प्रपंच (भाग पाचवा)

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
इकडे घराकडे सारंगा अंगणात फेऱ्या मारत होता..इकडून तिकडे..तिकडून इकडे. मधेच मांजर त्याच्या पायात येऊन घुटमळत होतं. त्याला उचलून घेऊन कुरवाळत तो पुटपुटला,”धनाकाका, गोड बातमी घेऊन येणार बघ मने. आता नवीन मालकीण येणार तुझी! तुला बाजारादिवशी पापलेट खिलवतो बघ.”
इतक्यात तिथे शिल्पा आली,”कायं रे दादा? कधी नव्हे ते मनीचे एवढे लाड..आणि काय रे खिलवतोयस मनीला. हेरशी नुसता घाबरवत असतोस बिचारीला.”
इतक्यात मनी सुळ्ळकन त्याच्या हातातून सुटली नि खळ्यात खांबाच्या बाजुला जाऊन अंग चाटत बसली.
–———————————————————————————————
धनाकाका येताना दिसताच शिल्पाने जास्वंदीखालच्या फडतरीवर पाण्याने भरलेली घागर व तांब्या न्हेऊन ठेवला. फांदीला पंचा अडकवला. हातपाय धुवून धनंजयने तोंडावर पाणी मारलं..चुळ भरली नि तोंड पुसत ओसरीवरील झोपाळ्यावर येऊन बैसला.
सारंगाने तांब्याभांड धनाकाकाच्या हातात न्हेऊन दिलं. त्याला बरंच काही विचारायचं होतं, कितीतरी प्रश्न होते सारंगाच्या मनात..काय म्हणाले दादासाहेब? आरु होती का तिथे? अंगावर नाही ना आले?? असे कितीक प्रश्न.. पण झोपाळ्याच्या कड्यांचा आवाज त्याला का कोण जाणे अस्वस्थ करुन गेला. धनाकाकाच्या मुडनुसार त्या कड्यांचे बदलते आवाजही सारंग जाणून होता. तो गपचिप आत जाऊन पहुडला. याच झोपाळ्यावर धनाकाकाच्या मांडीवर तो झोपायचा मग धनाकाका त्याच्यासाठी कविता म्हणायचा..
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
अशा कितीक कविता धनाकाकाच्या मांडीवर पहुडून सारंगाने ऐकल्या होत्या. नीटसा अर्थ कळत नसे त्याला पण त्या विशिष्ट चाली ऐकत ऐकत त्याच्या पापण्या मिटत..कमलपुष्पाच्या पाकळ्या मिटाव्यात तशा.
आताही सारंगाला वाटत होतं..काकाकडून सगळी बित्तंबातमी घ्यावी..पण विचारायचा धीरच होईना त्याला. जेवणावेळीही कोणी कोणाशी बोललं नाही.
आचवून तांब्या शिल्पाच्या हाती देत धनंजय म्हणाला,”माले, तुझा दादा पुर्वीसारखाच ताठ आहे अजुनी.”
“म्हणजे.. काय अर्थ घ्यावा या बोलण्याचा?”, धनंजयच्या बायकोने,वत्सलाने धास्तीने विचारलं. मालतीही थोरल्या जावेजवळ जाऊन बसली.
“अगदी टोकाचा अर्थ घेऊ नका..थोडा धीर धरा. कालाय तस्मै नम:” असं म्हणत धनंजय सुपारी कातरत झोपाळ्यावर बसला.
“काय काय नम: “सारंग संतापून म्हणाला. “मुलगी मागतोय त्यांची. भीक नाही मागत.”
संथ गतीने सुपारी कातरत धनंजय म्हणाला,”सारंगा, विसरतोयस तू..कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. याअर्थी आपण याचक आहोत त्यांचे. ते दाता आहेत. मुलगी द्यावी किंवा नाही हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मग तू प्रेम कर वा अन्य काही..मुलीच्या बापाचा अधिकार त्याच्याकडून हिरावण्याचं पातक करु नकोस.”
सारंग मुकाट्याने आपल्या खोलीत निघून गेला. थोरल्या चुलतीचे पाय दाबणारी शिल्पा मोठ्यांचे हे संवाद निमुटपणे ऐकत होती.
‘हे प्रेम इतकं हट्टी असतंं! सारंगदादासारख्या हळव्या माणसाला हट्टी बनवतं, मग यात न पडलेलं बरं.’ ती मनाशीच म्हणाली.. पण आता सारंगदादा न् आरोहीचं काय होणार! सगळंच अधांतरी.
इकडे दादासाहेबांकडेही काही बरी परिस्थिती नव्हती. ”आरोही न् सारंगचं लग्न ठरवलं नाही तर मीही मुंबईला जाणार नाही. माझी बहीण इथे रडत असताना माझा जीव तिथे लागायचा नाही.” निषादने हा इमोशनल पत्ता टाकून दादासाहेबांना कात्रीत पकडलं.
सकाळी न्याहारीला बसले असताना दोघं बापलेक एकमेकांशी बोलत नव्हते. “आरोही, इकडे ये बाळा.” दादासाहेबांनी बोलावलं तसं आरोही त्यांच्यासमोर जाऊन थरथरत उभी राहिली.
“आरोही, सारंगशी लग्न करण्याचा तुझा निश्चय पक्का आहे?”
आरोही थरथरत होती. आता नाही बोलले तर कधीच नाही..तिचं अंतर्मन म्हणालं तसं आपसूक तिच्या ओठांतून शब्द बाहेर पडले,”हो दादा.”
दादासाहेबांनी आरोहीला जवळ बसवलं व म्हणाले,”बेटा, पोलादाच्या काळजाचं पाणी करण्याची ताकद फक्त लेकीच्या बोलात असते. तुला वाटत असेल ह्या निषादच्या हट्टापुढे मी झुकतोय..तर तसं नाहीए बाळांनो. बाळांनो, एक ध्यानात घ्या, लग्न फक्त एका व्यक्तीशी होतं पण अनेक नात्याच्या बंधाने आपण जोडले जातो. त्या सारंगच्या बापाचा प्रताप पंचक्रोशीला ठाऊक आहे. तुझं लग्न लावून दिलं नि तोही बापाच्या वळणावर गेला तर एक बाप म्हणून मी तुला कोणतीही मदत करु शकणार नाही. मग तुझ्या नशिबाची तू.”
“मान्य आहे दादा मला,”असं म्हणत आरोहीने दादासाहेबांचे पाय धरले. दादासाहेबांनी आरोहीला कुशीत घेतले. तिचे वाहते डोळे उपरण्याने पुसले.
“पोरी, तुझा बाप कातळ असला तरी त्याला फोडण्याची ताकद फक्त तुझ्या अश्रुंत आहे. बाळा, तुला काही त्रास झाला नं तर..तर माझं काही खरं नाही बघ.” असं म्हणत दादासाहेबांनी हंबरडा फोडला.
निषाद आपल्या बापाच्या या हळव्या रुपाकडे अवाक होऊन बघत राहिला. म्हणजे दादासाहेबांनी पिक्चरस्टाइल नकार दिला असता तर स्वतः पुढाकार घेऊन आरोहीला न् सारंगला पळवून न्हेऊन त्यांच लग्न लावून द्यायचं. त्यांना भाड्याने खोली घेऊन द्यायची,संसार थाटून द्यायचा.. हे सारं स्वप्न त्याने अख्ख्या रात्रीत रंगवलं होतं.
एवढे कडक शिस्तीचे दादा इतक्या सहज हो म्हणतील यावर निषादचा विश्वास बसेना. तो आज्जीजवळ जाऊन बसला. आज्जी उन्हाला लावलेले बेडे भरुन ठेवत होती. निषादची गत पाहून तिला हसू फुटलं. “म्हातारे,हसतेस काय फिस्सफिस्स.”
“गप माकडा.” आज्जी डाफरली.
“अगं हा जमदग्नी इतक्या सहज तयार झालाच कसा! माझं तर टकुरं आऊट व्हायची पाळी आलेय.”
“अरे लेकीचा बापै तो. त्याच्या दिलाची गणितं लै अवघड..नाही कळायची तुला ती. तुला लेक झाली की कळेल बरं तुला.”
“म्हणजे आता मीपण चान्स मारुन घेऊ..वाहत्या गंगेत हातं धुवून घेऊ की काय..”
“तेवढं सोप्पं नाही रे. आधी प्रेम करायला शीक. कुणी आवडतेय का तुला!”
“बघतो आता मुंबईस जातोय नं. आणतो तुला नातसून, रेडीमेड नि उभी करतो दादांच्यासमोर. दादा, आम्हा उभयतांना आशीर्वाद द्या..म्हणतो. मग बघतो या कातळाला माझ्यासाठीपण झरा फुटतो का ते.”
“अगोचर आहेस” आज्जी हसत म्हणाली.
इतक्यात दादासाहेबांची हाक आली,”चिरंजीव,इकडे या.”
“काय दादा?”
“धनंजयभाऊंना देवळात बोलावलय मी म्हणून सांग जा.”
“हो हो दादा,”म्हणत पायात पायताणं गुंतवत निषाद पळत सुटला.
“आत्या..मालू आत्या.”
मालूआत्या मागीलदारास रतांबी फोडत होती. तिच्यासमोर लालभडक रतांब्यांची फाटी होती. एका टोपात रतांबी फोडून..गर व रस त्या टोपात ठेवून सालं ती फाटीत टाकत होती. जवळजवळ सगळ्यांच्या घरात ग्रीष्मात हा उद्योग चाले. वर्षभराची साठवणुकीची आमसुलं..तीनचार आगळ लावून वाळवली जात.
आपलं हातातलं काम चालू ठेवत निषादकडे बघत ती म्हणाली,”काय रे बाळा..एवढा धावत आलास तो. सगळं क्षेमकुशल नं.”
“हो गं आत्या.”
एवढं बोलतानाही त्याला धाप लागली.
“पैक जरा, मग बोल. शिल्पे, पाणी आण गो निषादसाठी.”
शिल्पानं आणलेलं पाणी तो घटाघटा प्यायला मग म्हणाला,”आत्या, जमदग्नीने म्हणजे आमच्या दादांनी होकार दिलाय सारंग आरोहीच्या लग्नाला.”
“काय सांगतोएस काय निषू, गोड बातमी आणलीस रे. देवापुढे साखर ठेवते आधी. शिल्पे,फणसाचं पान घेऊन ये बघू.”
“आत्या,सारंग कुठाय?”
“अरे काल भाऊचींचं बोलणं ऐकून मानच टाकली त्याने. लोळत पडलाय खाटीवर बघ जा.”
आइने के सौ तुकडे करके हमने देखे है
एक में भी तनहा थे। सौ में भी अकेले है।
निषाद दारात उभा राहून हात कपाळावर ठेवून गाऊ लागला.
“कोण निषाद..अरे माझा इथे जीव चाललाय नं तुला मस्करी सुचतेय लेका!”
“सारंगा,मी बिझी आहे रे..आमंत्रण, पत्रिका,मंडपवाले, आचारी..लग्न म्हंटलं की हजार भानगडी.”
“तुला काय वाटत नै रे..मित्राच्या प्रेमाची इकडे होळी होतेय नं तू लोकांची लग्न लावत फिरतोयस.”
“ओय आशिक, दादांनी होकार दिला आहे तुमच्या लग्नास.”
“काय बोललासं! चिमटा काढ आधी मला.”
“ओय! केवढ्याने काढलास..पण..म्हणजे, हर्षवायू होतोय रे मला, निषाद.” सारंगने निषादला कडकडून मिठी मारली.
“सारंगा, हाडं मोडतील माझी आणि मी म्हणजे आरु नाही रे.” ही मिठी थोडी हलक्या हाताने मारायला शीक आणि जा आता अंग विसळून ये तोवर मी धनाकाकांना भेटून येतो. कुठं असतील ते?”
पर्ह्याजवळ असतील बघ. अळी करताहेत लाल माठाची.”
निषाद मागल्या बाजूने पोफळींतून जाऊ लागला. सुर्याच्या किरणांची तिरीप पोफळीच्या झावळ्यांतून त्याच्या डोळ्यांवर पडत होती. इथेच त्या जांभळीजवळ ठेच लागून त्याचा अंगठा फुटला होता..अवघा चारेक वर्षांचा तो नं आरुताई सहा वर्षांची..तिनेच त्याची समजून काढली होती.
जखमेला रुईच्या पानांचा डींक लावला होता नं आलामंतर गेलामंतर छू करुन त्याच्या तोंडावर हसू फुलवलं होतं. विचारांच्या तंद्रीत तो धनाकाकांजवळ पोहोचला. धनाकाका फावड्याने अळं सारखं करत होता. निषादच्या पावलांकडे त्याची नजर जाताच त्याने वर बघितलं. “देवळाजवळ दादासाहेबांनी..” त्याचं बोलणं पुरं व्हायच्या आधीच खांद्यावरच्या फडक्याने घाम पुसीत धनाकाका “भले शाबास,”म्हणाला नि देवळाजवळ जायला निघाला.
सभामंडपाच्या बैठकीवर दादासाहेब येऊन बसले होते. रामेश्वराला नमस्कार करुन धनंजय त्यांच्याजवळ जाऊन बसला. धनंजयचा हात हातात धरत दादासाहेब म्हणाले,”तुमचं म्हणणं पटलं मला धनंजयभाऊ. मी तयार आहे, आरोही व सारंगच्या लग्नाची बोलणी करायला. त्यादिवशी रागाच्या भरात काय अधिकउणं बोललो असेन तर मला माफ करा.”
“अहो दादासाहेब, तुमचं मन किती साफ आहे ते ओळखतो मी. खरंच मला राग नाही आला तुमचा.”
दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. गाभाऱ्यात जाऊन देवाला नमस्कार केला.
दोन्ही घरांत लग्नाचे वारे घुमू लागले. तांदूळ निवडणी, बोटवे,मालत्या,नखुल्या,गव्हले करावयास शेजारणीपाजारणी एकत्र जमू लागल्या. ओव्या गात भरभर हात चालू लागले. थट्टामस्करी होऊ लागली. उखाण्यांचे आग्रह होऊ लागले. चहा नि पानसुपारीची ताट फिरु लागली.
भागिरथी काकू आल्या होत्या. आरोहीने विचारलंच”काकू ,साऊला का नाही आणलंत?”
“तिचं डोसकं चढलंय म्हणून निजलेय हो.”भागिरथी काकूंनी शोभवून घेतलं. आरोहीला पटेना. ती हळूच मागिलदारी गेली नं तिथून पाणंदीतून साऊच्या घराकडे..
क्रमश:
=====================
प्रपंच भाग १ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/
प्रपंच भाग २ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/
प्रपंच भाग ३ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/
प्रपंच भाग ४ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag4/
प्रपंच भाग ६ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-6/
==================
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
https://www.facebook.com/ritbhatmarati/
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
==================