Skip to content Skip to sidebar Skip to footer

मुलांना वाढविताना त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी

parenting tips in marathi : मुल जेंव्हा आईच्या उदरात वाढू लागतं तेंव्हापासनं आईला आईपणाची जाणीव होऊ लागते आणि बाबाला बाबापणाची. आईबाबा हे दोघेही फार महत्त्वाचे असतात, त्यांच्या मुलांसाठी.
आपलं मुल निरोगी, सुदृढ, सुविचारी असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. अगदी मुल मोठं झालं तरी पालकाचं पालकत्व काही विरत नाही आणि विरू नयेही. हेच पालकत्व सुजाण कसं करता येईल तेच बघणार आहोत आजच्या लेखात. काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या तुम्हाला पालक म्हणून घडताना निश्चितच उपयोगी पडतील.

१. मुलांमधे चांगल्या सवयी बाणवायच्या असतील तर प्रथम त्या पालकांनी आत्मसात करायला हव्या. आता प्रश्न येतो तो कधीपासून? तर जेंव्हापासून आपल्याला वाटतं, उमजतं की आपलंही बाळ असणार, असावं तेंव्हापासनं मुलांनी आपलं शरीर सुदृढ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. योग्य आहारविहार, सतविचारांचं आचरण अंगिकारलं पाहिजे. शुद्ध बिजापोटी असती फळे रसाळ गोमटी या उक्तीत तेच तर सुचविले आहे.

२. मुल होण्याआधीपासनं नवराबायको दोघांनीही त्याच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन सुरू केले पाहिजे त्याकरता बायकोही नोकरी अगर व्यवसाय करत असेल तर नवऱ्याने तिला योग्य ते प्रोत्साहन दिले पाहिजे.

३. मुल झालं की मातेत बरेच हार्मोनल बदल घडत असतात, यावेळी जोडीदाराने तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत तशाच त्या घरातील इतर सदस्यांनीही समजून घेतल्या पाहिजेत. आई झालं की बरेच बदल घडतात शरीरात. केस गळणं, शरीराचा आकार बदलणं..यामुळे बऱ्याच माता निराश होतात, यावेळी जोडीदाराने तिला विश्वासात घेतलं पाहिजे व तिला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी गरज पडल्यास मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेतली पाहिजे.

—————–

४. आमच्या वेळी नव्हतंच असं..तुझ्याच बायकोला काय सोनं लागलय..आम्हालाही झालीत पोरं..ही असली बोलणी वयस्करांनी बोलू नयेत. नवीन आईबाबांना घडताना होता होईल तो मदत करावी आणि ती ते करत नसतील तरीही निराश न होता आईवडिलांनी आपलं आईपणबाबापण साजरं करावं.

५. छोट्या छोट्या गोष्टींवरनं घरात वाद घालणं टाळावं. मुल मोठं होत असताना घराकडे ते एक शाश्वत आधार म्हणून पहात असतं. घर म्हणजे नुसतं चार भिंती नव्हे तर घरातील सदस्यही येतात यात. वादविवाद मुलांसमोर करू नयेत. एकमेकांना अजिबात हिणवू नये. थँक्यू, सॉरी या शब्दांचा सढळ वापर करावा. आपली कामं आपण करावीत मग मुलंही तसंच शिकतं.

६. कुणी ज्येष्ठ व्यक्ती घरी आल्यास तिच्या पाया पडणं हे आपण केलं की मूल न सांगता आपली क्रुती अंगिकारतं, आचरणात आणतं. कुणी बाहेरचं आलं की बंड्या पोएम म्हणून दाखव असं म्हणून नये बंड्याला. बंड्याला म्हणावीशी वाटली तर तो स्वतः म्हणेल.

७. आपलं मुल हे आपल्या प्रेस्टीजचा विषय बनवू नये. त्याला/ तिला त्यांच्या कलाने फुलू द्यावं.

८. आईबाबा दोघेही रोज थोडा व्यायाम करत असतील तर मुलही आपसूक करू लागतं. व्यायाम त्याच्यावर लादू नये तर त्याला तो करावासा वाटेल असं वातावरण, असे विचार घरात असावे.

९. स्वतः वाचनाची आवड जोपासावी. मुलांसाठी असणारी पुस्तकं आणून फावल्या वेळात त्यांना ती वाचून दाखवावीत. मुलांना वाचता येऊ लागलं की त्यांना चित्रयुक्त पुस्तकं आणून द्यावीत. त्यांच्या मेंदूला अशाप्रकारे सकस खाद्य पुरवता येईल. त्यांच्या विचारांना चालना मिळेल.

१०. मुलांना शक्यतोवर घरच्या खाण्याची सवय लावावी. बाहेर कामाला जाणाऱ्या मातांनीही घरचंच खाणं मुलांना द्यावं.

११. मुलांसमोर सारखं मोबाईल घेऊन बसू नये. प्रत्येक गोष्ट ही काही ठराविक वेळेपुरती ठीक. त्याच्या आहारी जाऊ नये हे मुलाला निरीक्षणातून कळतं.

उत्तम आरोग्य हवं असल्यास आजच तुमच्या स्वयंपाकघरातील हि भांडी वापरायची बंद करा

सौभाग्याचं लेणं…’ टिकली ‘…लावा पण जरा जपून…

१२. आपल्या मुलाची त्याच्या समवयस्क मुलाशी कधीच तुलना करू नये. मुल ती करत असेल तर त्याला ती करण्यापासनं पराव्रुत्त करावं. स्पर्धा करायची पण ती स्वतःशी. स्वतःला जास्तीत जास्त चांगलं बनवावं हे मुलाला समजवत रहावं.

१३. कोणालाच उपदेशांचे डोस आवडत नाहीत. मुलांनाही नाही. तू हे कर म्हणण्यापेक्षा तू हे केलंस तर तुझ्यासाठी छान असेल असं मला वाटतय. बघ विचार कर अशा शब्दांत मुलांशी बोललं पाहिजे.

१४. मुलांना शेजाऱ्यांशी, इतर सामाजिक घटकांशी आदराने बोलायला शिकवलं पाहिजे, तेही आपल्या आचरणातून. त्यासाठी आपण आजूबाजूला रहाणाऱ्यांशी सौहार्दाने बोललं पाहिजे.

१५. कोण अडचणीत असलं की आपण त्याला मदतीचा हात दिला पाहिजे मग मुलंही आपलं पाहून तसंच आचरणात आणतील.

१६. स्वतःची कामं स्वतः करायला शिकवावं. स्वत:ची निगा स्वतः राखायला शिकवावं. मुलाला एखादी समस्या सतावत असेल तर लगेच त्यावर तोडगा सांगू नये. ती परिस्थिती त्याची तो कशी हाताळतोय हे पहावं. रेडीमेड सोल्युशन देणं टाळावं. मुल मोठेपणी संयमी व्हावसं वाटत असेल तर त्याला आपटतधोपटत आपलं आपण सावरू द्यावं पण आपण त्याच्या पाठीशी आहोत हेही त्याला ठाऊक असावं.

१७. घरातील कामं प्रत्येकाने केली पाहिजेत. प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर राखला पाहिजे हे पालकांनी आपल्या आचरणातून मुलात पाझरावं.

१८. आपल्या मुलाला एक चांगलं माणूस म्हणून बनवण्यासाठी आपल्याकडे बराच काळ उपलब्ध असतो. त्यातील प्रत्येक क्षणाचा वापर करुन घेतला पाहिजे.. मग बघा इतके छान बंध तुमच्यात व मुलात निर्माण होतील की आयुष्यात कोणतीही छान घटना घडली की त्याला ती प्रथम तुम्हाला सांगावीशी वाटेल तसंच अप्रिय घटना घडली तरी आधार म्हणून तो प्रथम स्वतःच्या घराचा दरवाजा ठोकावेल.

पालकत्वाच्या या सुरेख वाटेवरून चालतण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा.
ब्लॉग आवडल्यास जरून आपल्या मित्रमंडळींत शेअर करा व आम्हाला कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या.

==================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.