पितृपक्ष कहाणी: पितृपक्षात हे केलं कि पुढची ७ पिढी पित्र ऋण मुक्त होईल.

pitru paksha katha: जोगे आणि भोगे दोघे भाऊ होते. दोघेही वेगवेगळे रहात असत. दोन्ही भावात खूप प्रेम होते. जोगे खूप श्रीमंत होता तर भोगे खूप गरीब. जोगेच्या बायकोला तिच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता तर भोगेची बायको साधी सरळ मनाची होती.
पितृपक्ष आल्यावर जोगेच्या बायकोने श्राद्ध करण्यासाठी सांगितले तर जोगेने हे काय फुकटचे काम आहे असे समजून त्याची चेष्टा केली. पण त्याच्या बायकोला माहीत होते की श्राद्ध केले नाही तर समाजातील इतर लोक नावं ठेवतील. तेंव्हाच तिला आपल्या माहेरच्या लोकांना बोलावण्याचा आणि आपली श्रीमंती दाखवण्याची ही उत्तम संधी आहे असे वाटले आणि ती जोगेला म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास होईल म्हणून नको म्हणत आहात पण मला काहीच त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेते आम्ही दोघी मिळून सगळी कामे करू. मग तिने जोगेला माहेरच्या लोकांना आमंत्रण देण्यासाठी पाठवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर भोगेची बायको आली आणि कामाला लागली.तिने सगळा स्वयंपाक केला अनेक पदार्थ बनवले. सगळी कामे आटपून ती आपल्या घरी निघाली कारण तिलाही तिच्या घरी पितृश्राद्ध घालायचे होते. पण त्याच वेळी जोगेच्या बायकोने तिला थांबवून घेतले आणि म्हणून ती थांबली.
————————-
दुपार झाली पितर पृथ्वीवर आले. जोगे भोगेचे पितर आधी जोगेच्या घरी आले बघतात तर काय त्याच्या सासरची मंडळी तिथे जेवत आहेत. निराश होऊन ते भोगेकडे गेले.
तर तिथे पितरांच्या नावावर अग्नी पेटवला होता आणि त्याचीच राख पितरांनी खाल्ली आणि तसेच उपाशी पोटी नदीच्या काठावर गेले.
थोड्याच वेळात सगळ्यांचे पितर तेथे जमले आणि आपल्या आपल्या श्राद्धचे कौतुक सांगू लागले. जोगे भोगेच्या पितरांनी पण त्यांची कहाणी सांगितली. परत त्यांनी विचार केला की भोगे जर श्रीमंत किंवा आपले श्राद्ध करण्यास समर्थ असता तर आपल्याला असे उपाशी रहावे लागले नसते. पण भोगेच्या घरी तर खाण्यासाठी पोळी पण नव्हती. त्यामुळे त्यांना भोगेची दया आली आणि ते नाचत म्हणू लागले, भोगेच्या घरी पैसा येऊदे, पैसा येऊदे.
हेही वाचा
गिरनारची पौराणिक कथा : जाणून घ्या गिरनार परिक्रमा का पुण्यदायी आहे?
संध्याकाळ होत आली तरीही भोगेच्या मुलांना काहीच खायला मिळाले नव्हते. ते आईला म्हणू लागले की भूक लागली आहे तेंव्हा त्यांना टाळण्यासाठी म्हणायचे म्हणून भोगेची बायको म्हणाली की, जा अंगणात हौदी ठेवली आहे ती उघडा आणि जे मिळेल ते वाटून खा. मुले तिथे गेली आणि बघतात तर काय हौदी मोहरांनी भरलेली आहे. ते पळत आईकडे आले आणि सगळे सांगितले. भोगेच्या बायकोने सांगितले तर ती हैराण झाली.
अशा प्रकारे भोगे श्रीमंत झाला पण त्याने पैशांचा घमंड केला नाही. दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आले त्याच्या बायकोने छपन्न पक्वान्न करून ब्रह्मनांस बोलावले जेवू घातले, श्राद्ध केले आणि दक्षिणा दिली. दिर जावेस सोन्या चांदीच्या ताटात जेवू घातले त्यामुळे पितर आनंदी आणि समाधानी झाले.
तर अशा प्रकारे आपल्या पालकांची आठवण ठेवत योग्य वेळी श्राद्ध केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्य सफल होते.
===================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.