Skip to content Skip to sidebar Skip to footer

पोळा सणाची माहिती व महत्त्व

pola festival in maharashtra: श्रावण महिन्यात स्रुष्टीने हिरवा साज परिधान केलेला असतो. याच महिन्यात नागपंचमी येते. मंगळागौर जागवली जाते. फुगड्या,झिम्मा नुसती धम्माल असते, रक्षाबंधनाला भावाबहिणीची भेट होते. गोकुळाष्टमीला श्रीकृष्णजन्म साजरा करतात, दहीहंडी खेळतात असा हा सणांनी भरगच्च भरलेला श्रावण सरत येतो तेंव्हा श्रावण वद्य अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा करतात. या दिवशी, बैलांचा थाट असतो.

या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळा हा सण म्हणजे बैलांविषयी क्रुतज्ञता दर्शविण्याचा, त्यांचे आभार मानण्याचा दिवस.

आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. पुर्वापार नांगरणीसाठी बैलजोडी वापरली जाते. ही मुकी जनावरं आपल्या धन्याला फार जीव लावतात. पावसाळ्यात शेतीच्या कामाने हे बैल श्रमलेले असतात. त्यांच्या कष्टाचं प्रतिक असलेलं हिरवं सोनं शेतात वाऱ्यासोबत डोलत असतं. दाण्यादाण्यात दूध तयार होत असतं. मग शेतकरी आपल्या सर्जाराजाचं बैलपोळ्यादिवशी कौतुक करतो.

देवकीचा पुत्र श्रीकृष्ण जेंव्हा मथुरेत वाढत आहे हे जेंव्हा कंसाला कळले तेंव्हा कंस भयभीत झाला कारण हा आठवा पुत्र कंसाला ठार करणार अशी आकाशवाणी झाली होती. कंसाला सुगावा लागला की बाळकृष्ण मथुरेत आहे. त्याने कान्ह्याला मारण्यासाठी अनेक राक्षसांना पाठवले. त्यातलाच ऐक पौलासूर. श्रावण वद्य अमावस्येला इतर राक्षसांप्रमाणेच बाळकृष्णाने या पौलासूर राक्षसास यमसदनी पाठवले. तेंव्हापासून दरवर्षी श्रावण वद्य अमावस्येला पोळा साजरा करतात.

पोळा हा सण भारतभर विविध नावांनी साजरा केला जातो. विदर्भात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दक्षिण महाराष्ट्रात हा सण बेंदूर या नावाने साजरा केला जातो. कर्नाटकात हा कार्हुनावी नावाने साजरा करतात.

नावं वेगवेगळी असली तर उद्देश एकच, पाळीव प्राण्याबाबत क्रुतज्ञता व्यक्त करणे हा असतो. बेंदूर व पोळा साजरा करण्याची पद्धत जवळपास एक असली तरी बेंदूर आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो तर बैलपोळा हा श्रावण वद्य अमावस्येला साजरा करतात जिला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात.

धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांना यादिवशी विश्रांती दिली जाते. त्यांना जोताला जुंपले जात नाही. त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही.

पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची खानेमळणी करतात. दुधात हळद व तूप घालून पळसाच्या पानांनी ते बैलांच्या खांद्यांना लावून बैलांचे खांदे शेकतात. हे खांदे मळताना बैलाचा धनी उद्या आमच्याकडे पोळ्याचं जेवायला या असं आवतन देतो.

दुसऱ्या दिवशी शेतकरी आपल्या बैलजोडीला नदी, ओहळावर न्हेऊन त्यांचे अंग धुतात. बैलांची शिंगे रंगवतात, नैसर्गिक रंगांनी त्यांच्या अंगावर नक्षीही काढतात, पाठीवर झुल चढवतात, डोईला बाशिंग बांधतात. शिंगांना लाल, पिवळे रंग देतात, शिंगावर बेगड लावतात, बैलांच्या गळ्यात करदोड्याच्या, घुंगराच्या माळा घालतात. पायात चांदीचे तोडे घालतात, नाकात नवीन वेसण घालतात. नवीन कासरा बांधतात. बैलांच्या अंगभर गेरुचे ठिपके काढतात.  प्रत्येकजण यथाशक्ती आपपापल्या बैलांना सजवतो.

याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते.

शहरांतून शेती करत नसले तरी बाजारातनं मातीच्या बैलजोड्या आणून त्यांची पूजा करतात, त्यांना नैवेद्य अर्पण करतात.

पोळ्यादिवशी दुपारी गोडाधोडाचं जेवण असतं. पुऱ्या, भाजी, वरणभात,पुरणपोळी, पापडकुरडया..असं भरगच्च जेवण घरमालक, घरातील मंडळी व सालदार जेवतात. सालदार म्हणजे वर्षभर बैलाची राखण करणारा, त्यांना चारापाणी घालणारा, चरायला घेऊन जाणारा गडीमाणूस. या सालदाराला घरमालक आपल्या पंगतीत जेवायला बसवतो. घरमालकीण त्याला व त्यांच्या मुलांना यथेच्छ जेऊ घालते, धान्याने सालदाराच्या बायकोची ओटी भरते. तिला लुगडंचोळी, सालदाराला व मुलांना नवी कापडं तसेच बक्षिसी दिली जाते.

पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी सजवलेल्या बैलजोड्यांना गावातील मोठ्या पटांगणावर न्हेतात व रांगेत उभ्या करतात. गावचा प्रमुख प्रत्येक जोडीचं नाव घेतो मग ती जोडी सालदारासोबत पुढे जाते. गावप्रमुख प्रत्येक बैलजोडीचा सन्मान करतो व प्रत्येक सालदारास बक्षिसी देतो. नंतर  गावप्रमुख तोरण तोडतो. बैलजोड्या सोडल्या जातात. याला पोळा फुटणे म्हणतात. बैलजोड्या मैदानात उधळतात, सालदार त्यांच्यामागे धावतात. ही अपुर्वाई पहायला लहानथोर सगळे जमा झालेले असतात. ढोल, ताशांनी वातावरण दुमदुमतं.

बैलांची  मिरवणुक काढतात.सनईचे सूर वाजतात. बैलपोळ्याची गीतं गायली जातात. मग सालदार  बैलजोडी घेऊन गावातील प्रत्येक घरी जातो. तिथली धनीण बैलांच्या पायावर पाणी घालते, त्यांची पूजा करते.  त्यांना खाटीवर ठेवलेले धान्य देते व पुरणपोळी खाऊ घालते.

सरतेशेवटी सालदार आपापली बैलजोडी घेऊन धन्याच्या घरी जातो. घरमालक व घरमालकीण बैलांची पूजा करतात. घरमालकीण बैलांच्या पायावर पाणी घालून त्यांना ओवाळते. पुरणपोळी खाऊ घालते. त्यांच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवते. बैलांना धन्य वाटतं.

विदर्भकन्या, कवयित्री बहिणाबाईंनी त्यांच्या कवितांमधे नेहमीच आजुबाजुचे जग रेखाटले आहे. बैलपोळ्यावरील त्यांची कविता ही पोळा सणाचे वर्णन सांगते. या कवितेतून बहिणाबाई सांगताहेत, पोळ्याचा सण आला. तुमच्यासाठी राबराब राबणाऱ्या बैलांना विश्रांती द्या, त्याला नटवा,सजवा. चुली पेटवा, पुरणपोळीचा नैवेद्य करून बैलांना खाऊ घाला . त्यांचे आभार माना.

आला आला शेतकर्‍या पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्य आतां शेंदूराले घोटा

आतां बांधा रे तोरन सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या लावा शिंगाले शेंदुर

लावा शेंदूर शिंगाले शेंव्या घुंगराच्या लावा
गयामधीं बांधा जीला घंट्या घुंगरू मिरवा

बांधा कवड्याचा गेठा आंगावर्‍हे झूल छान
माथां रेसमाचे गोंडे चारी पायांत पैंजन

उठा उठा बह्यनाई, चुल्हे पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद पुरनाच्या पोया ठेवा

वढे नागर वखर नहीं कष्टाले गनती
पीक शेतकर्‍या हातीं याच्या जीवावर शेतीं

उभे कामाचे ढिगारे बैल कामदार बंदा
याले कहीनाथे झूल दानचार्‍याचाज मिंधा

चुल्हा पेटवा पेटवा उठा उठा आयाबाया
आज बैलाले खुराक रांधा पुरनाच्या पोया

खाऊं द्या रे पोटभरी होऊं द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी आज करूं या बागूल

आतां ऐक मनांतलं माझं येळीचं सांगन
आज पोयाच्या सनाले माझं येवढं मांगन

कसे बैल कुदाळता आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधतां बाशिंगाचं डोईजड

नका हेंडालूं बैलाले माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस आन बैलाले तरास

आज पुंज रे बैलाले फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सन शेतकर्‍या तुझं रीन !

©️®️ गीता गरुड.

===========

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: