Skip to content Skip to sidebar Skip to footer

पाऊस

ॲड. अश्विनी सचिन जगताप.

बाहेरचा पाऊस आणि सुमनच्या डोळ्यातील पाणी काही थांबायचं नाव घेत नव्हतं.संततदार पाऊस आणि सुमनच्या डोळ्या तरतल्या अश्रूंच्या धारा एक सारख्या वाहत होत्या. खिडकीतून बाहेर पाहत असतानाच सुमनला पाऊस भूतकाळात घेऊन गेला. बरोबर याच दिवशीही असाच पाऊस चालू होता.आप्पांची लाडकी सुमन, तीन भावंडांच्या पाठीवर झालेली घरातली एकुलती एक मुलगी.आत्यालाही दोन्ही मुलंच, त्यामुळे सुमन सगळ्यांचीच लाडकी होती. नावाप्रमाणेच सुंदर मनाची असलेली सुमन दिसायलाही तितकीच सुंदर होती. ही नक्षत्रासारखी पोर एखाद्या श्रीमंताच्या घरात जायला हवी असे आप्पांना नेहमी वाटायचे.सुमन जशी जशी मोठी होत गेली तशी तशी आप्पांची काळजी वाढायला लागली.आप्पांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली.तालुक्याच्या ठिकाणचं पाटलांच्या घरचं स्थळ सुमनला चालून आलं. तालुक्यासारख्या गावात टोलेजंग बंगला, दारात चार चाकी, घरात नोकर-चाकर आणि सुशिक्षित,देखणा जावई आप्पांना आणखी काय हवं होतं.घरी साक्षात लक्ष्मी पाणी भरत होती. सुमनला पाटलांच्याच घरी द्यायचं असं ठरलं.
शेखर आणि सुमनचं लग्न थाटामाटात पार पडलं. सुमन पाटलांच्या घरची सून झाली.पाहुणेरावळे,घरात पूजेची चाललेली गडबड या सगळ्यात सुमनला शेखरशी बोलायला वेळच मिळाला नाही. शेखरने तिच्याकडे चोरून टाकलेला एखादा कटाक्ष ही तिला पुरेसा होता. ती लाजत होती,मोहरत होती. तिला स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटत होता. एवढं सुंदर सासर, देखणा- राजबिंडा नवरा सगळं कसं दृष्ट लागावं असं. जाता येता शेखरचा नकळत झालेला स्पर्श तिला सुखावत होता. आज सोळावा होता. हळदीचे पिवळे अंग त्यावर सुमनने नेसलेला लाल शालू. नखशीकांत नटलेली सुमन शेखरला वेडावून सोडत होती.सकाळीच पूजा आवरली. आई-आप्पा, आत्या, सुमनचे भाऊ-भाऊजया सगळे पूजेला आले होते. सुमनला आनंदात पाहून त्यांना खूप बरं वाटलं.घरी आलेल्या पाहुण्यांना,मित्रांना सोडवण्यासाठी शेखर आत बाहेर करत होता. पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर पाऊस चालूच होता त्यातच जोराचा वारा सुटला होता. शेखर त्याच्या मित्रांना सोडवायला रस्त्यापर्यंत गेला. त्यांची गाडी जातात शेखर माघारी वळला पण तितक्यात घरापासून शंभर दोनशे मीटर अंतरावर असलेलं एक मोठं झाड पडलं. ते झाड पडताना विजेची एक तार तुटली तशी शेखरच्या अंगावर पडली.विजेच्या झटक्याने शेखर काळानिळा होऊन खाली कोसळला.घरातले सगळे बाहेर आले तर रस्त्यावर पडलेला शेखर दिसला. कोणीतरी त्याला उचलून घरात आणलं पण तोपर्यंत शेखरचा जीव गेला होता. घरातलं वातावरण क्षणात बदललं. सुमनच्या घरावर शोककळा पसरली.सुमनची सासु सुमनला दोष देत होती. पांढऱ्या पायाची अपशकुनी आल्याबरोबर माझ्या मुलाला गिळून बसलीस.सुमन मात्र जागच्या जागी गोठल्यासारखी उभी होती. ती शेखरच्या काळ्या निळ्या देहाकडे एकटक पाहत होती. सुमनच्या हातावरची मेहंदीही अजून गेली नव्हती, हातातला हिरवागार चुडा अजून उतरला नव्हता तोच तिच्यावर तो फोडण्याची वेळ आली होती.तिला सारखं वाटतं होतं की,कुणीतरी येऊन तिला सांगावं की हे सगळं खोटं आहे. हे एक वाईट स्वप्न आहे,पण नाही ती जे काही पाहत होती तेच सत्य होतं आणि ते स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तिचं रडणं सगळ्यांचं काळीज पिळवटून टाकत होतं.आप्पांना वाटत होतं हे सगळं पाहण्या आधीच माझे डोळे का मिटले नाहीत? लेकीचं पांढरं कपाळ पाहण्याची वेळ माझ्यावर यावी यासारखं दुर्दैव नाही.
शेखरचे सगळे क्रियाकर्म आटोपले.सगळं होत्याचं नव्हतं झालं.सुमनच्या सासऱ्यांनी सुमनला इथेच राहू द्या, मी तिचा मुलीप्रमाणे सांभाळ करीन,अशा वारंवार विणवण्या करूनही आई आणि आप्पा तिला त्यांच्या सोबत घेऊन गेले. सुमन घरात होती पण फक्त शरीराने.तिचं मन मात्र शेखर बरोबर घालवलेल्या काही क्षणांसोबत तिच्या सासरीच होतं.परत परत तिच्यासमोर शेखरचा हसरा चेहरा यायचा, असं वाटायचं आता शेखर येईल आणि तिला आवाज देईल, पण ते कधीच शक्य नव्हतं.सुमनच्या देखण्या गोऱ्यापान चेहऱ्यावरून नजर हटत नसायची पण आजकाल तिच्याकडे पाहण्याचं कोणाचं धाडस होत नव्हतं.तिच्या चेहऱ्यावरचं तेज जणू शेखर जाताना घेऊन गेला होता.
आज बरोबर वर्ष झालं त्यावेळीही असाच पाऊस पडत होता आणि आजही.आताशा तिला पाऊस नकोसा वाटायचा.ती खिडकीत बसून टिपं गाळत होती, तेवढ्यात तिला सुमी अशी हाक ऐकू आली. हो आनंद होता तो, तिच्या आत्याचा मुलगा वर्षभरापूर्वी मामाने सुमनला त्याला द्यायला नाकार दिला,त्या गोष्टीचा राग मनात धरून तो मुंबईला निघून गेला होता.जो गेला तो आजच आला.मधल्या काळात त्याला काय घडलं याबद्दल काहीच कल्पना नव्हती.फक्त सुमीचे लग्न झाले एवढेच त्याला माहीत होते. किती दिवस त्या गोष्टीचा राग धरून बसणार म्हणून तो गावी आला होता.येताना त्याने सुमीला आवडणाऱ्या लाल रंगाची, सोनेरी किनारीची एक सुंदर साडी आणली होती. तो म्हणाला, झालं गेलं विसरून जाऊ सुमीची पहिली नागपंचमी आहे तिला ही साडी देऊ, म्हणून तो सुमीला ती साडी द्यायला घरी आला.त्याचा आवाज ऐकून सुमी धावतच सुटली. तोच उंबऱ्यात ठेच लागून ती खाली पडली ती थेट आनंदच्या पायावर.आनंद चेष्टेने तिला म्हणाला “अखंड सौभाग्यवती भव:” तसं तिने वरती पाहिलं आणि आनंदला दोन मिनिटं सगळं घर त्याच्या भोवती फिरतंय असं वाटलं. सुमीला असं पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.आनंदला पाहताच सुमनच्या अश्रूंचा बांध फुटला. ती मोठ्याने रडू लागली. लहानपणापासून आनंद सुमनच्या सगळ्या सुखदुःखात तिच्यासोबत असायचा. ती मनातलं सगळं काही आनंदला सांगायची. आजही तिला आनंदला सगळं सांगावं वाटत होतं. आनंदने तिला उठवले आणि तिला विचारले,”सुमे, खरं सांग नक्की काय झालं ?हे कधी आणि कसं घडलं?” सुमनने रडत रडतच त्याला सगळं काही सांगितलं.आनंदने सुमीला शांत केले, आणि काहीतरी निश्चयाने तो सुमीला घेऊन बाहेर आला. बाहेर ओसरीवरच आप्पा पेपर वाचत बसले होते.आनंदला आणि सुमनला एकत्र पाहून अण्णा जागीच उभे राहिले.अण्णांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. त्याचवेळी जर सुमनचे लग्न आनंदशी लावून दिले असते तर ही वेळच आली नसती, अण्णा स्वतःला शोष देत होते. तेवढ्यात आनंद म्हणाला,”मामा जे झालं ते झालं यात कोणाचा दोष नव्हता, नियतीलाच सुमीचं ते लग्न मान्य नव्हतं आणि म्हणूनच शेखर तिला सोडून गेला.त्याचं दुःख अजून किती दिवस घेऊन बसायचं. सुमी पुढे संपूर्ण आयुष्य पडले आहे आणि ते तिला सुखाने जगण्याचा पुरेपूर अधिकार आहे.मी सुमीला असं दुःखी- कष्टी पाहू शकत नाही, मी ठरवले मी सुमीशी लग्न करणार आणि आता मला कोणीही अडवू शकत नाही”.एका दमात आनंदने सगळं काही बोलून टाकलं.
आप्पांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.आप्पांनी आनंदला आणि सुमनला जवळ घेतलं. पण तेवढ्यात सुमन म्हणाली “आप्पा हे लग्न मला मान्य नाह. मला पुन्हा एकदा विषयाची परीक्षा घ्यायची नाही. आता आनंदच्या जीवाशी खेळ नको”.यावर आनंद म्हणाला” तुझ्याशी लग्न करून मी मरणार आहे की नाही, हे मला माहित नाही पण जर तू आता लग्नाला तयार झाली नाहीस तर मात्र मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन”, तसा सुमीने आनंदच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याला थांबवलं.सुमीने भरल्या डोळ्यांनीच आनंदला होकार दिला.आप्पांनी आत्याला लगेचच बोलवून घेतलं. शेखरने आत्या येताच तिला स्पष्ट सांगितलं,जे काही घडलं त्यात सुमीची चूक होती ना तुमची कोणाची, पण त्याची शिक्षा सगळ्यांनाच भोगावी लागतीयं. सुमीला या दुष्ट चक्रातून मी बाहेर काढणार,मी तिच्याशी लग्न करणार आहे. आत्याने या गोष्टीला विरोध करण्याचा तर काही प्रश्नच नव्हता,कारण जन्माला आल्यापासून तिने सुमीकडे सुनेच्या नजरेनेच पाहिलं होतं. आत्या या गोष्टीला हसत हसत तयार झाली. आजही पाऊस बरसत होता.आनंदने सुमनशी लग्न गाठ बांधली. पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात सुखाचा पाऊस पडत होता.ती पुन्हा पावसाच्या प्रेमात पडली. आणि आनंद सोबत ती त्या सुखाच्या सरींनी ओलिचिंब झाली.
आनंदने सुमनच्या आयुष्यात आनंद पेरला, अन्
सुमीने जुन्या आयुष्याची कात टाकली आणि तिचं रूप पुन्हा तेजाळलं. एका नवीन पर्वाला सुरुवात झाली.आजचा पाऊस तिला हवाहवासा वाटत होता.

-सुरेखकन्या.
ॲड. अश्विनी सचिन जगताप.

=====================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: