Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️सौ. गीता गजानन गरुड.

मालती वहिनी खरी साध्वी. रागलोभाच्या पलिकडे गेलेली..आपल्या मुलांवर उत्तम संस्कार केले. माहेराची वाट धरली नाही. आम्ही देत होतो त्या चटणीभाकरीतच आमच्या छायेखाली काबाडकष्ट करत आली.

थोरल्या वहिनीला आई मानते. तिच्या संधीवाताचा उद्रेक मालतीमुळेच सुसह्य होतोय तिला. कुठे बाम चोळ..कुठे निगडीच्या पानांनी शेक दे..चाललं असतं. लेक करणार नाही एवढी सेवा करतेय. गेल्याजन्मीची लेकच असावी आमची..’ अशा विचारांत धनाचे बंद डोळे झरु लागले.

रात्री पुन्हा सारंग व आरोही भेटले. स्थळ अर्थात चांदण टेकडी. आकाशाने चांदणशाल पांघरली होती. त्या टेकडीवर हे दोन प्रेमी जीव आणि भोवताली हवाहवासा गारवा.

आरोही आकाशी रंगाचा चुडीदार घालून आली होती.  कितीतरी वेळ दोघं एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेली होती.  प्रभाकर वगळता दोन्ही घरच्या मोठ्या माणसांकडून ग्रीन सिग्नल होता तरीही त्यांनी मर्यादा ओलांडली नव्हती. एकमेकांचा  सहवास, शब्देविण संवाद यातून प्रेम खुलू शकतं,हे तिथल्या व्रुक्षवेली,तिथला गार वारा पहात होता,अनुभवत होता.

आरोहीच्या मनात एक भिती होती. तिने धीर करुन सारंगाला विचारलं,”सारंग,तुझ्या वडिलांनी नकार दिला तर रे!”

”तर काय..आरु,आपलं लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुझ्या बाबांच्या,दादासाहेबांच्या होकाराची वाट पहात होतो कारण त्या पापभिरु माणसाच्या शब्दांना माझ्या लेखी लाखमोलाची किंमत आहे. हायस्कूलमध्ये असताना दादासाहेबांमुळे अभ्यासाची गोडी लागली मला. ते तुमच्या घरी जसे कडक वागतात तसे शाळेत मुळीच नसतात.

शिकवताना अगदी रमून जातात दादा. व्याकरण तर घोटून घेतलेलं त्यांनी आमच्याकडून. भाषा आपली,परकी असं न मानता संवादाचं ते एक सुंदर साधन आहे व जसा आई मग ती कुणाचीही असो तिचा मान राखला पाहिजे तसा भाषा मग ती कोणतीही असो, तिचा मान राखलाच पाहिजे हे पुन्हापुन्हा सांगायचे आम्हाला.

अवांतर वाचनाची गोडीही दादांनीच लावली. शाळेच्या ग्रंथालयात केवळ शोभेला पुस्तकं असायची, ठेवलेली. दादांनी मुख्याध्यापकांना शिफारस करुन तो खजिना आमच्यासाठी खुला केला. सर, मास्तर कधी म्हणालोच नै त्यांना..पुऱ्या गावाचे दादा ते आम्हीही दादाच संबोधू लागलो आणि त्यांना आवडे तसं संबोधलेलं. कित्येक गरीब मुलांची फी त्यांनी भरली आहे, तेही कोणताही गाजावाजा न करता.

माझ्या बापाचं म्हणत असशील तर तो विचारच सोड..आयुष्यभराची शिल्लक म्हणून जपावी अशी त्याची एकही आठवण नाही माझ्याकडे.

आरु, तू नि निषाद खरंच भाग्यवान. आयुष्यात जशी आईच्या पदराची माया लागते तसंच बापाचं बोट हातात धरावयास हवं असतं,बापाचा आश्वासक हात पाठीशी हवा असतो. मग कितीही संकटं येवोत, घाबरण्याचं कारण नाही.

माझ्या नशिबात तो हात नाही, क्रुपाद्रुष्टी नाही. अर्थात धनाकाकांनी कधीच पोरकेपण भासू दिलं नाही..तरीही आरु तरीही.. वडील असून नसल्यासारखं असणं ही लाजिरवाणी गोष्ट असते.

आमच्या आईने कसे दिवस काढलेत, आम्हाला ठाऊक. धड परित्यक्ता नाही, धड विधवा नाही. कुठे सार्वजनिक कार्यात तिला यथोचित मान नाही. हळदीकुंकू वगैरे मानपानाच्या कार्यक्रमात बाया बोलावतात पण रीत म्हणून आणिक आरु तुला सांगतो, आईने हे अपमान, दुर्लक्षिणं,उपमर्द..सारं स्वीकारलय ते केवळ आमच्याकरिता.

अशा माझ्या वात्सल्यमुर्तीस त्रास देणारा, तिच्या उभ्या आयुष्याची होलपट करणारा तो नराधम..त्याच्या होकाराची वाट मी बघेन! तरी धनाकाकाला जायचं होतं..प्रभाकरच्या कानावर घालायला मग मीही आडकाठी केली नाही. उगाच पवित्र कार्यात विघ्न कशाला!”

सारंग आरोहीपाशी त्याचं मन मोकळं करत होता. “आरु,तू प्राण आहेस माझा. मी अन् तू आता मनाने एक झालोय. हे मनोमिलन खूप खूप गरजेचं असतंं. दुर्दैवाने माझ्या आईला हे सुख..सोड!मी फिरुन फिरुन त्याच विचारांच्या गर्तेत जातोय. माझा भूतकाळ असा आपल्या प्रेमात रेंगाळणार, आरु. तू सहन करशीलं नं मला!”

आरोही, सारंगाच्या खांद्यावर डोकंं ठेवत म्हणाली,”हो रे. पतीपत्नी हे चांगले मित्र असले की जगण्याचा सोहळा होतो. पतीपत्नींत चढाओढ नसावी,अहंभाव नसावा तर त्याग,समर्पण ही व्रुत्ती असावी. परस्परांबद्दल आदर असावा. जोडीतील एक चिंतेत असला तर दुसऱ्याने दोन पावलं मागे येऊन त्याला मानसिक बळ द्यायला हवं नि जोडीदाराचा हात हातात घेऊन पुढे मार्गक्रमण करायला हवं. विश्वासाच्या धाग्यावर संसार टिकतो..तोच गमावला म्हणजे सहजीवनाला अर्थ उरत नाही.”

” आरु, अगदी खरं बोलतेस तू. किती ओघवतं आणि मनापासून बोलतेस राणी. हेच तर असतं यशस्वी सहजीवनाचं सार, तुला गं कसं ठाऊक?”

“सारंगा, मुलं घरातल्या मोठ्या माणसांचं वागणंबोलणं टिपत असतात, त्यातनंं घडत असतात. आमच्या बाबतीतही तसंच झालंय. मी ऐकत आलेय  घरात.. दादा नं आईचे संवाद, त्यांचा एकमेकांबद्दलचा आदर. दादांची शिस्त काय ती आमच्या वागण्याबोलण्याबद्दल, शिक्षणाबद्दल पण दादांनी कधी अपशब्द बोलल्याचं ऐकिवात नाही की कधी आमच्या आईवर हात उगारला नाही. म्हणूनच चार दिवस माहेरी जायचं म्हंटलं तरी सतरांदा आई मागे परतून पहायची. दादांना निरोप देताना तिच्या पापण्यांना अश्रुंची तोरणं असायची. 

नकळत्या वयात आई अशी माहेरी जाताना न् माहेरुन येताना का रडते हे फार मोठं कोडं होतं माझ्यासाठी..पण सारंगा, आपण मोठं मोठं होत जातो तशी बरीचशी कोडी आपसूक सुटत जातात आणि मग मात्र वाटतं..कोडी तशीच राहू द्यावयास हवी
होती. त्यांवरलं उत्सुकतेचं,कुतुहलाचं पांघरुण निसटावयास नको होतं.”बोलताना आरोहीच्या डोळ्यात दाटलेलं पाणी तिने निरपलं.

तिचा कातर झालेला आवाज नं गळ्याजवळची हालचाल सारंगच्या लक्षात आली. आरोहीचा हात हलकेच दाबत तो म्हणाला,”वेडी कुठली,आतापासून एवढी गलबल होतेय तुझ्या काळजात तर लग्नात मांडवाला पूर यायचा. मला नौका आणून ठेवावी लागेल बहुतेक.”

सारंगच्या मिश्कील बोलण्यावर आरोही खळखळून हसली. तिच्या शुभ्र दंतकळ्या अंधारात लख्ख चांदण्या झगमगाव्या तद्वत झगमगल्या. दोघांनाही परस्परांपासून दूर जाऊ नयेसं वाटतं होतं. दोघं गाऊ लागली..

शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला ?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा

लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा..

दोघंही भान हरपूनं गात होती. दोन प्रेमी जीवांना साथीने जगण्याचे सूर गवसत होते. ती दोघंच काय, सभोवतीचा परिसरही त्या सुरांच्या लयीत हरवून गेला होता..तितक्यात ..

निषादचा आवाज कानावर आला. तो खालून साद घालीत होता.”आरं लेको..बास झाल्या की शपथा नि आणाभाका. मी कुडकुडलो इथं थंडीत. निषादच्या आवाजाने ती दोघं भानावर आली.

सारंग खाली उतरुन निषादला भेटला,”सॉरी हं..जरा जास्त वेळ..”

“ठीकै रे. आता थोड्या दिवसांनी तुझीच होणार ती. मंग झोपूच नका रात्री. नुसतं खुसुरफुसुर..खुसुरफुसुर. भुकापण लागत नैत का रे प्रेमात?”

सारंग म्हणाला,”तू सुपात आहेस लेका. जात्यात ये मग बघतो.”

निषाद आरोहीला घेऊन घरी आला. दादासाहेब परसोवात उभे होते. त्यांना समोर बघून दोघांची ततपप झाली.

“कुठे गेला होता एवढ्या रात्री?”

“ते हे ते आपलं.. काजूचा मोहर बघायला.”

“दिवसा दिसला नाही? परत एवढ्या अंधारातसून फिरत जाऊ नका. जीवाणूबिवाणू असतं. त्यांना त्यांच्या वेळेत फिरु द्यावं. तुम्ही माणसं आहात ना मग निशाचरासारखी वागू नका. चला व्हा आता आत.”

व्हा आत म्हणताच दोघं बहीणभावंडं पाय धुवायला न्हाणीकडे पळाली.

रात्री दादा व सुमनची बारीक आवाजात बोलणी चालू होती. कुणाकुणाला साड्या घ्यायच्या, शर्टपीसपँटपीस याची यादी दादा करत होते. आज्जी बाजुलाच गोधडी शिवत बसली होती. ती आठवून आठवून एकेक नातं सांगत होती.

कुणाला कोणता रंग आवडतो..माळद्यातल्या बेबीवर गुलबक्षी उठून दिसतो तर प्रतिभेवर जांभळा..आज्जी सगळ्यांना डोळ्यासमोर आणून सांगत होती जणू तिच्या मिणमिणत्या नेत्रज्योतींनी कोस कोस दूर रहाणाऱ्या लेकीबाळींना ओवाळत होती.

गणू आचाऱ्याला पाच दिवसांचं कंत्राट द्यायचं. साखरपुड्याच्या जेवणात गोडाचा शिरा, उष्टावळीला जिलबी,लग्नाच्या जेवणात मोतीचूर लाडू,अळवाची भाजी,मठ्ठा,वरणभात,पुलाव,कुरडया,पापड..सगळं पानच आज्जीच्या डोळ्यासमोर सजू लागलं. पंगती उठूबसू लागल्या.

आज्जीची तंद्री भग्न करत निषाद म्हणाला,”आज्जे, एक महत्त्वाचं राहिलं बघ. तुझी कवळी रिप्लेस करुन आणुया. एवढं सगळं खायचं म्हणजे हत्यारं पाजळलेली बरी.”

“तू गप रे. साधं सात्विक शिवराक भोजन ते. हत्यारं कसली आणतोयस मधे. माझ्या नातीच्या लग्नाचं पोटभर जेवणार मी.”

“आणि त्रुप्तीचा ढेकर देणार?”

“अहं..तो तुझे दोनाचे चार झाले..तुला दोन चिल्लीपिल्ली झाली.. माझ्या गोधडीत खेळूबागडू लागली,ओलं करु लागली की.”

“आज्जे, तू डायरेक्ट ओलीपर्यंत..कमालै तुझी.” निषाद खुसफुसला.

“बरं दागिन्यांचं काय?”मालतीने विषय काढला.

“दागिन्यांचं काय म्हणजे..रजताचे पैंजण,मासोळी,छल्ला,टपोर मोत्यांचा तन्मणी, तोडे,नथ..सोन्याचं म्हणलस तर एक डवली,मणी,मंगळसूत्र, हार..आणि हो पाटल्या देणार मी नातीस आणि पिछोड्या नातसुनेसाठी..बुगडी,मोहनमाळ माझ्या लाडक्या सुनेसाठी.”

आज्जीच्या कुशीत शिरत निषाद म्हणाला,”आज्जे,मी तुझा नातू. माझ्यासाठी काहीच नै?”

“तुझ्यासाठी गोड पप्पी. निषू, तू कितीही मोठा झालास तरी माझा निषूच. उद्यापरवाच्याला केस नीट कापून ये हो. अरे,लग्नात करवल्या येतात, लाजत,मुरडत, ठमकत, ठुमकत.. एखादी जाळ्यात फसली तर फसली.”

“लव्ह यू आज्जे,” म्हणत निषादने आज्जीचा मुका घेतला.”

“काय हे ..नीट वागा माणसासारखे. परकं माणूस घरात येणार आपल्या. तुमच्या या माकडचाळ्यांनी भेदरुन जाईल आणि आई , मोहनमाळ तुझ्या लेकीसाठी ठेव.”दादासाहेब म्हणाले.

“अरे पण..”

“बस. यावर चर्चा नकोय मला.”

आज्जी लेकाकडे बघत होती. कातळातला प्रेमाचा झरा अनुभवत होती.

बैठक झाली. याद्या काढल्या.

एके दिवशी दुपारच्याला दुकानदारास घरी बोलावलं.  आज्जीसाठी चौकडची लुगडी, सुमनसाठी चारेक जरीकाठी साड्या, विहिणबाई नं मावळण(आत्या)असं दोन्ही बाजूने नातं असणाऱ्या मालतीसाठी दोन जरीकाठाच्या साड्या,नव्या नवरीसाठी साठ्याची साडी,मोठी साडी,अजून साताठ साड्या, त्यांवर मेचिंग ब्लाऊजपीस, नक्षीदार रेशमी शेला, पाहुण्यारावळ्यांसाठी सुटींगचे तागे, बारीक काठापदराच्या साड्या, ब्लाऊजपीस,ज्येष्ठ मंडळींसाठी करवती धोतरं,सदरे,उपरणी,खण, प्रत्येक साडीच्या घडीत त्या त्या साडीच्या मालकिणीचं नाव उदा. बयोमावशीस, सुप्रिया काकूस, बबूआत्यास,वच्छी आज्जीस सप्रेम भेट..अशा चिठ्ठ्या लिहिल्या.

रामेश्वराच्या देवळात दादासाहेब सपत्नीक गेले. देवासमोर पत्रिका ठेवली. डोळे मिटून प्रार्थना केली,”मुलाचं लग्नकार्य हाती घेत आहोत. निर्विघ्न पार पडुदे.” जोडीने नमस्कार केला.

एके दिवशी आरोहीला पेढीवर न्हेऊन तिच्या आवडीचं दोन पदरी मंगळसूत्र, कानातली कुडी,अंगठी हे धनाकाकाने स्वखर्चाने घेतलं. धनंजयने प्रभाकरने दिलेले पैसे तसेच ठेवले. आपलेच पैसे खर्च केले. सारंगला भरुन आलं. धनाकाकाने जन्म दिला नाही पण आपण जन्माला आल्यापासनं जे काही करतोय आपल्यासाठी त्याचे पांग या जन्मात तरी फिटणार नाहीत..तो विचार करत होता.

धनंजयने प्रभाकरच्या घरी काय घडलं ते मालतीस सांगितलं. सवतीची लेक पळून गेली..याचा मालतीला आनंदही झाला नाही की त्याचा तिला विषादही वाटला नाही.

केवळ देहधर्म पतीने निभावला की त्याला पती म्हणावं का? आणि मग त्या अंधाऱ्या, चोरट्या क्रियेतून जन्मास येणाऱ्या देवाच्या लेकरांवर माया न करता त्यांना बायकोच्या जीवावर सोडून देणं..हा पुरुषार्थ का?..हे असे विचारांचे भुंगे पहिली पाचेक वर्ष मालतीला पोखरायचे खरे. रात्री देहाची भूक चाळवून ती कुशीवर वळत रहायची खरी पण काळाने हे सगळं तिच्या नशिबाचा भाग म्हणून तिला मानायला लावलं..

ही विवंचना हळूहळू मालतीच्या अंगवळणी पडली. सारंग व शिल्पा जसजशी मोठी होऊ लागली तसं तिचं विश्व पालटून गेलं. तिच्या जगण्याला नवे धुमारे फुटले.

आता तर तिच्या लाडक्या, थोरल्या लेकाचं..सारंगचं लग्न होतं. कोणतेही कटू विचार मालती मनाजवळ फिरकू देणार नव्हती.

एके दिवशी सकाळी मालती कैरीची चटणी करावी म्हणून परड्यातल्या आंबोलीच्या कैऱ्या गखेने काढत होती, तितक्यात शिल्पा धावत आली.”आई,अगं दादासाहेब येऊन बसलेत. काकू नि काका बोलवताहेत त्यांच्याशी.

इतक्या वर्षांनी भावाची भेट होणार याचा आनंद मानावा का काही मोडता आला आहे लग्नकार्यात याची भिती ..तिला काही सुधरेना. शिल्पाच्या हाती काढलेल्या कैऱ्या देऊन ओचेपदर सारखा करत ती घराकडे आली.

क्रमशः

=====================

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/

प्रपंच भाग २ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/

प्रपंच भाग ३ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/

प्रपंच भाग ३ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/

प्रपंच भाग ४ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag4/

प्रपंच भाग ५ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-5/

प्रपंच भाग ६ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-6/

प्रपंच भाग ७ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-7/

प्रपंच भाग ९ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-9/

====================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *