प्रपंच ( भाग तिसरा )

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
“आरु, किती मधाळ बोलतेस तू. वाटतं ऐकतच रहावं..ही रात सरुच नये कधी..”
बराच वेळ झाला तशी निषादने शिट्टी वाजवली. सारंग आरोहीचा निरोप घेऊन उतरणीला लागला. घरी आला तर दारात आई वाट बघत बसली होती.
‘’ कुठे गेला होतास सारंगा? किती वेळ झाला हे आलेत घरी. चौकशी करत होते तुझी.’’
‘’ कशासाठी!”
————————–-–——————-–—–
“असं बोलू नये उद्धटपणे, सारंगा.”
“मग माझी चौकशी का करतात ते! मला मुळीच भेटायचं नाहीए त्यांना. माझं जेवण खोलीत दे पाठवून आणि सोबत कैरी दे तिखटमीठ लावून. आज जरा आवडीचं खावंसं वाटतय. “
सारंग मालतीच्या नजरेसमोरुन निघुनही गेला तरी ती दोन क्षण तिथेच उभी होती. प्रभाकरची हाक ऐकू येताच स्वैंपाकघराकडे वळली.
मालतीने नवऱ्याचं पान वाढलं.
“कुठे असतात कुठे चिरंजीव हल्ली? जेवायला येतोय ना. पान वाढ त्याचं.”
“अहो, तो खोलीत जेवतो म्हणतोय.”
“का बापाच्या पंक्तीस बसायची लाज वाटते! नोकरी करतोय म्हणे स्टेनोची. त्यात काय मिळणार..चार दिडक्या. माझ्या धंद्यात ये म्हणावं. हल्लीच दोन नवीन ट्रक घेतलेत. एक टूरिस्ट बस घ्यायचा विचार चाललाय. अष्टविनायक यात्रा, चारधाम यात्रा..लोकांचा जोवर देवावर विश्वास आहे तोवर या धंद्यात सुकाळ आहे..शिवाय इतर स्पेशल कमाई वेगळी.”
“ती आणि कसली?”
“काही विशेष नाही. बारक्या पांढऱ्या पुड्या असतात. इकडून तिकडे पाठवायच्या. जब्बर नफा मिळतो. कलेक्टर झक मारला.”
“काय असतं एवढं त्या पुड्यांत?”
“गांजा, चरस.”
“वाईट असतं ना ते. लोकांच्या पोरांच वाटोळं होतं ते खाल्ल्याने.” मालती नाराजीच्या स्वरात म्हणाली.
“ताटात हात झटकत प्रभाकर म्हणाला,”मी सांगतो खायला? अडाणी कुठची. अशाने नवऱ्याच्या पोटावर पाय आणशील तू कधीतरी. तुम्ही लोक साले शेणातले किडे. शेणातच सडणार.”
ताट उचलत मालती पुटपुटली,”पाप लागेल अशाने.”
मोठ्याने हसत मालतीकडे तुच्छ कटाक्ष टाकत आचवता आचवता प्रभाकर म्हणाला,”पाप..या जगात जे उजेडात येत नाही ते पाप नाहीच मुळी. आता हेच बघ. काल एका मोठ्या हाफिसात शिपायाला पकडला म्हणे, क्षुल्लक रुपयांची लाच घेताना. हे असे बारके मासे गळाला लागतात. मोठे मासे मलई खाऊन सहीसलामत सुटतात. वरतून सभ्यपणाचा आव आणतात. कलियुग आहे हे कलियुग. कोण सभ्य राहिलं नाही इथे. बरं ते जाऊदे. मुद्द्याचं बोलतो. रात्री मला हवीस तू. वाट बघतोय.”
“अहो, पोरं मोठी झाली आता. लग्नाला आली.” मालती अगतिक स्वरात म्हणाली.
“म्हणून मी उपाशी राहू..गप ये वरती. नाहीतर कंबरड्यात लाथ बसेल.” तणतणत प्रभाकर वरती गेला.
मालतीच्या क्रुश शरीराचे पुन्हा एकदा लचके तोडले गेले. कायदामान्य बलात्कार होता तो. मालती वरच्या तांबूस मंगलोरी कौलांकडे डोळे रोखत, प्रभाकर करत असलेली देहाची विटंबना सहन करत राहिली..
ती पळून आली तेंव्हाही अशीच घिसाडघाई. तिने कल्पना केलेली..वाऱ्याच्या स्पर्शाने कळीची एकेक पाकळी उमलावी तशीच उमलेल ती पण छे! तिचं कल्पनेतलं जग आणि वास्तव यात फार तफावत होती. बाहेरुन दिसणारं त्याचं देखणं रुप खरं की हे ओरबाडून काढणारं रुप खरं!
तिला वाटायचं तो अलगद मिठीत घेईल. तिच्या व्याकुळ मनाला आधी शांत करेल मग हळूहळू तिच्या कलाकलाने घेत तिच्यात एकरुप होईल. मिलनाचे ते उत्कट क्षण ती उराशी जपून ठेवील पण त्याऐवजी तिच्या नशिबी आली देहाची विटंबना, त्याच्या नखांचे ओरखडे, दातांचे व्रण..नि वेळप्रसंगी मुटकेही.
अशा वेळी तिला आठवायची तिची आई..आईचे ते आर्जवी बोल..”माले, तो प्रभाकर बरा नव्हे. त्याच्या नादी लागू नकोस,” म्हणणारी..तिचं न ऐकता मालती प्रभाकरच्यासोबत जत्रांतून फिरते हे कानी येताच भिंतीला डोकं आपटून घेणारी. .तिचा दादा..प्रभाकरचं नं मालतीचं सूत कळताच मालतीवर दिवसरात्र पाळत ठेवणारा..मालती या दोघांनाही जुमानत नाही म्हणताच तिला आपल्या परीने,संयमित वाणीने समजवू पहाणारे मालतीचे वडील..नं तरीही ती ऐकत नाही म्हंटल्यावर जन्माला आल्यापासनं कधी पोरीवर पाच बोटं न उगारलेले पण तिला या जाणत्या वयात गुरासारखे झोडणारे नि बाळंतिणीच्या खोलीत तिला डांबून ठेवणारे..ती जेवत नाही म्हणून स्वत:ही अन्नाच्या कणाला न स्पर्शणारे तिचे वडील नं या साऱ्यांच्या प्रेमाला, क्षोभाला बळी न पडता खिडकीचे गज तोडून अंधारात पळत सुटलेली ती..
थोरल्या आंब्याखाली प्रभाकरला जाऊन भेटलेली ती. तिच्या मनावरची प्रभाकरची धुंदी काही महिन्यांतच उतरु लागली. मालतीला कळू लागलं की चारचौघींसारखी बायको घरात यावी, पुजेस, सणाकार्यास जोडीला हवी म्हणून त्याने तिच्याशी लग्न केलं होतं.
लग्नानंतर थोड्याच वर्षांत दोन मुलांची ती आई झाली. प्रभाकर मात्र कुणाला अगदी तिलाही मागमूस न सांगता मुंबईस निघून गेला.
ओली बाळंतीण ती शोधणार कुठे होती त्याला! दोनेक वर्षांनी कुठुनसा पत्ता लागलाच त्याचा. दीर, जावेचं काही न ऐकता ती मुंबईस रवाना झाली, दोन कच्च्याबच्च्यांना घेऊन.
कदाचित त्यांना पाहून तरी त्याच्या काळजात मायेचा झरा फुटेल या आशेने. कुणकुण लागलेली तिला की प्रभाकरने तिकडे घरोबा केलाय पण तिचा तिच्या प्रेमावर विश्वास होता. प्रभाकर काहीतरी नवीन उद्योगधंदा करत असावा तिथे पण दुसरी बाई ठेवून तिच्या प्रेमाची अवहेलना करणार नाही असं वाटत होतं तिला,नव्हे खात्रीच होती तिची.
टेक्सीवाल्याने मालतीला एका चाळवजा बिल्डींगीपाशी आणून सोडलं. काखेला पोरगी, हातात पिशवी नि पदराचा शेव धरलेला थोरला लेक अशा अवतारात ती प्रभाकरच्या खोलीवर पोहोचली.
मालतीने तिथे नवऱ्याचा दुसरा संसार पाहिला..हो लोकांवर विश्वास नव्हता तिचा..आता स्वतःच्या डोळ्यांवर कसा अविश्वास दर्शविणार होती! गोरीपान किंचीत स्थुल देहाची, काळ्याभोर,मादक डोळ्यांची नाजूक जिवणीची तलम वस्त्र नेसलेली मालतीची सवत चांदणी म्हणजे जणू सिनेमातली नटीच होती. मालती नि मुलांना तिने चहापाणी दिलं. मालती पोराबाळांना घेऊन आल्याचं कंसलंही टेंशन चांदणीच्या चर्येवर दिसत नव्हतं. अगदी सहज तिचा वावर सुरु होता.
आपल्या नखाएवढ्या मुलीला मालतीच्या स्वाधीन करुन चांदणी प्रभाकरसोबत आतल्या खोलीत जाऊन निजली. आतून कडी लावली होती. आत दोघांची रतिक्रीडा बहरात आली होती.
संध्याकाळी आल्यापासनं प्रभाकरने मालतीची साधी दखलदेखील घेतली नव्हती. मुलांनाही कडेवर घेतलं नव्हतं. मालतीला प्रभाकरचा भयंकर राग आला होता..पण..पण असंच व्हायचं तिचं..प्रचंड राग आला की वाचाच बसायची तिची. दगड व्हायचा तिचा. स्वत:चा नवरा परक्या बाईसोबत पाहून ती आतल्या आत झुरत होती.
मालतीला खूप वाटत होतं,इथून दूर पळून जावं. माहेरी जावं ..आईवडिलांच्या पायावर लोळण घ्यावी नि आपली चूक कबूल करावी..हात जोडून म्हणावं..”चुकले मी आईबाबा..दादा चुकले रे मी..फसले रे.”त्या रात्रीनंतर आयुष्यभर मालती हेच बोलत आली होती..अगदी नामजप केल्यासारखी.
रात्रभर मालतीचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. थोडं उजवडताच चांदणीने आतली कडी काढली. तिची मुलगीही हुं नाही की चूं नाही. अगदी गाढ झोपली होती,मालतीच्या मुलाच्या कुशीत शिरुन..सख्ख्या भावंडांसारखी जोडी वाटत होती पण क्षणभरच..मालती भानावर आली. आन्हिकं आवरताच प्रभाकरला म्हणाली,”मला गावी न्हेऊन सोडा. झाली तेवढी शोभा पुरे झाली.”
प्रभाकर तिच्या बोलण्याला सहजतेने घेत म्हणाला,”मालती,अगं हिचं छोटसं ऑपरेशन करायचं आहे. दुसऱ्या कोणालातरी कामाला ठेवणारच होतो, अनायासे तू आलीच आहेस तर तूच रहा. लोकांना पैसे देण्यापरीस आपल्या माणसाला दिलेले काय वाईट!”सणकन थोबाडीत बसावं असं मालतीचं झालं..किती निलाजरं,कोडगं असावं माणसाने,त्याला काही सीमा!
महिनाभर मालतीला त्या परक्या संसारात राबावं लागलं..का..कशासाठी..एकटी असती तर केंव्हाच विहीर जवळ केली असती,मालतीने पण पदरात दोन लहान मुलं होती. धाकटी तर अंगावर पीत होती. मुलं मालतीची एकटीचीच होती का..एक पत्नी हयात असताना नवऱ्याचा दुसरा घरोबा..दाद मागता आली असती पण तेवढी धमक,कोर्टकज्ज्यासाठी लागणारा पैसाअडका नव्हता तिच्या गाठीस.
मालतीस पहाटे चारला उठून नळाचं पाणी भरावं लागे. सवतीसाठी आंबील,शिरा,पेज.. तिला जे खाऊ वाटेल ते करुन द्यावं लागे. चांदणीच्या थोरल्या लेकीचे, तारीचे नवीन झगे,खेळणी..सगळं अगदी सिनेमातल्यासारखं होतं. याउलट मालतीची मुलं, अगदी साधेसुधे कपडे पण किरकिरी मात्र अजिबात नव्हती. चांदणीच्या तारीलाही आपल्यात खेळायला घ्यायची.
एकदा प्रभाकरचा कोण व्यावसायिक पंजाबी मित्र त्याच्या पत्नीसोबत जेवायला येणार होता. त्याच्या पत्नीला म्हणे महाराष्ट्रीयन जेवणाची आवड..म्हणून त्यांच्यासाठी चारीठाव स्वैंपाक करावयाचा होता. त्यादिवशी मात्र सकाळपासनंच प्रभाकरच्या तोंडातून मध गळत होता. श्रीखंडासाठी लागणारा चक्का, भाजीपाला,अळूवडीसाठी अळूची पानं, कोशिंबीरीसाठी काकडी,गाजर..असं सगळं प्रभाकरने मालतीस आणून दिलं. तिच्यासोबत रांधायलाही लागला. मुलं आपापसात खेळत बसली होती. चांदणी रेडिओवर गाणी ऐकत बसली होती.
त्या शिख उभयतांनी मालतीच्या स्वैंपाकाची दिल खोल के तारीफ केली. जाताना ती पंजाबीण म्हणालीही,”भैया, आप बहुत खुशनशीब हो। इतनी अच्छी स्वैंपाकीणबाई मिलती कहाँ है। जी तो करता है, इसीको उठाके ले जाऊँ।”
मालतीच्या स्वैंपाककलेची ती स्तुती होती तरीही स्वतःच्या नवऱ्यासमोर स्वैंपाकीणबाई असा उल्लेख नं तरीही प्रभाकरचं नुसतं दात काढणं मालतीच्या वर्मी बसलं.
ते छोटंसं ऑपरेशन झाल्यानंतर काहीच दिवसांत चांदणी पोटुशी राहिली. प्रभाकर तिला नाजूक कळीला जपावं तसा जपत होता.
काय भूल घातली होती चांदणीने प्रभाकरला कोण जाणे. एका स्त्रीच्या संसारावर गुटा फिरवून दुसरी एखादी स्त्री त्याजागी आपला संसार कसा काय थाटू शकते! मनाजवळ काहीच येत नसेल का अशावेळी? माणूसपण कुठे गहाण टाकते? का नसतंच ते अशांकडे!
मध्यंतरी दिराचं पत्र येऊन गेलं..त्यांना मालतीने काही दिवस इथेच राहतो असं मोजकंच नि वरवरचं ख्यालीखुशालीचं लिहिलं होतं.
रात्र झाली की मालतीला या शहरीपणाचा उबग यायचा..तिला गावाची आठवण यायची. तिचा कंठ दाटून यायचा..डोळ्यातनं आसवं झरु लागली की सारंग म्हणायंचा..आई नको ना गं रडू. आपण स्वप्नात आपल्या घरी जाऊ. तू गाणं म्हण बघू..मग पदराने डोळे निरपित मालती हळू आवाजात गाऊ लागायची..
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
पिवळी पिवळी बिट्ट्याची काचोळी नेसल्या डोंगर वाटा
माळून गजरे फेसाचे साजिरे सजल्या सागर लाटा
इथल्या रानात तसाच मनांत झरतो मायेचा झरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
आंब्याला मोहर बकुळी बहर कहर चाफा फुले
माडाच्या सांदीला झाडाच्या फांदीला इवला खोपा झुले
बोलतो कोकिळ त्याच्या ग मंजुळ तोंडाला नाही थारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
गंधीत धुंदीत सायली चमेली लाजरी लाजेची पोर
पळस पांगारा पिंपळ पसारा जीवाला लावतो घोर
घंटेचा निनाद घालुनिया साद सांगतो जा पोरी घरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
तिचं गाणं ऐकत बाळं झोपी जायची..तिही मग त्यांच्यासोबत स्वप्नात गावाला जाई. तिथल्या माडापोफळींत मुक्त भटके. बागेतली फुलं काढी,वडाच्या पारंब्यांवर झोके घेई.. सान होई..माहेराला जाई..
पण म्रुगजळच ते..तिथे स्पर्श करेस्तोवर ते गायब होत असे..नळाला पाणी आलंय गं मालती..जा बघ जा..प्रभाकरची हाक ऐकू येई नि पेंगत्या डोळ्यांनी ती कामास सज्ज होई.
महिनाभरानंतर प्रभाकरने मालती व मुलांस गावी न्हेऊन सोडलं. तिथून पुढे मालतीने चुकूनही वडाला प्रदक्षिणा घातली नाही..का हाच नवरा जन्मोजन्मी मिळो म्हणून करतात तसा कोणता उपवास केला नाही.
थोरल्या दिरास प्रभाकरची लफडी ऐकून फार वाईट वाटलं. गोष्टी घडून गेल्यावर विचारण्यात हशील नव्हता. नव्हे तसं विचारलं की ही बातमी पंचक्रोशीत पसरेल नं लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील म्हणून झाकली मुठ सव्वा लाखाची या उक्तीस अनुसरुन तो गप्प राहिला. तरी बातमी पसरायची ती पसरलीच.
वाईट बातम्या वाऱ्यावर परागकण उडत जावे तशा चहुदिशांना पसरत जातात. मालतीच्या विस्कटलेल्या संसाराची कहाणीही पाणवठ्यावर, माळावर,बाजारात सगळ्यांच्या तोंडातोंडी झाली..साहजिकच तिच्या माहेरीही कळलं नि तिच्या वडिलांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्यांची वाचाच गेली. अंथरुणाला चिकटले ते चिकटलेच..शेवटी वर्षभरात त्यांनी डोळे मिटले.
दादासाहेबांचा मालतीवरील राग आणिक वाढत गेला नं मालतीला माहेर कायमचं दुरावत गेलंं.
थोरल्या भावजयीने,वत्सलाने मात्र मालतीला आश्रय दिला. अगदी पाठच्या बहिणीप्रमाणे वागवलं. कपडालत्ता, खाणंपिणं कशाचे हाल केले नाहीत की ही ब्याद तिच्या माहेरी पाठवावी असा विचार कधी तिच्या मनाला शिवला नाही.
दिवस, महिने,वर्ष लोटत होती. इतकं सगळं होऊनही प्रभाकर मनाला येईल तेंव्हा गावी येत होता. हक्काच्या बायकोकडनं हवंं ते वसूल करून जातच होता. मुलं हळूहळू जाणती होत होती. मालतीचा सारंग आता पंचवीशीचा तरुण झाला होता. आईच्या तोंडातनं पडल्यासारखा दिसायचा अगदी.
चार दिवस मालतीकडूनं वसुली करुन प्रभाकर मुंबईस गेला. ते चार दिवस सारंग फक्त रात्री निजायला तेवढा घरी यायचा नंं हाफिसात काम तुंबल्याचं निमित्त सांगून पहिल्या गाडीसाठी घर सोडायचा. मालतीला त्याच्या मनातली उलाघाल कळत का नव्हती पण तीही अगतिक होती.
मालतीने थोरल्या दिराकडे,धनंजयकडे सारंगचा विषय काढला,”भाऊजी, सारंग लग्न करायचं म्हणतोय.”
(क्रमशः)
©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
मालती तिच्यावरचा अत्याचार सहन करत करत मुलांना वाढवत राहिली. थोरला दिर, धनंजय व वत्सला, दोघं मालतीला व तिच्या मुलांना सांभाळत होते. ऋतुचक्र फिरत होतं, मुलं भरभर मोठी झाली. सारंगने मालतीला त्याची आवड सांगितली खरी. मालतीनेही धनंजयजवळ विषय काढला. धनंजय जाईल का दादासाहेबांकडे, मागेल का सारंगसाठी आरोहीचा हात. जाणून घ्यायचंय ना. भेटू उद्याच्या भागात. वाचत रहा.
=====================
प्रपंच भाग १ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/
प्रपंच भाग २ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/
प्रपंच भाग ३ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/
प्रपंच भाग ४ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag4/
=====================
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
https://www.facebook.com/ritbhatmarati/
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
=========================