परतफेड

आज अनघा रस्त्यावरील सगळ्यांकडेच संशयी नजरेने पाहत होती. तिची सैरभैर नजर कोणालातरी शोधत होती. प्रचंड अस्वस्थ असलेली अनघा रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांवरून एकसारखी नजर फिरवत होती. कारण गोष्टच तशी घडली होती.तिची नुकतीच शाळेत जाऊ लागलेली ४ वर्षांची मुलगी रिया, तिला शाळेतून कोणीतरी पळवून नेलं होतं किंवा तिची तीच हरवली होती.पण गेले तीन दिवस तिचा कुठेच काही शोध लागत नव्हता.
अनघा आणि अजय दोघेही मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पगाराच्या नोकरीला होते. रिया हे त्यांना झालेलं पहिलं आणि लाडकं अपत्य. दोन वर्ष वर्क फ्रॉम होम केल्याने रियाला आईची आणि आईला रियाची फारच सवय झाली होती.
आणि म्हणूनच ऑफलाईन काम चालू झालेलं असतानाही अनघाने रियासाठी थोडे दिवस घरूनच काम करण्याचे ठरवले होते. सकाळी लवकर उठून रियाचे आवरणे,तिला शाळेसाठी तयार करणे, तिला शाळेत सोडणे आणि शाळेतून आणणे या सगळ्या गोष्टी अनघाच करायची. का कोणास ठाऊक त्या दिवशी अनघाला थोडासा उशीर झाला.अनघा शाळेत पोहोचेपर्यंत रिया कुठेतरी गायब झाली होती. अनघाने अजयला फोन करून कळवले .तोही लगेच तिथे आला. शाळेतही सगळीकडे चौकशी केली.रिया कुठेच सापडत नव्हती. आता मात्र अनघाच्या पायाखालची जमीन सरकली.
नक्की कोणी नेलं असेल रियाला सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या मैत्रिणींना फोन करून झाले पण रियाचा कुठेच तपास लागत नव्हता. शेवटी अनघा आणि अजय पोलीस स्टेशनमध्ये गेले रियाचा फोटो दाखवून त्यांनी पोलिसांना हात जोडून विनंती केली आमच्या रियाला लवकरात लवकर शोधा. पोलिसांनी त्यांची यंत्रणा लगेच फिरवली आणि तपासाला सुरुवात केली.
अनघा मात्र ती वारंवार स्वतःलाच दोष देत होती. मी उशिरा गेले नसते तर हे सगळं घडलं नसतं.आजही ती शाळा सुटताना शाळेबाहेर उभी राहिली, तिला वाटायचं आता रिया शाळेतून येईल आणि मम्मा अशी हाक मारेल. पण तिची निराशा झाली.रिया आजही कुठेच दिसली नाही ती गाडीतून घरी निघाली .
तेवढ्यात डॉक्टर प्रियंका, अनघाची मैत्रीण ,तिचा अनघाला फोन आला लवकर माझ्या हॉस्पिटलमध्ये ये मला रियाबद्दल माहिती मिळाली आहे ,आल्यावर बोलू.अनघाला दूर कुठेतरी अंधारात एखादा काजवा चमकावा अगदी तसंच वाटलं .ती लगेचच डॉ. प्रियांकाच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिला समोरच एक बाई दिसली त्या बाईला पाहून अनघाचा राग अनावर झाला. ती त्या बाईला बोलणार तेवढ्यात प्रियंकाने तिला थांबवले ती म्हणाली “अनघा ही तीच बाई आहे ना,जिला सिग्नलवर तू सहा महिन्यांपूर्वी मदत केली होतीस.ही आशा, एका गाडीला धडकली आणि तिच्या हातातली छोटी मुलगी चेंडू सारखी उडून रस्त्यावर पडली त्यावेळी रक्तबंबाळ झालेल्या तिच्या मुलीला आणि तिला तूच माझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होतीस.
तिच्या उपचारांचा खर्च देखील केला होतास.अनघा जरा रागातच म्हणाली हो त्या उपकाराची फेड या बाईंनं अशी केली,माझ्या रियाला माझ्यापासून हिरावून घेतलं.प्रियांका म्हणाली “तुझा काहीतरी गैरसमज होतोय,तिचं पूर्ण ऐकून तरी घे” शेवटी अनघा राग आवरत त्या बाईशी बोलू लागली.आशा म्हणजेच ती बाई म्हणाली ताईसाहेब इथेच या शहराबाहेर असलेल्या बकाल वस्तीत मी राहते. नवरा २४ तास दारू पिऊन घरात पडलेला असतो.ही एवढीशी पोर घेऊन मी कुठं काम करणार म्हणून सिग्नलला उभी राहून काही मिळेल ते खाते.
दोन दिवसांपूर्वी रात्री सिग्नल वरून घरी जाताना आमच्या शेजारीच राहणाऱ्या दिग्या रामोशासोबत मी शाळेच्या कपड्यातील एका पोरीला पाहिलं. मला माहित नव्हतं ती पोरगी कोणयं? पण काल आणि आजपण तुम्हाला एकटीलाच पाहिलं, तुमची नजर कोणाला तरी शोधत होती ,त्यावरून मी अंदाज बांधला आणि त्या वस्तीत गेले त्या शाळेतल्या कपड्यातील पोरीला मी ओळखलं ती तुमचीच पोर होती.त्या दिग्याला कसलीच ओळख न देता मी माघारी फिरले. आणि तडक इथे निघून आले. ‘ताईसाहेब त्यो दिग्या लय डेंजर माणूस हाय, त्याच्यापासून तुमच्या पोरीला लवकर वाचवा’
अनघाला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला, तिने लगेचच अजयला फोन करून बोलावले. पोलिसांनाही कळवले .पोलीस म्हणाले, तुम्ही तिथे लगेच जायची घाई करू नका. आम्ही तुमच्या रियाला त्या दिग्याच्या तावडीतून सुखरूप सोडवू. तो दिग्या आमच्या तावडीतून सुटता कामा नये.
अजय आणि अनघाला रिया कधी दिसेल असे झाले होते.पण पोलिसांनी सांगितल्यामुळे ते लांबच पण वस्ती दिसेल अशा ठिकाणी थांबले. तेवढ्यात फाटकी साडी नेसलेली एक बाई त्यांच्या गाडी समोरून त्या वस्तीत शिरली. त्या बाईच्या पाठोपाठ दोन-तीन पुरुषही त्या वस्तीत शिरले.अनघाला मात्र आता खूपच भीती वाटायला लागली होती.आता हे काय नवीन ही लोकं कोण आहेत? पण अजयने तिला धीर दिला, थोडं थांब पोलिसांवर विश्वास ठेव. ते नक्की आपल्या रियाला सोडवतील असं म्हणून अजयने अनघाला जवळ घेतले. थोड्याच वेळात ती फाटकी साडी नेसलेली बाई दिग्याच्या घराजवळ पोहोचली. तिथे पोहोचताच तिला शाळेच्या कपड्यातील रिया दिसली त्या बाईने उगाच कुरापत काढून दिग्याशी भांडायला सुरुवात केली.
दिग्याही तिच्याशी तावा-तावात भांडत होता. त्या दोघांच्यात आता चांगलंच भांडण जुंपलं. त्याचाच फायदा घेत, त्या बाईच्या मागे आलेले दोन -तीन पुरुष मध्ये पडले आणि त्यांनी दिग्याला पकडलं.त्या फाटक्या साडीवाल्या बाईने पटकन रियाला सोडवलं.रिया खूप घाबरली होती. हे सगळं तिच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं होतं.अजय आणि अनघाच्या आता सारं काही लक्षात आलं, की ती फाटक्या साडीतली बाई तिच्या मागे जाणारे दोन-तीन पुरुष हे दुसरे -तिसरे कोणी नसून ते पोलीस होते.तेच वेशांतर करून दिग्याच्या वस्तीत शिरले होते. त्यांनी रियाची सुखरूप सुटका केली आणि दिग्याला ताब्यात घेतलं.
अनघाने धावत जावून रियाला मिठी मारली.अजयने ही रियाला जवळ घेतले. त्यांच्या काळजाचा तुकडा गेले तीन दिवस त्यांच्यापासून दूर होता. ते तीन दिवस त्यांनी कसे काढले हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. शेवटी अनघा आशाजवळ गेली,तिचे पाय धरतच,अनघा म्हणाली तुझे आभार मी कुठल्या शब्दात मानू? नकळतपणे अनघाने तिच्या हातातलं सोन्याचं कड काढून आशाच्या हातावर ठेवलं. आशा ते घ्यायला तयार नव्हती,ती म्हणाली ताईसाहेब सहा महिन्यांपूर्वी तुम्ही माझ्यावर एक उपकार केलता,त्याचीच परतफेड करायची संधी देवानं मला दिली.
“मला माहिती आहे मी या उपकारांची फेड कधीच करू शकत नाही तरीही माझ्याकडून हे मोठी बहीण समजून घे” असं म्हणत अनघाने आशाला मिठी मारली. गरीब- श्रीमंत, उच्च- नीच हा भेदभाव तिथेच संपला.
दिग्यासारख्या अट्टल गुन्हेगाराला पकडून दिल्याबद्दल आशाला सरकारतर्फे बक्षीस देण्यात आले. अजयने पुढाकार घेऊन आशाच्या नवऱ्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले.अनघानेही बंगल्याबाहेर नोकरांसाठी काढलेल्या खोलीत आशाला राहायला जागा दिली आणि तिला घरकामाला ठेवून घेतली.
अजय आणि अनघाला त्यांची रिया मिळाली. त्याचबरोबर आशाच्या कुटुंबाला एक नवं आयुष्य मिळालं. दोन कुटुंब उध्वस्त होता होता वाचली…
-सुरेखकन्या.
ॲड. अश्विनी सचिन जगताप.
==================
तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.