Skip to content Skip to sidebar Skip to footer

प्रपंच (भाग चौथा)

चार दिवस मालतीकडूनं देणं वसूल करुन प्रभाकर मुंबईस गेला. ते चार दिवस सारंग फक्त रात्री निजायला तेवढा घरी यायचा नंं हाफिसात काम तुंबल्याचं निमित्त सांगून पहिल्या गाडीसाठी घर सोडायचा. मालतीला त्याच्या मनातली उलाघाल कळत का नव्हती पण तीही अगतिक होती.

मालतीने थोरल्या दिराकडे,धनंजयकडे सारंगचा विषय काढला,”भाऊजी, सारंग लग्न करायचं म्हणतोय.”

———————––––—————————

“अरे वा..गुरुजींना सांगतो स्थळं बघायला. माले, आम्ही उभयता, निपुत्रिक राहिलो ते नावाने. तुझ्या मुलांवर अफाट प्रेम केलय आम्ही. तो प्रभाकर कसा का वागेना,त्याच्या बेछुट वागण्याने तू आम्हाला अंतरलं नाहीस. आताच पहा थोरल्या वहिनीची सेवाशुश्रुषा जातीने करते आहेस. गेल्या जन्मी आमची लेकच होतीस जणू. मीही आता सारंग व शिल्पाची लग्नं निर्विघ्न पार पडेस्तोवर स्वस्थ बसणार नाही.”

“तुम्ही मुलांचं कराल यात तीळमात्र शंका नाही भाऊजी पण..”

“पण काय..अशी कोड्यात का बोलतैस? काय असेल ते नीट सांग बरं.”

“भाऊजी, सारंगने घोर लावलाय जीवाला.”

“तो कसा?”

“अहो, मुलगी पसंत केलीय त्याने.”

“जातीबाहेरची आहे का? माले,अगं कसल्या जाती पाळत बसतेस! रक्ताचा रंग लालच शेवटी.”

“आहे..आपल्या जातीतलीच आहे ती..पण..तरीही..”

“नीट बोलणार का आता..पणबीण नको लावूस आधीमधी.”

“आरोही..माझ्या पुंडलिक दादाची धाकटी मुलगी आवडली म्हणतोय, सारंग. तुम्हाला तर यांच नि दादाचं वैर ठाऊकच आहे नं भाऊजी. पाण्यात बघतात एकमेकांना.”

“हो. लहानपणी एका ताटात जेवणारे दोघे जीवश्चकंठश्च मित्र..एकमेकांची तोंडं पाहिनासे झाले. तुझा नवरा,प्रभाकर पुर्वी बरा होता..कसा कोण जाणे कुसंगतीला लागला. सिगारेट, दारु..सगळे नाद सुरु झाले.  तुझ्या भावाने..दादासाहेबांनी फार समजावलं त्याला पण ऐकेल तर शपथ.. तेंव्हापासून दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या.

पुढे राजकारणाचं वेड डोसक्यात भरलं. दादासाहेब उगवत्या पक्षाचे तर हा मावळत्या पक्षाचा पाठीराखा. दोघं एकेकाळचे घनमित्र परस्परांवर आरोपप्रत्यारोप करु लागले. माले,अगं एकवेळ शस्त्राने केलेले  वार बुझतील,त्यांवर खपली धरेल..नवी कोवळी त्वचा येईल पण शब्दांनी,शिव्याशापांनी केलेले वार मरेस्तोवर चिघळत रहातात.

यावर कडी म्हणजे तुझं नि प्रभाकरचं जमलं. काय पाहिलंस त्यात तो हरि जाणे. पळून जाऊन लग्न केलात. दादासाहेबांच्या प्रतिमेला धक्का बसला. तू प्रभाच्या रुपाला,गोड बोलण्याला भुललीस. त्याचं मलिन चारित्र्य ठाऊक नव्हतं तुला. माहेरच्यांचं ऐकलं नाहीस. आम्ही समजावून सांगू तर तसा वेळच मिळाला नाही. माले, एक चूक आयुष्यभरासाठी जायबंदी करते माणसाला.”

हातातलं शिवण पुरं झालं तसं मालतीने सुई रिळात खोवली व कापडाची घडी घालत म्हणाली,”भाऊजी,मला भूरळ पडली होती ओ यांच्या रुबाबदार व्यक्तीमत्वाची,देखण्या, सुडौल बांध्याची, मधाळ वाणीची.”

सुमनने बसल्या जागी एक उसासा टाकला व म्हणाली,”भाऊजी, अहो कोळसा किती उगाळला तरी काळाच नाही का! रंग थोडाच सोडणारै तो त्याचा. माझ्या नशिबात जे भोग होते ते मुकाट्याने भोगले मी. बाप असून नसल्यासारखा असणाऱ्या मुलांना पाहून जगत आले. माझ्या लेकाचे तरी मनाजोगत्या मुलीशी लग्न  व्हावं एवढीच इच्छा आहे.”

“तू नको गो जीवास घोर लावून घेऊस. परमेश्वर मार्ग दाखवेल मी स्वतः दादासाहेबांना जाऊन भेटतो. आर्जव करतो..मग तर झालं!”

“ते तुम्ही कराल ही खात्री आहे मला भाऊजी पण तिकडे गेलात नं दादाने तुमचा उपमर्द केला तर!”

“दादासाहेब तसं नाही करायचे. तेवढा ताळमेळ आहे त्यांना. तुझ्या नवऱ्यासारखं.सगळं सोडून डोक्याला गुंडाळलं नाही त्यांनी. आदर्श शिक्षक नं उत्तम माणूस आहेत ते.  कधी कोठे दिसले तर पुढे येऊन चौकशी केल्याशिवाय जात नाहीत.”

मालती मग गप्पच राहिली. आपल्या लेकरांच्या पाठीमागे भाऊजी उभे रहातील याची तिला खात्री होतीच.

मालती कामं आवरली तशी दुपारी मुळवसाकडे गेली होती. केतकीच्या बनापाठी मायलेकीची भेटण्याची जागा ठरलेली. म्हातारी लेकीसाठी काट्याकुट्यातनं चालत यायची. दोघी तिथेच जांभ्या दगडांवर बसून चार गप्पा करायच्या न् कोणाला दिसायच्या आत माघारी फिरायच्या. प्रभाकर घरी नसंला तरी प्रभाकरपुढे लाळ गाळणारे कुत्रे असायचेच, मालतीच्या पाळतीवर. .त्यामुळे ही आडोशाची जागा मालती व तिच्या आईने निवडली होती.

म्हातारीने फडक्यात बांधून आणलेल्या दशम्या मालतीला दिल्या.

“एवढं कशास आणतेस आई!”

“तुझ्यासाठी, माझ्या नातवंडांसाठी आणते. सुनेनेच केल्यात. मी इकडे तुला भेटायला येणार म्हणताच बांधून दिल्याहेत, मी न सांगता. माले, अगं सुमन आणि तू किती गट्टी होती तुमची! नदीवर धुणं धुवायला असो की शाळेत जाताना असो हातात हात घालून जायचा,सागरगोटे खेळायचा,काचापाणी खेळायचा,गुंजा गोळा करायचा न् आता तुझ्या सख्ख्या भावाची बायको झाली सुमन तर दोन भाऊ शेजारी न् भेट नाही संसारी तशातली खबर. वर्षोनवर्षै भेट नाही तुमची.”

मालंतीने डोळ्यात तराळलेलं पाणी पदराने निरपलं. दाटून आलेला घसा खाकरत म्हणाली,”आई, तुला आरोही काही बोलली का?”

“कशाबद्दल?”

“आरोहीचं न सारंगचं प्रेमप्रकरण सुरु आहे. सारंग म्हणतो..लग्न करेन तर आरोहीशीच.”

“अगो पण त्याचा बापूस!”

तिथल्याच एका सुक्या गवताच्या काडीने मातीत रेघोट्या ओढत मालती म्हणाली,”बापसाला घाबरायला बापसानं बापाची कोणती कर्तव्ये पार पाडली आहेत? कधी मुलगा म्हणून माझ्या सारंगाला जवळ घेतलं आहे! सारंग,शिल्पाचं सगळं शाळा,कॉलेज चुलत्याच्या हातभारावर झालंय. आता भाऊजीच म्हणालेत..दादासाहेबांना भेटून येतो. “

आपल्या जाड भिंगाच्या चष्मातनं लेकीवर नजर टाकत म्हातारी म्हणाली,”निवांत,समजूनउमजून करा म्हणावं काय ते. माझी आरु हळवी आहे गो. तुझी सून झाली तर सोन्याहून पिवळं होईल बघ.”

आज्जी घरी आली पण तिने आरोहीसारंगचा विषय तिच्यापुरताच ठेवला. कुणाकडे अगदी सारंगच्या आईकडेही त्याची वाच्यता केली नाही.

दुपारी आरोही साऊच्या घरी गेली होती. साऊ तांदूळ पाखडीत खळ्यात बसली होती. ते आवरल्यावर लोणच्यासाठी कैऱ्या कापायच्या होत्या. साऊच्या मनगटावरील डागणी पाहून आरोहीचं काळीज हळहळलं.”का गं चटका दिला तुला?”

“आज सकाळी अंग कसकसत होतं. उठवलंच नाही मला. आमची कपिला माझ्याशिवाय कोणाला धार काढू देत नाही नि मलाही ठरल्या वेळेत काढू देते नाहीतर अं हं. मी हलत नाही म्हणून जगन काढू गेला तर त्याला लाथ मारलीन म्हणून मग आई माझ्यावर भडकली नं मी झोपेत असतानाच माझ्या हातावर डागलंन.

“साऊ, का असा अनन्वित छळ सहन करतेस!”

साऊ जनाबाईचा दाखला देऊन आरोहीची समजूत काढू लागली.”संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होती. पहिला घास खाताच पती जनीला मारायला धावंला,”अवलक्षणे, भाजीत मीठ घातलं नाहीस ? ठार अळणी केलीस..कुठं लक्ष असतं तुझं?  जनीला हुंदका फुटला, ती विठ्ठलासमोर उभी राहिली व आक्रंदू लागली, ‘‘विठ्ठला, तू येथे असतांनाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागतंय. का ?’’

विठ्ठलाने जनीच्या डोक्यावर हात ठेवला. जनीला तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झालं ..पुर्वजन्मातली ती द्रुश्य चलतचित्रासारखी तिच्या दिठीसमोरुन जाऊ लागली..

पुर्वजन्मी जनी एक राजकन्या होती. गायीसमोर तिने खाणं ठेवलं होतं. गाय काही ते खाण्यास तयार नव्हती. जनीने जवळची काठी उचलली..नि गाईच्या पाठीवर मारली. दोनचार मारात गोमातेच्या पाठीवर वळ उठले..तिची काया थरथर कापत होती.. गायीने तो गोग्रास मुखी लावला नाही. तशीच पाणावलेल्या डोळ्यांनी ती उभी राहिली. राजकन्या कंटाळून निघून गेली.

विठ्ठलाने जनीच्या डोक्यावरून हात उचलला तशी जनी भानावर आली..वर्तमानकाळात आली.

जनीच्या लक्षात आलं..आपलं सर्व पूर्वसंचित या जन्मी फेडावंच लागेल त्याशिवाय मुक्ती नाही.

तर असंय हे आरु. याजन्मी मी चांगली वागत आहे निश्चित पण पुर्वजन्मी मी काही वेडंविद्रं वागले असेन तर त्याची फळं मला भोगावीच लागतील. ते भोग नाकारुन गं कसं चालेल!”

आरोहीने मग सारंगबद्दल साऊला सांगितलंं.. तशी साऊ म्हणाली,”नक्की होईल तुमचं लग्न. माझं मन सांगतय.”

“खरंच गं साऊ, होईल सगळं व्यवस्थित!”

“नक्की होईल.” साऊ असं म्हणताच आरोहीने साऊची गळामिठी घेतली.

दुसऱ्या दिवशी भर मध्यान्ही पोस्टमन डोकावले.
“मुंबईहून पत्र आलय दादासाहेब.”

सुमन पाण्याचा तांब्या घेऊन आली.पोस्टमननी तांब्या हातात घेतला. चुळ भरली व तांब्यातून पाण्याची धार तोंडात सोडू लागले. सुमनने आणलेला पीठाचा लाडू तोंडात टाकत त्यांनी पाकीट दादासाहेबांकडे दिलं.

त्या कागदांवर नजर टाकत दादासाहेबांनी घरात आवाज दिला.

“अहो,देवाला साखर ठेवा।”

“अगं बाई..कोणती एवढी गोड बातमी म्हणायची?”

“लेकाला नोकरी लागली बँकेत..आहे कुठे तो? बोलवा त्याला..निषाद ए निषु. पोस्टमनभाऊ, खूप छान बातमी आणलात. हे पैसे ठेवा,तुमची बक्षिसी.”

निषाद नदीच्या पुलावर बसला होता. नेम धरुन गोटे नदीच्या संथ पात्रात टाकत होता. लांबवर उमटत जाणारे पाण्याचे तरंग पहात होता. आरोही धावतंच त्याच्या जवळ गेली.

“निश्या, अरे इथं काय बसलाएस असा? पेढे आण जा पेढे. नोकरी लागली तुला. दादा खूष झालेत अगदी.”

तिकडून सारंग आलाच.
”अभिनंदन निषाद. चल पेढे आणायला जाऊ.”

“अरे थांब. इथं कुठं पाकीट आणलय मी!”

“बस्स काय. माझ्या खिशातनं नाश्ता करताना वर्ष घालवलीस न् आता शहराकडची नोकरी लागल्यावर पाकीट काय.”

“सारंग, अरे यार तसं नाही रे दोस्ता. चल येतो तुझ्यासोबत नैतरी भाऊजी होणारेस माझा.” निषाद असं म्हणताच आरोही लाजली. दोघं नजरेआड होईस्तोवर  त्यांना बघत राहिली.

निषादने देवासमोर पेढे ठेवले. नमस्कार केला मग आज्जी, दादाआईच्या पाया पडला.

निषादची शहरात जाण्याची तयारी सुरु झाली. पंधरा दिवसांत कामावर हजर व्हायचं होतं.शहरी पद्धतीचे कपडे शिवण्यात आले. कपडे आल्यावर त्याने घालून आरशात बघितलं. अगदी टीपटॉप दिसत होता. आज्जीने त्याची अलाबला काढत त्याचं कौतुक केलं.

ओटीवर धनंजय आला.

दादासाहेब झोपाळ्यावरुन उठले,”या या धनंजयभाऊ. आज इकडे कुठे येणं केलंत. सगळं क्षेमकुशल नं. अहो,चहा टाका बरं लौकर.”

सुमन चहा घेऊन आली. धनंजयला विषयाला कसा हात घालावा हे सूचत नव्हतं.

“गावातली कच्चीबच्ची पोरं चटकनी वयात आली नै दादा.”

धनंजयच्या म्हणण्याला दुजोरा देत दादासाहेब म्हणाले,”होय की. आता आमची आरुच बघा..आता आतापर्यंत चॉकलेटगोळ्यांसाठी हट्ट करणारी आता आईच्या साड्या नेसून मिरवते आरशासमोर.”

“दादासाहेब, आरोहीबद्दलच बोलायचं होतं..म्हणजे तुमची आरोही आमच्या सारंगसाठी मागायला आलो आहोत आम्ही.”

“धनंजयभाऊ काय बोलताय तुम्ही! माझी सोन्यासारखी मुलगी त्या जुगाऱ्याच्या घरात! तुम्ही माझ्या ओसरीवर अहात म्हणून मान ठेवतोय तुमचा.”

“दादासाहेब तुम्ही शतप्रतिशत रास्त बोलत अहात पण बापाची शिक्षा पोरग्याला का? मला सांगा सारंगमधे काय कमी आहे! स्टेनोपदावर कार्यरत आहे. गुणी मुलगा आहे ओ. सुखात ठेवेल आरोहीला.”

“आणि बापाच्या वळणावर गेला म्हणजे मालतीचे..आमच्या सख्ख्या बहिणीचे हाल बघताय ना तुम्ही..काय सुख मिळालं तिला तुमच्या घरात! ज्या घराने माझ्या बहिणीस दु:ख दिलं ..तिथंच माझ्या काळजाच्या तुकड्याला देऊ!”

आता मात्र धनंजय ठाम स्वरात म्हणाला,”दादासाहेब घराने काही वाईट केलं नाही मालतीचं. मी पाठीशी आहे तिच्या, खंबीर.  तुमच्या भांडणात ती बिचारी बंधुप्रेमास पारखी झाली. प्रभाकरने तिला नांदवलं नाही. घराने मात्र मायेची पखरण केली तिच्यावर.”

थोडा वेळ शांततेत गेला. घरातल्या सगळ्यांचे कान आतापावेतोर ओसरीकडे लागले होते. दादासाहेबांच्या शब्दावर आरोहीचं भवितव्य ठरणार होतं.

दादासाहेब म्हणाले,”मुलीच्या बापाची भावना तुम्हाला नाही कळायची धंनंजयभाऊ. तिला साधा ताप आला तरी  जीव थाऱ्यावर नसतो माझा. खरी तिसरीत असताना नदीत पडली तेव्हाच आम्ही मुकणार होतो तिला. पण दैव बलवत्तर. तिथल्या पाणक्याने वाचवली तिला. आता कुठे मोठी होतेय आमची आरोही..तिचं लग्न करायचं तिची पाठवणी करायची या विचारानेच जीव कासावीस होतो. तुम्ही तर निपुत्रिक?”

इतका वेळ घरात शांत बसलेल्या म्हातारीस रहावलं नाही. ती बाहेर आली. रागाने हातवारे करत म्हणाली”तोंड आवर दादा. देवाने जीभ दिली म्हणूनं वेडंविद्रं बोलत सुटू नये. दादा, तुझ्यासमोर देवमाणूस उभा आहे. तुझ्या बहिणीला आजतागायत भाऊजीच्या नात्याने आधार दिलाय त्याने.

तू  मालतीचा सख्खा भाऊ असून राखी,भाऊबीजेला अव्हेरलंस मालतीला पण या थनंजयने बहीण मानलेय तिला. निपुत्रिक कोणास म्हणतोस रे! तुझ्या भाचरांना फक्त जन्म दिला नाही त्याने..पण बापाची छाया न मिळालेल्या त्यांना रक्ताचं पाणी शिंपून मोठं केलय त्याने. दादा,तुझी मुलगी तुला लख़लाभ. हे घर माझ्या धन्याचं आहे. इथे आलेल्या अतिथीचा उपमर्द करायचा अधिकार माझ्या हयातीत मी कोणाला देणार नाही.”

धनंजय म्हातारीस शांत करत म्हणाला,”काकू तुम्ही शांत व्हा बघू आधी. दादासाहेब त्यांच्या जागी बरोबर आहेत. काहीएक चुकलं नाही त्यांचं . चूक माझ्या धाकट्या भावाची, प्रभाकरची आहे आणि वडलांच्या पातकाचे परिणाम थोडेबहुत का होइना मालतीच्या मुलांना भोगावयास लागणार याची मला कल्पना होती.

दादासाहेब शांत बसून विचार करा. शैवटी निर्णय तुमचाच ग्राह्य धरला जाईल याची हमी देतो. येतो आता. रजा द्या.” असं म्हणून धनंजय जड पावलाने तिथनं निघाला.

सारंगाचे अगदी बारीक बारीक हट्ट धनंजयने पुरवले होते. समजुतीत येईस्तोवर तो धनंजयच्याच ताटात जेवत होता. धनंजय त्याला पाठुंगळी घेऊन जत्रेत फिरायचा. जत्रेतले जादूचे प्रयोग, बॉक्समधली फिल्म बघणे, फुगे,बंदूक..काय मागेल ते घेऊन द्यायचा..मोठा झाला तर प्रेमात पडला पण ही त्याची मागणी पुर्ण करणं धनंजयच्या हातात नव्हतं. डोळ्यातलं पाणी जिरवत तो चालत होता. मंद वारा सुटला होता. कडेच्या चिवारणींमधून वारा झुळूझुळू वहात होता. परत एकदा सारंगा लहाना व्हावा नि आपण त्याला जत्रेला घेऊन जावं असा विचार धनंजयच्या मनात चमकून गेला नं त्याचं त्यालाच हसू आलं. समोरच्या केळीवर एक हुप्प्या केळं हातात घेऊन बसला होता. दात विचकवत होता. धनंजयला वाटलं, आपल्याला यडं समजतय हे वानर.

इकडे घराकडे सारंगा अंगणात फेऱ्या मारत होता..इकडून तिकडे..तिकडून इकडे. मधेच मांजर त्याच्या पायात येऊन घुटमळत होतं. त्याला उचलून घेऊन कुरवाळत तो पुटपुटला,”धनाकाका, गोड बातमी घेऊन येणार बघ मने. आता नवीन मालकीण येणार तुझी! तुला बाजारादिवशी पापलेट खिलवतो बघ.”

इतक्यात तिथे शिल्पा आली,”कायं रे दादा? कधी नव्हे ते मनीचे एवढे लाड..आणि काय रे खिलवतोयस मनीला. हेरशी नुसता घाबरवत असतोस बिचारीला.”

इतक्यात मनी सुळ्ळकन त्याच्या हातातून सुटली नि खळ्यात खांबाच्या बाजुला जाऊन अंग चाटत बसली.

(क्रमश:)

वाचकहो, सारंग किती अपेक्षेने वाट बघतोय धनाकाकाची! धनंजय कसं बरं सांगणार दादासाहेबांकडे काय घडलं ते! साऊ, आरोहीची मैत्रीण सावत्र आईचा छळ सहन करतेय,तेही सावत्र आईला दोष न देता आपल्या मागल्या जन्मीचं ऋण आपण फेडतोय असं तिचं मन म्हणतय. काय असेल साऊच्या ललाटी?
सारंगला दादासाहेबांचं म्हणणं ऐकून
काय वाटेल? पाहू पुढील भागात. उद्याचा भाग वाचायला विसरु नका. वाचत रहा.

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

=========================

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/

प्रपंच भाग २ :

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/

प्रपंच भाग ३ :

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/

प्रपंच भाग ५ :

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-5/

==================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.