Skip to content Skip to sidebar Skip to footer

पिठोरी अमावस्या पूजा विधी व कथा

pithori amavasya katha in marathi: भारतीयांची नाळ निसर्गाशी जोडलेली आहे. सणव्रतवैकल्यांना आपल्या संस्कृतीत मानाचे स्थान आहे. माणसाला जगण्याला जसा प्राणवायू आवश्यक असतो तसेच जगण्यात चैतन्य आणण्याचं कार्य हे सणसमारंभ करत असतात. अर्थात हल्ली सणांना आलेलं राजकीय स्वरूप हे सणांची मजा घालवतं, हेही सत्य मान्य करावंच लागेल.

आजकाल फादर्स डे, ब्रदर्स डे, मदर्स डे असे विविध डे साजरे केले जातात, बाहेरच्या देशातील प्रथांचं अंधानुकरण केलं जातं परंतु हे डेज साजरे करण्याचा हेतू काय तर आपल्यासोबतच्या माणसांचे आभार मानणं मग हे डेज तर आपल्या पुर्वजांनी सणांच्या माध्यमातून पुर्वापार रुढ केले आहेत. उदा. रक्षाबंधन, भाऊबीज हे बहिणभावांच्या नात्यांचे बंध व्रुद्धिंगत करण्यासाठीचे सण आहेत तसेच पिठोरी अमावस्या दिवशी मातृदिन साजरा करतात.
आपल्या प्रत्येकाचा आद्यगुरू ही आपली माता असते. लेकराला जरा लागलं, खरचटलं तर जिच्या काळजात कळ उठते, लेकराला शिस्त लागण्यासाठी जी प्रसंगी कठोर वागते, लेकरांवर संस्कार घडवते त्या आपल्या मातेला या दिवशी नमन करून तिचा आशीर्वाद घ्यायचा असतो.
मातेचे ऋण फेडणे तर एका जन्मात शक्य नाही पण तिच्या ऋणांची आपणास जाणीव असणे, त्यांचे स्मरण करणे हेही नसे थोडके. यादिवशी विविध क्षेत्रांत कर्तबगारी बजावलेल्या महिलांचा गुणगौरव केला जातो.

श्रावण महिन्यातील वद्य अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात.

या व्रतात पिठापासून बनवलेल्या चौसष्ट योगिन्यांच्या मुर्तींची पूजा करतात पिठाच्या पदार्थांचा नैवेद्य करतात म्हणून पिठोरी हे नाव पडले अशी मान्यता आहे तर दुसरीकडे असंही म्हणतात की पिठोरी अमावस्येला रात्र काळीशार असते. अंधारलेल्या आभाळात कुणीतरी पीठाची मुठ फेकावी असे चांदणे विखुरलेले दिसते म्हणून पिठोरी अमावस्या म्हणतात.

पिठोरी व्रत घरातील विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरता, वंशव्रुद्धी करता तसेच मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांना सुखसम्रुद्धी प्राप्त व्हावी, त्यांची भरभराट व्हावी याकरता करते.

अशी मान्यता आहे की देवीपार्वतीने सर्वप्रथम देवराजा इंद्राची पत्नी शची हिस पिठोरी अमावस्येच्या व्रताबद्दल सांगितले. माता पार्वतीने कथिले की पिठोरी अमावस्येचे व्रत आचरल्यास वंशव्रुद्धी होते, मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभते.

घरातील विवाहित स्त्रिया पिठोरी अमावस्येचे व्रत करतात.

पोळा सणाची माहिती व महत्त्व

दुर्गामातेचा फोटो, शिवलिंग, ६४ सुपाऱ्या, हळदकुंकू, अक्षता, धूप, कापूर, दोन दिवे, तुळशीपत्र,गहू/तांदूळ, पंचामृत,दुर्गामातेसाठी श्रुंगार साहित्य( सिंदूर, बांगड्या,..)

७.१ दुर्गामातेसह चौसष्ट योगिनी या पुजेच्या देवता मानल्या जातात.

७.२ श्रावण अमावास्येच्या दिवशी व्रतकर्ती स्त्री दिवसभर उपवास करते.

७.३ सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापित केले जातात.

७.४ त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, महालक्ष्मी ,चामुंडा या अष्ट शक्तींची पूजा केली जाते.

७.५ तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात.

७.६ तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो.

७.७ नैवेद्याला वालाच बिरडं, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुऱ्या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात.

७.८ देवीजवळ अखंड सौभाग्य प्रदान कर, वंशव्रुद्धी कर तसेच मुलाबाळांना दीर्घायुष्य दे त्यांची भरभराट कर अशी प्रार्थना करतात.

७.९ नैवेद्यासाठी माता जे पक्वान्न तयार करते ते ती डोईवर घेते व विचारते अतिथी कोण? मग मुल ‘मी आहे’ म्हणल्यावर मातेने त्याला ते पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन द्यावे.

हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य लाभते व मुलाबाळांना दीर्घायुष्य ,सुखसमृद्धी लाभते.

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याच्या घरीं श्रावणांतल्या अवसेच्या दिवशीं बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई? ज्या दिवशी श्राद्ध, त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखूं लागे, व ब्राह्मण जेवायला बसण्याचें वेळेवर बाळंत होऊन पोर मरून जाई.

असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं सहा वर्षं झालं. सातव्या वर्षीही असंच झालं, तेव्हा सासरा रागावला. मेलेलं पोर तिच्या ओटींत घातलं, तिला रानांत हाकून लावलं. पुढं जातां जातां ती एका मोठ्या अरण्यांत गेली.

तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, “बाई, बाई, तूं कोणाची कोण? इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा; नाहींतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील.”तेव्हां ब्राह्मणाची सून म्हणाली, “तेवढ्याकरितां मी इथं आलें आहे.” तशी झोटिंगाची बायको म्हणाली “बाई बाई, तूं इतकी जिवावर उदार कां ?” “मी एका ब्राह्माणाची सून, दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशीं बाळंत होई व मूल मरून जाई.

त्याच दिवशीं आमच्या घरीं माझ्या आजेसासर्‍याचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्नाण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणें माझी झाली, सातव्या खेपेलाही असंच झालं. तेव्हां मामंजींना राग आला. ते मला म्हणाले, “माझा बाप तुझ्या बाळतपणामुळं सात वर्षं उपाशी राहीला. तर तूं घरांतून चालती हो.” असं म्हणून हें मेलेलं मूल माझ्या ओटींत घातलं, आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आलें. आतां मला जगून तरी काय करायचं आहे?” असं म्हणून ती रडूं लागली

तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, “बाई, बाई, तूं भिऊं नको, घाबरूं नको. अशीच थोडीशी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दॄष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून रहा.

रात्रीं नागकन्या, देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि ‘अतिथी कोण आहे’ म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण, त्या तुला पाहतील. कोण कुठची म्हणून चौकशी करतील, तेव्हां तूं सगळी हकीगत त्यांना सांग.”

ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली, तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहूं लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली.

इतक्यांत रात्र झाली, तशा नागकन्या, देवकन्या, आसरांच्या स्वार्‍यासुद्धां आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि ‘अतिथी कोण आहे’ म्हणूनं विचारलं. त्याबरोबर ती खालीं उतरली. ‘मी आहे’ म्हणून म्हणाली. तेव्हां सगळ्यांनीं मागं पाहिलं, त्यांचा आश्चर्य वाटलं, तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली.

नागकन्या देवकन्यांनीं तिच्या मुलांची चौकशी केली, तेव्हां आसरांनीं तीं दाखवलीं. पुढं त्यांनी तिच्या सातही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हें व्रत सांगितलं.

चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकीं हें व्रत प्रगट करायला सांगितलं; तसं तिनं विचारलं, “ह्यानं काय होतं?” असरांनी सांगितलं. “ हें व्रत केलं म्हणजे मुलंबाळ दगावत नाहींत, सुखासमाधानांत राहतात.” पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गांवांत आली.

लोकांनी तिला पाहिलें. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, “भटजी, भटजी, तुमची सून घरीं येत आहे.” त्याला तें खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहूं लागला तों मुलंबाळं दृष्टीस पडूं लागलीं. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरांत गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले.

हातपाय धुवून घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली, तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलांबाळांसुद्धा सुखाने ती नांदू लागली. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

©️®️ गीता गरुड.

===========

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: