सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडीत बिरजू महाराज यांच्याविषयी संपूर्ण माहिती

©️®️ सौ.गीता गजानन गरुड
सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडीत बिरजू महाराज यांचे काल दि. 16 जानेवारी 2022 रोजी, रविवारी मध्यरात्री ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. रात्री त्यांची तब्येत खालावली व ते बेशुद्ध झाले. त्यांना दिल्ली येथील साकेत इस्पितळात हलवण्यात आले. तेथे त्यांना म्रुत घोषित करण्यात आले.
पंडीत बिरजू महाराज यांच्या आकस्मिक निधनाने संगीतन्रुत्य जगतात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
१. पंडीत बिरजू महाराजांचं बालपण
पंडीत बिरजू महाराज हे पंडीत जगन्नाथ मिश्रा( ज्यांना आच्छान महाराज या नावाने ओळखले जायचे) व माता, अम्माजी महाराज यांचे सुपुत्र होते. पंडीत बिरजू महाराजांचं मुळ नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म 4फेब्रुवारी 1938 साली लखनौ येथे झाला होता. लखनौ कालका बिंदादीन घराण्याचे ते अग्रणी कथ्थक नर्तक होते.
लहानपणी त्यांना विटीदांडू खेळायला व पतंग उडवायला फार आवडायचे पण आई पतंगासाठी पैसे देत नसे ,पतंग घ्यायला मग ते दुकानदारास आपली नृत्यकला दाखवायचे. दुकानदार खूष होऊन त्यांना पतंग द्यायचा.
बिरजूमहाराज लहान असतानाच त्यांची नृत्यप्रतिभा त्यांचे वडील आच्छान महाराज यांनी ओळखली व त्यांना दीक्षा द्यायला प्रारंभ केला परंतु बिरजूमहाराज अवघे नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मग त्यांचे काका सुप्रसिद्ध नर्तक शंभू महाराज व लच्छू महाराज यांनी त्यांना कथ्थक नृत्याचे धडे दिले.
२. पंडीत बिरजू महाराजांच्या शिक्षणाचा आढावा थोडक्यात
वयाच्या बावीसाव्या वर्षी बिरजू महाराजांना संगीत नाट्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. पंडित बिरजू महाराज यांनी शास्त्रीय संगीताचाही अभ्यास केला. तबला,नाल,ड्रम वाजवणे त्यांना फार आवडायचे. कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण न घेता ते सारंगी,सतार,व्हायोलिन अशी वाद्यही लिलया वाजवत. ते कविता करत,चित्रं काढत. विविध कला त्यांना अवगत होत्या. ते एक गुरु, नृत्यकार, नृत्यदिग्दर्शक, संगीतकार तसेच कवी,चित्रकार होते.
पंडित बिरजू महाराज, वयाच्या तेराव्या वर्षापासून दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत अध्यापन करत होते. पुढे ते भारतीय कला केंद्र संगीत अकादमी, कथ्थक केंद्र या ठिकाणी शिकवू लागले. पंडित बिरजू महाराजांचे शिष्य जगभर पसरले आहेत. निव्रुत्त झाल्यानंतर त्यांनी ‘कलाश्रम’ ही नृत्य,नाट्य संस्था दिल्ली येथे स्थापन केली.
३. गौरव व पुरस्कार
पंडीत बिरजूमहाराजांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमी फेलोशिप 1998 साली देण्यात आली. मध्यप्रदेश सरकारने त्यांना ‘कालिदास सन्मान’ देऊन गौरविले.
2012साली बिरजूमहाराजांना, विश्वरुपम चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
४. पंडीत बिरजूमहाराजांची कारकीर्द
शतरंज के खिलाडी, देवदास, उमराव जान, बाजीराव मस्तानी या व अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. बनारस हिंदू विद्यापीठ व खैरागड विद्यापीठाने पंडीत बिरजू महाराज यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
पंडीत बिरजू महाराजांसारख्या विभूती ‘मरावे परि किर्तीरुपे उरावे’ ही उक्ती सार्थ करतात. देशभरातीलच नव्हे तर जगभरातील मान्यवर आसामींनी त्यांना आदरांजली वाहिली.
पंडीत बिरजूमहाराज यांना भावपुर्ण श्रद्धांजली.🙏🙏
–©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
===============