प्रपंच भाग १०

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
साऊ निगुतीने स्वैंपाक करायची,आग्रह करकरुन वाढायची. भागिरथीने तंबी दिल्याने ती डोक्याला पातळाचं फडकं बांधून सगळी कामं करायची.
प्रल्हादला आश्चर्य वाटायचं..इतकी देखणी ही युवती..नाजूक जिवणी, अपरं नाक,रेखीव डोळे, हसली की गालावर कशी पैशाएवढी खळी पडते पण हे डोकं का झाकून ठेवते.
का बरं माळत नाही ही फुलं? हिच्या वयाच्या मुली कशा हसतात,खिदळतात..हिचा चेहरा एवढा पोक्त का बरं वाटतो?
दारी जाई,जुई,मोगरा बहरलाय तर ती फुलं सगळीच देवाला का वहाते! आपण स्वतः का नाही माळत?
एके दिवशी तो पहिल्या गाडीला तालुक्याला गेला. तिथे काही पगारासंबंधी काम होतं ते आटपलं. दादासाहेबांनी सांगितलं होतं, “एक दिवस मी सांभाळतो तुझे वर्ग. दुपारचा येऊ नकोस शाळेत.” म्हणून तो घरी आला नं पाणी प्यायला म्हणून खिडकीपाशी असणारं तांब्याभांडं त्याने उचललं..
तिथे नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेली छोटीशी मोरी होती. आतून फार सुरेख गाणं ऐकू येत होतं. प्रल्हादने ओळखलं..ही साऊच असणार. तो एकटक तिथे पहात राहिला.
काही वेळातच छातीला परकर गच्च बांधून साऊ बाहेर आली. तिचा तो सुस्नात देह पाहून प्रल्हादच्या अंगात शिरशिरी आली, पण हे वरती..अरे केस नाहीत तर हिला..विकेशा ही..तरी इतकी सुंदर दिसते! का बरं डोकं झाकून ठेवते!
दुपारी तसंच डोक्याला फडकं बांधून साऊ प्रल्हादचं पान वाढत होती. लाल माठाची भाजी, ताकाची कढी,भात..प्रल्हादच्या तोंडून पहिल्या घासालाच व्वा बाहेर पडलं. साऊ आनंदली. हे असं कौतुक तिच्या स्वैंपाकाचं आजपातूर कोणी केलं नव्हतं.
“सविता..साऊ म्हणलं तर चालेल नं तुला.”
“हो गुरुजी.”
“साऊ एक ऐकशील. मी असताना डोक्यावर कपडा बांधू नकोस. तू जशी आहेस तशी छान दिसतेस.”
“आई..”
“अस्स..मग त्या असताना घाल वाटल्यास. त्या नसताना नको घालत जाऊस.”
साऊने मान डोलावली. साऊला समजून घेणारा हा पहिला पुरुष होता.
“तू अभंग सुरात गातेस. गात जा, तेवढंच कानांना अम्रुत प्यायल्याचं समाधान मिळतं.”
अशा भागिरथी घरात नसताना प्रल्हाद व साऊच्या गप्पा रंगू लागल्या.
मालतीने केलेल्या सेवाशुश्रुषेने धनंजयच्या पत्नीची तब्येत बऱ्यापैकी सुधारली होती. हातात काठी घेऊन का होईना सारंगची ही थोरली काकू, घरभर फिरत होती.
“घराच्या भिंतींना आकाशी रंग काढून घ्या.”
“समया,देवाची भांडी,पितळी हंडे,कळशा..सारं सारं चिंचेचं बुटुक लावून लख्ख लख्ख करा.”
“जुनंपुराणं काय सांदीकोनात पडलेलं..गरजेचं नसेल ते फेकून द्या.”
“आमंत्रणासाठी याद्या बनवा.”
“तांदूळ,किराणा,मानापमानाची तयारी”..हे न ते..वत्सलाकाकूच्या उत्साहाला बांधच नव्हता.
साखरपुड्यालाच शंभरेक माणसांनी हात ओले केले.
साऊ दिवस उजाडल्यापासनं सांजावेपर्यंत राबत असायची. जगनछगन तिला मदत करु गेले तर ते भागिरथीला रुचायचं नाही.
शेणामातीत राबून साऊच्या पायांना भेगा पडल्या होत्या. त्यांतून रक्त वहायचं. प्रल्हादला तिची दशा पाहून कळवळा यायचा.
एकदा ती पाणी शेंदत असताना प्रल्हाद त्या वाटेने येत होता. त्याने तिच्या हातातली कळशी घेऊन आपण पाणी शेंदू लागला..म्हणाला,”साऊ, किती यातना भोगतेयस तू. एवढं गुरासारखं राबूनही शिव्याशाप झेलतेस हसतमुखाने..”
यावर साऊ खिन्न हसली..एक संदर्भ देऊ लागली,.म्हणाली,
“संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होती. पहिला घास खाताच पती जनीला मारायला धावंला,”अवलक्षणे, भाजीत मीठ घातलं नाहीस ? ठार अळणी केलीस..कुठं लक्ष असतं तुझं? जनीला हुंदका फुटला, ती विठ्ठलासमोर उभी राहिली व आक्रंदू लागली, ‘‘विठ्ठला, तू येथे असतांनाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागतंय. का ?’’
विठ्ठलाने जनीच्या डोक्यावर हात ठेवला. जनीला तिच्या पूर्वजन्माचं स्मरण झालं ..पुर्वजन्मातली ती द्रुश्ये चलतचित्रासारखी तिच्या दिठीसमोरुन जाऊ लागली..
पुर्वजन्मी जनी एक राजकन्या होती. गायीसमोर तिने खाणं ठेवलं होतं. गाय काही ते खाण्यास तयार नव्हती. जनीने जवळची काठी उचलली..नि गाईच्या पाठीवर सपकारे ओढले.
दोनचार मारात गोमातेच्या पाठीवर वळ उठले..तिची काया थरथर कापत होती.. गायीने तो गोग्रास मुखी लावला नाही. तशीच पाणावलेल्या डोळ्यांनी ती उभी राहिली. राजकन्या कंटाळून निघून गेली.
विठ्ठलाने जनीच्या डोक्यावरून हात उचलला तशी जनी भानावर आली..वर्तमानकाळात आली.
जनीच्या लक्षात आलं..आपलं सर्व पूर्वसंचित या जन्मी फेडावंच लागेल त्याशिवाय मुक्ती नाही.
तर असंय हे गुरुजी. याजन्मी मी चांगली वागत आहे निश्चित पण पुर्वजन्मी मी काही वेडंविद्रं वागले असेन तर त्याची फळं मला भोगावीच लागतील. ते भोग नाकारुन कसं चालेल!”
प्रल्हाद, साऊचा सोशिकपणा पाहून थक्क झाला. किती सकारात्मकतेने घेत होती ती हे सारं! अशी जीवनसाथी मिळाली तर..साऊ माझी अर्धांगिनी झाली तर..या विचारांत साऊची मधुर स्वप्नं बघत तो झोपी गेला.
स्वप्नात तो एका तळ्याकाठी उतरला होता. तिथे फुलांनी सजवलेली नौका होती, ज्यात तो साऊला घेऊन बैसला निळंशार पाणी होतं तळ्याचं. तळ्यात चांदणफुलं उमलली होती. आकाशातला चांदवा पाण्यात उमटला होता. तरंगांसरशी ते प्रतिबिंब हलत होतं. आजुबाजूची सुरुची झाडं पाण्यात वाकून पहात होती. . त्यांवरले काजवे चमचम करत होते आणि साऊ भान हरपून ते द्रुश्य पहात होती. होडी हलली की प्रल्हादचा हात पकडत होती.
त्या दिवसानंतर प्रल्हाद साऊकडे त्याची होणारी भार्या या नजरेने बघू लागला होता. साऊलाही ती नजरेची भाषा कळत होती.
भागिरथी काकूने तिच्यासाठी निळं लुगडं आणलं नि ते पाण्यात टाकून ठेवलं. तिच्यानंतर अंघोळीला गेलेल्या जगनछगनने त्यातच आपले नवे सदरे टाकले.
साऊ स्वैंपाकघरात चूलखण्ड सारवत होती. नंतर ती माडांना पाणी वळवण्यात गुंतली. कपडे धुवायला जाईस्तोवर पांढरेशुभ्र सदरे निळ्या रंगाने माखले होते. साऊने साबण लावून चोळचोळ चोळले..अगदी गरम पाण्यात बुडवून ठेवले पण व्यर्थ.
भागिरथी काकू घरी आली. लुगडं नीट वाळत घातलय याची खात्री केली. मग तिचं लक्ष सदऱ्यांकडे गेलं. सदऱ्यांचा रंग पाहून तिचा तीळपापड झाला. चुलीतलं लालबुंद कोलीत काढून तिने साऊ काही बोलणार इतक्यात तिच्या दोन्ही गालांना डागलं.”माझ्या पोरांचे कपडे खराब केलेस दळभद्रे. आता जन्मभर मिरव हे डाग..” हातवारे करुन बोलू लागली. ‘आई गं’ साऊ विव्हळली. साऊला प्रचंड वेदना झाल्या. तितक्यात अर्धा दिवस शाळा असल्याने अंमळ लवकरच प्रल्हाद घरी आला.
समोरचं द्रुश्य पाहून प्रल्हाद तिथेच थिजला. प्रल्हादला बघताच भागिरथी काकू शोभवून घेऊ लागली. “काय लागलं गं गालाला, चुलीची आग आली वाटतं अंगावर. सतरांदा सांगते सांभाळून करावं काम.” असं काहीबाही सारवू लागली तसा प्रल्हाद कडाडला,”बंद करा ही तुमची नाटकं. रोज छळता साऊला. तक्रार करेन तुमची.”
हे ऐकून भागिरथी काकूही पिसाळली.”एवढंच वाटतं तर जा घेऊन तिला तुझ्या घरी. कर या बोडकीशी लग्न..आहे हिंमत?”असं म्हणून खिजवू लागली.
तसा प्रल्हाद म्हणाला,”हो, आहे मी तयार साऊशी लग्न करायला . फक्त साऊचा होकार हवा? साऊ माझ्या आईला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, ठार आंधळी आहे माझी आई. वडीलही अपंग आहेत. चालेल तुला असं सासर.”
साऊ उत्तरली,”का नाही चालणार! मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला.. पण मीही अशी चालेल तुम्हाला?”
“साऊ, अगं काय कमी आहे तुझ्यात? केसांचं म्हणशील तर मला तू जशी आहेस तशी पसंत आहेस.” आणि ती दोघं बाहेर पडली. थेट दादासाहेबांकडे गेली. दादासाहेबांना घडला प्रकार सांगितला. सुमनने साऊच्या गालांना दुधाची साय लावली.
दादासाहेबांनी प्रल्हादच्या निर्णयाबद्दल त्याचं अभिनंदन केलं. साऊला म्हणाले,”साऊ, आता आरोहीचं माहेर तेच तुझंही माहेर. तुझंही लग्न लावून देतो. तुझ्या लग्नात आम्ही दोघं नवराबायको तुझं कन्यादान करु.” साऊने दादासाहेबांचे पाय धरले..प्रल्हादला रहाण्यासाठी तात्पुरती खोली दादासाहेबांनी दिली..शिवाय याच गावात त्याच्यासाठी घर बांधायचं ठरवलं. साऊ आरोहीसोबत राहू लागली. दोघी मैत्रिणींची लग्नं, एकाच माटवात..किती तो आनंद!
प्रल्हाद गावी जाऊन आपल्या दिव्यांग आईवडिलांना घेऊन आला. प्रल्हादच्या अंध आईने साऊच्या गालावरनं हात फिरवला..क्षणभर साऊला आपली आईच आपल्याला चाचपडते आहे , मायेने कुरवाळते आहे असं वाटलं. ती सासूसासऱ्यांची देखभाल करु लागली. दादासाहेबांनी प्रल्हादसाऊसाठी घर बांधण्यास सुरुवात केली. गवंडी कामाला लागले,पाया रचला गेला, मोजक्या चार खणाचं पुढेमागे वाढवता येईल असं घर आकार घेऊ लागलं.
निषाद सुट्टी काढून लग्नाला आला. आपल्या पहिल्या पगारातून त्याने दादासाहेबांसाठी लाकडी आरामखुर्ची आणली होती. आज्जीसाठी पानाचा डबा घेऊन आला होता. आल्यापासनं त्याची धावपळ सुरु झाली.
दोन्ही घरांच्या दारांत माटव सजला. आंब्याच्या पानांची तोरणं बांधली. कर्णे डाव्याउजव्या बाजूला झाडांवर चढवले. चार दिवस आधीपासून त्यांवर गाणी सुरु झाली. घराने कात टाकली. अंगणात सारवणं झाली..त्यांवर बोटांची नक्षी उमटली. तुळशीला ऑइलपेंटने नवीकोरी केली. सगळं कसं झोकात.
आणि..आणि..दारात गाडी उभी राहिली. गाडीतून प्रभाकर, चांदणी व दिपक उतरले. धनंजयने लगबगीने जाऊन डिकीतलं सामान काढलं. प्रभाकर चांदणीला घेऊन आल्याने भरल्या लगीनघरात विचित्र तणाव निर्माण झाला.
चांदणी स्वतः होऊन मालतीशी,सारंगशी बोलू लागली. घरातली उस्तवार तिने आपणहून हाती घेतली. कुठे चहा ठेव,कुठे पोहे कर,पाहुण्यांना पानाचं तबक न्हेऊन दे, एक का दोन..
मालतीलाही घरकामातून उसंत मिळाली.
साखरपुड्यालाच दोनेकशे माणसांनी हात ओले केले.
मेंदीने नवरीचे,करवल्यांचे हात रंगले. थट्टामस्करीला ऊत आला.
आरोहीच्या घरी सगळ्या चुलत्या,मावशा जमल्या होत्या.
लग्नाच्या आदल्यादिवशी कासाराला बोलावून आरोहीला व साऊला चुडा भरण्यात आला. आरोहीला आज्जीच्या पिछोड्या चढवल्या. हिरवा चुडा भरला आज्जीने सुरात गीतं गायली..अगदी खणखणीत आवाजात. काही क्षणांसाठी का होईना..पुरा गाव हातातली कामं टाकून म्हातारीच्या गोड गळ्यातून येणारी सुमधूर गीतं ऐकत राहीला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकीने बांगड्या भरुन घेतल्या. कासारमामांना खाली वाकून नमस्कार केला.
जात्यावर लग्नाचे तांदूळ दळताना जाणत्या बाया ओव्या गाऊ लागल्या. नवख्यांनीही त्यांच्या मागून सूर लावला.
आरोही तुझ्या मावळ्यांनी आरोही तुझ्या मावळ्यांनी
मांडव सजविला मांडव सजविला
माडाच्या झावळ्यांनी माडाच्या झावळ्यांनी
चुलीच्या पाटणावर आंब्याचे गोळे
चुलीच्या पाटणावर आंब्याचे गोळे
त्या बाय यजमाननीचे पाठीपुढे डोळे
त्या बाय यजमाननीचे पाठीपुढे डोळे
नवरे रेगेला(दाढीला बसले) तेंव्हा भागिरथी काकू स्वतः येऊन गीत गाऊ लागली.
खळा सारवला चौकोनी खळा सारवला चौकोनी
कणे घातले रांगोळेचे कणे घातले रांगोळेचे
पाट ठेविला चंदनाचा पाट ठेविला चंदनाचा
त्यावर बैसला सारंग नवरा त्यावर बैसला प्रल्हाद नवरा
बाळ बसला रेगे बाळ बसला रेगे
न्हावी बसला डेगे न्हावी बसला डेगे
सोन्याची वाटी रुप्याचा वस्तरा
सोन्याची वाटी रुप्याचा वस्तरा
आई बाहेर येगे आई बाहेर येगे
पयली ओवाळणी करुन जागे
पयली ओवाळणी करुन जागे
सोन्याची वाटी रुप्याचा वस्तरा
सोन्याची वाटी रुप्याचा वस्तरा
काकी बाहेर येगे काकी बाहेर येगे
पयली ओवाळणी करुन जागे
पयली ओवाळणी करुन जागे
प्रल्हादच्या आईला मालतीने धरुन आणलं. प्रल्हादच्या आईने मालतीच्या मदतीने लेकाला ओवाळलं.
हळद लावताना अगदी लहान मुलींपासून सगळ्याजणींनी सूर धरला. मंगलमय वातावरण या अशा ध्वनीलहरींनी निर्माण झालं..अगदी दुमदुमलं.
आरोही व साऊ पाय गुडघ्यात घेऊन बसल्या..आंब्याच्या पानांनी कुटलेली हळदपाण्यात मिसळून लावणं सुरु झालं..
इसा तिसाची काठी
इसा तिसाची काठी
मधे काय हळदीची वाटी
मधे काय हळदीची वाटी
हळद लाविते कोण
हळद लाविते कोण
ही गं नवरीची आई
ही गं नवरीची आई
इसा तिसाची काठी
इसा तिसाची काठी
मधे काय हळदीची वाटी
मधे काय हळदीची वाटी
हळद लाविते कोण
हळद लाविते कोण
ही गं नवरीची मामी
ही गं नवरीची मामी
रात्री सीमांतपूजन झालं. सिमांतपुजनावेळी मालती व प्रभाकर जोड्याने बसले. मालतीला डोळ्यासमोर फक्त लेकाचं लग्न दिसत होतं.. त्यासाठी जणू ती या परपुरुषाच्या जोडीने बसली होती. त्या दोघांत बांधलेली उपरणं व शेल्याची गाठ निरर्थक होती. मालती आता कदापि प्रभाकरची होणार नव्हती.
मालतीला असं सुखी,समाधानी पाहून प्रभाकर खूष झाला असेल? का अजून काही..
क्रमशः
==================
प्रपंच भाग १ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/
प्रपंच भाग २ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/
प्रपंच भाग ३ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/
प्रपंच भाग ३ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/
प्रपंच भाग ४ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag4/
प्रपंच भाग ५ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-5/
प्रपंच भाग ६ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-6/
प्रपंच भाग ७ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-7/
प्रपंच भाग ८ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part-8/
प्रपंच भाग 9 :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-9/
प्रपंच भाग ११ :
https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-11/
====================