. आईच्या सांगण्यावरून मारहाण, संशय. ‘नको नको त्या आठवणी,
नको ते दिवस.’ दिवस कामात संपून गेला. आणि त्याठरावीक वेळी तिचा फोन खणखणला. ती जरा दचकलीच. आजुबाजूला कोणी नाही याची खात्री करून तिने फोन घेतला.
पलीकडून निनाद बोलत होता, “म तू काय ठरवलंस?”
“अजून काही नाही.” तिने फोन ठेवून दिला.
काल रात्री याच गोष्टीवरून आईचा आणि तिचा वाद-विवाद झाला होता व ती रात्री चिडूनच झोपली होती. रात्री बराच वेळ झोपच लागली नाही, मग पहाटे कधी तरी डोळ्याला डोळा लागला आणि उठायला उशीर झाला. मग काय उशीर झाला या नावाखालीआईशी न बोलताच तीबाहेर पडली होती. आणि आता ती नुकती घरी यायला आणि फोन वाजायला एकच गाठ पडली. तिने लगेच कट केला तरी आईचं बारीक लक्ष होतं. आईने चहाचा कप तिच्यासमोर ठेवला आणि म्हणाली, “चहा तरी घेणारेस का नाही?” लीना म्हणाली, “हो ग आई, चल आपण दोघी मिळून घेऊ चहा. माझं काल चुकलंच.”
आईही मग अस्पष्ट हसली म्हणाली, “बाळा, तुझं वाईट व्हावं असं का मला वाटतं? पण तुझी फार काळजी वाटते. बरं मला सांग तू
काय ठरवलं आहेस?”
“आई, जाऊ दे ना तो विषय. आपण चहा घेऊ छान आणि भाजी आणायला जाऊ.”
आई म्हणाली, “मी नाही ग येत आज. माझे पाय फार दुखत आहेत. तूच जाऊन काहीतरी भाजी घेऊन ये.”
लीना बरं म्हणाली आणि चहा पिऊन बाहेर पडली.
बाहेर पडल्यावर तिला वाटलं लावावा फोन निनादला. पण परत वाटलं जाऊदे एकदा सोडलाय ना त्याचा विषय. मग कशाला परत परत? पण काल किती गोड बोलत होता. मी तुला त्रास देणार नाही म्हणत होता. पण हे त्याचं वागणं खरं की, जो तो वर्षापूर्वी आपल्याशी वागलाय ते खरं. रोज ऑफिसवरून निनाद घरी आला की, त्याची आई त्याच्या मनात काहीबाही भरवत असे. “आज काय दूधच उतू घालवलंन, तर नेहालावेळेवर खायलाच देत नाही. आईलाच फोन करते.” एक ना दोन कधी खरं कधी खोटं, मग काय निनाद आधीच ऑफिसमधून वैतागून आलेला असे. त्यात हे ऐकल्यावर तो लीना वर चिडचीड करे.
त्या दिवशी तर हद्द झाली. तिला नेहाला शाळेतून आणायला जायला पाच मिनिटं उशीर झाला. तोपर्यंत वाट बघून नेहा रडू लागली होती.
घरी आल्यावर तिचा रडवेला चेहरा बघून आजीने विचारलं, “आज काय झालं माझ्या बाळाला? चेहरा रडवेला का?”
नेहाने बालिशपणे सांगितले, “आजी, आई उशीराच आली आणि म्हणून मला रडू आले.” झालं इतक्या छोट्या गोष्टीवरून आजीने
आकांडतांडव सुरू केला. ‘तुला लक्षच द्यायला नको. नट्टाफटा कशाला हवा? पटकन जाता येत नाही का?’ एक ना दोन हजार त्यातच भर म्हणून निनाद लवकर घरी आला आणि सर्व विषय त्याच्या कानावर गेला. तो आधीच चिडलेला होता त्याने लीनावर हात उगारला. मग लीनाही चिडली. ती म्हणाली, “तुम्ही दोघांनी माझं जिणं नको करून टाकलंय. जर तुम्हाला मी या घरात नको आहे तर मी माझ्या आईकडेच जाते.”
निनादही रागारागात “जा जा.” असे म्हणाला.
आणि लीना माहेरी निघून आली. कारण हे फक्त त्यादिवशीचंच नव्हतं तर साधारण दररोज आई निनादचे कान भरायची आणि निनाद आईचे ऐकून सारासार विचार न करता लीनालाच दोषी ठरवायचा.
लीना भाजी घेऊन घरी आली. छान भाजी भाकरी केली व ती आणि आई दोघी जेऊन आडव्या झाल्या.
लीनाचे वडील लहानपणीच वारले होते आणि भाऊ-भावजय कामानिमित्त परगावी राहात होते. घरी लीना आणि आई दोघीच असंत. आई
म्हणाली, “लीना, तू कायम अशीच राहा असं माझं म्हणणं नाही. आपण तुझ्यासाठी दुसरं एखादं चांगलं स्थळ पाहू.”
लीना काही बोलली नाही. तिच्या डोळ्यासमोर नेहाचा निष्पाप चेहरा तरळला. निनादने नेहालाही तिला भेटू दिलं नव्हतं वर्षभरात. काय वाटत असेल आपल्या मुलीला? आपली आईच वाईट आहे असं वाटत असेल. ती आईकडे पाठ करून डोळ्यातील अश्रू लपवीत झोपी गेल्याचं सोंग करू लागली.
रात्री बारा वाजता तिला जाग ली जरा मोबाईल चेक केला तर निनादचे दहा-पंधरा मिसकॉल येऊन गेले होते. फोन सायलेंट वर ठेवल्याने तिला कळलंच नव्हतं. मग फोन उचलला नसल्यामुळे एक मेसेज पाठवला होता. ‘लीना प्लीज मला फोन कर.’
लीनाने फोन बाजूला ठेवला आणि ती झोपी गेली. दुसर्या दिवशी ती 10 मिनिटं आधीच घरातून बाहेर पडली. दोन महिन्यापूर्वी तिने एक जॉब धरला होता. घरात बसून तरी काय करणार आणि तेवढाच हातभार या विचाराने.
अलीकडे निनादचा तिला फोन येऊ लागला होता. ती माहेरी परत आल्यानंतर 6 महिने त्याने काहीच कॉन्टॅक्ट केले नाही आणि एक दिवस अचानक तिचा फोन वाजला तिला नंबर ओळखीचा वाटला. पलीकडून निनादचा आवाज ऐकून ती दचकलीच. तिने फोन ठेवून टाकला, पण नंतर त्याचा मेसेज आला, ‘प्लीज माझा फोन कट करू नको. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.” तरीही तिने 5-6 दिवस असेच घालवले.
पण नंतर तिलाच वाटू लागले की, नेहाविषयी त्याला काही सांगायचे असेल का?
नंतर परत त्याचा फोन आला तेव्हा तिने फोन उचलला, “थँक्यू लीना.” निनाद म्हणाला.
“काय काम होतं?” लीना.
“कशी आहेस तू?” निनाद.
लीना हसली. म्हणाली, “फार लवकर विचारलंस रे.”
“सॉरी…” निनाद.
….
“लीना, काहीतरी बोल.” निनाद
“काय काम होतं?” लीना
“मला वाटतं आपण परत विचार करावा. तू तुझ्या घरच्यांच न ऐकता आणि मी माझ्या घरच्यांचं न ऐकता आपल्या बाजूने विचार करावा.”
निनाद.
लीनाने फोन ठेवला. हे याला आधी सुचलं असतं तर आज अशी अवस्था झाली नसती आपली.
मग कधी फोन कधी मेसेज असं सुरू झालं.
एक दिवस असाच फोन आला आणि तो आईने उचलला. झालं तिथून आईच्या आणि लीनाच्या वादाला सुरुवात झाली. आईने तिला
उपदेशाचे डोस पाजायला सुरुवात केली. “तू परत त्याच दिशेने का जात आहेस? तुला काही अक्कल आहे का नाही?”
कालही यावरूनच दोघींच्यात वाद झाला होता.
अलीकडे आईचे काय चालले होते लीनाला कळेनासे झाले होते. एकीकडे ती तू निनादला सोड असे म्हणत होती आणि दुसरीकडे मात्र तिच्यासाठी स्थळं शोधत होती. मग जर काही अॅलडजेस्टमेंट असेल तर ती लीनाने करावी असे ती लीनाला सांगत होती. मग कधी दुसर्या माणसाचं मूल सांभाळणे किंवा वयस्कर माणसाशी लग्नं.
लीनाच्या मनात हेच विचार घोळत होते. आज निनादला फोन करण्यासाठीच ती दहा मिनिटं आधी बाहेर पडली होती. तिला वाटलं आपण एकदा निनादला फोन करून त्याचं म्हणणं तरी ऐकून घेऊ. तिने निनादला फोन लावला. त्यानेही अधीरतेने उचलला.
“लीना, काल फोन का नाही घेतलास? तू काय ठरवले आहेस?”
“निनाद, तू परत तसाच वागणार नाहीस कशावरून?”
“मी आपल्या नेहाशपथ सांगतो. मी तुला त्रास देणार नाही.”
“पण माझी आई परवानगी देणार नाही.” लीना.
“लीना, तू आईच्या नजरेने नको तुझ्या नजरेने बघ. मला माझी चूक मान्य आहे. माझ्या घरचे किंवा तुझ्या घरचे आता आपल्याला
असेच बसू देणार नाहीत. ते आपल्या दोघांच्याही मागे लागतील की, लग्न करा. लग्न करा. मग मला सांग आपण अॅचडजेस्टच व्हायचे आहे तर एकमेकांशीच होऊ ना. आपल्या भांडणात त्या बिचार्या नेहाला सावत्रपणाचा त्रास का? आणि तसंही मला दुसरं लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. प्लीज तू विचार कर. चल मलाही कामावर जायचे आहे. संध्याकाळी बोलू.”
लीना कामावर गेली पण तिचे चित्त थार्यावर नव्हते. ती तब्येत बरी नाही सांगून लवकर बाहेर पडली. देवळात गेली. गणपतीच्या समोर
ध्यानस्थ बसली. काल रात्री तिच्याही मनात आज निनाद जे बोलला तेच आले होते. अॅलडजेस्टमेंटच करायची आहे तर निनादशी करून बघायला काय हरकत आहे? तिच्या मनात असा विचार यायला आणि गणपतीच्या उजव्या खांद्यावरचं फूल पडायला एकच गाठ पडली. तिला हायसं वाटलं गणपती बाप्पाने आपल्याला कौल दिला या आनंदातच तिने निनादला फोन लावला.
“निनाद माझं ठरलं आहे. तू मला न्यायला कधी येतोस?” तिचा स्वर अधीर झाला होता.
“लीना.. लीना… थँक्यू …” निनादला पुढे बोलवेना.
“….”
“उद्या सकाळी तयार राहा. मी येतोच.” निनाद.
आणि नंतर त्याच्या सुखी आयुष्याला सुरुवात झाली.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
==================
तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============