‘पुन्हा गवसली आई ‘

“जानकी आई..शाळेला उशीर होईल, वेणी घालून दे ना.” वेणू हातात कंगवा घेऊन आईच्या मागे- मागे फिरत होती. पण आईचे लक्षच नव्हते तिच्याकडे. शेवटी कंटाळून वेणूने दप्तर भरायला घेतले. इतक्यात आईने रागारागाने डबा भरून वेणू समोर ठेवला, ठेवला म्हणजे पुढ्यात जवळ जवळ आदळलाच.
तशी रडवेली होऊन वेणू जाणाऱ्या आईच्या धूसर आकृतीकडे बराच वेळ राहिली.
गेले दोन दिवस ‘आई अशी का वागत आहे आपल्याशी’ हेच तिला कळत नव्हते. इतक्यात बाबा आल्याने तिने घाईघाईने आपले डोळे पुसले. केसांची कशीबशी वेणी घालून डबा दप्तरमध्ये भरून तिने सायकल काढली.
एरवी शाळेला जाताना दारात उभारून निरोप देणारी आई, आज तिच्याकडे पाहतच नव्हती.
तिने बाबांकडे पाहिले, ते मात्र खुशीत होते. ऑफिसला जाताना आई त्यांना निरोप देत होती. पुन्हा डोळ्यातले पाणी पुसून वेणूने सायकल शाळेकडे दामटली. तसा उशीरही झालाच होता. आता बाईंचा मार खावा लागणार हे मात्र नक्की होत.
वेणू शाळेत आली तेव्हा प्रार्थना आटोपली होती. हजेरी घेणाऱ्या बाई वेणूला दरवाज्यात पाहून हातात पट्टी घेऊन पुढे आल्या.
सप्पप… प..दोन छड्या हातावर बसताच वेणू कळवळली. आणखी दोन छड्या हातावर बसताच वेणू हमसून हमसून रडू लागली.
बाईंच्या लक्षात आलं, ‘हिच्या रडण्याचं कारण काहीतरी वेगळेच आहे!’ बाईंनी तिला समजावले, प्रेमाने जवळ घेतले, पण वेणू काहीच सांगायला तयार होईना. न बोलताच आपल्या मैत्रिणींकडे दुर्लक्ष करून ती शेवटच्या बाकावर एकटीच जाऊन बसली.
आज शिकवण्याकडेही तिचे लक्ष लागत नव्हते. “आपली आई अशी का वागते आहे”! या प्रश्नांचे उत्तर तिला खूप विचार करुनही मिळेना.
संध्याकाळी वेणू घरी आली, तेव्हा आई एकटीच चहा पीत होती. नेहमी वेणू शाळेतून घरी आल्यावर आई आणि ती दोघी मिळून चहा घेत असत. शाळेतल्या गमती -जमती वेणू आईला सांगे अन् मग ती खेळायला पळे.
पण आज काहीही न बोलता वेणू हात- पाय धुवून आपल्या खोलीत गेली. आईची हाक येईल म्हणून वाट पाहत बसली. पण आज आईची हाक ऐकू आलीच नाही. आता मात्र ती कासावीस झाली. बाहेर येऊन तिने गॅसवरचा थंड झालेला चहा बशीत ओतून घेतला आणि आपल्या खोलीत गेली.
थोड्या वेळाने बाबा आले. मग आईने सगळ्यांसाठी पोहे केले, तशी बाबांनी वेणूला हाक मारली.
“एक गुड न्यूज आहे आमच्या परीसाठी..”
बाबा खुशीत येऊन म्हणाले. वेणूने आईकडे पाहिले, पण ती आपल्या कामात गर्क होती.
“वेणू..तू आता ताई होणार आहेस बरं..! म्हणजे आपल्या घरात छोटसं बाळ येणार आहे.” बाबा वेणूला जवळ घेत म्हणाले.
“काय!!” वेणूला खूप आनंद झाला. ती आनंदाच्या भरात आईला बिलागली. तसे आईने रागारागाने तिला झटकन बाजूला केले.
“अनु… वेणू माझी मुलगी असली तरी, तिच्यासोबत असे वागलेले मला अजिबात चालणार नाही. पुन्हा अशी वागशील तर गाठ माझ्याशी आहे.” बाबा कडाडले तशी जानकी आई घाबरली.
त्या आवाजाने वेणूही घाबरली. आज पहिल्यांदाच बाबांचा चढलेला आवाज तिने ऐकला होता! बाबांनी वेणूच्या हाताला धरून तिला बाहेर नेऊन गाडीवर बसवले आणि दोघे गणपतीच्या मंदिरात गेली.
गणपतीच्या दर्शनाने बाबांचे मन शांत झाले, तसे त्यांनी वेणुला जवळ घेतले आणि म्हणाले, “आता आपल्या घरी छोट बाळ येणार आहे ना..मग आपल्या आईला अजिबात त्रास द्यायचा नाही हा. सगळं मनापासून ऐकायचं तिचं. आमची वेणू आता ताई होणार..!
“हो बाबा मला खूप गंमत वाटते..माझ्या मैत्रिणींच्या घरी अशी छोटी बाळं आहेत की..” बाबांचे बोलणे मध्येच तोडत वेणू बाबांना बिलगली.
बऱ्याच वेळाने बाबा आणि वेणू घरी आले. तेव्हा जानकी देवापुढे बसून रडत होती.
वेणुला पाहून तिने घाईघाईने आपले डोळे पुसले. तशी वेणू आईला बिलागली.
“आई मी कधीच त्रास देणार नाही गं तुला आणि बाळालाही. तुझं सगळं ऐकेन मी. पण बोल गं माझ्याशी..”
वेणूचा असा कपरा स्वर ऐकून आईने वेणूला घट्ट मिठी मारली.
“मी चुकले गं बाळा.. माझं बाळ येणार म्हणून तुझा राग -राग करायला नको होता मी. अशीच वागत राहिले असते तर सावत्रपणाचा शिक्का बसला असता माझ्यावर!
खरचं चुकलं गं माझं..इतकी वर्ष आईपणाचं सुख तूच दिलंस अशी कशी विसरले मी?”
आईला अशी रडताना पाहून वेणूने आपल्या इवल्याश्या हाताने आईचे डोळे पुसले. तशी आईने आपली मिठी आणखीनच घट्ट केली आणि बाहेर दाराआडून हा माय- लेकीचा संवाद ऐकणारे बाबा, समाधानाने आपले डोळे पुसत उभे होते.
©️®️ सायली
===========
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============