प्रपंच भाग ९

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
एके दिवशी सकाळी मालती कैरीची चटणी करावी म्हणून परड्यातल्या आंबोलीच्या कैऱ्या गखेने काढत होती, तितक्यात शिल्पा धावत आली.”आई,अगं दादासाहेब येऊन बसलेत. काकू नि काका बोलताहेत त्यांच्याशी.
इतक्या वर्षांनी भावाची भेट होणार याचा आनंद मानावा का काही मोडता आला आहे लग्नकार्यात याची भिती ..तिला काही सुधरेना. शिल्पाच्या हाती, काढलेल्या कैऱ्या देऊन ओचेपदर सारखा करत ती घराकडे आली.
——––—––––––—––——–––—-–-––––––-
दादासाहेब सोप्यावर बसले होते. ती मान खाली घालून उभी राहिली,भिंतीला टेकून. नेमकं काय बोलावं हे तिला सुधरेना. एरवी जत्रेच्या वेळी ,बाजारपेठेत,वार्षिक कार्यक्रमात ती डोळे भरुन पहायची दादाला पण आता इतक्या जवळून पहात होती. पुढचे केस विरळ होत चालले होते, तब्येतही सुटली होती.
दादा थोडका वेळ पापणी न लवता धाकट्या बहिणीकडे बघत राहिले मग स्वतःला सावरत त्यांनी बोलायला सुरुवात केली,”मालू, किती दिवसांनी पहातोय तुला. तू प्रेमविवाह केलास..तोही..असो..पण त्या राक्षसापायी मी तुझ्याशी बोलणं टाकलं..तुला इतकी वर्ष भाऊबीज केली नाही की तुजकडून राखी बांधून घेतली नाही.
मालू, खूप वाटायचं गं, तुला डोळे भरुन पहावं पण माझा अहं आड आला..कदाचित दैवालाच वाटत असावं तुटलेले नातेसंबंध पुन्हा जुळावेत..इतक्या वर्षांनी तुला माहेरी न्याया आलोय..येशील?
मालतीला वाटलंं लहानपणीसारखं दादाच्या कुशीत शिरावं. तिने धनाभाऊजींकडे पाहिलं.
धनंजयचे डोळे पाण्याने भरले होते.”पाण्यात काठी मारली म्हणून पाणी वेगळं होत नाही, माले. दादासाहेब बोलवाया आले आहेत खरंच जाऊन ये. नवीन नातं सुरु करताना..जुनं नातंही घासून लख्ख लख़्ख होऊदेत.”
माहेराची वाट चालताना मालतीला शत शत आनंद होत होता. वाटेवरल्या खाणाखुणा,झालेले बदल ती लहान मुलाच्या नजरेने निरखून निरखून पहात होती.
आड्याची मधुमालती पुर्वीसारखीच फुलारली होती, पोरकरीन जशी भासत होती.. बाय, किती वर्षांनी आठव आली गो तुला, असंच जणू मालतीस विचारत होती.
चहापाणी झाल्यावर दादासाहेब बहिणीला घेऊन निघाले. आज्जी तुळशीपाशी उन्हं खात बसली होती. खळ्यात झावळ्यांचा माटव घातला होता..त्यातून उन्हाची किरणं सारवलेल्या जमिनीवर पडून सुरेख नक्षी उमटली होती.
गड्याने दारातला कापा फणस काढला होता. सुमन तो टिचकीने वाजवून पिकला आहे का ते पहात होती.
“मालूताई आल्या बघा मालूताई आल्या”गडी असंं बोलताच कुसुमने पांदीकडे पाहिलं.
आपल्या प्रिय सखीला..नणंदेला म्हणजेच बालमैत्रिणीला पाहून तिचं मन थुईथुई नाचू लागलंं. ती धावतच पुढे येऊन मालुला बिलगली.
“अगं हो हो रडतेसं काय अशी? वन्सं माहेरपणाला आली म्हणून एवढं रडू!”
“मालू गं असं नको ना बोलूस,” म्हणत सुमनने डोळ्यातलं पाणी निरपलं.
“चेष्टा केली गं राणी तुझी, रडुबाई कुठची..आता विहिणबाई होणारैस माझी!”असं म्हणताच सुमन रडतारडता हसू लागली.
आज्जीने लेकीची अलाबला काढली. सगळेच भावूक झाले. निषादने त्या गहिवरल्या क्षणाचे फोटो काढले.
शिल्पा आरोहीसोबत गप्पा मारत मामाची बाग बघत होती. काय नव्हतं त्या बागेत! मुळापासनं धरलेले लेकुरवाळे फणस..एकेक गरा अस्सा लांब न् पिवळाधम्म.
आवळीणही रसरशीत आवळ्यांनी लगडली होती. पपनस होतं,चारेक पेरणी होत्या,अगदी अलिकडे लावलेल्या डाळिंबीच्या रोपालाही लालबुंद कळ्या आल्या होत्या.
मालती अगदी अगदी लहान होऊन गेली होती. प्रत्येक झाड निरखून चाचपून पहात होती..हरेक झाडाशी,पाऊलवाटेशी अगदी मातीशीही तिच्या आठवणी बांधल्या गेल्या होत्या.
हे सारं ऐश्वर्य मालतीच्या स्वप्नात यायचं. माहेर हाकेच्या अंतरावर असुनही केवळ स्वाभिमानामुळे तिने इतकी वर्ष या तिच्या विश्वात पाऊल टाकलं नव्हतं.
चिंचेजवळ गेली नि दादांकडे पाहिलं. दादाच तर तिला गाभुळलेल्या चिंचा काढून द्यायचा. त्याचा नेम अगदी अचूक लागायचा.
कुठे जायचं,काय करायचं..सगळ्याला दादा हवा असायचा..मालतीला सारं आठवून सारखं सारखं भरुन येत होतं. “दादा,आई..चुकले मी खरंच चुकले..चुकीच्या माणसाशी प्रेम केलं नि माझ्यासोबत तुम्हा साऱ्यांच्या जीवालाही कायमचा घोर लावला.” ती तोंडाला पदर लावत म्हणाली.
सुमन मग जरा जरबेनेच म्हणाली,”मालू, आता त्या कटु आठवणी मुळीच काढायच्या नाहीत. चुकलीस पण त्यातूनही सावरलीस..मुलांना लहानाचं मोठं केलंस,घराला धरुन ठेवलंस.”
इतक्यात आरोही पाचसहा सोनचाफ्याची फुलं घेऊन आली.
“हे कधी गो लावलंत?”
यावर आज्जी म्हणाली,”मालू, अगो तूच तर वडलांसोबत मालवणास गेली होतीस तिथनं हट्ट करुन आणलंस नं स्वतःच्या हाताने लावलंस.”
“अय्या हो की,” म्हणत मालू आरोहीसोबत त्या झाडाकडे गेली. झाड चांगलच उंच वाढलं होतं. लांबुडकी पानं, त्यातून डोकावणारी सोनसळी चाफी..तिला वडिलांची आठव आली. केवळ तिच्या हट्टासाठी त्यांनी ते चाफ्याचं रोप विकत घेतलं होतं नं तिने सुचवलेल्या ठिकाणीच लावलं होतं.
मालू विहिरीजवळ गेली. आताशा पंप वगैरे बसवला होता,तरी तिने रहाटावर राजू टाकून कळशीला गळ बांधला व राजू सर सर सर सर पाण्यात सोडला..सगळ्या आठवणी कशा डुबुक डुबुक डुबुक डुबकल्या.
त्यावेळचा तिचा तो नाकात मणीची नथ घातलेला गोल चेहराही तिला दिसला, जणू तिच्याकडे बघून खुदकन हसतोय असं तिला वाटलं. आरोहीच्या हाती कळशी देऊन मालू वाकली नि कळशीतून पडणारं पाणी मन त्रुप्त होईस्तोवर पित राहिली.
खारुताई, रावे, इकडून तिकडे बागडत होते, जणू माहेरवासणीला विचारत होते,”कुठे होतीस गं मालू, इतकी वर्ष? विहिरही तसंच काहीसं विचारत होती,”एकदाही यावंस नाही का गं वाटलं तुला?”
सुमनने निगुतीने पुरणपोळीचा स्वैंपाक केला. नारळाचं दूध काढलं. तोवर सारंग आला. निषादने हसतहसत त्याचं स्वागत केलं. आरोहीच्या गालांवर लाली चढली. सारेजण जेवताना सारंग व आरोहीची चेष्टामस्करी करत होते. यानिमित्ताने सारंगचं केळवणही झालं.
रात्री मालतीने निषादला म्हंटलं की निषाद ताईचं लग्न घाईत नको व्हायला. त्यापरीस तू कामाला रुजू हो. आम्ही सगळे आहोतच इथे तयारी करायला. तू अर्धअधिक काम केलेलं असणारंच.
निषादला मालूआत्याचं म्हणणं पटलं. दोन दिवसांनी तो निघायचं ठरलं. मालतीने स्वत: चकलीची भाजणी केली व निषादला तिकडे न्यायला चकल्या बांधून दिल्या.
चार दिवस माहेरचा पाहुणचार घेऊन मालती मुलांसोबत सासरी निघाली तेंव्हा सुमनने आवळ्याचं लोणचं दिलं सोबत न्यायला.
मांडे नावाचा एक शिक्षक नुकताच शाळेत रुजू झाला होता. तो एकटा असल्याकारणाने त्याच्या जेवणाखावणाचा प्रश्च होता.
दादासाहेबांनी या मांडेला एकदा घरी बोलावलं, जेवू घातलं. तो घाटावरचा पण त्याला कोकणातलं नारळाचं जेवणही तितकंच आवडलं.
दादासाहेबांनी त्याला रोज जेवायला येण्याचा आग्रह केला. मांडे म्हणाला,”येईन की पण पैसे घेतले पाहिजेत.” जेवणाचे पैसे घेणं हे दादांना मान्य नव्हतंं.
कुठल्याशा कामासाठी तिथे भागिरथी काकू आली होती. तिचे कान भारी तिखट. तिने मांडेगुरुजींचंं बोलणं ऐकलं नं वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावा तसं लगेच म्हणाली”आमच्याकडे लावा गुरुजी खानावळ. एकदा खाल्लात माझ्या हातचं, तर बोटं चाटत रहाल.”
प्रल्हाद मांडेला हेच हवंं होतं. त्याने रोज जेवायला येण्याचं कबुल झाला. रात्री शाळेजवळच्या खोलीत निजावयास गेला खरा..पण एकटा असल्याने रात्रभर नीज येईना.
बांबूच्या वनातून येणारे वाऱ्याचे आवाज,कोल्हेकुई याने चरकला नि सकाळी परसाकडला गेला तर शौचालयाच्या खिडकीवर वेटोळे घालून आरामात बसलेलं जनावर.
प्रल्हादची बोबडीच वळली. तसाच करायचं महत्वाचं काम न उरकता परत आला. तितक्यात तिथनं नाथा, दुधाचा रतीब घेऊन जात होता. प्रल्हादने त्याला हाकारलं. तो पुढे आला.
“कोण गुरुजी का?”
“हो. नवीनच रुजू झालोय, तुमच्या गावातल्या शाळेत.”
“चेहरा का घाबराघुबरा दिसतोय तुमचा? तब्येत बरी नसंल तर डाक्टरांना घेऊन येतो तोवर आत जाऊन पडा.”नाम्याने सुचवलं मग प्रल्हाद गुरुजींनी त्याला शौचालयाच्या खिडकीवरल्या वेटोळ्याबाबत सांगितलं,तसा नाथा हसू लागला. त्याने काठीनं ते धुड बाजूला टाकलं नं म्हणाला,”शेताडी जमीन ही. इथं जनावरं दिसायचीच. घाबरायचं नाय. गुर्जीच घाबरु लागले तर कसं व्हायचं!”
दुपारच्याला भागिरथी काकू स्वतः गुरुजींचा डबा घेऊन गेली. बटाट्याच्या काचऱ्या नि मऊसूत पोळ्या..जोडीला तेलमीठतिखट लावलेली कैरी. प्रल्हादला जेवण आवडलं. त्याने भागिरथी काकूला रहाण्यासाठी आजुबाजूला माणसांची जाग असेल अशी खोली पहा म्हणून आग्रह केला. भागिरथी काकू म्हणाल्या,”मग चला की आमच्या घरी. डावीकडची होवरी रिकामीच आहै.”
भागिरथीने साऊकडून डावीकडची होवरी स्वच्छ करुन घेतली. सारवण करुन, त्यावर बोटांचा कणा काढून घेतला.
साऊचं काम कसं टापटीप. प्रल्हादला खोली आवडली..अगदी नीटनेटकी एक छोटंसं लाकडी फडताळ होतं, कपडे ठेवण्यासाठी.
खिडकीच्या कडेला लाकडी बाज. त्यावर प्रल्हादने आपली हाथरी पसरली. कपड्यांच्या घड्या आपल्या ट्रंकेतच ठेवल्या. न जाणो उंदीरमामा येऊन नक्षीकाम करुन गेले तर!
जगन छगनला गुरुजी त्यांच्या घरी रहायला आले म्हणून कोण बरं वाटलं. मित्रांमधे त्यांचा भाव वधारला.
भागिरथी काकू उठली की आन्हीकं आवरुन, न्याहारी करुन फिरायला सुटायची. अख्खा गाव पालथा घालायची.
याचं त्याला नं त्याचं याला करुन नांदत्या घरादारांत भांडणं लावून द्यायची.
भागिरथी काकूचा नवरा कुठे लांबशा गावात गडीपणाला होता. वर्षातनं एखाददुसरा वेळ फेरी मारी घरी. भागिरथी काकू गोड गोड बोलून लोकांकडनं पैसे घ्यायची नं नडलेल्याल्या व्याजावर द्यायची. त्या व्याजात तिचा घरखर्च जमून जायचा शिवाय दुधदुभतं,धान्यगोटा,भाजीपाला,नारळ सगळं घरचं. त्यासाठी खपायला होतीच की साऊ.
साऊ पहाटे लवकर उठायची, सडासारवण करायची. रांगोळी रेखाटायची..अगदी बघत रहावं अशी. फुलं खुडून परडीत ठेवायची.
जगनछगन देवपुजा करायचे. तोवर ही केरवारा काढायची. अंग विसळून स्वैंपाकाला लागायची. परसोवात तिच्या हाताच्या स्पर्शाने दुधी,कारली,दोडकी लोंबत असायची. केवढं ते हिरवं धन..मातीतलं..कष्टणाऱ्या हातांस धरणी मातेनं दिलेलं.
साऊ निगुतीने स्वैंपाक करायची,आग्रह करकरुन वाढायची. भागिरथीने तंबी दिल्याने ती डोक्याला पातळाचं फडकं बांधून सगळी कामं करायची.
प्रल्हादला आश्चर्य वाटायचं..इतकी देखणी ही युवती..नाजूक जिवणी, अपरं नाक,रेखीव डोळे, हसली की गालावर कशी पैशाएवढी खळी पडते पण हे डोकं का झाकून ठेवते.
का बरं माळत नाही ही फुलं? हिच्या वयाच्या मुली कशा हसतात,खिदळतात..हिचा चेहरा एवढा पोक्त का बरं वाटतो?
क्रमश:
=============
प्रपंच भाग १ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/
प्रपंच भाग २ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/
प्रपंच भाग ३ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/
प्रपंच भाग ३ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/
प्रपंच भाग ४ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag4/
प्रपंच भाग ५ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-5/
प्रपंच भाग ६ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-6/
प्रपंच भाग ७ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-7/
प्रपंच भाग ८ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part-8/
प्रपंच भाग १० :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-10/
====================