प्रथमेशचा रागोबा


बरं का मुलांनो,एक छोटूस गाव होतं. डोंगराच्या कुशीत वसलेलं. त्या गावात एक शाळा होती. गावातली शाळा म्हणजे इमारत नसते. ते एक लांबलचक कौलारू घर असतं. या घरातल्या मोठाल्या खोल्या म्हणजे वर्ग असतात. बरेचदा तिथे प्रत्येक इयत्तेवर शिक्षक नसतात कारण मुलं कमी असतात मग एकाच वर्गात एक दोन शिक्षक मिळून पहिली ते चौथीचा अभ्यास घेतात. असं जिथे मुलं कमी असतात त्या शाळांत चालतं. अगदी लहान मुलांसाठी बालवाडी असते. जसं शहरात नर्सरी,ज्युनिअर, सिनिअर तशी तिथे बालवाडी.
पाटील सर या शाळेत पहिली ते दुसरीला शिकवायला होते तर तिसरी चौथीला धोपाटणे सर शिकवायचे. शाळेत गेल्याबरोबर सर येईपर्यंत सारी मुलं पाढे म्हणत,कविता म्हणत,वाचन करत..तसा नियमच होता गुरुजींचा. वर्गप्रमुख देवेन माने दाराजवळ उभा राहून सर येण्याची वाट बघत असे. सरांचा पांढराशुभ्र शर्ट व काळी पँट मानेला बरोबर दिसे मग तो मुलांना हाताने इशारा करी. मानेचा इशारा आल्याबरोबर मुलं जोरात कविता म्हणू लागत.
याच वर्गात एक प्रथमेश नावाचा किडकासा काळा मुलगा होता. मुलं त्याला रेडा म्हणून चिडवत. प्रथमेशने बऱ्याचदा ऐकून घेतलं. असं झालं की तो आईला येऊन सांगे. आई त्याची समजूत काढे. मग त्याचा राग निवळायचा पण हल्ली प्रथमेशच्या आईला छोटं बाळ झालं होतं. प्रथमेशच्या आईच्या पोटाची शस्त्रक्रिया झाली होती त्यामुळे ती फारच अशक्त व चिडचिडी झाली होती.
प्रथमेशने बाळाचं ठकी असं नाव ठेवलं होतं. ही ठकी रात्रभर रडत रहायची त्यामुळे प्रथमेशची झोप पुरी होत नव्हती. त्याच्या आईची,बाबांचीही झोप अपुरी रहात होती.
दिवसा कामं झाली की प्रथमेशची आई छोट्या ठकीला कुशीला घेऊन झोपे. त्यांच्या घरात घरकामाला वासुकाका होते. ते प्रथमेश आला की त्याला जेवायला वाढीत. त्याला घालायला कपडे,..वगैरे सारी व्यवस्था करीत पण..पण..तरीही प्रथमेशचं कुठेतरी बिनसत होतं. याला कारण होतं ठकीचं त्यांच्या कुटुंबात येणं. बाळ येणार म्हणून आनंदात असणारा प्रथमेश बाळ आल्यावर मात्र घुमा बनत चालला होता कारण त्याला त्याची आई हवी तशी,हवी तेंव्हा मिळत नव्हती .
याचं पर्यवसान म्हणून की काय प्रथमेश हल्ली वर्गात सर नसताना मारामारी करु लागला होता. बारीकसारीक गोष्टींवरुन त्याचे गाल फुगायचे. त्यादिवशी तर कहरच झाला. राज त्याचं शाईचं पेन झटकत होता व ती शाई प्रथमेशच्या शर्टावर उडवली. हे पहाताच प्रथमेशचा राग अनावर झाला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले.
प्रथमेशने त्याच्या हातातलं करकटक राजवर भिरकावलं. राजचा डोळा थोडक्यात वाचला,तरीही जखम खोलवर झाली. रक्त वाहू लागले.पाटील सरांनी शिपायाला बोलावून घेतलं. राजच्या जखमेवर बँडेज बांधलं व त्याला घरी पाठवून दिलं. सर प्रथमेशवर रागावले व त्याला पुस्तकातली चार पानं लिहून आणायला सांगितली.
दुसऱ्या दिवशी राजचे आईबाबा शाळेत आले. त्यांनी मुख्याध्यापिकांकडे प्रथमेशची तक्रार केली. प्रथमेशला मुख्याध्यापिकांच्या कक्षात बोलवण्यात आलं. सोबत पाटील सरही होते. मुख्याध्यापिकांनी प्रथमेशला राजच्या आईवडिलांची माफी मागावयास लावली व राजला महिनाभरासाठी शाळेतून बडतर्फ करण्याची नोटीस लिहू लागल्या पण पाटील सर मध्ये पडले म्हणाले,”प्रथमेशच्या वतीने मी माफी मागतो व त्याच्या वागणुकीची जवाबदारी घेतो.”तेंव्हा कुठे प्रथमेशची सुटका झाली. प्रथमेशला सरांचं हे नवीन रुप दिसत होतं.
शाळा सुटल्यावर पाटील सरांनी प्रथमेशला जवळ बोलावलं व एक काम सांगितलं. सर त्याला म्हणाले,”प्रथमेश तुला खूप म्हणजे खूपच राग येतो नं. अशावेळी तू या कुदळीने ही शाळेच्या बाजूची जमीन खण. अगदी राग निवळेपर्यंत खणत रहा.”
सर पण घरी राग आला तर?
सर म्हणाले,” तर मग दुसऱ्यादिवशी सकाळी जरा लवकर ये व तो घरचा राग शांत होईपर्यंत खण.”
आत्ता प्रथमेश सरांच्या म्हणण्याप्रमाणे करु लागला. त्याची कोणी खोडी काढली व त्याला राग आला की तो शाळेबाजूची जमीन राग निवळेपर्यंत खणे.
हळूहळू प्रथमेशचं रागावणं कमीकमी होऊ लागलं.
सरांनी परत एकदा प्रथमेशला बोलावलं. त्याच्या हाती झेंडूच्या बिया दिल्या व त्याला त्या खणलेल्या जागेत ठराविक अंतरावर पेरायला सांगितले व रोज तिथे झाऱ्याने पाणी फवारायला सांगितलं. सरांनी त्याला इतर मुलांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेण्याचा सल्ला दिला. आपल्याला सरांनी एवढी मोठी जवाबदारी सोपवलेय याचं छोट्या प्रथमेशला कोण अप्रुप वाटलं.
प्रथमेशने वर्गमित्रांना झाडं लावण्याचं महत्त्व पटवून दिलं व त्यांना या कामात सहभागी होण्याचं आवाहन केलं. साऱ्या मुलांनी मिळून बिया पेरल्या व रोज बागेची जोपासना करु लागली. औषधांची फवारणी केली. त्याबद्दल आवश्यक ते ज्ञान त्यांना क्रुषी अधिकारी श्री.मानमोडे यांनी पाटील सरांच्या विनंतीनुसार दिले.
तसंच एग्रीकल्चर,फ्लोरीकल्चर या क्षेत्रातल्या करियरविषयीही मुलांना मार्गदर्शन केले.
आत्ता प्रथमेश शाळेत काय काय झालं ते घरी येऊन चिमण्या ठकीला सांगू लागला. ठकीही त्याला हुंकार देऊ लागली,हसू लागली.पायांनी सायकल चालवू लागली. प्रथमेशला त्याची इटुकली पिटुकली ठकीताई आवडू लागली. थोड्याच दिवसांत पेरलेल्या बियांतून छान रोपं उगवली.
थोड्याच दिवसांत विद्यार्थ्यांच्या कष्टाचं चीज झालं.हातभर मोठे ,भरगच्च असे शेंदरी,पिवळे झेंडू बागेत फुलले.मुलांच्या या उपक्रमाचं मुख्याध्यापिकांनीही कौतुक केलं.रोज मुलं सरस्वती देवीला त्यांच्या बागेतली फुलं वाहू लागली.
ही फुले बाजारात नेऊन कशी विकायची याचंही मार्गदर्शन श्री.मानमोडे सरांनी केलं. प्रथमेशच्या बाबांनी त्यांच्या रिक्षातून फुलं बाजारपेठेत नेण्यात व योग्य भावात विकण्यात विद्यार्थ्यांना मदत केली. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचा अनुभव आला.
विद्यार्थ्यांना ते पैसे पाटील सरांच्या हस्ते मुख्याध्यापिकांना दिले.त्या पैशितून शाळेच्या ग्रंथालयात छान छान गोष्टीची पुस्तकं घेतली. इ-क्लास ही संकल्पना वर्गात अमलात आणली. पाटील सरांनी प्रथमेशचे खूप कौतुक केले. त्याच्या नेत्रुत्वगुणाचं,सहकारी व्रुत्तीचं कौतुक केलं.
पाटील सर मुलांना म्हणाले,बाळांनो ही रंगीबेरंगी सुंदर फुलं त्यावर भिरभिरणारी ही फुलपाखरं तुमच्या कष्टाचं प्रतिक आहे.पण माती नसती,जमीन नसती तर हे शक्य झालं नसतं म्हणून तुम्हीसुद्धा आपल्या वाडवडिलांची जमीन कधीच विकू नका. भले दोन घास कमी खा पण मातीशी इमान राखा. ही माती काळी आहे पण फुलं किती सुरेख रंगाची देते नं तसंच प्रथमेश काळा आहे म्हणून त्याला चिडवू नका. मुलांनो बाह्यरुपापेक्षा मनातलं सौंदर्य टिपायला शिका. माणसातला माणूस ओळखायला शिका.
बोध:-
मित्रांनो राग हा सर्वांनाच येतो.मग माणूस लहान असो वा मोठा .या रागावर विजय मिळवता आला पाहिजे व आपल्या शक्तीचा उपयोग सत्कार्यासाठी केला पाहिजे.
एकमेकांच्या साथीने कामं तडीस नेता येतात.लहान भावंडांवर माया केली पाहिजे.असे बरेच छोटे छोटे बोध या इटूकल्या गोष्टीतून घ्या बरं.😊
——-गीता गजानन गरुड.
================================