प्रपंच (भाग दुसरा)

’ अगो, तू कोकरू न त्यांचं! ‘’
‘’ ते लाडबीड सगळं मी त्यांचं ऐकेपर्यंत. त्यांच्याविरुद्ध जर वागले ना मी तर मग काही खैर नाही माझी.’’
‘’ मान्य केलंस ना की आपला बाप हिटलर आहे.’’निषाद हसत म्हणाला.
‘’ निश्या…’’ आरोहीने निषादकडे पहात डोळे वटारले.
‘’ पण माझं वाचून कुठे झालंय ते पुस्तक! वेळच नाही मिळाला अरे.”
‘’ अगं खुळी की काय तू तायडे. नारायण धारपांचं पुस्तक ते. आधीच तू भित्रीभागूबाई. त्यात ते गिळगिळीत लांबवर जाणारे, मानेला वेढणारे हात, तो कुबटसा दर्प,त्या खोबण्या वगैरे वाचलं तर ढगात तरी जाशील नाहीतर किंचाळून धरणीकंप तरी करशील.”
“एवढी काही भित्री नाही मी,पण मला नाहीच आवडत अशी भुताखेताची पुस्तकं वाचायला. उगा दडपण येतं मनावर..उदासिनता येते एकप्रकारची. मन अस्वस्थ होतं.”
“पुरे पुरे..निरुपण नका करु. रात्री मागल्या दाराने ये. दोघं मिळून जाऊ चांदणटेकडीवर. सारंगाला दुपारीच प्रॉमिस केलय मी..तुला आणतो असं.’’
‘’ निषाद, माझं जरा ऐकून तर घे. मला भीती वाटते रे.’’
‘’ तायडे, तुला आवडतो का सारंग? हो तर हो म्हण नाही तर नाही म्हण. मी त्याच्याकडे अशा नजरेने कधी बघितले नाही वैगेरे घिसेपिटे डायलॉग नको मारुस. मी पाहिलंय तो जवळून गेला तरी लाजरीच्या पानांसारखी चिमटतेस.’’
‘’ निषाद, जास्त होतंय तुझं. बरं, आवडतो मला सारंग पण दादा…त्यांच्या घरचे..’’
‘’ त्यांच्या घरचे कोण? त्याचा जन्मदाता.. तो छंदीफंदी प्रभाकर. सतरा धंदे त्याचे…बाया..बाटल्या त्याला कसली भीक घालायची!’’
‘’ बरं..बरं. दादा येताहेत जा तू आता! ‘’
आरोही पाठमोरी वळून वळईत गेली.
‘’ आरोही,.जरा माझा चष्मा शोध गं बाई. मेला सदानकदा हरवत असतो. गोधडीला चार टाके घालीन म्हणत होते. दोरा गुतायचा होता सुईत. गुंडी सापडली दोऱ्याची पण मेली ती सुईही सापडेना बोटांना. कधीची चाचपडतेय मी.’’
‘’ हा बघ गं आजे गोधडीच्या खाली ठेवलायस चष्मा.’’
‘’ कसले मेले चष्मे बनवतात…सतरांदा हरवतात. एका जागेवर म्हणून थारत नाहीत. आणल्यावर चार महिने दिसतं ठाकठीक, मग आहेच येरे माझ्या मागल्या. धड दिसेल तर शपथ.‘’
‘’ आणि ही काय सुई, गुंड्यातच टुपून ठेवलैस..अगं आज्जी थांब हं जरा. मी देते ओवून. एवढ्या रजया आहेत घरात तरी पाठीला रग येईस्तोवर गोधड्या शिवतेस.‘’
‘’ अगं सोन्या, आवड आहे मला गोधड्या शिवायची. माझी पोरंबाळं मी शिवलेल्या गोधडीवर निजली की किती समाधान मिळतं सांगू. सगळ्या गोधड्या धुवायला आल्यात.
एकदा ओहळात नेऊन बुचकळून काढावयास हव्यात. फडतरावर हापटून हाफटून लख्ख लख्ख करायला हव्यात नं मग काळ्याभोर खडकांवर वाळत टाकायला हव्यात. त्यांनाही ऊन्हं हवी असतात गं. आपण कसं रोज न्हातोधुतो तसं अंथरुणंपांघरुणं धुत रहावं, सवड काढून आणि हे गो कळे कोठून आणलेस!” आरोहीने सोबत आणलेल्या परडीकडे पहात आज्जी म्हणाली.
“आज शेजारच्या साऊकडे गेलंते. मोगरी कसली बहरलेय त्यांची..हा असला टपोरा कळा. तिने मला सहज काढू दिली फुलं. भागिरथी काकू नव्हती म्हणून. तिच्या हातून एक फुल सुटलं नसतं. वाळवून घालवील पण कुणाच्या माथ्याला लाभू द्यायची नाही.”
“गेली होती कुठे ती?”
“तिचं काय? भटकत असते..इथंतिथं गप्पा थापीत. घरात कामास साऊच्या रुपाने दासी आहे कायमची. हिच्या पोरासोरांचं सैपाकपाणी, गुराढोरांचं शेणपाणी सारं सारं बिचाऱ्या साऊने करायचं!”
“असतात एकेकाचे भोग बाळा भोगावेच लागतात.” आज्जी एका रांगेत टाके घालत उत्तरली.
परडीतली फुलं ओंजळीत घेत आरोही म्हणाली,”बघ ना गं आज्जी, साऊच्या अंगणात मोगरा बहारलाय केवढा जणू आकाशातल्या चांदिण्या त्या झूडपावर झगमताहेत.. पण साऊला बिचारीला केसच नाहीत..मी फुलं खुडत होते नं, साऊ गाणं गुणगुणत होती.
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरू कळियांसी आला
इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलु गेला गगनावेरी
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिला..
“तुझाही आवाज गोड आहे बरं आरु. गात जा अधुनमधुन.”
“छे गं आज्जी तुझ्यासारखा गोडवा कुठला आलाय माझ्या गळ्यात!”
“येईल हो. आस्ते आस्ते..सगळं येईल बघ. साऊकडे बसावं फावल्या वेळात जाऊन. तिलाही बरं वाटेल. मनातलं बोलता येईल..मन मोकळं होईल तिचं. आईविना पोर बिचारी. सावत्र आई गड्यालाही कुणी सांगणार नाही एवढाली कामं करुन घेते.
साऊच्या आईचं बाळंतपण मीच केलं गो. बिचारी दोन दिवस कळा देत होती नं जन्मास आलं हे एवढुसं मुटकुळं..अजाबात जावळ नव्हतं टकलीवर..आम्हास वाटलं, येईल वर्षभरात..साऊची आई कसली कसली तेलं चोपडायची तिच्या डोसक्यावर..नागरमोथा,माका,ब्राह्मी..एक औषधी सोडलान नाही परसोवातली पण साऊच्या बोडक्यावर काही केस उगवंला नाही.
ओसाड माळ नुसता. तरी नाकीडोळी का वाईट आहे! लक्षण आहे पोरीला, काळ्या करंदासारखे डोळे.. किती लाड असायंचे पोरीचे!सांगून खरं वाटायचं नाही पण साऊ अवघी सातेक वर्षाची असताना ज्वराने आईस गेली नि बापसान दुसरं लग्न केलं नि ही चटकचांदणी घरात आणली..तेंव्हापासून साऊचे ग्रह फिरले हो. राबराब राबते पोर. सुख अणुमात्रही नाही नशिबी.”
“हो गं आज्जी, भागीरथी काकू सदा अंगावर येत असते साऊच्या. कितीक केलं तरी भागिरथी काकूच्या मनास येईलं तर शपथ! मला तर एखादंं मापटं धरुन हाणावसंं वाटतं तिच्या डोसक्यात. बरं आज्जी, छान झाले नं गजरे, थोडी अबोली मिळाली असती तर अजून सुरेख दिसले असते. माळू का मी?”
“रात्रीची माळू नयेत गं वासाची फुलं. उद्या वेणीफणी कर नि माळ निवांत.” आज्जीने समजावणीच्या सुरात म्हंटलं.
आरुने ते गजरे मग पितळी हंड्याच्या गळ्याला बांधून ठेवले.
मागल्या दारी सुमन ओले काजू चिरत बसली होती. काजुगर, ऊन पाण्यात टाकून तिने आरोहीकडे सोलावयास दिले.
आरोहीने चट चट चट सालं काढली. आवरलं सगळं असं मनाशी म्हणत सोलल्या गरांचं भांडं आरोहीने आईच्या हाती दिलं. पाट्यावर वाटलेलं ओल्या नारळाचं, खड्या गरम मसाल्याचं गंधवाटण सुमनने तेलात परतलं तसा घरात वाटणाचा घमघमाट सुटला.
“आई,काजुबिया टाकू का गं!”
“पैक जरा. कढ येऊदे वाटणास मग घालते मी काजुबिया. तू जा..ते का साद घालंताहैत बघ बरं.”
आरोही ओसरीवर गेली. तिला पहाताच दादासाहेब म्हणाले,‘’ आरू, वर्तमानपत्र कुठं ठेवलंय त्या दिवट्याने शोध गो जरा.’’
‘’ हे घ्या दादा. इथेच तर होतं खिडकीजवळ. ‘’
‘’ ही जागा आहे का वर्तमानपत्र ठेवायची? मुळात हा घेतोच कशाला?
हे बघा आले चिरंजीव. कुठे गेला होता उंदडायला? घर नाही तुम्हाला? का मोलमजुरी करायला गेला होता! कानात शंख फुंकला, स्पर्धापरीक्षांचा अभ्यास कर म्हणून तरी….’’
‘’ पालथ्या घड्यावर पाणी….’’
‘’ कार्ट्या…मला म्हणी बोलून दाखवतोस. थांब ती कसली मुलाखत दिलीस त्याचं पत्र येऊदेत..मग बघतो तुला.’’
‘’ हा सूर्य नि हा जयद्रथ. ‘’
‘’ जास्तीच जीभ सुटली रे तुझी. पेपरची नीट घडी करता येत नसेल तर वाचायला घ्यायचा नाहीस. पेपर कसला वाचतोय..नुसत्या नाटकाच्या नि सिनेमाच्या जाहिराती नि ते मडमींचे फोटो पाहत असणार.’’
‘’ बाप तसा बेटा.‘’
दादा आता मात्र निषादच्या अंगावर धावले तशी आरोही मध्ये पडली. तिने त्यांना हाताशी धरून झोपाळ्यावर बसवलं.
‘’ समजाव जरा त्याला…थोरली बहीण कशी मर्जीमाप आहे आणि हे कार्ट जरा म्हणून वडीलधाऱ्यांच्या मान ठेवत नाही.’’
आरोहीने पाटपाणी घेतलं चुलीजवळ सुमन तांदळाच्या पीठाच्या भाकऱ्या थापत होती. तव्यातल्या भाकरी गोल टम्म फुगत होत्या जणू पुनवेचा चंद्रच. त्यांचा खरपूस गंध घरभर पसरत होता.
कवडी दही, मेथीची भाजी, भाकरी, वरणभात आवाज न करता बापलेकांची जेवणं झाली. निषाद आरोहीला लवकर जेवायला खुणावत होता.
जेवणं झाली तशी भांडी कामवालीसाठी धुवून ठेऊन आरोहीने ओटा आवरला. आजीने बोलावलं,‘’ तायडे इकडे ये. केसांना तेल लावते तुझ्या.’’
निषादने कपाळाला हात लावला .
‘’ आज नको गं आज्जे. थोडं डोकं जड वाटतंय मला.’’ आरोहीने काहीबाही सांगितलं.
‘’ अगो उलिसं दाबून देते..मग बघ कसं बरं वाटेल.’’
‘’ आजी जरा मागील दारी जाते गं निषादसोबत.’’आज्जीचं बोलणं ऐकलं न ऐकल्यासारखं करत आरोहीने सपाता पायात गुंतवल्या.
खिडकीतून आवाज देत सुमन म्हणाली,
‘’ लवकर या रे. जास्त दूर जाऊ नका. बिबट्याचा वावर असतो म्हणे हल्ली टेकडीपल्याडच्या जंगलात.’’
‘’ हो आई लगेच येतो.’’
‘’ विजेरी न्या रे सोबत.’’
आईच्या सूचना सरायच्या आत दोन्ही भावंडं निघालेसुद्धा. पाणंदीतून चालत असताना पातेऱ्यांचा आवाज काय तो कानी येत होता. रातकिड्यांची किरकिर मंदस्वरात सुरु होती. आजूबाजूची झाडं जुन्या जाणत्या माणसांसारखी सोबतीला उभी होती.
‘’ पुस्तक घेतलंस ना तायडे? ‘’ खिशात हात घालत निषादने विचारलं.
‘’हो रे घेतलं..पण मला ना खूप भीती वाटतेय. आपण चल घरी परतू.’’
‘’ आणि त्याला उभा राहू देत खड्या पारश्यासारखा! ‘’
‘’ अय्या, हा कोण खडा पारशी?’’
‘’ मुंबईत पुतळा आहे म्हणे त्याचा. असेल कोणीतरी मोठा माणूस. बरं, नीट बोल त्याच्याशी. पुतळ्यासारखी उभी नको राहूस. मी थांबेन आडोश्याला. बाकी काही करू नकात.” निशांत गालातल्या गालात हसत म्हणाला.
‘’ बाकी काही म्हणजे रे निशांत ? ‘’
‘’ तायडे, शाळाकॉलेज करुनसुद्धा अडाणी राहिलीस बघ तू. शिकून कै बी उपयोग नै तुझा.’’
बोलताबोलता वाट सरत आली नि दोघं चांदणटेकडीजवळ पोहोचली.
‘’ मी बसतो इकडे. तू जा वर. काय ते फायनल करून ये. रोज रोज येता येणार नाही.’’ निषाद असं म्हणून तिथेच एका खडकावर पसरला.
आरोही, अधेमधे वाढलेल्या गवताच्या खुंटांना धरत वरती चढली. तिच्या काळजात घड्याळाचे ठोके वाजू लागले होते. माथ्यावर सारंग बसला होता. तिच्या पैंजणांच्या आवाजाने त्याने मागे वळून पाहिलं. त्याने नजरेनेच तिला बसायला सांगितलं. आरोही थोडं अंतर ठेऊन बसली.
वातावरणात निरव शांतता होती. गार वारा अंगाला स्पर्शून जात होता. झाडाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळुकीसवे डुलत होत्या. निळ्याभोर आकाशात चांदण्यांची आरास शोभून दिसत होती. झाडाच्या फांद्यांआडून चंद्राची कोर डोकावत होती.
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे स्वप्न वाहे,धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा
मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
लाजर्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
शोधिले स्वप्नांत मी ते ये करी जागेपणी
दाटुनि आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
न बोलताही दोघं जणू गात होती..त्यांचं ते प्रीतगुज तिथला निसर्ग पंचैंद्रिंयांनी अनुभवत होता,शहारत होता.
आरोहीने सारंगाच्या हाती पुस्तक दिलं.
‘’ आतली चिट्ठी वाचलीस?‘’ सारंगने हळूच विचारलं अगदी अगदी नाजूक फुलावर फुंकर घातल्यासारखं.
लाजून गोरीमोरी होत आरोही अस्पष्टशी म्हणाली,‘’ हो…’’
‘’ मग काय म्हणणं आहे तुझं! आवडेल माझ्याबरोबर संसार करायला.’’ सारंग मिश्कील हसत म्हणाला.
आरोही क्षणभर शांत राहिली..एकटक शुन्यात बघत..मग विचारपूर्वक म्हणाली,‘’ सारंगा,हे सारं नाटक सिनेमात ठिकै रे. आपल्याला नाही रे जमणार हे प्रीतीच इंद्रधनुष्य पेलणं. मी ही अशी भित्री. आपल्या घरातली मोठी एकमेकांची तोंडं बघत नाहीत. उगाच तुझी मात्र फरफट होईल.’’
‘’ आरोही, तुला मी आवडतो का ? तुझं माझ्यावर प्रेम आहे ? ‘’ सारंग ने धीरगंभीर स्वरात विचारलं. त्याच्या आवाजात जरब होती.
‘’ सारंग…सारंग, आवडतोस तू मला, पण..पण आमचे दादा अन् तुमचे वडील…कोण समजावणार त्यांना? शिवाय स्थळं येऊ लागलेत मला बघायला. मला कुणी पसंत केलंच तर दादांच्या विरोधात जाऊन मला नकार देता येणार नाही.’’
‘’ आपला निशी आहे ना. तो करील बंदोबस्त. एक सांगतो आरू…लग्न करीन तर तुझ्याशीच नाहीतर हा असाच राहीन.’’
‘’ हा कसला रे हट्ट तुझा! ‘’
‘’ हट्टच समज रात्रभर स्वप्नात असतेस माझ्या. आईशी बोललो आहे मी तुझ्याबद्दल. तिलाही आवडतेस तू. बघू नाही ऐकले बाकीचे तर देवळात जाऊन लग्न करू.’’
‘’ थोरामोठ्यांचे आशीर्वाद महत्वाचे असतात ना रे सारंगा…’’
‘’ मला का कळत नाही ते! थोरमोठे तसे हवे ना! माझा बाप..बाप म्हणायची लाज वाटते मला. माझ्या आयशीला प्रेमाच्या जाळ्यात गुंतवलं नि आपण धंद्याच्या नावाखाली महिन्यातले पंचवीस दिवस मुंबईला राहतो. तिथे घरोबा केलाय म्हणे..एका बाईशी. तिला दोन मुलं आहेत.
ती दोन आणि आम्ही दोघे म्हणजे माझ्या बापाची चार पोरं. गावात कोण अशा बापाच्या पोराला आपली पोरगी देईल, सांग बरं.
तुझ्या दादांचं आणि माझ्या बापाचं आधी सख्य होतं म्हणे. माझ्या आईला माझ्या बापाने पळवली तेव्हा तुझ्या दादांनी पोकळ बांबूनी फोडून काढला होता म्हणे माझ्या बापाला. हाडवैरी झालेत एकमेकांचे. तुझे दादा म्हणजे एकमार्गी शिक्षक….माझा बाप म्हणजे सतरा जणांना टोप्या घालणारा इरसाल माणूस. हेच बघ ना ही चांदण्यांची शाल पांघरलेली रात्र..तुझा सहवास आणि मी करंटा बापाचं आख्यान लावून बसलोय..’’
“सारंग, ही सुखदुःख वाटून घेण्यासाठीच तर एकत्र येणार आहोत आपण. तुझ्या मनातली सारी खदखद तू मजकडे मोकळी कर. मी फुंकर घालीन तुझ्या जखमांवर. संसाराचा रथ जोडीनं हाकू आपण. कितीही अडचणी आल्या मार्गात तरी एकमेकांवरचा विश्वास अणूमात्रही ढळू द्यायचा नाही. मी भरकटले तर तू मला सावर..तू चुकीच्या मार्गाने जाऊ लागलास तर मी तुला माघारी वळवीन.”
“आरु, किती मधाळ बोलतेस तू. वाटतं ऐकतच रहावं..ही रात सरुच नये कधी..”
बराच वेळ झाला तशी निषादने शिट्टी वाजवली. सारंग आरोहीचा निरोप घेऊन उतरणीला लागला. घरी आला तर दारात आई वाट बघत बसली होती.
‘’ कुठे गेला होतास सारंगा? किती वेळ झाला हे आलेत घरी. चौकशी करत होते तुझी.’’
‘’ कशासाठी!”
(क्रमश:)
©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
वाचकहो , मालतीचं माहेराशी नातं तुटलं तरी तिचा मुलगा सारंग नि दादासाहेबांची मुलगी आरोही यांच्या रेशीमगाठी जुळून येताहेत. आरोहीचा भाऊ निषाद हा या दोन प्रेमी जीवांना एकत्र आणणारा दुवा आहे. जुळेल का यांची रेशीमगाठ..पहायचय ना भेटू पुढच्या भागात..काय म्हणालात..लवकर हवा पुढचा भाग. हो हो, उद्याच भेटू नक्की.
=================
प्रपंच भाग १ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/
प्रपंच भाग ३ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/
==============================
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
https://www.facebook.com/ritbhatmarati/
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
=====================
1 Comment
Jyoti Tergaonkar
खूपच सुंदर आहे कथा👌दोन कुटुंब जे एकेकाळी अगदी सख्खे होते आणि प्रेमविवाह केल्यामुळे तो दुरावला आहे,बघू आता आरोही आणि सारंग मुळे तरी एक होतो का…