

” सखाराम अरे सखाराम….देवपूजा झाली कि नाही तुजी…? अजून किती वेळ लावणारेस…” स्वयंपाकघरामधून बायजाबाईंचा आवाज येत होता…बायजाबाई म्हजे अत्यंत अत्यंत साध्या आणि देवभोळ्या देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय एकही घास खात नसत…अशा देवभोळ्या आईचे दोन मुलं पंढरपुरातल्या एका वाड्यात मोठ्या गुण्या-गोविंदाने राहत असत…सखाराम आणि आत्माराम असे दोन मुलं…दोघांचेही लग्न झालेली…म्हणून बायजाबाईंनी आपल्या सूनबाईंच्या हातात स्वयंपाकघर आधीच सुपूर्त केलं होत… सखारामची बायको अगदी आपल्या नवऱ्याचा शब्द पाळणारी…म्हणजे नवऱ्याच्या आज्ञेत असलेली व तितकीच देवभोळी म्हणून बायजाबाईंना सगुणेचं विशेष कौतुक…आत्मारामची बायको मुक्ता ही मात्र सगुणापेक्षा वेगळीच शिकलेली आणि बड्या घरची असल्याने सगुणेला आपल्या बोटावर नाचवायची…मोठेपणा असल्याने खूप गर्विष्ठ अशी मुक्ता आपल्या सासूबाईलाही नेहमी घालून-पाडून बोलायची…बायजाबाईही आपल्या सुनेच्या कागाळ्या आत्मारामला सांगत नसे…म्हणून मुक्ता फार शेफारली होती…बायजाबाई सकाळ पासून सर्व घरावर घरातल्या माणसांशी काळजी घेत…सकाळची वेळ असल्याने अगदी घाई-गडबडीत आपल्या लेकाशी देवाच्या पूजेची चौकशी करायच्या…त्याच नम्रतेने सखारामने आपल्या आईला उत्तर दिलं…
सखाराम – आई…अगं…झालं ग…देवाचं कसं नीटनेटकं व्हायला पाहिजे ना…[देवाला टिळक लावतो] हा ….हे बघ आता कसं दिसतंय आपल्या देवाचं रुपडं…
बायजाबाई – सख्या….झाली न्हवं पूजा…जा झालं वाटत सगळं…न्यहारी करून घे…मळ्यात जायचंय ना…त्या उसाला पाणी द्यायचं जणू…सगुणे….बाई जावयला वाढ सख्याला…
सगुणा – आत्याबाई…आलेच हो देवाला नैवेद्य दाखवते…हे घ्या नैवेद्य…
असे म्हणून आपल्या सासूबाईंच्या हातात नैवेद्य देते…आणि दुसरीकडे आपल्या नवऱ्याला जेवण्यासाठी बसवते…सखारामही जेवून लागलीच आईने सांगितल तसं मळ्यात जातो…तेवढ्यात मुक्ता आपल्या खोलीतून बाहेर येते…आणि खेकसून सगुणेला म्हणते-
मुक्ता – काय ग सगुणे…किती वेळा सांगायचं तुला मला माझा बेड टी सात वाजता लागतो…आठ वाजत आलेत तरीही मला साधा चहा मिळाला नाही…काय हो सासूबाई तुमचा झाला असेल ना चहा…नाही म्हणजे तुमच्या लाडक्या सुनेनं करून दिला असेलच की…भरल्या घरात सर्वांचं पाहावं लागत…एवढं शिकवलं नाही का तुमच्या सुनेला तुम्ही…?
बायजाबाई – काय ग सकाळी सकाळी कटकट लावलीयस…तू हायस ना शिकली सवरलेली मग तुझा तू करून पी चहा…
मुक्ता – तरी यांना मी खूपदा सांगितलंय…घराची या वाड्याची वाटणी करून टाका म्हणून…
बायजाबाई – बाई ग…तुला चहा मिळाला नाही म्हणून एवढी रागावू नकोस…सगुणे…जा बाई चहा दे तुझ्या जाऊबाईला…पण वाटणीचा विषय काढू नकोस ग भरल्या घरात…जिवंतपणी मारतीया मला तू…
मुक्ता – वाटणीचा विषय निघाला की मरणाच्या गोष्टी कशा येतात…पहा तरी निदान तुमच्या मुलांचा वेगळा संसार…तरी माझे डॅडी या घरात सोयरीक करू नका असं हजारदा सांगत होते…पण माझी मम्मी भुलली तुमच्या गोडगोड बोलण्याला…बाई…तुझा चहा झाला असेल तर दे बाई…अंघोळ करून जायचंय मला शहरात…
असे म्हणून रागाने मुक्ता तिथून चहाचा कप घेऊन जाते…सासूबाई रडत म्हणतात….
बायजाबाई – पांडुरंगा…पाहतोयस ना सगळं…खानदानी असल्याचा केवढा रुबाब मिरवतेय…
सगुणा – आत्याबाई…नका मनाला लावून घेऊ तुम्ही…भाऊजी थोडीच वाटणी मागतील…त्यांना तर असं भरलं घर खूप आवडतं…
बायजाबाई – सगुणे…तुझाच आधार वाटतो बघ मला…या कैदाशिणीचं काही सांगता येत नाही बघ…भरवत असेल माझ्या लेकाला आपल्याबद्दल…तू आहेस म्हणून मी आहे ग…
सगुणा – हा…ना मग आता माझं ऐकताल का तुम्ही…?
बायजाबाई – बोल ना माझे बाय…
सगुणा – ते तुकारामांच्या गाथेतील अभंग वाचून दाखवलं मला…तसंही आज निरूपण देणारच आहेत की तुम्ही…
बायजाबाई – हा…बाई आन बरं ती गाथा इकडं…
सगुणा गाथा घेऊन जाते आपल्या सासूबाईंच्या शेजारी बसून निरूपण ऐकते….तासाभरानं दोघीही जेवण उरकून घेतात आणि सगुणा आपल्या नवऱ्याला जेवण घेऊन थेट रानात जाते…आपल्या नवऱ्याचं जेवण होईपर्यंत मळ्यात पिकाला पाणी देते…जेवण झाल्यावर शेतघरात जाऊन सखाराम थोडासा विसावतो…आणि आपल्या बायकोला म्हणतो-
सखाराम – काय मग….सगुणाबाई…कसं चाललंय सगळं…मजेत आहे ना…?
सगुणा – तुम्ही जिथं असाल तिथं मी मजेतच असणार ना…
सखाराम – लबाड बोलतेस तू…वहिनी काय-काय वंगाळ बोलते तुला…केवढं सहन करतेस तू…
सगुणा – काही नाही ओ…मला त्या मोठ्या बहिणीप्रमाणं आहेत…त्या जे काही बोलतील सगळं पोटात घालते मी…
सखाराम – मी तुला काहीच देऊ शकत नाही ग…
सगुणा – हे पहा…असं काही नाहीय…तुम्ही अगदी त्या विठ्ठलाप्रमाणं आहात…
सखाराम – ते कसं काय ग…?
सगुणा – आपल्या आईची किती काळजी घेता तुम्ही….
सखाराम – अगं खुळे…पुंडलिकावानी म्हणं….पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आला होता…
सगुणा – व्हय …बाई…तसंच समजा…मला काय कळतंय त्यातलं…मला फक्त तुम्ही कळता…
दोघं शेतघरात मस्त गप्पा मारत होते…त्यानंतर थोड्यावेळाने उठून दोघेही कामाला लागतात…संध्याकाळी घरी परत येतात…सगुणा हात-पाय धुवून संध्याकाळची दिवाबत्ती करते…आणि लागलीच भाकऱ्या थापायला घेते…मोठ्या सुनबाई लगेचच स्वयंपाकघरात येतात…आणि म्हणतात…
मुक्ता – भाजी जरा चमचमीत बनवा आज …गुलमठ करू नका…कसली भाजी करतीय आज ?
सगुणा – मळ्यातून वांगी तोडून आणलीत…म्हणून भरल्या वांग्याचा बेत आहे आज…भाऊजींना आवडतं ना वांग…
मुक्ता – बरं…दिराच्या आवडी निवडी जपतेस…
सगुणा – ताई…असं काही नाहीय…तुम्हाला काय करायचं ते सांगा ना…तुमच्या आवडीचंही करेल मी…एवढा नैवेद्य दाखवाल आत्ता…?
मुक्ता – काय …मला कसं काय सांगतीयस तू…सासूबाई दाखवतात ना…मग आज माझी आठवण कशी काय झाली तुला…
सगुणा – ताई….आत्याबाई हरीपाठ करत आहेत…नाहीतर त्यांनाच सांगणार होते मी…
मुक्ता – दगड आहे तो देव दगड…त्याचे कसले चोचले पुरवता ग तुम्ही…त्याला पाझर फुटणार आहे का….
सगुणा – ताई…मला वाटेल ते बोला पण देवाला काही बोलू नका …त्यानं काय केलंय… [ मुक्तेचा नवरा आत्माराम घरात येतो आणि मुक्ताला म्हणतो ]
आत्माराम – मुक्ता…लई बोललीस…देवाबद्दल अपशब्द काढलास तर…याद राख…
मुक्ता – ओ…पैलवान हा रुबाब तालमीत दाखवायचा आखाड्यात…हिथं माझ्यापुढं न्हाय …
आत्माराम – हिचं मुक्ता नाव कुणी ठेवलं काय माहिती…नावाप्रमाणं वागावं…
सगुणा – भाऊजी…चला जेवायला वाढते…आत्याबाईंचाबी हरिपाठ झालाय…तेवढं नैवेद्य दाखवते…म्हणजे सगळे जेवण करूंन घेऊ…
मुक्ता – माझं ताट माझ्या खोलीत पाठवलंत तर बरं होईल…
आत्माराम – कारल्याला तुपात घोळा किंवा साखरेत बुडवा कडू ते कडूच ….चल आई जेवण करून घे…
बायजाबाई – अरे पण सख्या कुठंय…काही सांगितलं होत का सगुणे त्याने तुला…
सगुणा – व्हय…आत्याबाई ते ना दार धरणार आहेत आज रात्री यायला उशीर होईल असं म्हटले होते मला…मी मघाशी सांगायला विसरलेच…
बायजाबाई – हम्म…मघाशी का नाही सांगितलं ते उमगलं बरं मला…जा बाई त्या बाईसाहेबांचं ताट कर…आत्म्या नेऊन देईल आपल्या बायकोला…देशील ना…? [ खोसकपणे बायजाबाई आपल्या मुलाला म्हणत होत्या ]
आत्माराम – आई…मी खूपदा सांगितलंय तिला पण मी तरी काय करू…मी जास्त वेळ व्यायाम शाळेत असतो…माझ्या गुरूंनी मला सांगितलंच होत…लग्न करू नको म्हणून…लग्न केलं नसतं तर ही धोंड गळ्यात पडली नसती माझ्या…तेव्हा बापाचं ऐकलं माझ्या…अन फसलो…
आत्माराम शरीराने बळकट पण मनाने भोळसट म्हणून मुक्ताशी आज जरी भांडण झालं तरी लगेच गट्टी जमत असे…याच भोळ्या स्वभावाचा फायदा घेण्याचं मुक्ता ने ठरवलं…म्हणून सगुणेबद्दल आणि सासूबाईंबद्दल आपल्या नवऱ्याच्या मनात भलतं सलत भरवते…व एक दिवस आत्मारामशी खूप खूप भांडते…भांडणासाठी कारणही मुक्ताच काढते….असंच एका सकाळी मुक्ता तोंड पडून बसते….आत्माराम आपल्या बायकोला म्हणतो..
आत्माराम – काय झालंय तोंड पाडायला…भरल्या घरात असं तोंड पडून बसलेलं चालत का…
मुक्ता – तोंड पडून बसू नको तर काय करू…?
आत्माराम – काय झालं…सगुणा वाहिनी काय म्हटली का…ती तरी कशाला काय म्हणलं…कारण जवा बघावं तवा तूच तिला धारेवर धरत असतेस….
मुक्ता – सगुणी आणि ते पण…बिचारी…खाली मुंडी आणि पातळ धुंदी आहे नुसती ती…दिसण्यावर जाऊ नका तिच्या…आतल्या गाठीची आहे ती खूप…
आत्माराम – चल काहीही सांगू नकोस मला…आई काही म्हणाली का तुला ?
मुक्ता – बाई ग…बाई काय भोळासांब नवरा दिलाय मला देवाने…एवढं काय काय घडत असत पण थांगपत्ता नसतो तुम्हाला…दिवसभर ते आखाड्यातली माती अंगाला फासून यायची…आणि बकासुरावानी बकाबका खात राहायचं…खाण्यातच आयुष्य जाणार असं दिसतंय मला…
आत्माराम – अय…लई बोललीस…इथं काय कमी पडतंय ग तुला….माझं खाणं काढतीयस…काही बोल पण माझ्या खाण्याबद्दल बोलायचं नाही तू…अन खायच्या खुराकाचा खर्च काय तुझे पप्पा करत नाही…माझ्याच कमाईचे खातो मी…तू कोण सांगणारी मला…
मुक्ता – लई बोललात तुम्ही…ती सगुणी आणि तुमच्या मातोश्री मला आश्रितासारखं वागवतात दिवसभर माहिती आहे का तुम्हाला…कसं माहिती असणार म्हणा…आखाड्यात पहिलवानांसमोर दोन हात कराल तुम्ही…पण तुमच्या बायकोला कुणी छळलं तर…तिथे नेमकं शेपूट घालाल तुम्ही…
आत्माराम – काय केलं त्यांनी…?
मुक्ता – आज मला सक्त ताकीद देऊन ठेवली त्यांनी…स्वयंपाकघरात पाणीसुद्धा प्यायला यायचं नाही…सगळं तुला तुझ्या खोलीत मिळेल म्हणून…
आत्माराम – मग काय चुकलं त्यांचं….कालच जेवण खोलीत आना असं तूच नाही का सांगितलंस सगुणा वहिनीला…मग काय चुकलं त्यांचं…
मुक्ता – [ हे कारण फोल ठरलं म्हणून मुक्ताने दुसरच कारण सांगितलं ] ठीक आहे…पाण्याचं सोडा…मला देवघरातही जाण्यास मनाई केलीय दोघीनी…
आत्माराम – तू आणि देवघरात…कधीपासून जायला लागलीस…?
मुक्ता – का देवघरात मी नाही का जाऊ शकत…मी नवस बोलले होते…आपल्याला मुलं हवं म्हणून…
आत्माराम – देवालाही वेठीला धरलं…नाही ते तू करतेसच त्यात प्रश्न नाही…देवाला नवस करून मुलं होणार आहे का ?
मुक्ता – जर असं असेल ना आईंच्या मनात आपल्या मुलांबद्दल तर मला योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल…
आत्माराम – कुठला निर्णय…आणि आईच्या मनात काय आहे…?
मुक्ता – तुम्हाला माहिती नाही…जर माझ्या मुलांना नेहमी दुय्यम स्थान मिळणार असेल तर या घराच्या वाटण्या झालेल्या कितीतरी पटीनं चांगल्या…[ ‘वाटणी‘ हा शब्द ऐकताच आत्मारामच्या पायाखालची जमीन हलते]
आत्माराम – काय…? वाटण्या….आपल्या गेल्या पाच पिढ्यात वाटणी हा शब्द ऐकला नाहीय मी…तुला कुठून हि अवदसा सुचली…
मुक्ता – आपल्या संसाराचाच विचार करतीय मी…
आत्माराम – घरात काडीची मदत करत नाही तू…वेगळं राहायला लागलीस तर काय सगळी काम करणारास कि काय तू…साधं स्वतःसाठी हाताने पाणी घेऊन पित नाहीस तू…वेगळं राहायला लागली ना की सगळी कामं करावी लागतील तुला…
मुक्ता – नीट समजून घेतलं ना तुम्ही तर काहीही अवघड नाहीय…तुम्हालाही आखाड्यात नाही पाहवत मला…MIDC मध्ये नोकरी पकडायला पाहिजे तुम्ही…
आत्माराम – काय गरज आहे नोकरीची…? घरात दुभती जनावरं आहेत…त्यांच्या दुधाचेच ५०,००० येतात महिन्याला…आणि काय कमी आहे तुला म्हणतो…एवढ्या महागड्या साड्या अंगावर घालून मिरवतेस की…तीन टाइम खातेस की रोज…
मुक्ता – आपल्या मुलांच्या भावी आयुष्याबद्दल बोलतेय मी…आज मला दुय्यम स्थान आहे…उद्या आपल्या मुलांनाही हे कसं सहन करेल मी…एक आई म्हणून माझा विचार कराल….
असे म्हणून मुक्ता आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत बसते…आत्माराम ला आपल्या बायकोच म्हणणं पटत नाही तरीही सहानुभूतीने आपल्या बायकोला म्हणतो-
आत्माराम – मुक्ता…असं करून नाही चालणार…तुझ्या एका निर्णयाने सगळं घर कोलमडेल गं…आपली मुलं मोठी झालीत की थाटू देत ना त्यांना वेगळा संसार…माझ्या आईसाठी मी काही तुझ्या मताशी सहमत नाहीय…
मुक्ता – ठीक आहे….जेव्हा कळेल ना तोपर्यंत मी तुमच्या मताची वाट पाहीन…
आत्मारामहि जास्त न बोलता पटकन आखाड्यातली कामं उरकण्यासाठी जातो…मुक्ता मात्र आपल्या खोलीत विचार करत बसते…आपल्या म्हण्याचा काही फरक आपल्या नवऱ्यावर पडला आहे की नाही याचा विचार मुक्ता करते…चार-पाच दिवस जातात पण आत्मारामवर आपल्या म्हणण्याचा काहीच फरक पडला नाही असं मुक्ताला जाणवतं याचीच शहानिशा करण्यासाठी मुक्ता एक डावपेच आखते या डावपेचात आपल्या जावेला म्हणजे सगुणेला दोषी ठरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले असतात…
सगुणा एक अन्नपूर्णा म्हणून घरात सासूबाईंची लाडकी असतेच म्हणून मुक्ता सगुणेवर आळ यावा म्हणून मोठा डाव आखते…यात आपल्या माहेरच्या शांताक्काची मदत घेते…शांताक्काला एक जालीम विष बनवून आणायला सांगते…बायजाबाई,सगुणा,सखाराम आणि आत्माराम या चौघांचा एकादशी असल्याने उपवास असतो तरीही सकाळपासून फराळाचं सगळं सगुणा करून ठेवते,घरात मुक्ताताईना तेवढा उपवास नसतो म्हणून सगुणा आपल्या जावेसाठीचाही स्वयंपाक करून ठेवते …सकाळचा फराळ झाल्याने सगळीजण शेतात जातात…घरात मात्र मुक्ता शांताक्काना बोलवून विषाची कुपी घेऊन ठेवतात…दुपारची जेवण उरकून सगळेजण घटकाभर विसावा घेऊन संध्याकाळी घरी परततात…घरी हात-पाय स्वछ धुवून सगुणा स्वयंपाकाला लागते तोपर्यंत बायजाबाई…आपल्या दोन्ही लेकांबरोबर देवघरात जाऊन हरिपाठ करत असतात….सगुणा स्वयंपाकघरातून नैवेद्याचं ताट घेऊन देवघरात जाते…इकडे स्वयंपाकघरात मुक्ता…शांताक्काने दिलेली विषाची कुपी घेऊन जाते आणि स्वतःसाठी केलेल्या स्वयंपाकात सर्वांच्या नकळत विष खिरीमध्ये टाकून देते…आणि विष घातलेल्या पातेल्यावर झाकण न ठेवताच आपल्या खोलीत जाऊन बसते…सगळीजण जेवण करण्यासाठीच बसतात….घरात चौघांचे उपवास असतात म्हंणून त्यादिवशी मात्र मुक्ता स्वतःच ताट घेऊन जात असते…वाड्यात पाळीव प्राण्यांचा वावर असल्याने जेवतेवेळी मांजरी पायात अडखळत असतात….अशीच मुक्ताची लाडकी असणारी पांढरीशुभ्र मांजर मुक्ताच्या पायात अडखळते आणि मुक्ताच्या हातून तिने स्वतःसाठी केलेलं ताट जमिनीवर पडत…सगळे ताटातले पदार्थ जमिनीवर पडतात…मातीतली खीर जमिनीवर पसरते…तेवढ्यात जमिनीवर पडलेली खीर मुक्ताची लाडकी मांजर खाऊन टाकते…हा सगळा प्रकार घरातले सगळे जण फराळ करता करता पाहत असतात….आत्माराम मुक्ताला खोचकपणे म्हणतो-
आत्माराम – काय हा धांदरटपणा…बरं झालं आवरून घेतेस नाहीतर पुन्हा सगुणावहिनीवर टेकली असतीस…पण मला कळत नाहीय तू स्वतःच काम स्वतः अचानक कशी काय करू लागलीस…एवढा बदल कसा काय झाला…
मुक्ता आपलं काम आवरून मांजर जिथे गेलं तिथे जाते….वाड्याच्याबाहेर तेच मांजर मृतावस्थेत सापडलं….कारण विष घातलेली खीर प्यायलं असल्याने तेच होणार होत…तेवढ्यात मुक्ता बोंब मारत घरात सैरावैरा पळत असते…घरभर का पळते हे पाहण्यासाठी आत्माराम आणि सगुणा फराळ करता करता पडवीत येतात…आत्माराम मुक्ताला विचारतो…
आत्माराम – अय….गैबाने…काय झालाय कांगावा करायला…आजचा दिवस नीट जाईल असं वाटलं पण कसलं काय…तू काही ना काही करतेसच…
मुक्ता – अहो पहिलवान….ते बघा माझं लाडकं मांजर…मेलं की हो…कसं काय झालं असं…?
आत्माराम – मग काय आता सुतक धरणारेस की काय त्याच…ठीक आहे धर सुतक….भूतदया असावीच नाही का ?
मुक्ता – पहिलवान असं काय म्हणता…धरावाचं लागणार मला त्याच सुतक….
बायजाबाई – काय झालं…अगं मुक्ता पण ते मांजर असं मरून कसं गेलं…इथं कुत्रं तर फिरलं नाही ना…
मुक्ता – सासुबाई….आत्ता लक्षात आलं माझ्या…मांजरांने मघाशी सांडलेली खीर खाल्ली होती…
बायजाबाई – काही काय बोलती…खीर खाल्ल्यानं काय होतंय…तुही खाल्लीच की खीर…
मुक्ता – नाही मी नाही खाल्ली अजून…तुम्ही सगळे हरिपाठ करत होता तेव्हा….खीर सगुणेन झाकण न ठेवताच देवघरात नैवेद्य घेऊन आली होती मी स्वतः पाहिलंय…त्यात गेलं असलं एखादी पाल नाहीतर उंदीर…काय होणार मग विषारी असतात असले प्राणी…
आत्माराम – तुला जर एवढं वाटत होत तर स्वतःची भाकरी स्वतः करायची ना कशाला दुसऱ्यांवर विसंबून राहायचं…अन तू काय ग वेगळं होऊन पोटभर खाऊ घालशील मला…एकतर मी पहिलवान गडी…मला खुराक आणि रतीब लागतोच की…
मुक्ता – तुमच्या पहिलवानकीच्या फुशारक्या सांगूच नका….मी पोटभर खाऊ घालेन की नाही हि फार लांबची गोष्ट आहे पण मी चांगलं…आणि कुठलीही विषबाधा न करता अन्न खाऊ घालू शकते हि गोष्ट पक्की आहे…
बायजाबाई – तुला नक्की काय म्हणायचंय…? माझ्या सगुणेंन विष मिसळलं की काय खिरीत…
मुक्ता – मी तसं म्हटलंय का सासूबाई…ती खिरीची वाटी मांजराने खाल्ल्ली म्हणून बरं नाहीतर माझी आज तिरडी चढली असती एकादशीच्या दिवशी…
आत्माराम – आलं लक्षात….सरळ सरळ बोल तुला काय म्हणायचं ते…
मुक्ता – माझा निर्णय झाला नव्हता पण आज मी ठाम झालीय…या घरात माझ्या जीवावर आलय सगळं…सासूबाई मला वाटणी हवीय…!
आपल्या थोरल्या सुनेच्या तोंडून वाटणी हा शब्द ऐकताच बायजाबाई थाड्कन जमिनीवर बसतात…आणि म्हणतात-
बायजाबाई – वाटणी पाहिजे तुला…! या घरात मी कधीच अजून हा शब्द ऐकलं नव्हता…सांग आत्म्या तुझ्या बायकोला…
आत्माराम – आई….एक विचार कर…मुक्ताला जर या घरात असुरक्षित वाटत असेल तर वाटणी होऊनच जाऊ देत…
बायजाबाई – काय….आत्माराम तुही असा बोलतोस…बरोबर तुला सगळी हिचीच फूस असणार….आमच्या बद्दल कान भरवत असणार तुझे ती…तिला पाहिजे ना तर होऊ देत तिच्या मनासारखं…
बायजाबाई – अरे पण तू एकटा कसं काय झेलणार हीला…एकतर खुराक किती लागतो तुला…पहिलवान गडी तू…
आत्माराम – आई….तुलाही माझ्या खाण्याचं पडतंय…मला नव्हतं वाटत तुही माझं खाण काढशील ते…आज माया दिसली तुझी…मुक्ता सांगत होती ते खरंच होत म्हणजे…या घरात आम्हाला दुय्यम स्थान आहे…म्हणूनच तिच्या जीवावर उठण्याचा अघोरी प्रकार तुझ्या धाकट्या सुनेनं केला…मी आत्तापर्यंत माझ्या बायकोची साथ दिली नाही पण आज देणार….उद्याच वाटणी होऊन जाऊ देत…
बायजाबाईही अगदी हताश मनाने वाटणी साठी तयार होतात…मुक्ताने सगळी कपट कारस्थानं करून बायजाबाईंकडून वाटणीतला जास्तीत जास्त हिस्सा आपल्या नवऱ्याच्या आणि स्वतःच्या नावावर करू घेतला…त्यातल्यात्यात वाड्यातली पडवी फक्त सामायिक राहिली….घरातली पन्नास दुभत्या गायी होत्या त्यातल्या..फक्त आठ गायी सखारामला देण्यात आल्या…शेतातला बागायती हिस्सा आत्मारामच्या वाटेला तर ज्या भागात पाणी नाही तसली बंजर जमीन सखारामच्या वाटेला देण्यात आली…घरातला फक्त देवघरातला भाग आणि एकच खोली सखारामला दिली गेली…बाकी सगळा वाडा आत्मारामने स्वतःच्या हातात घेतला…स्वयंपाकघराची मालकीणही मुक्ता झाली म्हणून सगुणेला आपली स्वतःची वेगळी चूल मांडावी लागली…या सगळ्या पेचप्रसंगात तीनच गोष्टी सगुणेसोबत होत्या त्या म्हणजे स्वतः बायजाबाई आणि देवघरातला पांडुरंग….!
सगुणा रोज आपलं गाऱ्हाणं पांडुरंगापुढे गायची…त्याला आळवायची…पांडुरंग पावलोपावली याची प्रचिती सगुणेला देत असे…असच एक दिवस देवासमोरून सगुणा उठली…त्यादिवशी नेमकी एकादशी होती…घरात काम आवरून सगुणेला मात्र थकल्यासारखं होत होतं…म्हणून दुपारी आराम करण्यासाठी स्वतःच्या वाट्यात आलेल्या खोलीत पडली…पडून फक्त अर्धा तास झाला होता…सखाराम घरी आला…आपली सगुणा आज घरीच कशी म्हणून काळजीनं खोलीत आला…आपला नवरा आला म्हणून सगुणा उठून उभी राहते न राहते तोच एक घेरी सगुणेला आली आणि थाड्कन जमिनीवर पडली…आपल्या बायकोला काय झाल म्हणून आपल्या आईला मळ्यातून निरोप धाडून बोलावून घेतलं…बायजाबाई आपल्या सुनेपाशी बसल्या तोपर्यंत सखाराम डॉक्टर ला घेऊन येतो…डॉक्टर सगुणेच्या हाताची नाडी तपासतात…तर गोडं बातमी असल्याची खबर ते देतात…सखारामला खूप आनंद होतो…आपल्या पांडुरंगाचे आभार तो मानतो…एकादशीच्या दिवशी बातमी समजल्याने बायजाबाई पोटी पांडुरंग येणार म्हणून गावभर सांगत सुटतात…
एका बाळाच्या चाहुलीने घरातलं वातावरण खूप क्षणात पालटताना दिसत…म्हणून सगुणाचे सगळे डोहाळे पुरवतात…घरावरचं मळभ एका क्षणातच धुवून निघतं…काही दिवसांनी घरात ओटीभरण होतं…घरात नवीन पाहुणा येणार म्हणून आपल्या मुलासाठी सखाराम जास्तीत जास्त शेतात घाम गाळू लागतो बायजाबाईही लोकांची वाळवणं करून दे,मजुरीला जा,अशी काम करत,गोठयात गायीलाही वासरं होऊ लागली म्हणून दुधाला काहीच कमी नव्हती,त्यातून जेवढे पैसे येतील ते पैसे घरखर्चासाठी वापरतं असे…एकूण सगुणाचा सुखाचा संसार मेहनतीने चालला होता…..तर दुसरीकडे मुक्तावर मात्र आभाळ कोसळले….मुक्ताला स्वयंपाक येत नसल्याने घरात रोज आत्मारामचं भांडण होतं असे…पहिलवान गड्याला खाणं-खुराक नीट मिळालं तर ठीक आहे नाहीतर पूर्ण दिवस भांडणात जात असे…काही दिवसांनी आत्माराम जास्तीत जास्त वेळ आखाड्यात घालवू लागला मुक्ताबरोबर त्याला राहणे जड जाऊ लागले…याची परिणती म्हणून नवरा-बायकोमध्ये नैराश्य येऊ लागलं…मुक्ताही भलामोठा वाडा साफ करणं, गाई-गुरांचं करणं,स्वयंपाक याने बेजार होतं असे आणि अंथरुणावर पडताचक्षणी झोपत असे…म्हणून आपल्या नवऱ्याच्या सोबत काही क्षण घालवू शकत नव्हती एकूण मुक्ताचा संसार डळमळू लागला…देवघर सुद्धा आपण सगुणेच्या वाट्याला दिल म्हणून देवापुढं गाऱ्हाणही मुक्ता घालू शकत नव्हती…मुक्ताचं घर म्हणजे एक प्रकारे जिवंत स्मशान वाटत होतं…
दुसरीकडे सगुणेचेही दिवस भरत आले होते…म्हणून सासूबाई सगुणेची खूप काळजी घेऊ लागल्या…तिला काय हवं नको ते पाहू लागल्या…कार्तिक महिना सुरु होता सर्व गावभर कार्तिकस्नान उत्साहात होतं असे…सगुणाबाईंच्या घरी त्यानिमित्ताने काकड आरतीसाठी काही महिला येत असे…पांडुरंगासोबत सुनेचीही दृष्ट सगळीजण काढत असे…कार्तिकी एकादशीलाच सगुणेन एका सुकुमार मुलाला जन्म दिला…बाळाचे पाऊल घरात पडताच घर हसू-खेळू लागलं…सगळा वाडा बाळाच्या हसण्याने पुन्हा हसू लागला…असेच दिवस पुढे जात राहिले…बाळाचे नामकरण करण्यात आले…बायजाबाईंची लेक जिजा आपल्या भाच्याच्या बारशाला आली…सासूबाईंच्या आवडीनुसार बाळाचे नाव कैवल्य असे ठेवण्यात आलं…बाळ खूप तेजदार असं होतं, कुरुळ जावळ,गालावर खळी असं सुंदर रुपडं बाळाचं दिसे…कुणीही घरात आला की बाळाचं कौतुक केल्याशिवाय राहत नसे…बाळाच्या पायगुणाने सखारामला एका साखर कारखान्यात उसाच्या पुरवठ्याची मागणी आली…बंजर जमीन असूनही उसासारखं पीक पिकवले आणि त्याच पिकांना मोठ्या साखर कारखान्यात मागणी आली…दिवस पालटून गेले…पाहता-पाहता ‘कैवल्य शुगर सप्लाय ‘ या नावाने ट्रान्सपोर्ट सेवा सखारामने नावारूपाला आणली…
एकीकडे पांडुरंग चांगला प्रसाद सखारामला देत होता…दुसरीकडे आपल्या करणीचे फळ मुक्ता भोगत होती…आपल्या नवऱ्याच्या अति नैराश्यामुळे आलेल्या वाढत्या तणावामुळे मुक्ताचा आई होण्याचं सुख भंग पावलं..नैराश्य घालवण्यासाठी आत्माराम दिवसरात्र हातभट्टीवर दारू पिऊन येत असे…दारूच्या अतिसेवनाने आत्माराम आपल्या बायकोला मुलं देऊ शकला नाही…
आपण कधीच वडील होऊ शकणार नाही या सततच्या नैराश्याने आत्मारामने स्वतः राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली…आपल्या नवऱ्याचा असा मृतदेह पाहून शेवटी याच धक्याने मुक्तालाही वेडाचा जबरदस्त झटका आला…बायजाबाईनी मुक्ताच्या माहेरी याची बातमी दिली तसे मुक्ताला…वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं…तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले…तरीही आपली सून आहे म्हणून बायजाबाईनी मुक्ताकडे कधीच पाठ फिरवली नाही…उपचार करून आल्यावर मुक्ताला परत आपल्या घरात बायजाबाईनी घेतलं…झालेल्या प्रकामुळे कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण मुक्ता देऊ शकली नाही….मुक्ताच्या डोळ्यात फक्त आई होण्याची आस सर्वांना दिसत होती…बायजाबाई मात्र आपल्या एका लेकाचा संसार पाहून समाधानी होत्या…पुंडलिकाला जस पांडुरंगाने दर्शन दिल….तसंच कैवल्यच्या रूपाने सखारामला जगण्याची दिशा दाखवली…याची प्रचिती सगुणेला आणि बायजाबाईना वारंवार आली म्हणून…त्याचघरात नेहमी कथा कीर्तन,काकड आरत्या असं सगळं परंपरागत होऊनच गेलं…


प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.