प्रपंच भाग १३ अंतिम भाग

©® सौ. गीता गजानन गरुड.
सारंगचा मजबूत हात हलकेच बाजूला करत ती दारापाशी गेली. कडी काढून मागिलदारी जाऊन उभी राहिली.
तिचे विस्कटलेले केस, आरक्त गाल पाहून शिल्पा स्तिमित झाली.
एका रात्रीत वहिनी इतकी तेजाळली..चैत्र ऋतूत आंब्याचं मोहरलेलं झाड जसं दिसतं तशी ती शिल्पाला भासली.
“शिल्पा, अगं बघतेस काय अशी!” शिल्पाच्या आ वासलेल्या चेहऱ्याकडे बघत आरोहीने विचारलं.
“कालची रात्र अधिकच गंधाळली होती का गं वहिनी! अगदी पहाटे चारलासुद्धा तुमच्या खोलीतनं..”
“चल चावट..” आरोहीने शिल्पाला चापटी मारली.
“बरं का वहिनी, नणंदबाई आहोत आम्ही तुमच्या..आमचा तोरा, मोरासारखा फुलारलेला असणार बरं. अशी चापटी नै मारायची आम्हाला. ते आपलं खोलीत काय ते झिम्मा खेळा.तू नं सारंगदादा.”तोंडावर हात घेऊन हसत शिल्पा म्हणाली.
“नणंदबाई नकटी धाकटी बरं का वैनीच्या मर्जीत रहायचं,”असं म्हणत आरोही शिल्पाला पुन्हा चापटी मारणार इतक्यात शिल्पाने तिला हुल दिली नं परसोवातून येणाऱ्या सारंगावर आरोही धडकली.
सारंगाचा तो पारोसा गंध..रात्रीचा सुखद प्रणयानुभव..आरोही तिथेच घुटमळली.
तिची नजर खाली वळली.
दोघं परत काही..इतक्यात शिल्पा खाकरली..
तसं सारंग खांदे उडवत आपण कुठे काय असे भाव चेहऱ्यावर आणत घरात गेला.
जाता जाता आरोहीच्या गालांवर लाल गुलाब खुलवून गेला.
मालती खिडकीतनं ही सारी थट्टामस्करी बघत होती. तिला भरुन आलं पण हे भरुन येणं वेगळं होतं.
आतापर्यंतच्या भरुन आलेल्या दु:खाच्या तळ्यासारखं नव्हतं. सुखासमाधानाचं कोंदण होतं हे.
थोरल्या जाऊ, वत्सलाने मालतीसाठी चहा आणला.
अगदी कडक, चहाची पात घालून उकळवलेला. चहाचा घोट पिताच मालतीला तरतरी आली. जावेकडे पाहून ती गोड हसली.
वत्सला तिच्या बाजूला बसली..म्हणाली,”काल पहिल्यांदा पाहिला माले तुझा खंबीरपणा. झंझावाताला पिटाळून लावायची धमक आली तुझ्यात. अशीच खमकी रहा बाई.”
मालती रात्रीचा तो प्रसंग आठवत चहाचे घोट घेऊ लागली. ही सकाळ तिच्यासाठी निश्चितच नवी होती.
प्रभाकरने जाणलं..आपली इथे डाळ शिजणार नाही. त्याने आपलं गाठोडं गुंडाळलं.
दिपकला गाव आवडला. त्याला गावीच रहायचं होतं.
त्याचा पाय निघेना. शेवटी प्रभाकर व चांदणी दोघंच मुंबईस परतली.
दिपक गावी चांगलाच रुळला. आपल्या आईच्या वाईट वागणुकीने तो फार दुखावला होता.
त्याला सारंगची आई मालती आवडू लागली. त्याने धीर करुन विचारलं मालतीला,”सारंगदादासारखं मीही आई म्हणू शकतो तुला?”
मालती क्षणभर भांबावली..नात्यांचे वेगळे अर्थ. या अगोचर नात्यामुळे तिची झालेली ससेहोलपट. तिला सहावे लागलेले ब्रह्मचर्य..सारं काही तिच्या मन:चक्षूसमोर तरळलं..पण क्षणभरच. तिच्या मनाने विचार केला..या सगळ्यात या मुलाची काय चूक?
याच्या आईवडिलांच्या पापाची शिक्षा या मुलाला का द्यावी! त्याचा हात पकडत, त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाली,”नक्की म्हण मला आई. तुही माझ्या सारंगासारखाच.”
“आई, मी इथे राहिलो कायमचा तर चालेल तुला?” दिपकने चाचरत विचारलं.
तिने मानेने नं बोलक्या डोळ्यांनी दिपकला होकार दिला.
सारंगं तिथे सुकडी (असोले नारळ) यंत्राने सोलत होता. मालती त्याला उद्देशून म्हणाली,”सारंगा, दिपक इथे रहायचं म्हणतोय. ऐकलस ना तू. “
“हो. जमेल की. आपल्या कणकवलीच्या कॉलेजात एडमिशन घेऊ याचं. निकाल येऊदेत. सगळं मार्गी लावतो. दिपक तू काळजी करु नकोस. खा पी नि मजा कर.
टोपभर पेज खाल्ली पाहिजेस न्याहारीला..नि हे माझ्यासारखं हाताला दिसेल ते काम हातावेगळं करत गेलं पाहिजे.
शेणामातीची घाण नाही बाळगायची. मातीवर प्रेम करायला शिकलं पाहिजे.”
दिपक म्हणाला,”सारंगदादा, नक्की करेन मी हे सगळं. धनाकाकांसोबत डोणी धुवेन, गुरासोरांना वैरण घालेन,त्यांना पाणी दाखवेन..सगळं सगळं करेन दादा.”
“हे शाब्बास,”सारंगने दिपकचं कौतुक केलं.
इतक्या वर्षात झुडपासारखा खुंटलेला दिपक मालतीच्या,वहिनीच्या मायेने,सारंगच्या साथीने व धनाकाकांच्या मार्गदर्शनाखाली पातेरा गोळा करणे, कुणग्यांत न्हेऊन टाकणे, भाजणी करणे,कुंपण करणे यांसारखी कामं करु लागला. मातीत घाम गाळू लागला.
धनाकाकांच्या गुरासोरांना घेऊन नदीवर जाऊ लागला. त्यांच्या पाठी चोळूनचोळून त्यांना न्हाऊ घालू लागला.
संध्याकाळी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागला. थोडक्यात सांगायचं तर महिनादोनमहिन्यात त्यांच्यातलाच एक झाला.
गावकरी आपापसात चर्चा करीत,”मानलं पायजे मालती वहिनीला. सवतीच्या पोरालाही स्वत:च्या पोराप्रमाणे माया लावते बाई. शेवटी आईचं काळीज ते.”
धनाकाकाच्या वाढदिवासाची पार्टी आयोजित केली होती. आरोहीच्या घरच्यांनाही बोलावणं होतं. आज्जीने रात्रभर जागून तांदळाच्या रव्याचं धोंडस बनवून आणलं होतं. मालती व वत्सलाने घावणे,काळ्या वटाण्याची आमटी, फणसाची भाजी,गोडी डाळ,भात,ताज्या कैऱ्या़चं करकरीत लोणचं, असा सगळा स्वैंपाक रांधला होता.
वत्सलाने धनंजयचं औक्षण केलं नं धनंजयने धोंडस कापला. सगळ्यांनी धनाकाकाला वाढदिवसाचं अभिष्टचिंतन केलं. धना व वत्सला आज्जीच्या पाया पडले. आज्जीने त्यांना तोंड भरुन आशीर्वाद दिला.
साऊ नि प्रल्हादलाही बोलावलं होतं. साऊ नि आरोही दोघी लाजतखिदळत होत्या. शिल्पाला त्या जरा यड्याच वाटत होत्या. ती सगळ्यांना पाण्याचे तांबे भरुन देत होती.
मधेच लाईट गेली मग दोन लफ्फे(पेट्रोमेक्सच्या बत्त्या) पेटवले नि त्या उजेडात जेवणं झाली. सारवणाची जमीन त्या पिवळसर प्रकाशात खूप छान दिसत होती. रात्रीपर्यंत गप्पांचा फड रंगला. दादासाहेबांच्या गाडीतनं आलेली मंडळी परत गेली.
धनंजय अगदी समाधानी होता. पुतण्याच्या लग्नाचं कार्य सुरळीत झालं होतं. नक्षत्रासारखी सून घरात आली होती.
पाहुणेमंडळीही खूप चांगली लाभली होती. असा सगळा विचार करत धनंजय शतपावली करत होता.
शिल्पाची साद ऐकून धनंजय आत गेला. तिच्या हातात रिसिव्हर होता. धनंजयने रिसिव्हर कानास लावला.
“हेलो, कोण?”
“हेलो, मी प्रभा बोलतोय धना.”
“प्रभाकर, अरे तुझा आवाज असा घाबरल्यासारखा का येतोय? सगळं क्षेम आहे ना तिकडे! नीट काय ते बोल. उगा जीवाला घोर लावू नको.”
“धना..धना, मी बरबाद झालो रे. नेस्तनाबूत झालो. माझ्या गाड्यांवर, ऑफिसवर पोलीसांनी धाड टाकली.”
“अरे प्रभा तू का घाबरतोयस! कर नाही त्याला डर कशाला! मुळीच घाबरु नकोस तू. तू वस्तूंची नेआण करतोस ना..मग घाबरायचं कशाला!”
“धना..धना, कसं सांगू तुला. पोलीसांना माझ्या मालात पाकीटं सापडली, चरस, गांजाची.”
“अरे पण धना कोणी षडयंत्र केलय का तुझ्याविरुद्ध? घाबरु नकोस. मुळीच घाबरु नकोस तू. मी तुझ्या पाठीशी उभा राहीन.” धनंजय त्याला धीर देत म्हणाला.
पोलीसांनी प्रभाकरच्या घरावर धाड टाकली. सगळं सामान आलटंपालटं करुन टाकलं.
घरात लपवलेली सोन्याची नाणी सापडली, इतर मुद्देमाल सापडला. पोलीस प्रभाकरला घेऊन गेले.
प्रभाकर तोंडच उघडेना..शेवटी पोलिसांनी त्याच्या एकच कानफटीत लगावली. तो सटपटला. पाया पडू लागला. लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने प्रभाकरला हाणून काढला.
पोलीस इनस्पेक्टरने त्याची कॉलर पकडत त्याला उठवलं. म्हणाले,”अरे चोरा, पैशासाठी गु पण खायला कमी न करणारी तुमची औलाद. तुमच्यासारख्या लोकांमुळेच देशाची भावी पिढी नरकात जातेय रे. सोळासतरा वर्षांची कोवळी मुलं व्यसनाधीन झाले आहेत. काहीच वाटत नैरे तुम्हाला? गेंड्याच्या कातडीची अहात रे. किडे पडून मरायला पाहिजे तुम्ही. तुझे सारे लागेबांधे सांगायचे फटाफट..जीव पाहिजे असेल तर ओक गरळ.”
प्रभाकर पोपटासारखा बोलू लागला. मिळेल त्या गाडीने धनंजय मुंबईस जाऊन पोहोचला. तिथून जेलमधे गेला. प्रभाकरची केविलवाणी अवस्था पाहून धनंजयचं काळीज हललं. त्याचं एकही अंग असं नव्हतं जिथे माराच्या खुणा नव्हत्या. डोळे सुजून बटणासारखे पुढे आले होते. धनाला बघताच प्रभाकर धाय मोकलून रडू लागला.
“का प्रभा..का असं केलंस..का असा वहावत गेलास? घरादाराचं नाव मातीला मिळवलंस.” धनाने त्याला विचारलं.
प्रभाकरचा जामीन नामंजूर झाला होता. धनंजय निघणार तेवढ्यात प्रभाकरने त्याला विनंती केली.”धना, चांदणी एडमिट आहे. शक्य झाल्यास तिला भेट.”
धनंजय त्या इस्पितळात गेला. पन्नाशीची चांदणी अगदी हडकुळी झाली होती. त्या चंदनशेठने तिला एड्ससारखी महाभयानक बिमारी भेट म्हणून दिली होती.
धनंजय म्हणाला,”वहिनी मी गावी न्हेतो तुम्हाला. तिथे उपचार करु आपण.”
चांदणीने धनंजयसमोर हात जोडले व म्हणाली,”माझ्या दिपकला जवळ केलत तेवढं पुरे. माझ्या पापांची शिक्षा मी भोगतेय. ती भोगुदेत मला. धना काही न बोलता जायला निघाला.
पेपरात बातमी होती. रतनशेटला खुनाच्या आरोपाखाली पकडल्याची नि तारीने स्वतःला पेटवून घेतल्याची. रेडिओवर गाणं लागलं होतं..
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥
क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट,
कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट,
देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..
धनंजयच्या मनात आलं..एवढं सगळं होण्याआधी प्रभाकरने आपली चूक मान्य केली असती तर! मोह मोह तो किती असावा माणसाला. शेवटी जाताना सोबत काय घेऊन जाणार!
प्रभाकरचं हे असं ऐकून मालतीला ना दु:ख झालं ना आनंद. ती तिची कामं नेमाने करत होती. नव्या सुनेचे लाड करत होती. तिला या घरचे.रीतीरिवाज समजवत होती. आरोही नि तिचं माहेर एकच असल्याने त्यांच्या गप्पाही छान रंगत होत्या.
आरोहीने धनाकाकाच्या मदतीने फणसाचे गरे तळून विकण्यास सुरुवात केली.
नारळ घरचेच त्याकारणाने निर्भेळ खोबरेल तेलही घरचंच.
आज्जीचं बघून आरोही गरे तळायला शिकली होती.
सासरी आल्यापासनं तिला काहीतरी नवीन करावंस वाटत होतं. आज्जीचं मार्गदर्शन घेऊन तिने हे काम सुरु केलं.
धनाकाका फणस फोडून गरे काढून द्यायचा. मालती नि वत्सलाही तिला फावल्या वेळात मदत करु लागल्या.
त्यातच नवीन पाहुण्याची चाहूल लागली..मग काय चुलीजवळ बसण्यासाठी गावातल्याच दोघी गरजू स्त्रिया दुपारी येऊ लागल्या.
तेवढाच त्यांनाही रोजगार मिळू लागला. साऊही आंबापोळी करुन देऊ लागली.
वितरणाचं काम सारंग करत असताना त्याच्या लक्षात येऊ लागलं की खरंच नोकरी एके नोकरी करत बसण्यापेक्षा या भूमीने जे आपल्याला भरभरुन दिलंय त्या फळांपासून,धान्यांपासून उत्पादनं बनवून विकली तर एक वेळ अशी येईल की नोकरीही करण्याची गरज नाही पण तोवर तरी नोकरी धरुन ठेवणंही तितकच आवश्यक होतं. शेतीचं उत्पादन म्हंटलं तर ते पाऊसराजावर अवलंबून, बिनभरवसे काम..तरी आरोहीने आखलेल्या या पाऊलवाटेवर तो तिच्यासोबत चालणार होता.
निषाद सुट्टीला आला की आरुताईला भेटायला जायचा. कधी तिथे रहायचाही. यातच शिल्पाच्या मनात त्याच्याविषयी कुछ कुछ होता है सुरु झालं जे आरोहीने अचुक ओळखलं नं मग तिने ते सारंगला सांगितलं.
सारंगने विचार केला, काय हरकत आहे! दुहेरी पाहुणेपण होईल. बहीणही नजरेसमोर राहील न निषादमधे नाव ठेवण्यासारखं काही नाही.
पुढल्या वेळेला निषाद आला तेंव्हा आरोहीने त्याच्या आवडीच्या शिरवळ्यारस करायचा बेत आखला नि अंग दुखतय सांगत शिरवळ्या काढण्याचा लाकडी सोर्या निषादकडेच सोपवला.
शिल्पाला केळ्याच्या आगोतलीत शेवया धरावयास बसवलं. नारळ खवताखवता सारंग डोळ्याच्या कोपऱ्यातनं दोघा प्रेमपाखरांचं निरीक्षण करत होता. दोघांचै नजरेने संवाद चालू होते. सारंग काय समजायचं ते समजला.
पोटभर शिरवळ्या रस खाऊन निषाद नि सारंग मागल्यादारी वाऱ्याला बसले होते. सारंगने निषादकडे शिल्पाचा विषय काढला.
“शिल्पाच्या लग्नाचं बघतोय. तुझ्या बघण्यात एखादं स्थळ असेल तर सांग. नाहीतर असं कर, दादासाहेबांनाच सांग ते लागतील कामाला.” सारंगने खडा टाकला जो निषादला बरोबर लागला.
निषाद म्हणाला,”सारंग म्हणजे खरं सांगायचं तर मलाच आवडू लागलेय शिल्पा पण विचारायचं कसं ते जमत नव्हतं शिवाय तू काय समज करुन घेशील म्हणून गप्प होतो.”
सारंग म्हणाला,”साले, यही पहेचाना आपुनको. चल..जौदे तुला भीत भीत रहायचंय ना. धनाकाकाने एक स्थळ आणलय शिल्पासाठी. बाजूच्या गावातलं आहे. आपल्या वळंजू मास्तरांचा भाऊ. उद्या बोलवतो त्यांना”
“ए बस्स काय. आता पाया पडू का. असलं काही करु नको बाबा. मी मरुन जाईन.”निषाद भावनिक होत म्हणाला.
“आता कसं..आता कसं! ती बघ वाट बघतेय शिल्पी विहिरीजवळ. तिलाच सांग काय ते. एरवी पोपटासारखा बोलतोस नं.”
निषाद मानेकडे हात फिरवत विहिरीच्या दिशेने निघाला.
त्याच्या धडधडणाऱ्या ह्रदयाचे ठोके त्याला पावलागणिक ऐकू येत होते.
आताआतापर्यंत दोघं एकमेकांशी अगदी सहज बोलायची पण वारा बदलला होता. प्रेमाचे मतलई वारे सुरु झाले होते.
गुलाबी चुडीदार ल्यालेली शिल्पा कठडयाला हात टेकून उभी होती.
तोही तिथे जाऊन उभा राहिला. दोघंही उभीच होती..उष्णओली थरथर..शब्दच बाहेर पडेनात.
“ते..ते..आपलं..ते हे..तू मला..तू..पाणी शेंदून हवंय का थांब देतो.”
निषादने सरसर कळशी खाली सोडली. राजू हलवला तशी कळशी पाणी पिऊ लागली..तोच कानी आवाज आला..निषाद तू मला आवडतोस. झालं राजू(दोर) निसटला नं कळशी डुबुक.
राजूऐवजी निषादच्या कवेत त्याची लाजरी शिल्पी..अगदी सिनेमाला शोभावा असा सीन. तेंव्हाच झाडकीतून सारंग, आरोही, साऊ, प्रल्हाद बाहेर आले नि निषाद नं शिल्पाची एकच तारांबळ उडाली.
“लग्नाआधीच अलिंगन.”सारंग कंबरेवर हात ठेवून म्हणाला तशी शिल्पा हळूच निषादच्या बाहुंतून निसटून सारंगदाच्या कुशीत शिरली.
वडीलधाऱ्यांच्या कानावर नाजूक विषय घातला. बैठक बसली. ठराव झाला.
मालतीचं घर पुन्हा रोषणाईने सजलं. दाराला तोरणं लावली होती. आरोहीची भलतीच लगबग सुरु होती. तिच्या नकट्या, धाकट्या नणंदेचं, शिल्पाचं जे लग्न होतं तेही आरोहीच्या लाडुल्या भावाशी, निषादशी.
गर्भार असल्याने अधिकच तेज आलं होतं तिच्या चेहऱ्यावर. दवाने न्हालेलं केतकीचं पातंच जणू.
शुभमंगल सावधान..थाटामाटात लग्न लागलं. वधुवरांनी एकमेकांना वरमाला घातल्या.
शिल्पाचं कन्यादान करण्याचा मान धनाकाका व वत्सलाकाकूस मिळाला. शिल्पाला हातीबोटी देताना धनाकाकाला, मालती स्वत:चं दु:ख आवरुन धीर देत होती. हाच तर प्रपंच असतो. एक कचरला, डळमळला तर दुसऱ्याने सांभाळणं.
संयुक्त कुटुंबात पुर्वी माणसं माणसांना धरुन होती. जसजशी विभक्त कुटुंबपद्धती सोयीसाठी का होईना रुढ झाली तसतसे माणसांतले बंध विरळ होत गेले. माणसं सणावारालासुद्धा भेटायचा कंटाळा करु लागली.
सारंगदादा,प्रल्हाद,आरोही,साऊ,दिपक सारेच वरातीत मनसोक्त नाचले. फटाक्यांच्या माळांचा कडकडाट चालूच होता.
दादासाहेबांचं घर फुलांच्या माळांनी,दिव्यांनी,पताकांनी झगमगत होतं. वरात दादासाहेबांच्या दारात आली. नणंदबाई आरोही मोठ्या तोऱ्यात पदर खोचून दार अडवून उभी होती. “मला तुमची मुलगी सून म्हणून देणार असं कबूल करा, मगच वाट सोडते.”
”देणार..देणार.” दोघांनी म्हंटल्यावर आरोहीने त्यांची वाट सोडली.
शिल्पाने धान्याने भरलेलं मापटं ओलांडून सासरच्या घराचा उंबरठा ओलांडला.
आज्जी आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी नातसुनेकडे कौतुकाने पहात होती. आपल्या नेत्रज्योतींनी नव्या जोडप्याचं औक्षण करीत होती.
(समाप्त)
====================
प्रपंच भाग १ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/
प्रपंच भाग २ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/
प्रपंच भाग ३ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/
प्रपंच भाग ३ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/
प्रपंच भाग ४ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag4/
प्रपंच भाग ५ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-5/
प्रपंच भाग ६ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-6/
प्रपंच भाग ७ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-7/
प्रपंच भाग ८ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part-8/
प्रपंच भाग 9 :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-9/
प्रपंच भाग १० :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-10/
प्रपंच भाग ११ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-11/
प्रपंच भाग १२ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-12/
====================
1 Comment
Mrs.Prachi Patankar
@गीता गरुड , मला तुमची प्रपंच ही कथा खूप आवडली. प्रत्येक व्यक्ती ,प्रसंग, निसर्ग सगळं काही अगदी डोळ्या समोर आलं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. अश्याच सुंदर सुंदर कथांचा लाभ आम्हाला मिळोत. धन्यवाद 🙏🙏