प्रपंच भाग ६

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
दोन्ही घरांत लग्नाचे वारे घुमू लागले. तांदूळ निवडणी, बोटवे,मालत्या,नखुल्या,गव्हले करावयास शेजारणीपाजारणी एकत्र जमू लागल्या. ओव्या गात भरभर हात चालू लागले. थट्टामस्करी होऊ लागली. उखाण्यांचे आग्रह होऊ लागले. चहा नि पानसुपारीची ताट फिरु लागली.
भागिरथी काकू आल्या होत्या. आरोहीने विचारलंच”काकू ,साऊला का नाही आणलंत?”
“तिचं डोसकं चढलंय म्हणून निजलेय हो.”भागिरथी काकूंनी शोभवून घेतलं. आरोहीला पटेना. ती हळूच मागिलदारी गेली नं तिथून पाणंदीतून साऊच्या घराकडे..
———————————-–––—————
साऊ दळण दळत होती..एकटीच. गावात चक्की झाली तरी भागिरथी काकू साऊकडूनच भाकरीचं दळण दळून घ्यायच्या.
आरोही चिडली,”बघ मी जाऊन विचारतेच त्या भागूकाकूला. सगळ्या बायकांसमक्ष म्हणते कशी..साऊचं डोकं चढलय..नुकतीच सुतशेखराची मात्रा देऊन आले. जरा नीज म्हंटलं..खोटारडी कुठची!”
“आरोही, असं बोलू नये मोठ्या माणसांना.”
“आणि ती तुला राबवून घेते,डागण्या देते, ते सगळं चालतं नं तुला.”
यावर साऊ फक्त हसली. आरोही तिच्यासोबत जातं ओढू लागली..दळण दळतादळता साऊ गाऊ लागली..
धुणे घेवोनी काखेसी। जनी गेली उपवासी।।
मागें विठ्ठल धावला। म्हणे का टाकिले मला।।
कां गा धावोनि आलासी। जायजाय राउळाशी।।
चहूं हाती धुणें केले। जनी म्हणे बरे झाले।।
धुण्याची फाटी काखेशी मारुन जनी धुणं धुवायला गेली.मागून विठ्ठल आला हाकारत..लटके रागवत म्हणतो कसा! मला का आणलं नाहीस सोबतीला? जनी म्हणाली..का माझ्या मागं मागं आलास..जा तुझ्या राऊळात जा. तुझे भक्तगण तुझी वाट पहात असतील..पण ऐकतो तो तिचा सखा विठ्ठल कसंचा..सगळी धुणी धुवून काढलीन.
साऊ अभंग गात होती, अर्थ सांगत होती..दळण दळून कधी झालं दोघींना कळलच नाही. आरोही म्हणाली,”या रहाटगाडग्यात कशीबशी दहावी पास झालीस तू साऊ तरी हे इतकं सगळं मुखोद्गत तेही अर्थासहीत..”
साऊ जातं बाजुला भिंतीस लावून ओंजळीने पीठ भरुन ठेवत म्हणाली,”अगो आवड असली की सगळं होतं बघ. माझी आई गायची, जनाईचे अभंग..अजून तिचा गोड आवाज कानी ऐकू येतो मला.
आईची वही मिळाली मला एकदा घर झाडताना..अभंग नि अर्थ टिपण करुन ठेवलेली..मग काय वेळ मिळेल तसं वाचू लागली..गोडी लागली हरीभक्तीची,जनाईची. माझं हे चालायचंच गं आरु. तू आता काही दिवसांची पाहुणी. माझी सखी अशी मनास येईल तेंव्हा भेटायला यायची नाही मला, याचा एकीकडे खेद वाटतो तर दुसरीकडे सारंगसारख्या उमद्या,देखण्या तरुणाशी तुझी लग्नगाठ बांधली जाणार याचा आनंद होतोय बघ मला. एकाच वेळी आसू अन् हसू म्हणतात तसं काहीसं.”
“तू म्हणजे ना. आतापासूनच रडवायचं ठरवलयस का मला!”
“नाही गं सखी.”
इतक्यात साऊची सावत्र भावंड जगन आणि छगन शाळेतून आली. साऊ त्यांना अंग विसळायला पाणी देण्यात, पंचे देण्यात गुंतली तशी साऊचा निरोप घेऊन आरोही घरी आली.
गावच्या घरी एवढं सगळं चाललेलं तरी प्रभाकरला थांगपत्ता नव्हता. हल्ली तो महिन्यातनं एखादी फेरी मारायचा..दोनेक दिवस रहायचा..त्यातला अर्धाअधिक वेळ पारावरच्या चांडाळचौकडीत गप्पा कुटण्यात.
प्रभाकरचा मुंबईचा मुलगा, दिपक नुकताच दहावी पास झाला होता. मोठी मुलगी तारा बारावीला होती.
प्रभाकरचा शहरात चांगलाच जम बसला होता. ट्रकच्या वाहतुकीसोबतच नव्याने काढलेलं देवदर्शन टुरिस्ट ऑफीसही दणक्यात चाललं होतंं. दिवसभर प्रभाकरला उसंत नसायची. असाच एका दुपारच्या वेळेला गावातला त्याचा शाळूमित्र त्याला भेटायला आला. दोघांची गळाभेट,हस्तांदोलन वगैरे झालं.
प्रभाकरने मित्रासाठी थंडगार उसाचा रस नि मिरचीवडा मागवला. गरमागरम,झणझणीत मिरचीवडा खाता खाता वसंंता प्रभाकरला म्हणाला,”प्रभा,गड्या मजा आहे तुझी. गावाला एक बायको, मुंबयला दुसरी बायको. दोघींची दोनदोन लेकरं. बरं बाबा एवढं खटलं सांभाळतोस. दोघीतल्या एकीचीबी कुरकुर नाही.”
वसंताचं बोलणं ऐकून प्रभाकरची छाती अभिमानाने फुलली. हातवारे करत म्हणाला,”काय मजाल कुरकुर करतील! सगळं माझ्या मर्जीने चालतं. हम करे सो कायदा. बायकांच्या हाती व्यवहार नाही.” टेबलावर बोटांनी तबला वाजवू लागला.
“खरं..मला नाही वाटत.”वामन म्हणाला.
“असं काय बोलतोयस?”
“प्रभा,अरे गावात चर्चा सुरु आहे. तुझ्या मुलाच्या,सारंगच्या लग्नाची न् तुला थांगंपत्ता नसल्याचं दिसतय.”
हे ऐकताच प्रभाकरच्या माथ्यावरली शीर तटतटली. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले, नाकपुड्या फुलल्या. सारंगचं लग्न ठरतय नि त्याला न सांगता हा त्याच्या पुरुषार्थाला धक्का होता.
अवघ्या काही क्षणापुर्वी तर वामनने त्याचं दोन बायका सांभाळतोय म्हणून कौतुक केलं होतं..नुकतीच त्या स्तुतीने त्याची छाती उभारली होती नं वामनने ही काय पुडी सोडली का तो जाणूनबुजून ती पुडी सोडण्यासाठीच आला होता, हे त्याचा तोच जाणे. प्रभाकर मात्र खवळला. मुठी दाबीत म्हणाला,” काय सारंगचं लग्न? ठरवलंं कुणी आणि कोणाशी?”
“आरोही..दादासाहेबांची आरोही. तुझ्या एकेकाळच्या परममित्राची मुलगीच तुझी सून बनून येणार आहे.”
“काय? कसं शक्य आहे? तुला आठवतयंना वामन, या दादासाहेबाने मी त्याच्या बहिणीशी प्रेमविवाह केला म्हणून मला वडाच्या पाराजवळ सर्वांसमक्ष लोळवलं होतं.
शिंच्याने जीव घ्यायचा बाकी सोडला होता माझा..आणि आता याच्याशी सोयरीक.. हे शक्य नाही. काय समजतात कोण स्वतःला. एकेकास धडा शिकवतो..त्याच्या थोरल्या चुलत्याची फुस असणार त्यास..त्याशिवाय काय एवढ्या उड्या मारतोय!”
“ते काय मला ठावे नाही. तुझी नं माझी दोस्ती म्हणून बोलताबोलता विषय निघाला बघ..नाहीतर तुला वाटायचं, हा वामन्या एवढ्यासाठीच आला होता. दुसऱ्यांच्या घरात आग लावण्याचं पातक.. नको ते डोक्यावर. बरं एक सांग, हा सारंग सध्या करतो काय कामधंदा वगैरे?” वामनने विचारलं.
“स्टेनो आहे रे कुठल्याशा कंपनीत. पगार तो किती असणार असून. त्या गधड्याला म्हंटलं, इकडे ये . धंद्याच्या खाचाखोचा शिकवतो. माझ्या जोडीने ऑफीस सांभाळ तर नन्नाचा पाढा लावलान् नं आता माझ्या अपरोक्ष माझ्या शत्रूच्या मुलीसोबत प्रेमाचे चाळे करतो..वरती लग्नाची तयारी..मीही बघतोच कसं लग्न होतं ते!”
वामन निघून गेला,काडी टाकून पण कुलरच्या थंडाव्यातही प्रभाकरच्या अंगाची लाहीलाही होत होती. भूतकाळ डोळ्यासमोर पिंजारत होता..दीडदमडीचा शिक्षक असणारा दादासाहेब.. त्याने त्याला धुळ चारावी..गावकऱ्यांसमक्ष..अजूनही तो अपमान त्याच्या काळजात सलत होता.
एकदोन गिर्हाइकं तिकटं बुक करण्यासाठी आली होती. त्यांच्यासाठी चहा मागवला नं पुढची सूत्र मदतनीसाकडे सोपवून तो घराकडे जायला निघाला.
सांजावलं तरी दिवा लावला नव्हता. घरात अगदी सुतकी वातावरण होतं. नेहमी सुंदर वेषात असणारी चांदणी आज मात्र तिन्ही सांज झाली तरी केसांच्या झिपऱ्या घेऊन बसली होती.
पदर,साडी अस्ताव्यस्त..नि शुन्यात बघत होती. प्रभाकरचं मन कचरलं. त्याने दिपकला विचारलं तसं दिपक म्हणाला,”पप्पा, आपली तारादीदी रतनशेठसोबत पळून गेली. तिची चिठ्ठी सापडली टेबलवर. कॉलेजला जाते म्हणून सांगत नेहमीसारखी बाहेर पडली. मम्मीला संशय आला नाही. ती चिठ्ठी वाचल्यापासनं मम्मी अशी बसली आहे…”
आधीच तापलेला प्रभाकर हे ऐकून अजुनच खवळला. “अरे काय मोगलाई लागून गेलेयं काय! तारीला एक अक्कल नाही? त्या रतनशेटला कळायला नको! चाळीशी पार झालेला तो माझ्या तारीला फूस लावून पळवून न्हेतो म्हणजे काय! मी पोलीसचौकीत जातो नि तक्रार नोंदवतो आधी त्या हरामखोराची.”प्रभाकर पायात सपाता अडकवू लागताच थंड स्वरात दिपक बोलला,
“पप्पा,तारीदीदी सज्ञान आहे. आपण त्या दोघांचं काहीच वाकडं करु शकत नाही.”
दिपकचं म्हणणं पटताच प्रभाकर हात चोळत बसला.”कुठल्या कुमुहूर्तावर जन्माला आलेली पोर देव जाणे. असं काही करेल याची निसटती जरी कल्पना असती तरी तेंव्हाच नरडीचा घोट घेतला असता तिच्या.
गल्लीतला सतरा धंदे करणारा, बारा गावचं पाणी पिलेला तुरुंगाची हवा खाल्लेला, रंगल्या तोंडाचा गुंड तो..तो काय लग्न करणार हिच्याशी. मी एक कामधंद्यात बुडालेला माणूस पण चांदणी तुझं लक्ष नको मुलांवर..नुसतं नट्टापट्टा केला नि तोंडात पानाचा तोबरा भरुन बसलंं की झालंं!” तो चांदणीववर आग ओकू लागला.
चांदणी शिळेसारखी बसली होती. तिच्या दु:खाची तर्हा निराळीच होती. चांदणीला तो दिवस आठवला..पहिल्यांदा रतनशेट बुकिंग करण्यासाठी म्हणून त्यांच्या दारात आला होता. प्रभाकर नेमका गावी गेला होता.
चांदणी ही एका तमाशाच्या फडातली. प्रभाकर ट्रकवर गावोगाव फिरायचा तेंव्हा प्रभाकरची नि चांदणीची गाठभेट घडली. चांदणीच्या अदांनी प्रभाकर पुरता घायाळ झाला नं गावी लग्नाची बायको असताना ही धोंड गळ्यात मिरवायला घेऊन आला होता.
प्रभाकर चांदणीसाठी पुरता पागल झाला होता पण प्रभाकरचं आता वय दिसू लागलं होतं. हाताजवळ पैसा आल्याने फिरतीसाठी त्याने ड्रायव्हर ठेवले होते नं हाफिसात बसून नि बसून नि तिखट तेलकट चमचमीत झणझणीत खाऊन, मद्याचे प्याले नेमाने रिचवून त्याचं पोट बरंच सुटलं होतं.
प्रभाकरच्या चेहऱ्यावरचं पुर्वीचं तेज उडालं होतं नि तो आताशा वयस्कर दिसू लागला होता..इतका की बाजारात काही नवख्या दुकानदारांनी चांदणीला विचारलंही होतं की ते तुमच्यासोबत होते ते तुमचे वडील का..तेंव्हापासनं तर चांदणीला प्रभाकरसोबत कुठे फिरावयास जाण्याचा वीट यायचा.
चांदणीला रतनशेटच्या रुपात नवं सावज मिळालंं नि आपण दोन तरण्या पोरांच्या आई आहोत हे विसरुन ती रतनशेटकडे ओढली गेली.
चांदणीच्या तर्हेवाईक अदांनी रतनशेट काय समजायचं ते समजून गेला होता नि त्याने आपलं चिखलातलं पाऊल प्रभाकरच्या संसारात ठेवलं होतं.
लालसर गोऱ्या वर्णाच्या,मजबूत बांध्याच्या, पिळदार शरीराच्या..देखण्या रतनशेटने चांदणीच्या सादेला प्रतिसाद दिला होता.
सजणाच्या मर्जीखातर, जरासा वर धरिला अंबाडा
उघडीच ठेवली मान, केतकी पान सोनकेवडा !
घातला वेश पंजाबी तंग सलवार
रेशमी खमीज अंगात सैल दळदार
झिरझिरित दुपट्टा वरी, टिकेना उरी पडे तोकडा
पावडरचा मुखावर थर एक पातळ
किरमिजी रंगले ओठ नयनी काजळ
मुळचेच गाल मखमली, चाखतो लाली तीळ चोंबडा !
ऐन्यात पहाता मुखा सुखाची लहर
डोलते रान मोहरीचे फुलांना बहर
असल्यात येई राजसा चेतल्या नसा, नाचु भांगडा !
चांदणी घरात कुणी नसताना आपल्या न्रुत्यगायनाने रतनशेटला घायाळ करायची.
प्रभाकरच्या बिछान्यावर रतनशेटचा मोगरा भरदुपारी फुलू लागला. परपुरुषासोबत शेज सजवली जात होती.
आजुबाजूच्यांना कुणकुण लागली खरी पण रतनशेटसारख्या गुंडाचं नाव घेण्याची कोणाची बिशाद नव्हती. शेजारपाजारच्या बायांनी चांदणीशी बोलणं सोडून दिलं होतं. चांदणीला त्याचं काही सोयरसुतक नव्हतं. तिच्या अंगप्रत्यंगात रतनशेट भिनला होता. आताशी ती रतनशेटसोबत पळून जाण्याची स्वप्नं बघायची.
अशा कितीक दुपारी त्या वर्षदिडवर्षात चांदणी व रतनशेटच्या प्रणयावेगात रंगल्या होत्या. उन्हाने तापल्या धरतीवर वळीवाचा पाऊस पडावा नं तिच्यातील आग बाष्परुपाने बाहेर पडावी तशी चांदणीच्या देहाची आग रतनशेटने विझवली होती.
सुट्टीला तारी घरी असली तरी रतनशेट यायचा..मग नुसतं तारीकडेच एकटक बघत रहायचा.
क्रमश:
=================
प्रपंच भाग १ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/
प्रपंच भाग २ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/
प्रपंच भाग ३ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/
प्रपंच भाग ४ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag4/
प्रपंच भाग ५ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-5/
प्रपंच भाग ७ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-7/
===================