“प्रेम हे..”

शिशिर होताच तसा, मनकवडा. त्याला मनातलं सारं काही कळायचं न बोलताच. एक हलकासा कापरा स्वरही त्याला उमगायचा. म्हणायचा, “माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही अजिबात.”
माझे मलाच आश्चर्य वाटायचे, ‘मी कशी काय प्रेमात पडले या व्यक्तीच्या!’
शिशिर स्वभावाने एकदम मनमिळावू. अगदी काही मिनिटांतच समोरच्याला आपलसं करून टाकणारा, सतत हसवणारा, खोड्या काढणारा, चिडवणारा..आणि मी एकदम शांत, गप्प गप्प राहणारी, गालातल्या गालात हसणारी.
पण जशी शिशिरची भेट झाली, तसा माझ्या स्वभावात बदल जाणवू लागला. स्वतः वर भरभरून प्रेम करायला शिकले मी आणि समोरच्या व्यक्तीवरही. मनमोकळेपणाने हसायला लागले, व्यक्त व्हायला लागले.
कॉलेजच्या शेवटच्या दिवशी शिशिरनेच प्रपोज केलं मला. म्हणाला, “सानवी, माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. माझी लाईफ पार्टनर होशील? पण तुझा हा स्वभाव फारसा बदलू नकोस, मला आहेस तशीच जास्त आवडतेस.”
या शेवटच्या वाक्याने मी पुन्हा नव्याने शिशिरच्या प्रेमात पडले. ‘त्याला मी आहे तशीच आवडत होते!’ मला समजून घेणारा कोणीतरी भेटलं याचाच खूप आनंद झाला मला आणि त्याक्षणी त्याला मी होकार दिला.
कॉलेज संपल्यानंतर शिशिर नोकरीसाठी परगावी गेला. त्याच्याविना इथे राहणं मला कठीण होतं, पण शेवटी नाईलाज होता. जाताना तो म्हणाला, “सानु मी ही नाही राहू शकत तुझ्याविना. पण आपल्या भविष्यासाठी जाणं भागच आहे मला.” इतकं बोलून त्याने मला एक हलकीशी मिठी मारली आणि मागे न वळून पाहताच तो निघून गेला.
नंतर मीही आई -वडिलांच्या घरच्या बिझनेसमध्ये काम करायला सुरुवात केली.
हळूहळू शिशिर नोकरीच्या एक -एक पायऱ्या चढत गेला आणि मी ही बिझनेसच्या खाचा- खोचा शिकत गेले. काहीही झाले तरी शिशिर आणि मी दररोज एकमेकांना कॉल करायचो. दिवसभरात जे काही घडलं, ते एकमेकांशी बोलायचो.
आम्ही सहा महिन्यातून एकदाच भेटायचो. त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहायचो.
भेटल्यानंतर शिशिरमध्ये पूर्वीपेक्षा जास्त बदल जाणवायचा मला. “तो आपल्या पासून दूर तर जात नाही ना?” या विचाराने मन व्याकूळ व्हायचं.
पण “माझा शिशिर तसा नाही” या एका समजुतीने मी पुन्हा- पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडायचे. आमच्या भविष्याची स्वप्न पाहायचे.
तीन वर्षानंतर शिशिर आपल्या घरच्यांशी आमच्या लग्नाबद्दल बोलणार होता. तसं प्रॉमिसही केलं होतं त्याने.
दरम्यान माझ्या आई -बाबांनीच माझ्याकडे लग्नाचा विषय काढला. मग मी शिशिर आणि माझ्या विषयी सारं काही सांगून टाकलं दोघांना. पण आमच्या लग्नाला दोघांचा कडाडून विरोध झाला.
“नोकरी करणारा मुलगा नको. मुरलेला बिझनेस माईंडेड मुलगा हवा.” हाच तगादा आई – बाबांनी लावला. मी समजावून थकले दोघांना. शेवटी शिशिर इथे आला. त्याने मला घरी येऊन मागणी घातली. तरीही आई -बाबा आपला हट्ट सोडायला तयार होईनात.
तसं शिशिरमध्ये नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. पण इथे आई -बाबांचा इगो आड येत होता. त्यांच्या समाजातल्या प्रतिष्ठेला धक्का लागत होता.
मग शिशिरच्या आई – वडिलांनी माझ्या आई -बाबांची मनधरणी केली. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.
शेवटी शिशिर म्हणाला, “तुझ्या आई -वडिलांना दुखावून मला लग्न करायचे नाही.
” हे ऐकून मी दुखावले गेले. रडत -रडत त्याला बिलगले, माझी मिठी सोडवत, जाताना तो इतकेच म्हणाला, “विरहात प्रेमाची खरी परीक्षा असते गं. माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही. मात्र मी आयुष्यभर तुझ्यावर जीवापाड प्रेम करत राहीन.”
या वाक्याने मी पुन्हा त्याच्या प्रेमात पडले अगदी नव्याने!
मग मी ही त्याला प्रॉमिस केलं, “आई – बाबांचा होकार येईपर्यंत तुझीच वाट पाहीन.”
पुढे दोन वर्षानंतर शिशिरचे लग्न झाले, त्याच्या आई -वडिलांच्या आग्रहाखातर.. आणि मला धक्काच बसला.
आता माझ्या आई – बाबांनी माझ्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. मी लग्न करून खुश राहू शकणार होते की नाही हे माहित नव्हतं. पण मी होकार दिला.
वाटले, कदाचित खरे प्रेम हे असेच असेल, आठवणीत रमणारे, विरह सहन करायला लावणारे..
पण माझ्या मनाचा एक हळवा कोपरा शिशिरसाठी कायमच रिकामा राहणार होता..नेहमीच.
============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============